सोमवार, ३१ डिसेंबर, २०१८

स्वप्न गोजिरे असे जगावे

सरळ दक्षिणेकडे जातांना रस्ते डावी वळणं घेऊ लागले. वेगवान वारे वेग अवरोधू लागले.  तस्तसं जाणवू लागलं,
आता रस्ता संपणार, जमीन संपणार... आणि समोर उरणार अथांग पसरलेला सागर, महासागर. पुढे काय? दाटून आली एक खिन्नता रस्ता संपण्याची. एक शांतता, रोहतांगच्या पलिकडल्या झिंग झिंग बार पासून, गूगल वर न दिसणाऱ्या पत्थरी ज्योत पासून दक्षिणेकडील प्रवास पूर्णतेची, शांतता! डोळे शोधू लागले तीन लाटा, तीन दिशेकडच्या- या भूमीचे पाय धूणाऱ्या; शोधू लागले एक चेहरा स्फूर्तिदायी, या प्रवासाला, विवेकाचा, आनंदी, मानवांमध्ये इंद्र ठरलेल्या नरेंद्राचा, योध्या संन्याश्याचा, स्वामी विवेकानंदांचा!
त्या उन्हात, वाऱ्यांचा आघात सहन करणाऱ्या नारळीच्या झापांचा आवाज ऐकणाऱ्या घामट्ट शरीरावर उभे राहणारे रोमांच बरंच बोलत होते. मी कन्याकुमारीत पोहचलो होतो. स्वप्न जगत होतो. या प्रवासा बरोबर स्वप्न जगायला शिकलो होतो.

"स्वप्न जगणं" किती पुस्तकी वाटतात ना हे शब्द? धनलालसेत न अडकलेली स्वप्न जगता येऊच शकतात. किंबहुना ती जगण्यासाठीच बघायची असतात. याची आता खात्री पटली आहे. पैसा कितीही कमावला तरी तो कमीच पडतो. पैश्याची स्वप्न पूर्ण झाली तरी त्यात संतुष्टी नाही. म्हणून ही धनलालसा नसण्याची अट!
कुवारबाव ते रत्नागिरीचा चढ उतार सायकलने पार करायचाय, भाट्ये समुद्र, आरे वारे मार्ग, पावस, गोवा आणि आताचे कन्याकुमारी! अगदी लहानपणापासून बघितलेली, बोलून दाखवलेली, बरीचशी चर्चिलेली स्वप्न. जगलो.
संकल्पच असे करावेत की स्वप्न जगता यायला हवीत. स्वप्नच अशी बघावित की त्यातून देशहिताचे काम घडू शकेल. हे कुठेतरी प्रबोधिनीने शिकवलं.
काम केलं की सोयी होत जातील. असा विश्वास गीतेने दिला.
जाणतेपण ते झपाटलेपण ही मालिका प्रवासात निवांत वेळ मिळाला की बघत होतो. स्वप्न जगणारा मी एकटाच नाही हे समजलं. सगळेच स्वप्न का जगू शकत नाहीत? असा प्रश्न बरेचदा पडला  प्रबोधन गीतातलेच काही शब्द बदलले, ते असे-

संकल्पांनी बळ मिळवावे
संकल्पांनी बळीष्ठ व्हावे
उघड्या डोळ्यांनी हे दुर्लभ
स्वप्न गोजिरे असे जगावे

आजवरीचे स्वप्नद्रष्टे
धनचिंतेने रात्री निजले
नको तयांचे शब्द ऐकूनि
नकारांनी स्वप्न निजविले
स्वप्न जयांचे ध्येय झाले
स्वप्ननिष्ठ संकल्पचि केले
उघड्या डोळ्यांनी ते दुर्लभ
स्वप्न साजिरे जगते झाले

