दसरा, शके 1940
मी रोज सीमोल्लंघन करतोय. आजचा दिवस या एका शब्दासाठी विशेष आहे. गाठोडं शब्दांमध्ये जरासं मोकळं सोडतोय.
घराचे, शहराचे सीमोल्लंघन सायकलबरोबर शरीराने तर केले. मनाचे काय? पाऊस कोसळावा तश्या घराच्या, आप्तांच्या, मित्रांच्या, शहराच्या आठवणी कोसळत. ज्येष्ठाच्या पावसात माती चिंब भिजावी तसे मन भिजत. रोज सकाळी निघतांना बांध फुटत. आषाढा सारखा पाऊस लागला की कोण सावरू शके पाण्याला? स्थळांची, माणसांची, प्रसंगांची दृष्य थेंबांसारखी झरत. बाबांचा वाढलेला बी.पी., आईचे बोलके डोळे आठवत.
कित्येकदा फक्त गाणंच ऐकतो,
मन वज्र हवे अन मनगट ते पोलाद!
पण प्रत्यक्षात हळवं असलेलं/झालेलं मन खंबीर कसं करावं सुचे ना.
घरी फोन करूयात. रडणं ऐकून त्यांचा बि.पी वाढेल. गाडी घेऊन घरी घेऊन जायला येतील.- बाबांनी त्यांचा भयंकर प्लॅन सांगितलेला होताच! "कुठेही काहीही प्राॅब्लेम आला तर मी आणि दत्तू काका फोअर व्हीलर घेऊन येऊ. तसं आमचं ठरलंय." ही काळजी आठवली की अजूनही डोळ्यात पाणी येतं. पत्र दिल्यावर आई बाबांना म्हणाली, "आपण न लावायचा नाहीये."
"गंधार तू एकटा भारत भ्रमणाला निघत असलास तरी संपूर्ण भारत तुझ्याबरोबर असेल." सगळ्यात आधी श्रुती काकूंसमोर ठेवलेला विचार आणि चर्चा झाल्यावर घरातून निघतांना काकूंचं हे वाक्य. ही सगळी वाक्य कानावर पडायची. अंगावर यायची. तेव्हा झालेला परामर्शातील ध्वनि-शब्दार्थ स्फोट आता नाही वर्णू शकत. शब्दनित्यत्व अनुभवलं.(माफ करा फार जास्त तान्त्रिक झालं)
सचिनदादाला देखील असंच झालं असेल का? त्यांना फोन करूयात. नाही, नको. त्यांचे अनुभव माझ्या पेक्षा वेगळे असतील. त्यांनी माझ्यापेक्षा जास्त तयारी केली असेल. मानस्शास्त्रज्ञांबरोबर सेटींग्स वगैरे घेतल्या असतील, निघण्या अगोदरच!
आपणही मानस्शात्रज्ञाची मदत घेतली तर? ठरवलं. फोन केला. अमरावती ते नागपूरचा रस्ता. पाऊस पडत होता. फोनवर ओळखीचा आवाज. कुतूहलाने अधिकच आनंदलेला. चार पाच कुतूहलाची प्रश्न उत्तरं. "मी उद्या फोन करतो. जरा महत्वाचं बोलायचंय. तुझी मदत हवी आहे एक मानस्शास्त्रज्ञा म्हणून."
खूप धीर लागतो कोणाशीतरी मोकळेपणे बोलायला. नंतर आम्ही दोन तीन वेळा बोललो. "जेव्हा वाटेल तेव्हा मुक्तपणे रड. आठवण येत असेल कोणाची तर फोन करून व्यक्त हो. आणि आई बाबांच्या बाबतीत तू असा विचार कर की तुझ्या बरोबर तेही खंबीर होताच आहेत की." खरंच होतं आखलेल्या वाटेने न जाऊन वेगळ्या वाटेचा प्रवासी होण्याला त्यांनी खंबीर पणे उभं राहणं, "माझा मुलगा रस्त्यावर झोपणार नाही याची मी काळजी घेईन" असं म्हणणं, त्यांच्यासाठी मानसिक सीमोल्लंघनच होतं, आहे.
