सीट
काल संध्याकाळी कचेरीतून बाहेर पडलो. मनात औदासीन्य भरून राहिलं होतं. #21dayschallenge संपलं! एकवीस दिवस सायक्लवायला मिळालेलं कारण, सायक्लवून झाल्यावर जगाला ओरडून काहीतरी सांगायला मिळालेलं "व्यासपीठ" उद्यापासून नसणार.
आता फक्त आपणच स्वतःला प्रोत्साहन देऊन सायक्लवणारे. अश्यावेळी अर्णवची आठवण आली तर, त्यात काय नवल? 21 days ला धरून पुढे १०० दिवस सायक्लवलं तेव्हा आम्ही एकमेकांना साकाळी घराबाहेर काढायची कामगिरी करत असू.
21 दिवसांची मोहिम संपल्याच्या विचारांनी मन अस्थिर होत असतांना माझी नजर माझ्या सीट वर गेली आणि, "आता बदलायला हवी." या विचारासरशी मन कमालीचं हळवं झालं.
ती सीट खरेदी करण्यापासून साऱ्या आठवणी जणू डोळ्यांसमोर आल्या. डिकॅथ्लाॅन मधे रचित बरोबर गेलो होतो. सगळ्यात महागडी सीट विकत घेतांना- सचीन दादाला केरळात सीटकव्हर मुळे घर्षण होऊन झालेल्या त्रासा विषयी त्याच्या ब्लाॅगवर वाचलं होतं. "पुढच्यास ठेच मागचा शहाणा" ह्या उक्तीनुसार- एवढं महागडं सीट घेतांना माझ्या मनात अजिबात दुसरा विचार आला नव्हता.
पण ती किंमत पाहून माझी सीट हा आमच्यात कुतूहलाचा आणि चर्चेचा विषय बनली होती. त्या चर्चेतला शब्दब्रह्मच काल मन गद्गदवत होता. काश्मीरात अस्सरला (भटोत) पोहचतांना एक घाट चढतांना तहान शमवायला रस्त्याकडेला- दरीच्या बाजूला असलेल्या एका घरावरील दुकानात शिरलो. तेव्हा त्या दुकाना समोरील झाडाला टेकवून सायकल ठेवली. पण चढ खडा असल्याने आणि सायकलवरील एकूण वजनाचा भार सहन न झाल्याने, जो भाग झाडाला टेकला होता तिथून सायकल मागे आली. सायकलीला झाडाने खरचटले. सीटवर मोठा व्रण झाला, तो कायमचाच. त्यावेळी झालेली मनाची धाकधूक अजूनही त्या सीटवरील व्रणाकडे पाहून होत असते. मला वाटलेलं आता जेल बाहेर येणार आणि सीट निष्कामी होणार. सीट खमकी होती. तिने मला अजिबात त्रास दिला नाही. ना मला पॅडेड शाॅर्ट्स घालाव्या लागल्या ना कधी औषधं लावण्याची वेळ आली. पॅडेड शाॅर्ट्स मला टाळायच्या होत्या स्वच्छतेच्या कारणांनी. माझा प्रवास पावसा पाण्यातला. त्यात त्या वाळणं कठीण. आणि भर उन्हात साक्लवायची वेळ आल्यावर त्या कापडाने घर्षण वाढून अधिक त्रास होऊ लागला. सुरवातीला तीन चार शाॅर्ट्स बाळगल्या. पण दोन महीन्यांतंच त्यांना निकालात काढले. आणि माझे मलाच कपड्यांचे सुशेगीवलय समजत गेले. सीटने कधी निराशा केली नाही.
दुपारचे ऊन आणि उन्हाच्या झळा यांमुळे सीट जेलवरील आवरण, जे आता झिजून पातळ झालंय आणि वीरत चाललंय ते अधिक सैल सुटलेलं दिसलं. मग वाटलं, ठाण्याला गेलो की घेऊया नवी सीट. पण विचार केला आता सीटकव्हर चालू शकेल संपूर्ण सीटचा खर्च करून मोहिमेला कुठे निघायचंय!
अर्णव आणि रचित दोघांशीही सीटची आठवण काढून फोन वर मनमोकळ्या गप्पा झाल्या. तेव्हा बरं वाटलं. त्या सीटची नेमकी किंमत मी विसरलो होतो. रचितच्या लक्षात होती. २९९९/- ची सीट सवलतीत २४९९/- ला घेतलेली. रचित म्हटला, "वसूल ना भाई."
अजून काय हवं?
#सायकलोपासना #cyclopasana
#dombivalicycleclub