सोमवार, २ डिसेंबर, २०१९

आवर्ष मेघभेट

2/12/2019
आज मराठवाड्यातल्या उस्मानाबाद जिल्ह्यात दिवसभर पावसाळी वातावरण होतं आणि मधूनच भुरभूरता पाऊस पडत होता. सहज आठवलं... मागील बारा महिन्यात एक तरी महिना पावसा शिवाय गेल्याचं आठवतंय का?
आनंद मना पासून चेहऱ्यावर खुललं! मागच्या वर्षी, सुमेध-दिपालीच्या लग्नाच्या दिवशी, डिसेंबर मधेच केरळात; नंतर ह्या जानेवारीत सव्वीस जानेवारीला हैद्राबादेत, फेब्रुवारी महिन्यात कलकत्त्यात, मार्च महिन्यात आसाम मध्ये गोलापाड़्यात, एप्रिल महिन्यात मेघालय आणि अरुणाचलात, मे महिन्यात सिक्कीम मध्ये, जून-जुलै दोन्ही महिन्यांत छत्तीसगड़ मध्ये, ऑगस्टपासून महाराष्ट्रात...
अगदी एकही महिना न चुकता मला *मेघ भेटायला येतोय.*
मराठवाडा, दुष्काळी प्रदेश म्हणून दुष्कीर्ती लाभलेला प्रदेश... इथल्या आश्रमशाळांमध्ये जाता येता असंख्य मेंढपाळ आपल्या मेंढ्यांना घेऊन देशाटन करताना दिसतात.  मराठवाडा ही जणू मेंढपाळांचीच भूमी आहे असं एकदा होर्टीच्या शाळेवरून येतांना एका टेकाडावर, तिथून जाणाऱ्या मेंढपाळाकडे बघून वाटलं. खरं तर इथे वेग वगळे समाज आपापले पिढीजात धंदे सोडून वसाहती वसवू पाहत आहेत. त्यात चूक काहीच नसलं तरी, हे वसाहतवादाचं खूळ त्यांना देशोधडीला लवतंय यातील भयानक वास्तविकता दूरदृष्टीरहित सरकारच्या नजरेस नाही पडणार! विकासाच्या नावाखाली पैश्याचं स्तोम माजवणं हा जणू सरकारी धंदा आहे. वसाहती वसवाव्यात इंग्रजाने आणि मिशनऱ्यांनीच! आधी सुनियोजित घरं बांधावीत, इस्पिताळं बांधावीत, धंद्याची सोय करता करता दुसरीकडे शाळा सुरू कराव्यात, पैसा वाढत गेला की कोषागार सुरू करावे. जनतेच्या पोटा पाण्याची, आरोग्याची व्यवस्था झाल्या शिवाय लोकं शिक्षण घेणार कसं? घेतलं तरी, त्यातली गुणवत्ता ते टिकवू कसे शकणार? करोडो अस्पृश्यांमध्ये एकच डाॅ. बाबा साहेब अंबेडकर होऊ शकले,  इतर एक वजा केलेल्या करोडोंचं काय? आणि गुणवत्ता नसेल तर, त्यांना बढत्या मिळायला आरक्षण लागणारच ना. भौतिक- प्राथमिक सुविधा नसतांना बौद्धिक विकास साधला जाऊ शकत नाही हे जेव्हा आपल्याला समजेल तेव्हा कुठे वेडावलेला 'विकास' शहाणा होईल.
असो, त्या विविध जमातीची कामं ऐकून मला द अल्केमिष्ट मधला सॅन्तियागो आठवला नसता तर नवलंच. कोणी 'बुड्ढी के बाल' च्या बदल्यात मानवी केस विकत घेतं. कोणी मृत शरीरांची योग्य विल्हेवाट लावायचं काम बघतं. कोणी गावकऱ्यांच्या गायी चरायला घेऊन जातं तर, कोणी मेंढपाळ असतं-ज्याला शेतातून मेंढ्या घेऊन जाण्याच्या बदल्यात शेतकरी धान्य देतो...  मला ह्या मेंढपाळांचं खूप अप्रूप वाटतं. त्यांच्या स्वरूपात एखादा सॅन्तियागो शकुनांचा पाठलाग करत, मक्तूबावर विश्वास ठेवत आपल्या स्वप्नांच्या शोधात फिरत असेल का? असं नेहमी वाटतं.
शकून-
बाराही महिने न चुकता भेटायला येणाऱ्या मेघाला आता कालिदासानेच ऋतुसंहार समजवावा!

शुक्रवार, १ नोव्हेंबर, २०१९

खुळावलाय पाऊस

खुळावलाय पाऊस
ढग वीजेवीन रडे
दर्याला उधाण अन्
शरदी मळकटलेले तळे

गेला व्हाऊन घाम,
गेलं चिखला मधी शेतं
घसा खर्डून खर्डून
न्हायी थकला बेडूक

खुळावलाय पाऊस
संगे बळीराजाला रडवे
दसराही ओला गेला
आला काढाले दीवाळे

आली-गेली पहा दिवाळी
उभ्या धानाची रांगोळी
राख कराले ठेवली
अंकुर्ल्या पीकाची बा पेंढी

-सम्प्रिः।

सोमवार, २८ ऑक्टोबर, २०१९

कासोद्याची दिवाळी

शाळेत असतांना अगदी सातवी-आठवी पर्यंतच्या सगळ्या दिवाळ्या मला अजूनही आदर्श, अविस्मरणीय वाटतात. कासोद्याला सगळे चुलते एकत्र येऊन दिवाळी साजरा केली जात असे. केसोदा हे जळगाव जिल्ह्यातल्या एरंडोल तालुक्यातलं एक खेडेगाव. चार-पाच दिवस तरी तिथेच मुक्काम! सगळ्या ताया, दादा, लहान भाऊ, समवयस्क बहिणी, काका, काकू, आजी; एक वेगळाच अनोखा सोहळा.