संकल्पांनी बळ मिळवावे
संकल्पांनी बळीष्ठ व्हावे

ख्रिस्ती नववर्षा निमित्त सगळेच नवीन संकल्प करतील. अगदी आदर्श वगैरे. त्यातले किती स्वतःच्या स्वप्नांकडे घेऊन जाणारे असतील? किंबहुना स्वप्नांवर विचार केलाय का कधी? परीक्षा पास होण्याची पराधीन स्वप्न बघण्यापेक्षा एखाद्याला सहज शिकवता येईल इतके विषयग्रहण पक्के करण्याचे स्वप्न किंवा  संकल्प करून बघा, मार्कांची आसक्ती दूर होते.
हे प्रवचन देण्यासाठी एक किस्सा घडला. योगायोग, नियती, मक्तूब, सगळंच!
डाॅ. गौरी माहूलीकरांची भेट.
नाताळ्याच्या सुट्टीच्या काळात केरळात पोहचलो होतो.शाळा-महाविद्यालये बंद. कामाशिवाय नुस्ती सायकल चालवून कन्याकुमारीला पोहचण्याची इच्छा सोडल्यास बाकी काहीच प्रेरक नाही. कोची जवळ चिन्मय विश्वविद्यापीठ असल्याचं समजलं. माहूलीकर मॅडम कुलगुरू असल्याचं ऐकलं. म्हटलं जाऊन, बघून तर येऊया. कोचीहून निघत गूगलबाबाच्या मार्गदर्शनाखाली पेप्पथी(उच्चारण-पेबदी) गाव गाठलं. विश्वविद्यापीठापाशी पोहचलो. वेदांत्यांचे विद्यापीठ. समोर इमारत दिसत होती. पण भला मोठा वळसा घालत, जरासं चुकत, मुख्य दारापाशी पोहचलो. माहूलीकर मॅडमचा कुठलाही संपर्क नव्हता. मी मिळवण्याचा प्रयत्नही केला नव्हता. मुंबईहून आलोय. माहूलीकर बाईंना, मा. कुलगुरूंना भेटायचंय. असं सांगत त्यांच्या खोलीत प्रवेश मिळवला.
त्यांना माझी ओळख ठेवण्याचं कारणही नव्हतं. त्यांनी सहा वर्षांपूर्वी, मी स्नातकाच्या शेवटच्या वर्षाला शिकत असतांना एकदाच माझ्याशी संवाद साधला होता. मुंबई विद्यापीठाची रामटेकला अभ्याससहल गेली होती. आषाढाच्या पहिल्या दिवशी राज्यस्तरीय चर्चासत्र तिथे आयोजित केलं होतं. मी पहिल्यांदाच रामटेक बघत होतो. मेघदूताचं रामटेक! स्वप्न बघायची एकही संधी सोडत नाही ही जागा आणि मेघदूत. तीन दिवसांपैकी एका रात्रीच्या जेवणाच्या वेळी त्यांनी माझी चौकशी केली होती. पुढे काय करणार म्हणून!
मी त्यांच्या खोलीत प्रवेश घेतला. आणि हा संपूर्ण प्रसंग सांगितला. मेघदूताच्या मार्गाने प्रवास सुरू केला होता हे सांगितलं. नंतर अभिमानाची गोष्ट एकच होती की, नव्याने ओळख झालेल्या या गंधार बरोबर फिरत कुलगुरूंनी संपूर्ण विद्यापीठ दाखवलं. शंकराचार्यांचं जन्मस्थान आणि घर दाखवलं. जेवणही केलं. अजूनही तो मी नव्हेच असं वाटतंय.
चिन्मय विद्यापीठ भारतातल्या मोजक्या पाच भारतीय प्रयोगशील विद्यापीठांपैकी एक आहे. माझे अनुभव सांगतांना अभ्यासाचा दृष्टीकोन, त्याचा शैक्षणिकस्तरावर होणारा परिणाम आणि वेदांत हा विषय सोडू शकलो नाही. चंगळवादाकडे झुकणारी वाढती वृत्ती बघतांना विवेकानंद आठवत होते. जगापर्यंत वेदांत पोहचवायला सांगणारे. आपण आपल्या शिक्षणात किती विचार करतो वेदांताचा? गुणात्मक विकास सोडून गणनात्मक विकासाकडे सहज प्रवृत्ती असते. सगळ्यांचीच!
आपल्या संकल्पामध्ये गुण आणि गणन यांचा योग साधता यायला हवा. जगायला पैसा आवश्यक असला तरी पैसा म्हणजेच सर्वकाही नाही आणि पैश्या शिवायही जगता येणार नाही. मग पैसा किती असायला हवा? यातला योग साधता आला की, कुठेतरी दिलीप आणि पौर्णिमा कुलकर्णी यांच्या सारखं समाधानी आयुष्य जगता येतं. माझी काहीच ओळख नसतांना आनंदाने पाहूणचार करणारी जागा लहान असलेली पण मनाची दारं खुली असलेली घरं उभी राहतात. नाहीतर मोठी, रिकामी, दारं बंद असलेली घरं भारतात कमी निर्माण झालेली नाहीत.
असो,
सायकलवरून कन्याकुमारी बघायची स्वप्न अनेकांनी बघितली आहेत. त्यांना ती प्रत्यक्षात उतरवण्यासाठी शुभेच्छा देतो आहे.
माझ्या मनातली शांतता आणि खिन्नता उगवत्या सूर्या बरोबर मावळली नसती तर नवलंच. पूर्व बोलावतेय. पूर्वांचल बोलावतोय, उगवत्या सूर्याची भूमी बोलावतेय...
कन्याकुमारी, 1/1/2019

