दिवस 121- 29/10/2018, सोमनाथ
आज सकाळी लवकर उठून सोमनाथ मंदीर गाठायचं. रात्री झोपतांनाच ठरवलं होतं. नशीबाने सकाळी कुठलाही रिपू आड आला नाही. अंघोळ करून साडेसहाला सोमनाथ संस्कृत विद्यापीठातून बाहेर पडलो. बोटींच्या तळापाशी सूर्योदय होतांना दिसला. प्राप्त स्थानी फोटो वगैरे काढायचे प्रयत्न केले. बहुदा निष्फळच! सोमनाथ मंदीरापाशी पोहचलो. सायकल सुरक्षितपणे ठेवणे ही चिंता होतीच. आणि आत गेल्यावरही फोटो काढता येणार नव्हते. मला सायकल ला सोडून आत जाणे काही प्रशस्तकर वाटत नव्हते. कळसाला नमस्कार करून बाहेरूनच फोटो काढून सायकल समोर बसून लिहूया. असं म्हणत त्याच त्या समुद्रा समोर जमीनीवर आदळणाऱ्या लाटांचा आवाज ऐकत नंदी आणि त्रिशूळाची प्रतिकृती असलेला फडकता भगवा झेंडा असलेल्या मंदीराचा काहीसा भाग भिंती आडून दिसेल असा बसलोय. तोच तो समुद्र म्हणायचं कारण 31 डिसेंबर 2017 ला- "ख्रिस्ती सौर वर्षाचा शेवटचा सूर्यास्त, मुंबईच्या अधिक पश्चिमेला जाऊन, दक्षिण ध्रुवापर्यंत अबाधित पसरलेल्या महासागरासमोर उभ्या असलेल्या सोमनाथाच्या किनऱ्यावर, समुद्राच्या पाण्याने शीत केलेला वारा झेलत, पौर्णिमेसाठीची एकच कोर कमी असलेल्या वर्षानुवर्ष सोमपान केलेल्या चंद्राच्या सौम्य प्रकाशात, या वर्षी अनुभवता आला..."
दहा महिन्यांनंतर त्याच जागी बसलो होतो. कोवळ्या उन्हात. सकाळचे आठ वाजून गेले होते. तरी चंद्र आकाशात रेंगाळत होता.
भालका तीर्था विषयी ऐकून होतो. गूगल बाबाच्या मार्गदर्शनाखाली तिथे पोहचलो. पुन्हा एकदा एक एक लोक कथा! इथे योगेश्वराला बाण लागला आणि श्रीकृष्णाचा देहांत झाला. माझ्यातला नास्तिक आणि अज्ञान बाहेर डोकावत होतं. त्या कथे विषयी साशंकता. कारण बाहेरून दिसायला हल्लीचं बांधकाम असलेलं श्रीकृष्णाचं मंदीर. आत शिरलो. आत खूप सुंदर देखणी मूर्ति. तिथे उभं राहून एक शांतता पसरली मनात. त्यातला रस शांत होता की करुण शोधायचा प्रयत्न करत होतो. ज्याक्षणी तो करुण वाटला त्याक्षणी गीतेतले श्लोक आठवले. 'नैनं छिन्दन्ति शस्त्राणि...'
पण.तरही "कहो ना प्यार है संपतांना जे हृतिक रोशन मरतांना जे दुःख होतं तसं काहीसं जाणवत होतं. जिथे महाभारताचं युद्ध घडलं, जिथे गीता सांगितली गेली त्या कुरुक्षेत्री गेलो. कृष्ण लीला रंगल्या ती यमुना दोन-तीनदा ओलांडली. "तव भगिनीचा धावा ऐकूनि धाव घेई गोपाळा" म्हणणारी द्रौपदी- तिने जिथे जल समाधी घेतली ती जागा बघितली. कृष्ण सुदामाची भेट झाली त्या द्वारकेला गेलो... आणि आता कृष्णाचा देहांत! डाॅ. अरुणा ढेरे म्हणतात महाभारताच्या पाऊलखूणा भारतभर पसरलेल्या आहेत. खरंच! मी काही महाभारताचा अभ्यास करायला निघालो नव्हतो. मी काही महाभारत वाचलं नव्हतं. पण ज्याच्यामुळे या भूमिला भारत हे नाव मिळालं ते महाभारत मला काही सोडत नव्हतं.
आणि या कथेतल्या नायकाचा मृत्यू! दुःख वाटलं.(अजून गीतेपासून बराच लांब आहे याची जाणीव झाली.) पण प्रवासाचा भाग आहे म्हणून स्वीकारलं!
#bgm #bergamontbicycles #starightfromstpauli #bergamontindia #सायकलोपासना #cyclopasana #pitambari
मंगळवार, ९ जून, २०२०
भालका तीर्थ
याची सदस्यत्व घ्या:
पोस्ट (Atom)