एखादे दिवशी सकाळी झणझणीत मिसळीचा नाश्ता झाला की अंगणात चूल पेटवली जात असे. दूध आटवून काका बासूंदी करी. मग शेवेच्या भाजीची साग्रहसंगीत पंगत.
तर कधी, शेतात जाऊन नदीत अंघोळ, शेतातच केलेलं वांग्याचे भरीत आणि शेतातच झालेलं एखाद्या दिवसाचं जेवण. मग बैल गाडीला जुंपले जात आणि फरकांड्यापासून कासोद्याच्या घरा पर्यंत बैलगाडीतून 4-5 किलोमीटरचा प्रवास! त्यात झूलत्या मनोऱ्याची गोष्ट सहज कानावर पडायची. या ऋतूत हवेत शांत गारवा रेंगाळत असे. शेतात पीक उभं राहिल्यावर किडे, चिल्टं का कमी येणार खेडेगावात? त्यांना आम्ही खूप भ्यायचो. मग रात्री दिवे लागण झाली की मागच्या खोली बाहेर असलेल्या संडासात जातांना राम जप करायला गत्यंतर नसे. घरात कमी पाखरं यावी म्हणून संध्याकाळी धूरी करण्यासाठी चालत्या बैलगाडीत उभं राहून कडूलिंबाच्या काटक्या, पानं तोडायचं काम दादा करायचा. त्याचं बघून आम्हीही आरडा ओरडा करत तोल सावरत उभे राहण्याचा निष्फळ प्रयत्न करायचो. मग गाडी हाकण्यासाठी पुढे कोण बसेल यावरून भांडणं व्हायची. पुढे बसल्यावर शेपटी बरोबर शेण वगैरे उडालं की 'बिट्टी', चिडवा चिडवी व्हायची.
आम्हा मुलांचा दिवसभर दंगा! कधी कधी घरा समोरील चिंचेच्या झाडावर वानरं यायची. त्यांच्या बरोबर आमच्याही माकडचेष्टा चालायच्या. भूलाबाईची गाणी वगैरे डोंबिवलीत कधीही कानावर न पडणारे असंख्य शब्द तिथे परंपरा म्हणून कानावर पडायचे. आमची खेचण्यासाठी काका मुद्दाम काहीतरी अहिरणीतून बोलायचा आणि आम्हाला गोंधळवायचा.

एके वर्षी आम्हाला सुट्टी लागल्या नंतर आम्ही कासोद्याला गेलो. तेव्हा तिथल्या शाळांना सुट्टी लागली नव्हती. लहान भाऊ, तिसरी-चौथीत असेल. शाळा चालू असतांना त्याला आम्ही आलो आहोत म्हणून बोलवून आणले. शाळेतल्या शिक्षकांनी त्याला सोडून दिले. तेव्हा माझ्या शाळेचा मला खूप राग आला होता.

पहिल्या अंघोळी साठी स्वयंपाकघरात पाट मांडले जात. उटणे लावण्यासाठी सगळ्यांचीच किरकीर असे. सुगंधापेक्षा खडबडीत पणा त्रासदायक वाटायचा म्हणून! मग तांब्याच्या बंबात तापवलेलं पाणी मिळायचं. (आज हे लिहीतांना खूप हेवा वाटतोय.) मागच्या खोली बाहेर नाहणीघराहून मोठी मोरी होती. तिथे सकाळी हवेतील गारठ्यात कुडकूडत अंघोळी व्हायच्या. एकाची अंघोळ चालू असतांना दुसरा फूलबाजी ओवाळायचा. आई आणि काकूंकडून कणिकेच्या दिव्यातून ओवाळले जायचेच. आजी दादाला सांगायची, "अंघोळी चालू आहेत. एखादी माळ लाव." नवीन कपडे घालून सगळ्या खोल्यांमधे विखूरलेल्या मोठ्या मंडळींना शोधत आशिर्वाद घेण्याचा कार्यक्रम पार पडल्यावर  एकत्र फराळ व्हायचा. मग राम मंदीरात जायचे. तिथे गप्पा मारत आणि घरा भोवतालच्या परिसरात हुंडरत, कोणी तरी शोधत येई पर्यंत दुपार झाल्याचे समजत नसे.

