रत्नागिरी आणि मी
एकट्याने राहण्याचा निर्णय घेतांना डोक्यात दिवसभरात काय काय करता येऊ शकतं, करायचं आहे याची रूपरेषा अस्फुटपणे आखली होती. त्यात सकाळी आणि संध्याकाळी जसं जमेल तसं सायक्लवायची, रत्नागिरीतले रस्ते धुंडाळण्याची कल्पना होती. सकाळी किल्ल्यावर, संध्याकाळी भाट्यात, कधी भगवती बंदरावर वगैरे जाण्याचं डोक्यात होतं. रत्नागिरी आश्चर्याचे धक्के देत होती. दोन्ही दिवस मला इंद्रधनुष्य दिसले.
आमच्या घराला आंब्याच्या पानांचं तोरण आहे ते निसर्गदत्तच! पूर्वेकडे असलेल्या आंब्याच्या झाडाच्या फांद्या घराच्या पत्र्यावर येऊन पानांची तोरणं स्वतःहून बांधतात. या रत्नागिरीला निसर्गानेच इंद्रधनुष्याचं तोरण लावल्या सारखं वाटलं अगदी मेघदूतातल्या आलका नगरीला आहे तसं! मनात अणि वतावरणात सकारात्मकता भरली होती.
हे घर घेण्या आधी आई बाबांनी माझ्या आणि सयुरीपुढे दोन विकल्प ठेवले होते. पुणे, नाशिक की रत्नागिरी? माझं एम.ए. संपत आलं होतं. मी पुण्याला पूर्त ओळखलं होतं. लहानपणापासून आजी आजोबांनी रत्नागिरीचा जो लळा लावला होता, त्याने सर्वानुमते रत्नागिरीत घर घ्यायचं ठरलं.
माझं आजोळ रत्नागिरीतलं. ज्येष्ठ पत्रकार अरविंदकाका कोकजे माझे आजोबा. सगळ्या उन्हाळी सुट्ट्या आम्ही आंबे खात आजी आजोबांच्या पत्रकार काॅलनीतल्या घरात घालवल्या. कोकण रेल्वे सुरू होण्या आधी बोरिवलीहून सुटणाऱ्या जांभळ्या-हिरव्या रंगाच्या पवन ट्रॅव्हल्स किंवा घाटगे पाटीलच्या बसने आम्हाला बोरिवलीचे आजी-आबा रत्नागिरीला घेऊन जायचे ते चांगलं आठवतंय. पत्रकार काॅलनी म्हणजे रत्नागिरी स्टेशन जवळ, शहरापासून दहा किलोमीटर दूर, वरच्या बाजूला. ट्रेन सुरू झाली आणि आजोबांच्या घरी पोहचणं अधिक सोयीचं झालं. ट्रेन सुरु झाल्याच्या पहिल्या वर्षी अगदी ठरवून सगळ्यांनी कोकणकन्येने प्रवास केल्याची आठवण आई बाबा सांगतात. परवा, बाबा असतांना वरती आजी आजोबांना भेटून आलो. "नंतर निवांत येईन." असं सांगून आलो.
पहिल्या मजल्यावर राहणारा मामा म्हणजे माझ्या आईचा आतेभाऊ. वर, आजोबांकडे आल्यावर खाली मामाकडे न जाताच परतलोय असं कधी घडलं नाही. वाड्याच्या आजूबाजूला 2-3 फणसाची झाडं होती. डावीकडे कलमी आंब्याची तटबंदी असल्या सारखी दोन तीन कलमं रांगेत होती. त्यामुळे वाड्यात शिरलं की गोड घमघमाट असायचा. आमचं मामाकडे जाणं आणि मामीचं फणसाचं सांदण घालणं अगदी ठरवल्या सारखा बेत असायचा. जोशीपाळंदेतून मामाकडे पोहचल्याचं मला फारसं आठवत नाही. फाटक हायस्कूलच्या बाजूला घनदाट झाडांमधून जाणारी एक पाऊलवाट होती. वरच्या आळीतून त्या पायवाटेने चालत पोहचतांना एकदम गावात आल्यासारखं वाटायचं. रत्नागिरीच्या "विकासा" बरोबर मामाच्या वाड्याचाही विकास झाला. पायवाटेसमोर इमारतीची तटबंदी उभी राहिली. आता त्या पायवाटेवर जायचं म्हणे उड्या मारून जावं लागतं.
एकूणच, रत्नागिरीच्या घरात प्रचंड प्रसन्न वाटत होतं. शुक्रवारी संध्याकाळी भाट्यात गेलो, तिथून कुर्लीच्या किनाऱ्यावर गेलो. मुखपट्टी लावण्यावर बराच भर दिला जात होता. मी, खर्च करून उगाच कशाला आपलंच तोंड बंद करायचं? असा विचार करून मोठा रुमाल घडी करून तोंडाला बांधला होता.
