काल कांदाभजी तळू लागलो तेव्हा आजीची आठवण आली. आणि एकादशी जवळ येऊ लागली तशी ती येतच राहिली. म्हणून हा लेखनप्रपंच!
आषाढी एकादशी जवळ आली की आजीमधे उत्साह संचारायचा. नवमीला कांदेभजी करायचा अट्टहास शरीर थकू लागलं तरी आवरता येत नव्हता. मग आईने जवळची सुट्टी बघून कांदेनवमी करायला सुरवात केली. रविवारच्या सुट्ट्यांचे मुहूर्त चर्चमधे जाणाऱ्यांसाठीच असतात नाही का! आपण आपल्या परंपरा ॲडजष्ट करायला किती सहज शिकलोय. त्यात आपल्या धर्माचं पुरोगामित्व आहे. कळत्या वयात ट्रेनमधल्या हरिपाठात दंग व्हायचो. त्यासाठी नकळत्या वयात आजी बरोबर विठ्ठल मंदिरात जाऊन मस्तकी लावलेला बुक्का आणि हरिभजनाचे कानावर घडलेले संस्कार कारणीभूत असावेत असं आता वाटतं.
कोणे एके काळी अभ्यंगस्नान करून काकड आरतीला मंदिरात जाण्याची सवय आजीला लागली असावी. तिच्या उत्तर काळात ती रात्रंदिवस अभ्यंग स्नानानंतरच्या काकड आरतीत स्वमग्न व्हायचा प्रयत्न करत असे. अवेळी अंघोळीसाठी हट्ट धरत असे. एकादशीला आजीची आठवण येते ती आजीने दिलेल्या या विठ्ठलभक्तीमुळेच. घरात तिच्या हाताने लिहीलेल्या वह्या मी जपून ठेवल्या आहेत. तोच तिने आमच्यासाठी ठेवलेला वस्तुरूपी ठेवा. आज, उदयपुरात हस्तलिखितांवर काम करतांना आजीच्या त्या हस्तलिखितांची आठवण येणेही साहाजिक आहे.
लहानपणी मी तिचं बोट धरून विठ्ठल मंदिरात जायचो. नंतर आधार लागू लागल्यावर तिला मी मंदिरात घेऊन जाऊ लागलो. अगदी नकळत घडत गेलं होतं ते. भजनमंडळांची एक गंमतच आहे. आजी ज्या मंदिरात जायची तिथेही ते घडायचं आणि ट्रेनमधेही तेच होतं. हरिपाठ ऐकत आषाढीला विठ्ठल झोपी गेला की गोकुळातल्या गवळणी फेर धरू लागतात. श्रावण अष्टमीला काला होऊन कृष्ण जन्म झाला की पाळणे म्हणत गणपतीच्या आरत्या सुरू होतात. नंतर वारागणिक विविध देवता एकत्र येऊ लागतात. नवरात्र होऊन जाते. दिवाळी येऊन नाविन्याने रोषणाई करून जाते की कार्तिकीला पहाटेच्या काकड्याने विठ्ठल उठतो आणि पुन्हा हरिपाठ सुरू होतो. हा भक्तीरसाचा मेळ अतूट आहे. तो मंदिरातल्या दगडात नाही, भक्तिमय भजनातच आहे.
आजीने रामरक्षा पाठ करून घेतली. पण रामाची मूर्तिभक्ती तिने माझ्याकडे कधी सोपवली नाही. म्हणून रामभक्तीचा पुरस्कार करणारं आजचं राजकीय हिंदुत्व मला अजिबात आपलंसं वाटत नाही. कासोद्याच्या घराबाजूला राममंदिर होतं. पण तिथला राम घरातल्या देव्हाऱ्यात किंवा घरातल्या भक्तीत कधीच आला नाही. तो फक्त शब्दरूपी रामरक्षेतच राहिला. पण पंढरपुरातला पांडुराया आजीकडून आमच्याकडे अगदी विविध मार्गाने आला. त्याचं मूर्तिरूप दर्शन हवसं वाटावं इतका... आणि म्हणूनच त्याची मूर्ती आम्ही पंढरपुराहून घरी आणली.
आजी अंथरुणाला खिळून होती. तेव्हा आत्याने तिच्यासाठी तिच्या जवळ असावी म्हणून एक विठोबारुक्मिणीची मूर्ती आणली होती. ती घरात आलेली दुसरी मूर्ती. ती पलंगा जवळ ठेवायला जागा नव्हती म्हणून आजीच्याच खोलीतच पण, आजीला दिसतेय की नाही अशी शंका येण्याइतकी दूर ठेवली गेली. आजीला ती दिसत नाही म्हणून, मला काही ती जागा आवडली नाही. मी ती मूर्ती आजीच्या नजरेच्या टप्प्यात- पलंगा जवळच्या खिडकीत ठेवायचा खाटाटोप करत होतो. तेव्हा ती माझ्या हातून खाली पडली आणि पांडुरंग विटेवरून हलला. त्यानंतर दोन-तीन दिवसातंच आजी गेली. भक्तीत आंधळा होऊन मूर्खासारखा त्या घटनेच्या संदर्भ लावायचा मी कधीतरी प्रयत्नही केला होता. पण माझा तसल्या योगायोगांवर विश्वास नाही. जीर्ण शरीरात अडकलेला जीव सुटणं आम्हा सगळ्यांनाच हवं होतं. ते विठ्ठलाने ऐकलं. आणि विठाई शरीरातून निघून गेली.
जाता जाता काया ही पंढरी, आत्मा हा विठ्ठल अभंग शिकवून गेली.
राजकारण्यांनी स्वार्थासाठी समाजावर लादलेलं आणि समाजाने आंधळेपणाने स्वीकारलेलं तथाकथित हिंदुत्व मला मान्य नसल्याने मी निधर्मी जगण्याचा विचार ठाम केला. तरी, त्यामुळे माझ्यावर झालेले हिंदुधर्माचे हे चांगले संस्कार सोडणं मूर्खपणाचेच ठरेल नाही का! चांगलं तेवढं घेऊन पुढे जातांना आजीनेच शिकवलेलं भजन आठवतं-
"पाऊस आला चिखल झाला भिजला हरीचा वीणा
हरिनामाचा गजर होतो विट्ठल विट्ठल म्हणा" आणि पुढे चला.
आठवणींच्या पावसाने विचारांचा चिखल झालाय, हिंदुत्वाची वीणा भिजत बेसूर झालीये. पण हरिनामाचा गजरच तितका- एकसंधपणे टिकून आहे. भोळी-भाबडी-भक्तीच म्हणाची. चांगलं तेवढं स्वीकारा आणि पुढे चला.
॥रामकृष्णहरी॥