एस.टी. स्टॅण्डवर काकाचे बियाणे आणि खत विक्रीचे दुकान होते. त्यामुळे लक्ष्मीपूजन दणक्यात साजरे होई. झेंडूच्या फुलांच्या माळांनी बाहेरच्या खोलीतील भिंत सजवली जाई. भिंतीवर चंद्र-सूर्य, लक्ष्मीचे चित्र वगैरे लाल रंगाने काढलेले असे. चौरंगावरील ताम्हणात गव्हा-तांदूळाच्या लक्ष्मीला अलंकारांनी मणवण्याचे काम काकू आणि आई करत. हिशोबाची पुस्तके (चोपड्या) यांच्या आराशीच्या बाजूला दोन समया लावल्या जात. ज्वारीच्या लाह्या आणि बत्ताश्याचा मूठभर नैवेद्य वाटला जाई. गावात असलेला एकमेव भटजी ठरलेली घरं करून पूजा सांगायला येत असे. तो अर्ध्या तासाचा चुळबूळ करत 'शांत बस'ण्याचा कार्यक्रम आटोपायची आम्हाला घाई असे. कारण त्यानंतर फटाक्यांचे समान भाग करून प्रत्येकाला आपापले वाटे दिले जात! नाग गोळीच्या धूरामुळे घरातली पाखरं बाहेर जातील म्हणून ती अगदी वऱ्हांड्या जवळ लावायचा नेम होता.
भाऊबीजेला बहिणी भावाला तेल-उटणं लावायच्या. संध्याकाळी तर ओवाळणीच्या वेळी सगळ्यांना सारख्या पण आपापल्या आवडत्या रंगाच्या वस्तू मिळण्यासाठी चुरस असायची. आवडती बहीण, आवडता काका, आवडती आत्या, आवडती काकू वगैरे वगैरे अगदी निरागस चर्चा भातुकलीच्या खेळात रंगायच्या!त्यानुसार रंगही ठरायचे...
कधी, एखादी फेरी एरेंडोलला घडली की पद्मालयच्या मंदीरात  तिथल्या तलावात कमळांच्या देठात पाय अडकून गेलेल्या कोणाच्या तरी गोष्टीने आणि भीमकुंडावर पडलेल्या भाताच्या 'महाभारतातल्या' असंख्यवेळा ऐकलेल्या आख्यायिकेने दौरा घडायचा.

हा सगळा दिवाळीचा सण शिगेला पोहचला असतांना एके संध्याकाळी निघायची वेळ यायची आणि कधी डोळे पाणावत, तर कधी हट्ट धरून निरोपा निरोपी व्हायची.
काही कारणांनी कासोद्याला चार दिवस जाणे बंद झाले. अकरावीत असतांना काका गेला. कासोद्याच्या घराचे दार कायमचेच बंद झाले. आता त्या एकत्र साजरा झालेल्या दिवाळीच्या आठवणी मात्र दर वर्षी उजळल्या जातात. कासोद्याच्या घराने, फरकांड्याच्या शेताने मनात एक छोटसं घर करून ठेवलं आहे.

दिवाळी 2017

मंगळवार, १५ ऑक्टोबर, २०१९

ऋतू

मी सूर्याकडे तोंड करून बसलो आहे. सूर्य दक्षिणेकडे झुकू लागला आहे. सकाळी सव्वासात ची वेळ. वारा वाहत माझ्या डाव्या हाताच्या वर नाक आणि कानाच्या मध्ये आदळतो आहे. हा ईशान्येकडचा वारा हवेत गारवा आणणारा आहे.  शिशिर ऋतू आणणारा आहे. या वाऱ्यानेच पाऊस परतवून लावला आहे. वसंत सुरू झाला की या वाऱ्याची दिशा  बदलू लागेल आणि पावसाळ्यापर्यंत नैर्ऋत्य दिशेकडून ते वाहू लागतील. तलावाचं पाणी संथ झालंय. त्यात निळ्याक्षार आकाशाचे प्रिबिंब पडलंय. लिलीची फुलं उमलली आहेत. पाणकावळा आणि खंड्या अधून मधून डुबकी मारता आहेत. हे न्याहाळत बसलेल्या माझी इतर पक्ष्यांना सवय झाल्याने त्यांचे आवाजही खुलू लागलेत. पूर्वेकडेच झाडं असल्याने ते दिसत नाहीयेत. पण, हळद्या, सुगरण, बुलबूल, पारवा, कोकीळ, भारद्वाज यांची साथ चिमणी आणि कावळ्याला आहे. चारही बाजूंना कुठे ना कुठे तरी खारूताई आहेतच. काही शांतपणे शिधा जमवतायत तर काही आवाज करून शत्रूंना पळवून लावतायत.
सकाळचा गारवा हळू हळू कमी होऊन दुपारचं ऊन तापू लागेल आणि रात्रीच्या चांदण्यात हवेत पुन्हा गारवा रेंगाळेल. या ऋतूतलं दुपारचं ऊन फार क्लेशदायी ठरतं. कारण सकाळी आणि रात्री बराच गारवा असतो. तापमानातील हा मोठा फरक आपल्या शरीराला सहन करावा लागतो. खरं तर, वट पौर्णिमेनंतर  रात्रीचा चंद्र दिसायला कोजागिरी पौर्णिमा उजाडावी लागते. मधले चार महिने मेघाच्छादनाने चंद्रदर्शन दुर्लभ झालेलं असतं. दर्याला उधाण आणणारा चंद्र आपलं काम ढगां आडूनच करत असतो. कोजागिरीचा चंद्र चार महिन्यांनंतर नवीन वाटू लागतो. तो दिसत असला तरी दर्या शांत होताना दिसत असतो. त्या चंद्रावर खूप गारठा आहे. दुपारभराच्या तापलेल्या ऊन्हानंतर त्या चंद्रप्रकाशात थंड केलेलं दूध पीणं शरीराचा सगळा शीण उतरवतं. हा एक दिवसाचा विधी खरं तर संपूर्ण ऋतूभर आचरावा असं आयुर्वेदात सांगितलं आहे. हा ऋतू शरद् ऋतू आहे. हे तेपमानातील चढ-उतारावरूनच जाणवतं.
ह्या ऋतूत पाणी स्फटिकासारखं वर्णग्राही (रंग घेणारं) होतं. तळ सुस्पष्ट दिसू लागतो. हे सगळं कुठेतरी वाचलेलं वर्णन आपण सगळेच अनुभवू शकतो, नाही का? आवश्यकता असते निरीक्षणाची. #सायकलोपासना जोपासली जातांना ह्या निसर्गजाणीवा जपल्या, पोसल्या जातांना निराळाच आनंद देऊन जातात.