फार कमी मानस्शास्त्रज्ञांच्या सल्ल्यांकडे मी लक्ष देतो, हा दहावी पासूनचा माझा इतिहास आहे. त्यांच्या निर्णयांना-सल्ल्यांना कचऱ्याची पेटी दाखवत भाषेच्या अभ्यासाकडे वळलोय. पण आता मात्र मी स्वतःच तो पर्याय निवडल्याने आणि यंदाची मानस्शास्त्रज्ञा बहीण, मैत्रीण आणि होणारी वहिनी या सगळ्याच नात्यात मोडत असल्याने तिचा सल्ला ऐकला आणि खरंच काही दिवसांनी सीमोल्लंघन केल्यासारखं वाटलं.
प्रबोधिनीतच शिकलोय, "आमी बी घडलो तुमी बी घडा ना" आता प्रयोग करायची वेळ होती.
असाच एक कातर किस्सा-
हिमाचल मध्ये शिरून दुसरा का तिसरा दिवस होता. सुंदरनगर कडे जाणारा रस्ता. 16 कि.मी चा घाट चढत होतो. कितीही उंच वळणं चढावीत. समोर येणारे हिमालयाचे कडे उंचच उंच दिसत होते. एक-दोन किलोमीटर नंतर पाऊस सुरू झाला. ऊन झेलून काळ्या पडलेल्या हिमालयाच्या कड्यांना कृष्ण मेघांनी झाकले तरी ढग त्यांहून पांढरेच दिसत.आणि एकदम वीज चमकत तेव्हा वैदिक देवतांची- इंद्राची, वरुणाची, रुद्राची आठवण करून देत. पुराणातला शिव शंकर हिमालयावर तांडव करतो ही कविकल्पना कशी सुचली असावी याचे प्रात्यक्षिक दिसे. वर चढता चढता पाऊस गार होऊ लागला. धुकं येऊन रस्ता दिसेनासा होई. अगदी माथेरानच्या दौऱ्या प्रमाणे. अगदी मागच्या वर्षीच्या 15 ऑगस्टच्या कसारा घाटातल्या राईड प्रमाणे. वळणा वळणावर माथेरान चढतांना रोहन माझा दादा कसा झाला होता हे आठवंत. भोरघाट चढतांना रचित-रोहन आणि मी अश्या तिघांच्या क्षमतांची केलेली विभागणी आठवत. अश्या चढांवर कोणीतरी पुढे वाट बघत असेल तर अधिक उत्साह वाढेल असंही वाटून जाई.
वातावरणातली आर्द्रता मनात शिरली की बांध फुटायला ढगालाही वेळ घालवावा लागत नाही. निर्माण झालेल्या ऊबेला जरासं शैत्य पाऊस पाडायला पुरून उरतं... आडवार होता दुपारची वेळ. सगळेच आपापल्या काॅलेज मध्ये. कशाला फोन करावा? असं वाटूनही गेलं. पण राहावलं नाही. एक-दोनदा फोन केल्यावर जरा वेळाने रोहनचा फोन लागला. बरं वाटलं.
"माझी मुक्ती प्रकाशली या आकाशी..." (আমার মূক্তী আলোয আলোয এই আকাশে) असं बंगाली गाणं म्हणणं, ऐकणं फार सोपं असतं.
प्रत्यक्षात आपण एका सुशेगी जगात (comfort zone) रमलेलो असतो. आपल्या सगळ्या अहम्, न्यून वगैरे गंडांना पोसत असतो. त्यातून बाहेर पडणं हे पहिलं सीमोल्लंघन असतं.
ते बऱ्याच जणांनी केलं म्हणून आज 110व्या दिवशी गुजरातच्या भुज गावी पोहचू शकलोय. आई-बाबा आणि सयुरी भेटायला येणार आहेत. त्यांची वाट बघतोय.
सम्प्रिः।
ता.क.- मानस्शास्त्रज्ञेचे नाव नमूद केले नाहीये कारण मानस्शास्त्रज्ञाबरोबरचा संवाद नेहमीच गुप्त ठेवला जातो. ठेवायचा असतो. आयुर्वेदाचार्यां प्रमाणेच तिच्याही मी ऋणातंच राहीन...