शनिवार, २२ डिसेंबर, २०१८

पुनश्चारम्भ

दिवस 175, 22 डिसेंबर 2018
बंडीपूर, 76 कि.मी.

पुनश्चारम्भ

काहीच लिहू नये असं वाटतंय... कारण सविस्तर लाहीणं म्हटलं की घटनांचा बारकाईने विचार करावा लागतो. आज तसा करणं व्यर्थ वाटतंय.
मैसूरु मध्ये लांबवलेला निवास गीतेच्या विचारांनी सुरू झाला होता आणि गीतेच्या विचारांनी संपला. "नसे दुःखात उद्वेग सुखाची लालसा नसे..."
कधी कुठे कशी राहण्याची व्यवस्था होईल याची कसलीही निश्चिती नसते. कुणाच्यातरी घरी राहणं म्हटलं आणि यजमानच खुलत नसेल तर  आपणही किती बिंधास्त व्हावं यावर मर्यादा येतात. तर कधी कधी भाषा प्रांत कसलंच बंधन आड येत नाही. अगदी खुलेपणाने आनंदाने आपुलकीची भाषा अनुभवता येते.
केंद्र सरकारच्या भारतीय भाषा संस्थानाला भेट दिली. त्या दिवशी संचालक रजेवर होते. सहनिर्देशकांना (उपसंचालक) भेटलो तेव्हा त्यांनी संचालकांना भेटण्याचा आग्रह धरला. झोकून देऊन भाषांसाठी काम करणारी सगळीच मंडळी.