मंगळवार, २४ सप्टेंबर, २०१९

इंटरसिटी

आज इंटरसिटी मला न घेताच निघून गेली. डोंबिवलीहून सुपरफास्ट चं तिकीट काढणारा एक प्रामाणिक ग्राहक आज रेल्वेने गमावला. काल संध्याकाळपासून ज्या प्रवासाच्या विचाराने मन प्रसन्न झालं होतं. अनेक विचार लिहीण्याच्या प्रतीक्षेत कर्जतच्या अलिकडचा नाला ओलांडून 7.02ने कर्जतला पोहचलो होते. ते सगळंच इंटर्सिटीने सोडवलं. इंरसिटीत एक सुशेगी वलय (कम्फर्ट झोन) होतं. तिथल्या रोजच्या प्रवाश्यांबरोबर ते तिथेच राहणार होतं. आज ते मला सोडून गेलं होतं. दीड वर्षांनंतर आज पुण्याचा प्रवास करत होतो. जून पासून लादलेला हा निर्णय आज गाडी सुटल्यानंतर समजला. नाहीतर, कमी वेगातल्या इंटर्सिटीत तयारीनिशी चढलोच असतो. मागनं येणाऱ्या विशाखापट्टनम् एक्सप्रेसयच्या सामान्य डब्यातून प्रवास सुरू आहे.
खंडाळ्याचा घाट, पावसाने वितळवला, सह्याद्रीचा काळा खडक पावसाने पाझरवला... अत्यंत संथ गतीने गाडी घाट चढायचा प्रयत्न करते आहे. गाडीच्या वजनाने रूळाखालची खडी वाजते आहे, खडी खालील माती ढसते आहे. यंदा पहाड वितळवणारा पाऊस झालाय. बोगद्यावरून गाडीवर धबधबा पडतोय. जामरुग ट्रॅक्शन पासून ठाकुरवाडी पर्यंतचा भयावह प्रवास झाल्यावर ठाकुरवाडी नंतर गाडीने वेग घेतला. सप्टेंबर संपत आला, पितृपक्ष संपत नवरात्र तोंडावर आले तरीही पावसाने परतीची वाट धरली नाहीये. गाडीबाहेरचं वातावरण पावसाळी, आह्लाददायी आहे. उजवीकडच्या डोंगरावरून रूळाच्या बाजूला धबधबे वाहतायत. दरीत ढग खालच्या नदीवर, शेतांवर विसावलेत. काही उडत वर येत गाडीत शिरू पाहतायत. गाडी वेगाने त्यांना मागे टाकतेय. ढगांचीही गाडी सुटते आहे. ऊन्हाळ्यात भकास पडलेले डोंगर, डोंगरावरील वाळलेले गवत, सुकलेली माती, सगळं सगळं पावसाळ्याने नवचैतन्यीत केलं आहे. मंकी हिलच्या पुढे राजमाचीचा डोंगर धुक्याने झाकून टाकलाय. खोल दरीवर कापसाची गादी अंथरली आहे. काळेकुट्ट बोगदे कीर्र आवाज करतायत. त्यांना गाडीही ताल देते आहे. बोगदा, सूर्यप्रकाश न पोहचणारं आयुर्वेदाच्या दृष्टीने अत्यंत अनारोग्यदायी ठिकाण, वर्षातून फक्त एकदाच धुतलं जातं. पावसाळ्यात, नित्यशुद्ध पाण्याने!
छएक मोठा बोगदा पार करून गाडी डोंगरमाथ्यावर पोहचते. खंडाळा-एकेकाळचं थंड हवेचं ठिकाण, अर्ध ढगातंच असतं. पुढचा बोगदा पार केल्यावर महामार्ग लागलेला असतो. गाडीच्या मागे लावलेल्या इंजिनचं काम संपलेलं असतं. ते काढण्यासाठी लोणावळ्याचा फलाट तयार असतो.
डेक्कनचं पठार, सह्याद्रीच्या पर्वतरांगांपासून सुरू होतं. लोहगड विसापूर एरवी अत्यंत रुक्ष दिसणारे हे किल्ले विसापुरच्या धबधब्याने तेजस्वी दिसू लागतात. ते देखील पाण्याने भरलेल्या ढगांना टेकू देत उभे आहेत. कामशेत हे नाव किती पूरक आहे असं दरवेळी वाटतं. बारा महिने वाहणारी नदी, ऊसाची, तांदूळाची शेती, सदा बहरलेली जमीन, चढ-उतारांवर वसलेलं गाव. रूळाच्या दोहो बाजूंना फुललेली केशरी रानफुलं आश्विन महिन्याच्या आगमनाची चाहूल लावत आहेत. ही फुलं पिंपरी चिंचवडपर्यंत साथीला असतात. हिरवळीवर, डोलणारी ही केशरी फुलं निसर्गाचा आविष्कार आहे. गाडी शिवाजी नगरला थांबणार नाही. फार फार तर वेग कमी करेल. तेव्हा गाडीतून उतरायचं. सामान्य डब्यातून प्रवास करण्याचा तोटा एकच की, सहप्रवाश्यांना रोजच्या प्रवासाचा सराव नसतो. गाडी पूर्ण थांबेपर्यंत पुल, बाहेर पडायचा मार्ग मागे राहीलेला असतो. सामान्य डब्यायल्या प्रवाश्यांबरोबर पुढे जाऊन मागे येणं करावं लागतं. असो, रेल्वेने कल्याण-डोंबिवली-बदलापूर मधील प्रवासी संघटनेने केलेल्या कल्याणच्या थांब्याची मागणी तर उडवून लावलीच वरून मुंबई सोडून इतर कुठल्याही गावात राहणाऱ्याला वेळेची किंमत नसते असल्या तोऱ्यात इंटरसिटीचा कर्जतचा थांबाही रद्द झालाय. [वर्तमान आमदार आणि खासदार यांच्याकडे हा प्रस्ताव परित करवण्याचे अधिकार असतात. डोंबिवलीकरांना किती गृहीत धरलंय हे यावरून दिसून येतं!] आता तर मुंबईहून मागचं इंजिन लावून पळवतायत तिला. इंटरसिटी कर्जतला थांबत असतांनाच माझं एम्.ए. झालं यासाठी मी देवाचे आभार मानले पाहिजेत. "मक्तूब" (विधिलिखित) असतं सगळं, नाही का?