तेव्हा लोकांच्या चेहऱ्यावरचं भय आणि मनातली चिंता बघून एक स्वगत लिहीलं-
"मी, ती, हा निसर्ग, आणि त्यात, मानवानेच निर्माण करून सोडलेला तो सूक्ष्म प्राणघातक विषाणू. कांजिण्यांचा विषाणू आपल्या शरीरातच असतो असं म्हणतात. प्रतिकारशक्ति कमी झाली की कांजिण्या येतात. आयुष्यातून एकदाच. विषाणूने कांजिण्या होत असल्या तरी त्यांची गणना पित्तजव्याधीत होते आणि शरीरातली सारी ऊष्णता बाहेर पडते. आयुर्वेदात तीन दोषांपैकी कुठल्याही दोषाचं प्रमाण डळमळलं की अस्वास्थ्य निर्माण होतं. एखाद्या रोगाकडे शरीराचा अंतर्गतभाग म्हणून बघायचा दृष्टिकोन मला आयुर्वेदाने दिला. आयुर्वेदाच्या दृष्टीने कोरोना हा कफजन्य रोग आहे. कफावर नियंत्रण मिळवलं की तो विषाणू तग धरू शकतच नाही.
एकांतवासासाठी रत्नागिरीत आलोय. डोंबिवलीत असल्यापासून त्या रोगाची लक्षणं आणि बरे झालेल्यांच्या प्रतिक्रिया बघून अधून मधून वैद्याबरोबर चर्चा करत होतो. शिशिरऋतूत पसरलेला आजार ग्रीष्मात नियंत्रणात आणता येईल, वसंतात वमन केलं तरंच!
वैद्यांनी एक छान दृष्टांत दिला आहे. "सांडलेल्या साखरेला मुंग्या लागल्या की आपण मुंग्या मारतो की साखर झाडून काढतो?" मानवी शरीरातल्या कफावर विषाणू जगत असेल तर विषाणूचा प्रदुर्भाव होऊच नये म्हणून कफहनन करावं. #सायकलोपासना साठी पावसच्या मार्गावर होतो. विश्वेश्वराच्या घाटीवर पोहचलो. WHO ची पाश्चात्य अभ्यासानुसार दिली गेलेली सतर्कता, अॅलोपथीच्या दृष्टीने बरोबर असेलही कदाचित् पण, आयुर्वेदाच्या ठायी अंतूबर्व्याचे शब्दात, "विश्वेश्वराच्या घाटीवर कुराण वाचून दाखवण्या सारखं आहे. तो बोंबलतोय तिथे. त्याचा ह्यास उपयोग नाही, ह्याचा त्यास उपयोग नाही."
आपण आधुनिक रोगांकडे वेगळ्या दृष्टीने, चरकाच्या/वाग्भटाच्या दृष्टीने बघू शकतो का? तेवढे सामर्थ्यवान वैद्य निर्माण होतील असा अभ्यासक्रम आपण विद्यार्थ्यांना देऊन त्यांना प्रयोगक्षम, कृतिशील करतो का? की एमबीबीएसला प्रवेश न मिळाल्याने बीए एमएसच्या डीग्र्या घेऊन अलोपथीची औषधं देऊ करणारे डाॅक्टरच आपण बनवू इच्छितो?"
मी पंचकर्मातील वमन करायचं ठरवलं आणि परतलो. तसा रत्नागिरीतल्या वैद्यांचा संपर्क मिळवला. पुढल्या आठवड्यातल्या गुरुवारची वेळ दाते वैद्यांकडून घेतली. जिन्या जवळ लहान सायकली ठेवल्या होत्या. त्यांच्या जवळ माझी सायकल जिन्याला कुलूपबंद केली. तोच रात्री इमारतीच्या व्हाअॅट्स अॅप ग्रूपवर कोणीतरी "ही सायकल जिन्यात लावली आहे." असं फोटोसहित टपाल (post) टाकलं.
खरं तर तो प्रकार माझ्या डोक्यातच गेला होता. कुणाच्याही रस्त्यात न येणारी माझी सायकल काहीतरी खुचपटं काढायची म्हणून कुठलातरी नियम दाखवत बाहेर ठेवायला मला सांगितलं होतं. रिकामटेकडे धंदे! सहकारी गृहनिर्माण संस्थेतला अतिशिक्षित असहकार भोगण्याचा हा पहिला प्रकार होता. मी सायकल दुसऱ्या मजल्यावर उचलून आणली. घरात ठेवली. लहानमुलांच्या इतर सायकली तश्या तिथेच होत्या. मी नवीन. उगाच वाद नकोत म्हणून शांत राहिलो. असले खवचट प्रकार इथे घडणार असतील तर अवघड आहे. ठकासी ठक व्हावे लागेल. मनोमन ठरवले! तसा पुण्याचा दोन अडीच वर्षांचा अनुभव होताच गाठीस
19/3/2021
डोंबिवली.