आज पुण्याविषयी जरा लिहीण्याची इच्छा झाली आहे. वास्तविक हे वाक्य माझ्या लेखणीत वाचताच अनेकांना स्वतःचे पूर्वग्रह दूषित असल्याचा अनुभव येईल. साहजिकच आहे म्हणा; माझ्या तसल्या वर्तनाचा तो परिणाम!
दीड दोन वर्षापूर्वी संपलेला दोन वर्षांचा शैक्षणिक काळखंड आणि त्याच्याही दोन वर्षां पूर्वी प्रबोधिनीच्या परिचयात आल्यापासून पुण्याशी सातत्याने येत गेलेला संबंध. असे हे पुणे! आज अनेकविध कारणांनी आयुष्यात स्वीकारले गेल्याचे मी कबूल करतो आहे. सुरूवात उत्सुकतेपासून झाली. सवाईला गेलो तेव्हा कुतूहल जागृत झाले. प्रबोधिनीमुळे अप्रूप वाटले. हा परिचय, लवकरच अतिपरिचयात बदलायला वेळ लागला नाही. तश्या परिस्थिती निर्माण झाल्या, तयार झाल्या म्हणून असेल कदाचित्. दूरूनच डोंगर साजरे हे पुरते पटले. पुण्यात वास्तव्यासाठी केलेले निष्फळ प्रयत्न बरंच काही शिकवून गेले.
आज या विषयावर लिहावेसे वाटले तेव्हा "का???," हा एकमेव प्रश्न मोठ्याने ओरडून मनालाच विचारला.
पुण्या विषयी अप्रूपही नाही, कुतूहलही नाही, आसक्तीही नाही आणि द्वेषही नाही. पण पुण्यातल्या लोकांनी राग-द्वेषापलीकडलं मैत्रीचं छान नातं जमवलंय. सगळ्या पुणेकरांशी मैत्री होऊ शकेलच, असा समज नसावा. मी ओकलेला त्यांच्या विषयीचा सर्व द्वेष त्यांनी स्वीकारला. म्हणून ती मैत्री. मैत्रीचा संबंध शब्दात मांडणे फार सोपे आहे. "निरपेक्ष विश्वास". द्वेष स्वीकारण्याची अपेक्षा मुळीच नव्हती. पण नकळत घडते तीच तर मैत्री असते! पु. ल. म्हणतात तसं, "वेवलेन्थ जुळली की क्षणभरात जन्मजन्मातरीचं नातं असल्याचा दुवा साधला जातो. वागण्यातला बेत शुद्धपणा क्षणार्धात नष्ट होतो." वगैरे, वगैरे...
पुण्याने मला खूप वाईट अनुभव दिले. पण त्यातही काही लोकांची त्यांच्यापरीने इतकी चांगली साथ मिळाली की पुण्यात गेल्यावर यांची भेट झाली नाही तर चुकल्यासारखं वाटल्या खेरीज पुणे दौरा पूर्ण होत नाही. मुंबईत झालेले शिक्षण म्हणजे महाविद्यालय-घर-अभ्यास-प्रबोधिनी-सायकल या शिवाय वर्गात दोनच विद्यार्थी असल्याने काॅलेज लाईफ एन्जाॅय करण्यासाठी कधी कारण मिळण्याचा अवसरच नव्हता. ते काॅलेज लाईफ पुण्यात एन्जाॅय करता आलं. अभ्यासाकडे दुर्लक्ष झालंही असेल पण अभ्यास एके अभ्यास करून कोणाचं भलं झालंय? पद्धतशीर बंक मारून चित्रपट बघितले. नाटकं केली. मित्र-मैत्रिणींच्या गाड्यांवरून टेकड्या हिंडलो. पुण्यात राहण्याच्या प्रयत्नात हाॅस्टेल लाईफ बघायचा आणि बॅचलर लाईफ जगायचा काही महीन्यांसाठी अनुभवही घेतला. पेठेंमधले पुणेरीपण अगदी कोळून प्यायलो ते योग्य वेळी वापरता येण्याच्या उद्देशानेच!