गुरुवार, १९ सप्टेंबर, २०१९

भाषयोरभेदे भारतीयत्वम्

यदि भविष्यति हिन्दी एका राष्ट्रभाषा तर्हि भारतो न तिष्ठेत् भारतः। वैविध्ये एव भारतस्य भारतीयत्वम्। नैकानि राज्याणि संघराज्य-भारतात् बहिः गमिष्यन्ति इति अपि निश्चितम्। भाषाः अस्मान् बन्धनाय, अस्माकम् एकीकरणाय सन्ति, न तु परस्परविरोधाय, स्वामित्व-अंगीकाराय।
प्रत्येक-भारतीय-भाषायां, भाषायाः च उत्तमः अभ्यासः भवतु इति अद्यतन भारतस्य आवश्यकता। अग्रे गच्छद्विज्ञानं भारते परकीयभाषासु एव आगच्छति। वयं भारतीय-भाषाभिः कीयत् कार्यं कुर्मः? नूतनशब्दानां निर्मिति: क्रियते किम्? संस्कृते यद् शब्दशास्त्रं लिखितमस्ति, निरुक्तं वा भवतु, तस्य उपयोगः आधुनिक-भारतीय-भाषासु क्रियते किम्?  किमर्थं भाषासु  स्पर्धा?
भारतीयाः भाषाः नैकाभिः लिपीभिः वयं लिखामः। काऽपि भाषा भवतु नाम, तस्याः लिपी तु ब्राह्मीतः एव उद्भूता। लेखने उच्चारणशास्त्रं महत्त्वपूर्णम्। न विद्यते काऽपि हिन्दीलिपी। हिन्दी, संस्कृतं, मराठी, कोंकणी, नेपाली इत्यादयः भाषाः देवनागरीलिपीं स्वीकुर्वन्ति। परं उच्चारणशस्त्रस्य उत्तमता लेखने मातृत्वात् संस्कृते एव वर्तते। यकारजकारयोरभेदः, वकारबकारयोरभेदः, शकार-षकारयोरभेदः इत्यादयः उच्चारणदोषाः हिन्दीभाषिकाः कुर्वन्ति। हिन्दीभाषायां ते भेदाः न सन्ति इति तस्याः भाषायाः वैशिष्ट्यमिति यदि वयं स्वीकुर्मः चेत् देवनागऱ्यामपि तस्य वैशिष्ट्यस्य दोष-पूर्ण-व्यवहार-आचरणं कथं प्रसरति इति मया आभारते दृष्टम्।
कथं न शक्नुवन्ति अरुणाचलप्रदेशीयाः स्ववाणीं देवनागरीलिप्यां लिखितुम्?
तान् प्रति यदि देवनागरीलिप्याः शुद्धोच्चारणमेव न गच्छेत् चेत् ते कथं शक्नुयुः? "श्रीरंगपट्टनम्" इति लेखने भाषा भिन्ना लिपी वा?

