रविवार, ९ जून, २०१९

सुरुवात

9/6/2019 काशी, उत्तर प्रदेश
मला गाण्यातलं समजत नाही फारसं. पण काल सायक्लवतांना सकाळच्या कोवळ्या ऊन्हात देस राग ऐकावासा वाटला. ऊन वाढत  जाऊन पारा पंचेचाळीसीपार गेला असावा. ओसाड रस्त्यावर दरबारीची गंभीरता जाणवली... सारंगीचा आवज सातत्याने डोक्यात होताच. उत्तर प्रदेशात नुकताच शिरलो होतो. कजरा मोहब्बत वाला आणि बरेलीच्या बाजारातली हार्मोनियमची अल्लड साथ होतीच.
काशीत पोहचल्यावर तिथलं वातावरण कसं असेल या कल्पनेत रमलो.
म्हणून लिहून काढलं-
"
इथल्या वातावरणात सारंगी आणि सनईचे स्वर आहेत फक्कड तबल्याचा ताल आहे. हार्मोनियम चा अल्लड पणा  आहे. वाऱ्यात देस राग वाहत असतो आणि स्थिर असलेल्या जमिनीवर  गंभीर असा दरबारी. संध्यासमयी गंगेबरोबर यमन वाहत येतो. 
आणि काशी विश्वेश्वराच्या मंदीरात?
पूर्ण असूनही अपूर्ण राहिलेला षड्ज न मिळणारा मारवा भक्तांत असतो तर, स्थिर, संथ चालणारा ख्याल गाभाऱ्यात पखवाजासहित घुमत असतो.
काशीच्या या वातावरणात हरवून जाऊ म्हणतोय...
"
सायकल मिळून आज एक वर्ष झालं. हे पृष्ठ सुरू करतांना, सायक्लवणं वगैरे ठीक आहे. त्या सगळ्यात मी तंत्रज्ञानावर किती अद्यतनित होऊ शकीन ही शंकाच होती. त्यावेळी @sahil raje⁩ ने जबाबदारी स्वीकारली म्हणून हे पृष्ट अस्तित्वात आलं. 17,828 कि.मीचा पल्ला पार करून काल रात्री काशीत पोहचलोय.
हा निव्वळ योगायोग आहे. ईशान्यभारतानंतरच्या माझ्या तारखा ठरलेल्या नाहीत. पंधरा ऑगस्ट पर्यंत घरी पोहचायचं तेवढं फक्त ठरवलंय.
@mithilesh birla नियोजित केलेला मार्ग टंकित करायला मला मदत करत होता. मी काशीला येऊन थांबलो होतो. इथून पुढे ट्रेन ने यायचं हे सगळ्यात पहिले नियोजन, विचार. "आता इतका आलायस तर घर पर्यंत ये ना सायकलने..."  त्याचं म्हणणं पडलं. मग, कट्ट्यावर @Akiee Watulkar शी बोललो. @Arnav Kulkarni Marcella चं म्हणणं होतं, "तू ठरव." तर, @Rohan Sakhare दादा म्हणाले, "मला तर वाटतं सायकलने ये. पण, शेवटी तू ठरव. तुला करायचंय." 17-18 हजार किलोमीटर नंतर दीड दोन हजार किलोमीटर करायला काय हरकत आहे? ठीके करूया, म्हणत हात न लावलेल्या छत्तीसगडमधून मार्ग काढला.
