समीक्षा लिहीण्या पूर्वी... मी पैसा खर्च करून "हिंदी" चित्रपट- द काश्मीर फाईल्स बघायला जातो तेव्हा...
मनापासून पैसे खर्चून चित्रपटगृहात जाऊन बाॅलिवूड चित्रपट बघणाऱ्यातला मी प्रेक्षक नाही. रविवारी उदयपुरातली दुकानंही बंद. दुपार किंवा संध्याकाळचं महागडं प्रक्षेपण बघण्यापेक्षा सकाळी नऊचं स्वस्तात बघता येणारं प्रक्षेपण बघूया असं ठरवलं.
हिंदी भाषेतला वयस्कांकित (Adult rated) चित्रपट बघायची ही माझी पहिलीच वेळ. घरातून निघतांना मनात या विषयी असंख्य विचार होते. वयस्कांकन म्हणजे नग्नता, शिव्या, महिला अत्याचारांचे खुले प्रदर्शन, वगैरे हीन गोष्टी दाखवल्या असाव्यात.
पूर्वी तंबूतल्या चित्रपटाच्या जमान्यात देवता आणि संतांचे चित्रपट बघायला तंबूबाहेर चप्पला काढायची पद्धत होती. चित्रपट हिट जायचे. तसे हल्ली देशभक्तीवर आधारित वरील हीन गोष्टी दाखवल्या तरी चित्रपट हिट जातात. इतिहासांचे विडंबन करणे हा गल्ले भरायचा सोप्पा मार्ग. बाॅलिवूडची एकूण पातळी ही काही दिग्दर्शकांनी खालावलेली आहेच. त्यामुळे वयस्कांकित चित्रपटाची तिकीटं काढल्यावर तसला प्रकार बघायचीही मनाची तयारी ठेवली होती.
काश्मीर विषयीचे मिश्र अनुभव घेऊन चित्रपटगृहात जातांना...
हा विषय गूढ वलयांकित काश्मीरचा. काश्मीर म्हटलं की पटनीटाॅप पलिकडल्या भटोत, भदरवाह भागात झालेल्या गप्पा आणि तिथल्या शाळा आठवतात. संस्कृतमधे लिहीलेल्या राजतरंगिणीतली काश्मिरीयत आठवते. दोन हजार चौदा साली आई बाबांबरोबर फिरायला गेलो असतांना पहलगाम भागातील काही डोंगर भटकतांना तिथल्या स्थानिकांनी विचारलेला, "क्या आप हिन्दुस्थानसे हो?" (तुम्ही हिन्दुस्थानातून आला आहात का?) हा खवचट-टोकेरी प्रश्न आठवतो. तर दुसरीकडे दोन हजार अठरा साली भदरवाहच्या पहाडांत सायक्लवतांना अत्यंत प्रेमाने आणि अदबीने झालेला पाहूणचारही आठवतो. काश्मीरच्या शिक्षणात काश्मिरी सोडून इतर भाषांचाच भर अधिक! हेच इथले भाषिक पारतंत्र्य मी भाषारत सायकलोपासनेत नोंदवले होते. जिथे मातृभाषेतून व्यवहाराचे स्वातंत्र्य नाही तिथे स्वातंत्र्याची जाणीव दुर्मीळच असते. इथे तर उर्दू भाषेसहित जीवनमानच लादलेले... "यहापे सरकारी सिस्टम उल्टी चलती है" (इथे सरकारी यंत्रणा उलटी चालते) सरकारी योजनांच्या अंमलबजावणीवरचं हे अस्सरच्या स्थानिकांचं वाक्य डोक्यात घुमू लागतं.
या सगळ्या माझ्या डोक्यातल्या पार्श्वभूमीवर मी चित्रपटगृहात जाऊन बसलो.
...आणि राष्ट्रगीताने चित्रपट सुरू झाला...
काश्मिरी भाषेचे सौष्ठव सुरुवातीपासूनच कानावर पडू लागले. समोरील दृष्य 1990 सालच्या 18-19 जानेवरी पासून घडलेल्या काश्मीरातल्या घटना आणि आजच्या भारतातील विद्यापीठं या दोन काळखंडात- आजचा तरुण विद्यार्थी- कृष्ण पंडित, त्याची प्रोफेसर- राधिका मेनन, आणि त्या काळात साऱ्या घटनांचे साक्षीदार असलेले चार मित्र या पात्रांच्या भूमिकेतून -फिरवू लागली.
एखादा चित्रपट पाहतांना दिग्दर्शक आपल्याला कुठे घेऊन जातो? विहीर, किल्ला, सैराट् यांसारख्या चित्रपटात आपण कथानकातल्या पात्रांशी एकरूप होऊन जातो. त्या गावात, त्या घरात नटां बरोबर आपलाही वावर सुरू असतो. विवेक अग्निहोत्रींच्या द काश्मीर फाईल्समधे मात्र आपण त्या पात्रांसोबत फिरत असूनही स्वतः एक त्रयस्थ हतबल नागरिक म्हणून अकल्पित क्रूर घटनांची माहिती करून घेत असतो. म्हणून हा नुस्ताच चित्रपट नसून माहितीपट आहे.
असंख्य सत्य घटनांची मोळी बांधत, एका अव्याप्त चिकित्सक आवृत्तीतून साकारलेलं हे एक थरारक कथानक आहे.