भाषायाः उत्तमता। उत्तमभाषायां शिक्षणम्। उत्तमभाषार्थं च शिक्षणम्। इति अद्यतनभारतस्य आवश्यकता

तडागे बहवः बकशावकाः सन्ति। एकः भिन्नः। सर्वे तं कुरूपं मन्यन्ते। सः अपि स्वं कुरूपं मत्वा स्वस्य कृते न्यूनगण्डं प्रप्नोति। कदाचित् रुदन् जले पश्यन् प्रतिबिम्बं पश्यति। स्वस्य राजहंसत्वस्य आविष्कारः स्वं भवति। भारतस्य राजहंसत्वं भाषावैविध्ये अस्ति। न हि अन्यान् देशान् अनुसर्तुं, यस्याः भाषायाः जनसंख्यायां अभाषिकाणां न्यूनता अस्ति तस्याः स्वामित्वं प्रस्थापयितुम्।

एतद् अहं संस्कृतेन लिखामि यतः अस्यां भाषायां पक्षपातस्य सम्भावना न्यूनातिन्यूना। यदा भाषानुसारिणी राज्यस्य प्रान्तरचना अभवत् तदा संस्कृते ब्राह्मणवादस्य कलंकः आसीत्। अतः तदा संस्कृतभाषा राष्ट्रभाषार्थरूपेण निराकृता। डाॅ. बाबासाहेब आम्बेडकर महोदयः आग्रही आसीत् संस्कृतराष्ट्रभाषा भवतु इत्यर्थम्। तदा तत्रभवतः अवमानः एव अभवत्। अधुना संस्कृते राष्ट्रीय-ऐक्यस्य सामर्थ्यं वर्तते तद् इतिहासस्य कलंकमपि संस्कृतभारत्याः कर्येण, अभ्यासकानां अभ्यासेन च निराकारितः अस्ति। हिन्दीभाषायां तावत् सामर्थ्यमस्ति किम्?

का स्वामित्वं स्थापयितुं शक्नुयात्? या सृजनशीला, कार्यक्षमा सा एव। तावद् सामर्थ्यं आभारते केवलं संस्कृते वर्तते। महाराष्ट्रस्य मराठी भवतु, तामीळनाडोः वा तामीळम्, उत्तर भारतस्य हिन्दी भवतु ईशान्यस्य आखोमिया वा, किं सूत्रमेतासु भाषासु? यद्यपि पाश्चात्य-अभ्यासकैः कुलभेदाः निर्माय अस्माकं भाषासु एव भेदभावं निर्मितं तर्ह्यपि वयं भारतीयभाषासु संस्कृतस्य एव सूत्रत्वं द्रष्टुं शक्नुमः। अत्र पूर्व-परयोः प्रश्नम् उपस्थापयितुं न मे इच्छा। अनर्थकोऽयं प्रश्नः। यथा असंख्याः उपनद्यः मिलित्वा प्रवाहयन्ति ब्रह्मपुत्रनदं, तथा प्रवहन्ति भाषाः वाणीः मिलित्वा। न तत्र पूर्व-परत्वम्। भारतीयेषु भेदोत्पादनाय निर्मितोऽयं प्रश्नः। वास्तविकता तु एषा एव यद्, संस्कृते तामीळशब्दाः सन्ति, तामीळे च संस्कृतशब्दाः। वयं कं शब्दं "संस्कृतोऽयं शब्दः" "तामीळोऽयं वा" इति ब्रूमः? शब्दोऽयं, आकृतिं सूचयति। यस्यां भाषायां, प्रान्ते वा येन प्रकारेण तस्य उपयोगः भवति तस्मै तावत् च प्राप्यते  भाषायाः नामकरणम् शब्दाय।

भाषा तु एका एव। नामहीना सा। रूपं तस्याः संवादे, अभिव्यक्तौ अभिव्यक्तिग्रहणे च बद्धम्। ध्वनिभिः  नैकैः गृह्णितम्। कैश्चन जनैः आंगिकाभनयेन प्रकटितम्, मनस्शब्दैः परायां च बद्धम्।

आभारते अटन्तं मां न कदाऽपि भाषायाः समस्या उद्भूता। गृह्णिताः नूतनशब्दाः भारतीयभाषायाम्। यदि ज्ञातं शब्दशास्त्रं तर्हि कुत्र भेदः भाषयोः?
'चोर' नाम ओदनम् 'मोर' नाम तक्रम् मल्याळं भाषायाम्।  "चोरे मोरः" इति च मराठी वाक्प्रचारः। कुत्र अस्ति भाषाभेदः?
न भूता वा न भवति वा न भविष्यति हिन्दी एका राष्ट्रभाषा। निर्णयोऽयं हरेत् भारतीयत्वम् भारतस्य।

-सम्प्रिः, गन्धारः।
चेन्नयी, 20/9/2019

शुक्रवार, ९ ऑगस्ट, २०१९

दिवाळी

*दिवाळी*

फडकेवर गर्दी होऊ नये म्हणून 144 कलम लावणार... दिवाळी साठी काढलेल्या ह्या फतव्याने डोक्यात क्षणभरासाठी सुन्नता पसरली.
करायचं काय अंघोळीनंतर?

*कोण विषाणु कुणा ग्रासेल, मक्तुब ज्या-त्याचे*
*भिऊनि मरणा भय शिंपडणे, काम का हो तुमचे?*

विचारावंसं वाटलं. टाळेबंदीतल्या कोरोनातून बरे होऊन काका, काकू, दादा, वहिनी गणपतीसाठी दोन दिवस घरी आले तेव्हा, मागील पाच सहा महिन्यातला, आजारपणातला सगळा मानसिक ताण बाप्पा घेऊन गेल्यासारखं सगळ्यांच्या चेहऱ्यावर हसू खुललं होतं.

