*जागतिक मातृभाषा दिवस*
एकोणीसशे अठ्ठेचाळीस साली पाकिस्तानने उर्दू 'राष्ट्रभाषा' म्हणून स्वीकारली. या धोरणाची अंमलबजावणी अराजकीय व लोकतंत्राला न जुमानता पूर्व पाकिस्तानात म्हणजेच आजच्या बांगलादेशात होऊ लागली. एकवीस फेब्रुवारी एकोणीसशे बावन्न रोजी ढाका युनिव्हर्सिटीत उर्दू 'राष्ट्रभाषे'विरोधात मोर्चा निघाला होता. पाकिस्तानी पोलिसांनी मोर्चेकरूंवर खुला गोळीबार केला. अब्दूस सलाम, अब्दूल बरकत, रफिक उद्दीन अहमद, अब्दूल जब्बर आणि शाहफियूर रहमान तिथेच हूतात्मे गेले आणि शेकडो जखमी झाले.
हीच पूर्व पाकिस्तान विरुद्ध पश्चिम पाकिस्तान युद्धाची नांदी होती. नंतर एका दशकाहून अधिक काळ पूर्वपाकिस्तानावर काळरात्र पसरली होती. तिथे बंगाली बोलण्यावरही बंदी आणली गेली. मग घडलेलं युद्ध आणि त्यात भारताची कामगिरी सगळ्यांनाच माहिती आहे. एकोणीसशे एकाहत्तर साली "आमार बांगला" म्हणत बांगलादेश स्वतंत्र झाला. बंगाली भाषा मुक्त झाली.
परकीय राजवटी खालसा झाल्यावर साऱ्याच देशांमधे "राष्ट्र भाषेच्या" नावाखाली स्थानिक भाषा धोक्यात येत असल्याचे चित्र सर्वत्रच दिसून येत होतं. हाच मातृभाषा संरक्षणाचा मुद्दा लक्षात घेऊन युनेस्कोने बांगलादेशा मधील हूतात्म्यांना श्रद्धांजली म्हणून 21 फेब्रुवारी हा जागतिक मातृभाषा दिवस साजरा करण्याचे ठरवले. 17 नोव्हेंबर 1999 रोजी एकमताने हा ठराव पारीत करण्यात आला.
मातृभाषेसाठी घडलेलं युद्ध आणि वेगळे झालेले दोन देश हे भाषिक स्वातंत्र्याचे जगातील प्रेरणादायी उदाहरण आहे.
"स्वतंत्रते भगवति त्वामहं यशोयुतां वन्दे" म्हणणाऱ्या सावरकरांच्या "स्वातंत्र्य" मुद्द्यावरीलच हा एक आयाम...
मातृभाषेच्या स्वातंत्र्याचा.
सगळ्यांना जागतिक मातृभाषादिनाच्या शुभेच्छा!!!
-सम्प्रिः।
21.02.2022