मी सायकलचं काम करण्यात मूर्ख आहे. असा माझा ठाम विश्वास होता. माझ्या बरोबर सायक्लवणाऱ्यांनी माझी गती बघून त्या 'ढ'पणाचा स्वीकार केला होता. आणि माझ्या भारतभ्रमणाच्या पूर्वतयारीत तांत्रिक काम, (mechanical work) nut-bolt वगैरेंची कामं मला करायला न लावता त्यांनीच परस्पर करून टाकली होती. दिवाळीच्या सुट्टीत दुकानात सायकल ठेऊन मी शिवथरघळीत निघून गेलो होतो. "सायकलचं काम करायला कोणी तरी आहे, आपण कशाला डोकं घालायचं?" इतकाच विचार. दुकानदाराने सायकलकडे दुर्लक्ष केल्यावर ऐनवेळी मित्रांनीच धावपळ करून कामं पूर्ण केली.
पण इतर वेळी घरातून बाहेर पडल्यावर नकळतच मला माझ्या सायकलची कामं एकट्याने करावी लागली होती. याची मला जाणीव सुद्धा नव्हती.
सिक्कीमला जातांना- सिलिगूडीच्या पुढे एक घाट चढतांना- केरळहून घरी न सांगता आलेला एक सायकलस्वार सामानाचं वजन सांभाळत काहीतरी डागडूजी करतांना रस्त्यात थांबलेला दिसला.
मी थांबून विचारपूस केली. माझं 16,000 किमी. सायक्लवून झालं होतं! तो मात्र पहिल्यांदाच पर-राज्यामध्ये स्वतःचे पहिले 100 किमी पूर्ण करतांना झगडत होता.
मी mechanical works मध्ये कितीही मंद असलो तरी, आता हा 16,000 चा आकडा स्वतःत अहंकार निर्माण करत होता. "आता इतकं साधं काम जमलं नाही तर तुझ्या 16,000 किमी सायक्लवण्याचा काय उपयोग?" अहंकारी मनाने स्वतःला विचारलं. आणि खरतर, मी ते त्याच्या सायकलचं काम अगदी लीलया करून टाकलं.
नंतर स्वतःशीच हसलो. "च्यायला! आपल्याला हे कसं जमलं?" "मी मूर्ख, मी मंद! कोणी ठरवलं?" मीच! आणि मित्रांवर परावलंबी झालो. "मी केलेलं काम माझ्या मित्रांनी बघितलं असतं तर ते आवाक् झाले नसते का?" त्या क्षणी त्यांच्या आठवणीने मन गद्गदून गेलं होतं.
त्या वेळी प्रबोधिनीत शिकवलेलं आणि अनेकदा म्हटलेलं, गुणगूणलेलं गाणं आठवलं-
निद्रेमधूनि जागा होता नवाच मी मजला दिसतो
उलगडणारी दूनिया भोवती मी मध्ये माझा नसतो
साखर झोपेमधली हसरी स्वप्नमालिका अवतरते
कठोर, अवघड सारे सरूनि आसमंत होती हिरवे॥
क्षितीज नवे मज सतत बोलवी साथीला सन्मित्र हवे...
कोणीही कश्यातही मूर्ख नसतं. प्रत्येकाची आकलन गती, विविधविषयांसाठीची कमी जास्त असू शकते. प्रत्येकाने आपापला वेळ घ्यावा. आणि इतरांनाही घेऊ द्यावा.
मुलांना प्रत्येक परीक्षेत शंभारापैकी शंभर मार्क मिळावेत यासाठी पालक प्रयत्नांची पराकाष्ठा करत मुलं आणि शिक्षकांमागे लागलेले दिसतात. संस्कृतच्या बाबतीत तर, कमी मार्क पडले की हिंदी घेण्याचे सल्ले दिले जातात. समोर येणाऱ्या परिस्थितींबरोबर माझ्या हातांना तांत्रिक कामांची सवय होऊ शकली. तशीच, थोडे प्रयत्न घेऊन- दिलेला अभ्यास पूर्ण करून, आपल्या बुद्धीला एखाद्या विषयाच्या अभ्यासाची गोडी आपण लाऊ शकणार नाही का?
वेळ लागेल म्हणून प्रयत्न का सोडावेत?
नववीच्या पुस्तकात शिकतो तेच-
प्रारभ्यते न खलु विघ्नभयेन नीचैः
प्रारभ्य विघ्नविहता विरमन्ति मध्याः।
विघ्नैः पुनः पुनरपि प्रतिहन्यमानाः
प्रारब्धमुत्तमजना न परित्यजन्ति॥
-सम्प्रिः।