आणि सगळं पहिल्यासारखं होऊ पाहत असतांना,
फडके पथाची दिवाळी पहाटेवर बंधन आली...

*दिवाळीत करावा शिमगा ऐसे कुणा आवडेल सांगा?*
*फडके पथ बंद ठेऊनि उगा का दुःख तुम्ही वाढविता?*
...........
तुम्ही विचाराल एवढं काय बरं असतं फडकेवर?
शाळेतली, वर्गातली, महाविद्यालयातली, प्रबोधिनीतली, सायकल क्लबमधली, ह्या न त्या कारणासाठी आपल्या संपर्कात आलेली मित्रमंडळी पहिल्या अंघोळी नंतर हमखास भेटायची जागा म्हणजे फडके पथ!
आपल्याच मित्र-मैत्रिणीच्या ढोलपथकाचं सादरी करण बघायला, कुणाचा पोवाडा ऐकायला तर, कुणाचं भाषण ऐकायला, गणपती दर्शनाला किंवा हिरवळ बघायला... ह्या न त्या कारणासाठी आलेला प्रत्येक जण त्या खच्च भरलेल्या रस्त्यावर डोंबिवलीकर कुटुंबाचा भाग होऊन दिवाळी साजरी करत असतो.
हो कुटुंबाचाच! एकत्र कुटुंब मोडून एकल कुटुंब मूळं धरू लागण्याचा अनुभव घेऊन; मागे वळून पाहतांना, मी कुठल्या कारणासाठी गर्दीचा भाग झालो? आणि का झालो? या प्रश्नांची उत्तरं खणता खणता कासोद्यात जाऊन पोहचलो.
.....................
*कासोदा*
शाळेत असतांना अगदी सातवी-आठवी पर्यंतच्या सगळ्या दिवाळ्या मला अजूनही आदर्श, अविस्मरणीय वाटतात. कासोद्याला सगळे चुलते एकत्र येऊन दिवाळी साजरा केली जात असे. चार-पाच दिवस तरी तिथेच मुक्काम! सगळ्या ताया, दादा, लहान भाऊ, समवयस्क बहिणी, काका, काकू, आजी; एक वेगळाच अनोखा सोहळा.

एखादे दिवशी सकाळी झणझणीत मिसळीचा नाश्ता झाला की अंगणात चूल पेटवली जात असे. दूध आटवून काका बासूंदी करी. मग शेवेच्या भाजीची साग्रहसंगीत पंगत.
तर कधी, शेतात जाऊन नदीत अंघोळ, शेतातच केलेलं वांग्याचे भरीत आणि शेतातच झालेलं एखाद्या दिवसाचं जेवण. मग बैल गाडीला जुंपले जात आणि फरकांड्यापासून कासोद्याच्या घरा पर्यंत बैलगाडीतून 4-5 किलोमीटरचा प्रवास! त्यात झूलत्या मनोऱ्याची गोष्ट सहज कानावर पडायची. या ऋतूत हवेत शांत गारवा रेंगाळत असे. शेतात पीक उभं राहिल्यावर किडे, चिल्टं का कमी येणार खेडेगावात? त्यांना आम्ही खूप भ्यायचो. मग रात्री दिवे लागण झाली की मागच्या खोली बाहेर असलेल्या संडासात जातांना राम जप करायला गत्यंतर नसे. घरात कमी पाखरं यावी म्हणून संध्याकाळी धुरी करण्यासाठी चालत्या बैलगाडीत उभं राहून कडूलिंबाच्या काटक्या, पानं तोडायचं काम दादा करायचा. त्याचं बघून आम्हीही आरडा ओरडा करत तोल सावरत उभे राहण्याचा निष्फळ प्रयत्न करायचो. मग गाडी हाकण्यासाठी पुढे कोण बसेल यावरून भांडणं व्हायची. पुढे बसल्यावर शेपटी बरोबर शेण वगैरे उडालं की 'बिट्टी', चिडवा चिडवी व्हायची.
आम्हा मुलांचा दिवसभर दंगा! कधी कधी घरा समोरील चिंचेच्या झाडावर वानरं यायची. त्यांच्या बरोबर आमच्याही माकडचेष्टा चालायच्या. भूलाबाईची गाणी वगैरे डोंबिवलीत कधीही कानावर न पडणारे असंख्य शब्द तिथे परंपरा म्हणून कानावर पडायचे. आमची खेचण्यासाठी काका मुद्दाम काहीतरी अहिरणीतून बोलायचा आणि आम्हाला गोंधळवायाचा.
एके वर्षी आम्हाला सुट्टी लागल्या नंतर आम्ही कासोद्याला गेलो. तेव्हा तिथल्या शाळांना सुट्टी लागली नव्हती. लहान भाऊ, तिसरी-चौथीत असेल. शाळा चालू असतांना त्याला आम्ही आलो आहोत म्हणून बोलवून आणले. शाळेतल्या शिक्षकांनी त्याला सोडून दिले. तेव्हा, "असं आपल्या शाळेत का चालत नाही?," म्हणत माझ्या शाळेचा मला खूप राग आला होता.
पहिल्या अंघोळी साठी पाट मांडले जात. उटणे लावण्यासाठी सगळ्यांचीच किरकीर असे. सुगंधापेक्षा खडबडीत पणा त्रासदायक वाटायचा म्हणून! मग तांब्याच्या बंबात तापवलेलं पाणी मिळायचं. (आज हे लिहीतांना खूप हेवा वाटतोय.) मागच्या खोली बाहेर नाहणीघराहून मोठी मोरी होती. तिथे सकाळी हवेतील गारठ्यात कुडकूडत अंघोळी व्हायच्या. एकाची अंघोळ चालू असतांना दुसरा फूलबाजी ओवाळायचा. आई आणि काकूंकडून कणिकेच्या दिव्यातून ओवाळले जायचेच. आजी दादाला सांगायची, "अंघोळी चालू आहेत. एखादी माळ लाव." नवीन कपडे घालून सगळ्या खोल्यांमधे विखूरलेल्या मोठ्या मंडळींना शोधत आशिर्वाद घेण्याचा कार्यक्रम पार पडल्यावर  एकत्र फराळ व्हायचा. मग राम मंदीरात जायचे. तिथे गप्पा मारत आणि घरा भोवतालच्या परिसरात हुंडरत, कोणी तरी शोधत येई पर्यंत दुपार झाल्याचे समजत नसे.