टंकित केलेला मार्ग आणि पत्रक तयार झालं. ACT110चा थांबक ही यात्रा झेलू शकणार नव्हता. नवीन सायकल हवी होती. तिच्यासाठी प्रायोजक शोधायचा होता, प्रायोजकत्वावरच ती मिळवायची हे ठरवलं होतं. @Sahir Shaikh भाईंना भेटलो. त्यांची भेट ही केवळ सायकल मित्र संमेलनामुळे घडलेली. BIKE PORT Cycling हे कल्याण मधलं दुकान लांब पडत असल्याने तिथे फारसं गेलो नव्हतो.साहिर भाईंनी स्वतःचे संपर्क वापरून Bergamont Bicycles- Bergamont India ची हेलिक्स 3.5आय्  ही सायकल मिळवून दिली. अट साधी होती. एकतीस मार्च पर्यंतचा मार्ग पूर्ण केल्यावर सायकल माझी. त्या आधी सायक्लवणे सोडलेस तर सायकल परत करायची. प्रवासातला सायकलवरचा सगळा खर्च मलाच करायचा होता. बँकेत पन्नास हजाराच्या आसपास पैसे होते. तयारी करतांना खर्च कश्यावर करावा आणि कश्यावर करू नये हे अनुभवा शिवाय समजणार नव्हतं. समजत नव्हतं. @Sachin Gaonkar सरांचं मार्गदर्शन घेतलं होतं. पण तरीही खर्च कुठे आणि कसा करावा लागेल या विषयी स्पष्टता नव्हती. दिवसाचा खर्च किती होईल? "शंभर रुपये!" असला विचार डोक्यात घेऊन पैश्याची चिंता न करता बाकीची कामं सुरू होती. सगळ्यांचं म्हणणं होतं पैश्याची व्यवस्था आधी कर. प्रायोजक शोध. त्यासाठी पत्र कसं बनवायचं हे शिकण्यापासून सुरुवात. त्याबाबत @अश्विनी मयेकर यांचं मार्गदर्शन अतिशय उपयुक्त ठरलं. आई-बाबांनी संभावित खर्च लिहायला सुरुवात केली. तोवर त्यावेळी भरमसाठ वाटलेला खर्च म्हणजे नऊ हजाराचे पॅनियर्स (मागच्या बॅग) आणि चार हजाराचे झीफलचे मागचे कॅरीयर करून झालेला होता. तयारी साठी एकीकडे छोटा मोठा खर्च सुरूच होता, वेगात. तर, दुसरीकडे पैश्याची जुळवा जुळव.  @Madhav J Joshiसर, @Jayant Falke sir, डोंबिवलीकर सत्कार समिती, ज्ञान प्रबोधिनी-डोंबिवली विस्तार केंद्र, Dombivli Cycle Club, कात्रे बाई, गाडगीळ बाई, @दिनेश रसाळ सर, झा बाई पाठीशी उभे राहिले. यांबरोबरच वर नमूद न केलेले असे डोंबिवलीतले असंख्य हितचिंतक पाठीशी उभे होते आणि अजूनही आहेत. @Shruti Phatak काकूंना प्रबोधिनीचंच काम करतांना एकदा विचारलं होतं, "असं कसं मागायचं?"
"आपण कुठे स्वतःच्या भरभराटीसाठी मागतोय आणि घरात पैसा साठवून ठेवणार आहोत? दोन हात आहेत. एक देणारा आणि घेणारा. दोन्ही उघडे ठेवायचे. काम करायला पैसा लागतो. पैश्यासाठी काम आडता कामा नये."
आजी आजोबा, मामा मामी, काका काकू, दादा वहिनी, मावशी काका आणि आई बाबा यांना सांगीतल्यावरच तयारी सुरू झाली होती. पण माझ्या बरोबर सगळेच अननुभवी! मी मांडलेला विषय पचायलाच जरा वेळ जाऊ द्यावा लागला. मी माझा मार्ग स्वतःहून आखत होतो. ते पाठीशी उभे होते. पण नेमकी आपली भूमिका काय असणार आहे हे मलाही माहीत नव्हतं आणि त्यांनाही. अनुभवाने उलगडत गेलं सगळ्यांनाच. SBI General Life Insurance चे छोटेसे प्रायोजकत्व मिळाले. तसेच मी हरिद्वार ला पोहचे पर्यंत पितांबरीने ही तेवढेच प्रायोजकत्व देऊ केले. भारतीय भाषा अनुसंधान, मैसुरूला पोहचलो. तिथले उप संचालक डाॅ. नारायण चौधरी यांनी संस्थेतर्फे सर्टिफीकेट दिलं.