गीताजयंतीची तिथी होती. संस्थेच्या आंतरराष्ट्रीय अतिथिगृहात आलिशान निवास व्यवस्था उपसंचालकांनी केली होती... सुरक्षा रक्षकाने अतिथिगृहाच्या मुख्य दारापासून शंभर-दीडशे मीटर दूरच सायकल उभी करायची खूण केली. सवयी प्रमाणे चष्म्याच्या डब्यात वेगमापक ठेऊन चेनने बंद होणाऱ्या सायकल समोरील खोक्यात ठेवला. इमारतीच्या वर कॅमेरे वगैरे लावलेले दिसत होते आणि सुरक्षा रक्षक येण्या जाणाऱ्याला त्रास देतोय हे बघून मनात कुठलाही नकारात्मक विचार न घेता तिथूनच चार नग सामान उचलून आधी आत आणि नोंद वगैरे झाल्यावर वर पहिल्या मजल्यावर घेऊन गेलो.
एखादे ठिकणी पाकीट ठेवले असेल आणि सातत्याने ती जागा न्याहाळत बसलो तर आणखीन चार लोकांचे त्या जागेकडे लक्ष जाणारंच. या न्यायाने उगाच सायकल कडे फिरकून काही व्यवस्थित आहे का हे तपासायचे वगैरे टाळले. याच न्यायाने आजवर गोप्रो कॅमेरा वगैरे अगदी सुरक्षित राहिलेत. गावात अगर मंदीरात रात्रभरात सायकलवरचं सामान कधी कोणीही उघडून बघितलेलं नाही. आज काहीतरी वेगळं अनुभवणार होतो. सायकलवरचे दोन ताणदार दोर (बंजी काॅर्ड्स); राजस्थान मध्ये अश्वशक्तिधारी दुचाकीच्या धडकेत बॅग तुटल्यामुळे या दोरांचा वापर अनिवार्य झाला होता. ते ताणदार दोर जागेवर नव्हते. कुणी गरजू माझी गरज न समजल्याने घेऊन गेला असेल. डोक्याला फार त्रास न करता बॅगेतून दुसरा ताणदार दोर काढला. एकदम लक्षात आलं. सायकलस्वाराच्या गरजा न समजणाऱ्याला वेगमापका विषयी काही जाण असण्याची काय खात्री? ते एक घड्याळ आहे असं समजून ते गायब झालं होतं. 9250 कि.मी. पेक्षा जास्त अंतर पार केलंय म्हणणाऱ्या मला  शेवटचा बघितलेला 9268 कि.मी.चा आकडा आठवला. बॅग उपसून बघतांना आणि पुन्हा खोली तपासतांना तो आकडा सोडून द्यावा लागेल यासाठी मन तयारी करत होतं.
अनेक स्वप्न जगतांना आत्ता आत्ता बघितलेलं मुल्यवान चार शून्य बघायचं स्वप्न आता राहून जाणार होतं. जगाला दाखवणारा रेकाॅर्ड वगैरे करायला हा प्रवास सुरू झाला नव्हता. त्यामुळे कुठलाही संकल्प वगैरे मोडला नव्हता. अहंकाराला पोषण देणारे अंक मात्र सुटले होते.
त्यामुळे फार विचार न करता निघूया असं ठरवलं. पण, हे सगळं बघणारे आणि त्यांच्या जीवाला लागलेले मित्र बरोबर होते.
भाषांतर शास्त्राचा अभ्यास करायला आलेला सोमय्या महाविद्यालयातला मित्र नयन आणि कालच नवीन ओळख झालेले त्रिपुराहून आलेले जयकुशल आणि वाराणसीहून आलेला शिवम्... लेखी नोंद झाल्या शिवाय मी जाऊ नये यावर ते ठाम होते. गेलेलं परत मिळणार नाहीये मग वेळ घालवून मी ठरवलेल्या आजच्या स्थळाला, बंडीपूरला पहचू शकणार नाही म्हणून घालमेल होत होती. 10,000 चा आकडा बघू शकणार नव्हतो तर निदान ख्रिस्ती वर्ष संपतांना दक्षिणतम तटाला, पोहचण्याचे तरी साधूया म्हणून निघण्याच्या मनःस्थितीत होतो. तर दुसरीकडे नोंद नीट ठेवायला हवी म्हणून दुसरं मन सांगत होतं. शनिवार-रविवारची सुट्टी बघता अधिकारी वर्ग तर भेटू शकणार नव्हता. पत्र लिहीलं. नयनने सगळी जबाबदारी स्वीकारली होती. पत्र अधिकाऱ्यांपर्यंत पोहचवायचं. वेगमापक जरी नाही मिळालं तरी एक हमी पत्र मिळवायचं वगैरे.  आपल्यासाठी या मित्रांचा उत्साह बघितला की, "केन रत्नमिदं सृष्टं मित्रमित्यक्षरद्वयम्" हे वाक्य सहज आठवून जातं.
माझा प्रवास सुरू झाला.

"नसे दुःखात उद्वेग सुखाची लालसा नसे" वगैरे शब्द आठवत होते. त्या आलीशान खोलीत गेल्यावर माझ्यासाठी आवश्यक असणारे स्वच्छ संडास-स्नानगृह,  कपडे वाळवायला पंखा, दाढी करायला आरसा सोडल्यास बाकी सगळ चैनीसाठी किंवा अनावश्यक होतं. चैनीसाठी गरम पाण्याची सोय, टि.व्ही-सोफासेट वगैरे बैठकीची खोली, गॅलरी  अश्या काही अनावश्यक सुविधा होत्या. मन हळवं होत होतं ते खरं तर पुढच्या शब्दांनी, "गीताई आई माझी, मी तिचा बाळ नेणता, पडता रडता घेई उचलूनि कडेवरी..." डीकॅथलाॅन मधून नवीन वेगमापक आणि ताणदारदोरीचा जोड घेतला.
मैसूरु सोडले. आराम महागात पडला होता असं वाटत होतं. दत्त पौर्णिमेची तिथी होती. दक्षिणधृवाकडून मकर संक्रमण सुरू होण्याचा दिवस होता. तसा मूहुर्तंच! दत्त म्हणजे दिलेला. दा धातूचे क.भू.धा.वि. रूप. मागच्या वर्षी गिरनार चढतांना. "दत्तं दत्तं किं दत्तम्?" असा प्रश्न स्वतःला विचारत होतो. आज त्या प्रश्नाचं एक भौतिक उत्तर मिळालं होतं. उत्तर मिळालं की समाधान झालंच पाहिजे, नाही का?

बंडीपूरच्या वेशी पाशी मुरारजी देसाई निवासी शाळा आहे. इथे विद्यार्थ्यांबरोबर संवाद साधला आणि निवासाची व्यवस्था करविली.