एस.टी. स्टॅण्डवर काकाचे बियाणे आणि खत विक्रीचे दुकान होते. त्यामुळे लक्ष्मीपूजन दणक्यात साजरे होई. झेंडूच्या फुलांच्या माळांनी बाहेरच्या खोलीतील भिंत सजवली जाई. भिंतीवर चंद्र-सूर्य, लक्ष्मीचे चित्र वगैरे लाल रंगाने काढलेले असे. चौरंगावरील ताम्हणात गव्हा-तांदूळाच्या लक्ष्मीला अलंकारांनी मणवण्याचे काम काकू आणि आई करत. हिशोबाची पुस्तके (चोपड्या) यांच्या आराशीच्या बाजूला दोन समया लावल्या जात. ज्वारीच्या लाह्या आणि बत्ताश्याचा मूठभर नैवेद्य वाटला जाई. गावात असलेला एकमेव भटजी ठरलेली घरं करून पूजा सांगायला येत असे. तो अर्ध्या तासाचा चुळबूळ करत 'शांत बस'ण्याचा कार्यक्रम आटोपायची आम्हाला घाई असे. कारण त्यानंतर फटाक्यांचे समान भाग करून प्रत्येकाला आपापले वाटे दिले जात! नाग गोळीच्या धूरामुळे घरातली पाखरं बाहेर जातील म्हणून ती अगदी वऱ्हांड्या जवळ लावायचा नेम होता.
भाऊबीजेला बहिणी भावाला तेल-उटणं लावायच्या. संध्याकाळी तर ओवाळणीच्या वेळी सगळ्यांना सारख्या पण आपापल्या आवडत्या रंगाच्या वस्तू मिळण्यासाठी चुरस असायची. आवडती बहीण, आवडता काका, आवडती आत्या, आवडती काकू वगैरे वगैरे अगदी निरागस चर्चा भातुकलीच्या खेळात रंगायच्या!त्यानुसार रंगही ठरायचे...
कधी, एखादी फेरी एरेंडोलला घडली की पद्मालयच्या मंदीरात  तिथल्या तलावात कमळांच्या देठात पाय अडकून गेलेल्या कोणाच्या तरी गोष्टीने आणि भीमकुंडावर पडलेल्या भाताच्या 'महाभारतातल्या' असंख्यवेळा ऐकलेल्या आख्यायिकेने दौरा घडायचा.

हा सगळा दिवाळीचा सण शिगेला पोहचला असतांना एके संध्याकाळी निघायची वेळ यायची आणि कधी डोळे पाणावत, तर कधी हट्ट धरून निरोपा निरोपी व्हायची.
काही कारणांनी कासोद्याला चार दिवस जाणे बंद झाले. अकरावीत असतांना काका गेला. कासोद्याच्या घराचे दार कायमचेच बंद झाले. आता त्या एकत्र साजरा झालेल्या दिवाळीच्या आठवणी मात्र दर वर्षी उजळल्या जातात. कासोद्याच्या घराने, फरकांड्याच्या शेताने मनात एक छोटसं घर करून ठेवलं आहे.
........
सहाजिकच अशी दिवाळी अनुभवल्यानंतर मी डोंबिवलीकर झालो, गर्दीचा भाग होऊन गेलो.

आज दिवाळी पहाटेशिवाय फडकेपथ!...

फडकेवर पसरली आज दुःखाची दिवाळी
ना मुली, ना मुले, ना ताश्यांची आतीशबाजी

पाय दुमडूनि कलामंचके आर्द्रनेत्र धुसमुसती
चमकावे का मी? पुसति वस्त्रे शरीरां जरदारी

फडके लावूनि पुसली चप्पल हिवाळी कोल्हापुरी
फडके पथ न तिला स्पर्शता तीही हिरमुसलेली

द्वारबंद मंदिरात शिरली शांतता रोषणाईची
माघा सम त्यां बोचे वारा गर्भगृही कार्तिकी

.........सम्प्रिः। वसुबारस, ख्रि.2020

घरच्यांबरोबर दिवाळी साजरी करायला रत्नागिरीहून डोंबिवलीला येतोय खरा मी! पण, माहीत नाही दिवाळी पहाट कशी जाईल ते!

सगळ्यांना दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा!!!