जावं कधीतरी एकट्यानेच सायकलिंगला,
दूर कुठेश्या एखाद्या अनोख्यात
मनातले ताल उतरवावेत पायात।।
सूरही गुणगुणतील चाकातल्या स्वरात
शब्दही मिळतील वार्याच्या घोंघावात ।।
आवाजातच असतील प्रकृती आणि प्रत्यय
क्रियापद सापडताच, काराकाचा होईल जय ।।
वाक्य-शब्द-अर्थ, यांचे जेव्हा होतील स्फोट
स्वीय सूर गवसून, ब्रह्मावरही चढेल कोट ।।
तेव्हा काय विचारशील तू,"खरच किती एकटा आहेस?"
"सायकल-संगीत-भाषेसह तू,चौथा कुठे फिरतो आहेस?"
ऐकून प्रश्न उत्तरातला एकटेपणा जाईल दूर
हेच गाणं ऐकत पुन्हा पेडल मारत कापीन नूर ।।
म्हणून म्हणतो,
जावं कधीतरी एकट्यानेच सायकलिंगला…
मी एकटा तर नव्हतो पण अनुभवातून परामर्श गोळा करत होतो. महिन्याभराने सायकल बाहेर काढल्यामुळे येणारे अनुभव. महिना-दीड महिन्यानंतरचे सायकलिंग तेही माथेरानचे… नेहमीप्रमाणेच अचानक ठरलेले.
घरच्या गणपतीचे विसर्जन होऊन, मागील आठवडा-पंधरवडाभर रंगत शिगेला पोहचलेला घरचा गणेशोत्सव संपवून घर एकदम शांत झालं होतं. लेक्चर रद्द झाल्याने किंवा केल्याने अचानक मिळालेली शनिवारची सुट्टी आणि नंतरच्या रविवारच्या सुट्टीने दोन दिवस आरामात जाणार होते. पण, तेव्हा विशेष करायचं ते काय? आराम, झोप!!! आनंदी आनंदच!
दिवे बंद करायचा अवकाश, रोहन चा फोन आला. "दादा उद्या माथेरानला येतोस का? नेरळ पर्यंत ट्रेन" दोन दिवस सुट्टी आणि त्यातल्या एका दिवशी सायकलिंग! कल्पना भारी होती. विचार न करता "हो" म्हटलं गेलं. आई-बाबांना न विचारता निर्णय सांगितला. आणि मनातल्या अनिश्चीततेसह, माझी वाट पाहणारी, नुकतेच नवीन ट्यूब बसवलेली act११० खाली उतरवली गेली.
याच अनिश्चिततेमुळे जरा उशिरा का होईना ठाकुर्ली स्टेशन गाठलं. तोच धुवांधार पाऊस सुरु झाला. इंद्रायणी ११ वाजता सुटणार आहे, अशी अनौन्स्मेंट. तिथे दहावीत असलेल्या रोहनच्या आईचं रोहनला फोन वरून टिप्स् देणं चालू होतं. तसे आम्ही दोघेही समदुःखी होतो. कारण घरी, आई-बाबांच्या valid reasons मुळे, या वेळेस त्यांच्याकडून पायखेची झाली होती. मनातल्या अनिश्चिततेचं कारणही तेच असावं.
तेराव्या महिन्यात सुरु झालेला दुष्काळ भाद्रपदात संपल्याचा दिलासा देणारा पाऊस पडत होता. ट्रेनच्या खिडकीतून रोज दिसणारे येणारे सौंदर्य आज मुक्ततेने अनुभवत होतो. नेरळची वेस ओलांडून प्रत्यक्ष घाट सुरु झाला. पाऊस-धबधबे-दरी आणि वरून दिसणारी हिरवीगार भातशेतं! चढावर आमच्या बरोबर मंद गतीने वाहणारा वारा आणि अविरत पडणारा पाऊस साथीला होताच.
विद्याव्रताचा अभ्यास करतांना शारीरिक विकसनात दम-रग-वेग वगैरे शब्द आणि त्यांचे शाब्दिक अर्थ वाचले, ऐकले होते. पण प्रत्यक्ष ज्ञानातून अर्थस्फोट झाला तो या घाटातल्या चढावर! रोहन माझा दादा झाला होता! जुम्मापट्टी मागे टाकलं आणि "१st गीअर" लिहिलेले चढ दिसू लागले. रोहन चिकाटीने ते चढत होता. माझे पाय तर दुखत नव्हते. पण घेतलेल्या श्वासातील प्राणवायुचा योग्य रीतीने उपयोग करता न आल्याने "दम" लागत होता. मी, बरेच चढ अर्ध्यावर उतरून, चालत चढलो तर काही पूर्ण केले. रोहनला माझ्यामुळे थांबावं लागत होतं.
कड्यावरच्या गणपतीकडे जाणाऱ्या रूळांपर्यंत पोहचेस्तोवर पाऊस थांबला होता आणि घनदाट धुकं दाटू लागला. ७-८ मीटर च्या पुढचं दिसणही कठीण! एक-दोन चढ न उतरता चिकाटीने चढता आले. तेव्हा लक्षात आलं. समोर दिसणारा खडा चढ, सुरु होण्या आधीच मनाला मागे खेचत होता. दम लागतो आहे, हे खरं आहे. पण, दम खाऊन चढ पूर्ण करणही कठीण असलं तरी अशक्य नाहीये.
एका नवीन र्हिदमने माथेरान पर्यंत पोहचलो. काही वर्षांपासून तो घाट सायकलवरून पूर्ण करायचं मनात असलेलं स्वप्न पूर्ण झालं होतं! सायकलिंग करतांना पावसाळी निसर्ग बघून मनात गुणगुणत असतो कालिदास. "परा" मध्ये तर्कसंग्रहातून कुठेतरी उभे राहत असतात परामर्श आणि वैखरीतून लिहिले जात असतात असेच छोटे छोटे अनुभव!
खरंच मी जितकं जास्त फिरतो तितकंच जास्त मला संस्कृत समजत असतं. पुस्तकातल्या किड्यांपेक्षा ते खूपच माणसाळलेलं असतं.
20/09/2015
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा