एका जवळच्या मित्राचे वडील कर्करोगासहित आपले शेवटचे दिवस काढत आहेत. दोन वर्षांपूर्वी शरीरातली गाठ त्यांच्या लक्षात आली होती. त्यांनी घरात कोणालाही न सांगता आजार अंगावर काढला. यावर्षी घरातल्यांना शरीरातील अत्यंत बदल लक्षात आले. पण, त्यांनी उपचार घेण्याचे नाकारले. ते स्वतःहून जगाला निरोप द्यायला तयार झाले.
निर्व्यसनी असूनही कर्करोगाचे दुःख वाट्याला येणे- हे त्यांना वेदनेपेक्षा अधिक सलतं आहे. कधीही अपशब्द न उच्चारणारा माणूस असल्या वेदना पचवायला शिवीगाळ करू लागतो. मृत्यू कधीही येईल या विचाराने धीर सुटलेला असतो. हक्काचे प्रेम आणि हक्काचा राग एकाच वेळी प्रकट व्हावा असा चिडचिडेपणा घरातले अनुभवत असतात.
हे समजल्यावर, पाप काय आणि पुण्ण्य काय यावर विचार करत होतो. ज्याचं अंतीम फळ आनंद देतं ते पुण्ण्य आणि ज्याचं अंतीम फळ दुःख देतं ते पाप!
ही खरं तर पुण्ण्यवान माणसं! आपलं आयुष्य कसं संपवायचं ते स्वतः ठरवतात. आपण मुलं म्हणून, सेवा करत, फक्त पितृ-ऋण फेडायचे काम करू शकतो. आणि तेच आपलं कर्तव्य असतं. तोच आपला पुण्ण्य संचय.
आजी गेली. आईचे काका, म्हणजे आमचे अंबरनाथचे आजोबा गेले. जाण्याच्या वेळा प्रत्येकाच्या ठरलेल्या होत्या. आजीला जगण्याची तीव्र इच्छा होती. तिच्या शरीराला होणाऱ्या वेदना बघणे आम्हालाच असह्य झाले. तेव्हा तिला शरीर सोडण्याविषयी समजवावं लागलं. तिच्या सेवेला मुलं, सुना, नातवंडं शेवटपर्यंत होती. आजोबांनी पुतण्या आणि पुतणीला त्रास होऊ नये म्हणून अन्न पाणी सोडून दिले. त्यांचा एकटेपणा- आम्ही जवळ असूनही त्यांना दुःख देत होता. कुणासाठी, काय, कसं, कुठे सोडावं याची तयारी कमावणं सुरू झाल्या पासून करावी लागते. नाॅमिनीच्या रूपात फक्त पहिल्याची- 'कुणासाठी'ची तयारी करून घेतली जाते. बाकी सगळा मनो-बुद्धिचा खेळ!
आजीचं वेदनांवरचं लक्ष विचलित करण्यासाठी म्हटलेली रामरक्षा असो, तिचा हात गार पडेपर्यंत माझा हात तिच्या हातात असणे असो, तिला शेवटचे पाणी पाजणे असो किंवा शरीर सोडतांना गीता ऐकवणे असो. आजोबांना अंबरनाथला रात्री जाऊन केलेली मदत असो -या सगळ्याच अंतघटिका, त्या आठवल्या की मला उगाच दुःखदायी आनंद होतो.
तेच पुण्ण्य असतं का? माहीत नाही.
आजोबा गेले तेव्हा मी रत्नागिरीत होतो. म्हणजे आजोबांची काळजी घ्यायला आई-मामा होते. मी फक्त त्यांचा मानसिक आधार होऊ शकलो असतो. आई म्हणते मी दहाव्या-बाराव्याला रत्नागिरीहून परत यायला हवं होतं. पण, माझा काही श्राद्ध संस्कारांवर फारसा विश्वास नाही. ते फक्त नातेवाईकांच्या मानसिक समाधानासाठी असतात, असं मला वाटतं. मन हलकं करायचे वेगळे मार्गही असू शकतात. पिंडात ब्रह्म बघण्या पेक्षा निसर्गात ब्रह्म बघणं मला अधिक तर्कसंगत वाटतं. भाट्याच्या समुद्रावर मावळती बघतांना गुरुदेवांची- "के लइबे मोर कार्य कहे सन्ध्यारवि" ही कर्तव्यग्रहणावरील कविता म्हणणं आणि अंबरनाथच्या आजी आजोबांचं स्मरण करणं मला अधिक मानसिक समाधान देतं.
आई-बाबा, मामा-मामींची धावपळ सुरू असतांना त्यांना मानसिक आधार द्यायला मी डोंबिवलीत थांबलो नाही म्हणून कधी कधी वाईट वाटतं. घश्यात पाणी अडकेल म्हणून मी एकच चमचा आजीला पाणी पाजलं. अजून पाणी पाजायला हवं होतं का? या विचारानेही वाईट वाटतं.
तेच पाप असतं का? माहीत नाही.
तत्त्वज्ञानात आस्तिकांचा जन्ममृत्यूच्या फेऱ्यात अडकलेला आणि नास्तिकांचा याच जगण्यात सुटणारा -पाप-पुण्ण्याचा हिशोब वाचतांना आणि त्यावर विचार करतांना मला दोन्ही पक्ष पटतात. आज जगत असतांना चार्वाकांसारखं जगावं. पण, उद्याच्या कृतीवर विचार करतांना आस्तिकांप्रमाणे करावा असं मला वाटतं. कारण दोन्ही पक्ष चुकीचे नाहीत.
आणि मृत्यूसमयी- शरीर सोडतांना हीच पूर्वी केलेली पाप-पुण्ण्य आठवतील ना!
गीता-गीतईतले शब्द आजीच्या कानावर पडले तेव्हा तिचे हात-पाय गार पडले होते. पण, त्यानंतर शिरेतून वाहणारा रक्तप्रवाहाचा शेवटचा ठोका मी बघितला. तिच्या मनात, बुद्धीत काय काय सुरू असेल त्या तासाभरात? आयुष्यभरात मनाविरुद्ध घडलेल्या गोष्टी पाप म्हणून तिला आठवल्या असतील का?
वैयाकरणी म्हणून शब्दनित्यत्व मान्य केले तर, आपण उभा केलेला संसार शेवटी तिच्या भोवती होता हे शब्दातून तिला समजलं असेल. हीच पुण्ण्याईची तृप्तता असेल का?
सात-आठ वर्ष एकटं जगत असतांना आजोबांनी एकटं मरण्याची मनो-बुद्धीची पूर्वतयारी केली नसेल का? अधिक जगण्याने पुतण्यांना त्रास होईल या विचाराने इस्पिताळात जायला नाकारणे. हे नकारात्मक एकटेपण येणे- मनाविरुद्ध नसेल किंवा असेलही. अन्नपाणी सोडल्यानंतर त्याच पाप-पुण्ण्याचा हिशोब ते करत असतील का?
म्हणजे, मनाविरुद्ध फळ देणारी, घडणारी कृत्य करणे म्हणजे पाप आणि शांतता देणारं वर्तन म्हणजेच पुण्ण्य असावं. असं तरी आता वाटतंय.
-सम्प्रिः।