दरम्यान, निघण्या आधी मी महाराष्ट्राच्या शिक्षण मंत्र्यांना भेटलो, मालवणकर साहेबांनी ती भेट घडवली.
झालं असं की,
"
पावसामुळे ट्रेन उशीराने चालत होत्या. सकाळचे क्लास आटोपून पत्राचा मजकूर व्यवस्थित संपादित वगैरे करून निघून पोहचेपर्यंत पाच वाजले. बाबांचे मित्र श्री. राजू रेडकर यांनी दुवा साधला होता. ही भेट घडून यायलाच हवी यासाठी त्यांनी सरवतो परी प्रयत्न केले होते. मुख्यद्वार बंद झालं होतं. मालवणकर सरांनी वरून एका माणसाला पाठवलं, मला दुसऱ्या दाराने घेऊन जायला. "मी मातृभाषेसाठी काम करायला भारत फिरणार आहे. ज्ञान प्रबोधिनीच्या डोंबिवलीतील युवा गटात मागच्या सात वर्षांपासून काम करतोय. पुणे विद्यापीठ... वगैरे, वगैरे..."  दोन मिनीटाच्या भेटीत त्यांच्या हातात माझं पत्र होतं आणि अगदी शांतपणे ते माझं ऐकत होते. पत्रावर सही करून झाली आणि मला एक प्रमाणपत्र मिळावं या बद्दल सूचना दिली गेली.
घरी पोहचल्यावर आई-बाबा आ वाचून ऐकत होते. त्यांना प्रत्येक सेकंद बारकाईने ऐकायचा होता. "मग काय झालं?" "आणि मग...?"
मा. शिक्षण मंत्री विनोद तावडे यांच्या बरोबर झालेल्या भेटीचे ते क्षण होते.
मी मंत्रालयाच्या इमारतीच्या आत गेलो. ही गोष्टच त्यांच्यासाठी फार आश्चर्यकारक होती. असंख्य वेळा किंवा कधीतरी रोजच प्रवास करतांना कार्यालयाच्या मार्गावर बाहेरूनच दर्शन घडवणारी तर, कधी भडक चर्चांच्या वादात वृत्तपत्रांत दिसणारी एक वास्तू! -मंत्रालय, एक सर्व सामान्य कोणीच नसलेला मी, तीत प्रवेश करता झालो.
"
त्यांच्या प्रमाण पत्रामुळे आजवर अनेक ठिकाणी सरकारी अतिथीगृहात राहण्याची व्यवस्था होऊ शकली.
अरुणाचल नंतर परतीचा प्रवास सुरू झालाय. आता लोकांचे प्रश्न बदललेत. खर्च आणि पैसा हा चिंतेचा मुद्दा प्राधान्याने मला विचारला जातोय.
"आपण काम केलं की पैसा मिळतो. पैसा नाही म्हणून बसून राहीलो तर कामही होत नाही आणि पैसा मिळायला कारणच उरत नाही." ते काम कसं असावं? हे ठरवायला गुण, पदवी या मागे न लागता प्रामाणिकपणे  शिक्षण घेणं महत्वाचं असतं, असं मला वरच्या अनुभवावरून वाटतंय.
पाय खेचणारे, नकारात्मक बोलणारे खूप भेटलेत. त्यांचं बोलणं फाट्यावर मारण्या इतका सवतःतला विचार पक्का असेल तर काहीच अडचण येत नाही.
@सायकलोपासना हे पृष्ठ सुरू करून एक वर्ष झालंय. सायकलला एक वर्ष झालंय. मी सहस्त्रादि वर्षांची भारतीय परंपरा नांदणाऱ्या अत्यंत पवित्र अश्या  तीर्थक्षेत्री पोहचलोय. हे साऱ्या भारताचे ऋण आहेत. रोहतंग पास, परशुराम कुंड, सोमनाथ, कन्याकुमारी सारख्या ठिकाणी हे सगळे विचार येऊन मन हळवं करायचे. आज लिहून काढता आले.