"एकच भाषा शिकावी पण व्यवस्थित, परिपूर्ण शिकावी." हे भाषेचं तत्त्व इथेच उलगडलं गेलं.
विभागाचे दरवाजे संध्याकाळी बंद झाले की विद्वान् विदुषींबरोबर अभ्यासासाठी दरवाजाबाहेर बैठक मारली जात असे. नाकं मुरडत यज्ञकर्म समजत हाॅस्टेलचे बेचव अन्न पोटात ढकललं जाई. पुण्याच्या आलिशान रस्त्यांवर सायकल पळवणं आनंददायी असे. बाकी राहण्या खाण्याची मारामारी रोजच चालू होती. सकाळी लवकर उठून दूध आणायला जावं, तर गवळ्याची झोप मोड व्हायची. अश्या सगळ्या विचित्र अनुभवांनंतर अभ्यासावर परिणाम होतोय हे समजलं. मग रोज प्रवास करायचे ठरवले आणि ट्रेन मधलं वेगळंच आयुष्य सुरू झालं. सर्वांना नवल वाटायचं. बोलण्यासाठी तो मूर्खपणाही वाटायचा. विभाग प्रमुखांना हाॅस्टेलच्या खोलीवरचा ताबा सोडण्या बाबत लेखी पत्र दिले. तेव्हा त्या ते घ्यायला तयार नव्हत्या. आम्हा सगळ्यांवर त्यांची आजी सारखी माया आणि लक्ष असायचं. प्रवासामुळे अभ्यासाकडे दुर्लक्ष होतंय म्हणून मार्क जास्त द्यावेत अशी अपेक्षा कधी बाळगली नाही. वेळेमधे सूट मिळायची. अभ्यासासाठी नाना तऱ्हेची मदतही मिळायची. टोमणेही मिळायचे. पण पुण्यात रहायचे नाही हेही ठरलेच होते. कधी ग्रुपचे कुठे फिरायला जायचे ठरले की ते माझ्या वेळेत इंद्रायणी जायच्या आत बसवावे लागे. नाकं मुरडत, माझ्या प्रवासाच्या निर्णयाला शिव्या घालत ते बसवले जाई. तो प्रवास संपत आला तेव्हा ते सगळं मीस करणार असल्याचा विचार डोळे पाणावून गेला. नाही म्हणता म्हणता शिक्षण संपलं.
माणसापेक्षा अधिक जागेशी भावना जोडल्या जातात असं म्हणतात. कितीही वाईट अनुभव आले तरीही आता ते भूतकाळातले आहेत. त्यांच्यामुळे मी शहाणा झालोय. वाईट अनुभव देणाऱ्या जागेला मी चांगलाच ओळखून आहे. गुण-दोषांसहित तिला स्वीकारलंय. त्या जागेशी माझा जुना संबंध जडलाय कारण तिच्याकडून मला कोणत्याच अपेक्षा नाहीयेत. बारामहीन्यातले ऋतू माहिती आहेत. तिचे स्वभाव-धर्म, गुण-दोष, वगैरे सर्व पैलूंपासून मी अनभिज्ञ नाही. मी पुण्याला ओळखू लागलोय!
भूतकाळ गेला. आता वर्तमान आणि भविष्यकाळांसाठी मीच पुण्याचे दरवाजे उघडे ठेवले आहेत. पुण्यात न राहता एक कंफर्ट झोन निर्माण करून असतील कदाचित्. पुणे परकं राहीलं नाहीये.
एखादी गोष्ट स्वीकारायला आणि मग, ती स्वीकारल्याची जाणीव व्हायला किती वेळ लागू शकतो ते आता समजतंय खरं!
ज्या विषयी भरभरून लिहावे असे काही कारण नव्हते, त्या विषयी लिहूच नये असेही कारण मिळाले नाही. व्यक्त व्हायचे ठरवले. वाणीने रूप प्रकटीले. शब्द जुळले. झाले.
-सम्प्रिः।