ज्यांनी हे भोगलं त्यांच्या जाणीवेच्या नखाएवढी जाणीवही आपल्याला नाही. डोळे न पाणवता हा चित्रपट बघता येणं कठीण आहे. हळव्या मनांसाठी चित्रपटगृहात जागा नाही. नैतिकतेचा तोल ढळू न देता वास्तविकतेला न्याय द्यायचा सर्वतोपरीने प्रयत्न केला गेला आहे. यात नग्नता नाही, शिव्या नाहीत. आहे तो फक्त रक्तपात. 1990 साली धनधान्यांनी भरलेल्या काश्मिरी पंडितांच्या घरात धान्य रक्तात न्हाऊन निघाल्याचं करुण वास्तव आपल्या पुढे उभं ठाकतं.
आजच्या शिक्षणातील फोलपणाही या चित्रपटाने प्रदर्शित केला आहे.
या इतिहासाला वाचा फोडण्याचं शिवधनुष्य सगळ्यांनीच उत्तमप्रकारे उचलून धरलं आहे.
अनुपम खेर, मृणाल कुलकर्णी, चिन्मय मांडलेकर, मिथून चक्रवर्ती, पल्लवी जोशी, प्रकाश बालेवाडी, भाषा सुंबली यांसारख्या प्रथित यश कलाकारांसोबत पृथ्वीराज सरनाईक या बालनटाने आणि दर्शन कुमारने स्वतःच्या अभिनय कौशल्यांनी हा माहितीपट थरारक बनवला आहे. पार्श्वसंगीतकारांच्या नावात स्वप्नील बांदोडकरचे नाव मराठी प्रेक्षक म्हणून काॅलर टाईट करणारे नक्की आहे.
ज्याप्रमाणे कृष्ण पंडितची भेट दल सरोवरात चिन्मय मांडलेकरशी घडवली तसंच मृणाल कुलकर्णीच्या मुली सोबत बोलणं घडवता आलं असतं असंही वाटत राहतं. त्यात या पूर्ण असलेल्या कथानकाचं अपूर्णत्व आहे आणि यशही.
आपण काय घेऊन चित्रपटगृहाच्या बाहेर पडतो?
स्मशान शांतता पसरलेले, प्रेक्षकांच्या हुंदक्यांनी भरलेले, पाणवत्या डोळ्यांचे असंख्य वास्तववादी क्षण या तीन तासात आपण अनुभवलेले असतात. कधीतरी ओक्साबोक्षी रडावं असंही वाटू शकेल. इतकं क्रौर्य आपण दृक्-श्राव्य माध्यमातून बघत असतो.
हा इतिहास अश्या प्रकारे सगळ्यांसमोर येण्याची वेळ यावी यातच- सगळ्या तथाकथित मानवतावाद्यांचं, आंतरराष्ट्रीय-राष्ट्रीय राजकारण्यांचं अपयश सामावलेलं आहे. आजच्या घटिकेतील समस्यांना (Real time problems) ऐतिहासिक भावनिक वळण देऊन तरुणांना भडकवणं, दिशाभूल करणं हा विज्ञानाधिष्ठित अध्ययना विरोधातला राजकारणी खेळ आहे. याची जाणीव कुठलीही नारेबाजी न करता चित्रपट बघणाऱ्या संवेदनशील युवक-युवतींना नक्कीच होऊ शकेल. हा चित्रपट माथेभडकाऊ नाही. इतिहासाची पुनरावृत्ती न होवो म्हणून डोळे उघडणारा नक्की आहे.
तेव्हा हा चित्रपट बघायचा असेल तर, मन वज्र करून चित्रपटगृहात जायला नक्की सज्ज व्हा...
ता. क.-
समीक्षकाचं काम चित्रपटाची समीक्षा करणं आहे. चित्रपटाच्या विषयावरील संशोधनावर वाहवत जाणं नाही.
गब्बरचं गुणगान ऐकू यावं म्हणून कोणी खलनायकाची भूमिका रेखाटत नसतो. "त्याने कापलेले हात किती क्रूर!" म्हणत समीक्षक घोळत राहिला तर चालेल का?
नायकाचं उदात्तत्व सगळ्यांमधे चमकून दिसावं यासाठीही दिग्दर्शकाची उत्तमता पणाला लागते.
चित्रपट जर एका समाजाला नायक आणि दुसऱ्या समाजाला खलनायक बनवत असेल तर, मात्र चित्रपट प्रदर्शनावरच फेरविचार करण्याची गरज आहे. शालजोडे घेऊन फिरणाऱ्या प्रेक्षकांसमोर दिसणाऱ्या चित्रपटाचा विषय कसा असावा?
आपल्या उत्तम चित्रपटाचं, कथानकाचं मूर्ख प्रेक्षकांमुळे राजकारण घडू नये; अस्थिरतेचा ऐतिहासिक विषय मांडल्यावर वर्तमानात स्तोम माजू नये -याची जबाबदारी निर्माते आणि दिग्दर्शकाने स्वीकारायलाच हवी.
भारताच्या चित्रपटसृष्टीचा प्रदीर्घ आलेख बघतांना, सुजाण प्रेक्षक घडवण्यासाठी किती निर्मात्यांनी प्रयत्न केले?
समीक्षकांचा वापर भडक विधानं अधोरेखित करून स्वतःच्या चित्रपटाच्या प्रसिद्धीसाठी केला गेल्यावर या देशात चांगला प्रेक्षक तयार होणं अशक्यच. परिणामी कितीही उत्तम चित्रपट आला तरी वादाच्या भोवऱ्यात अडकवून तो बंद पाडणे, विषयावर राजकारण करत समाजाला भडकवणे हे नित्याचेच. प्रत्येक चित्रपट उत्तमच असतो असे नाही. पण, उत्तम चित्रपटातलं उत्तमत्व न समजण्यासारखं दुर्दैव दिग्दर्शकाच्या माथी येतं ते आंधळ्या समीक्षेमुळेच!
-सम्प्रिः।