शुक्रवार, २९ मार्च, २०१९

नकाशा

सौर चैत्र 8, 1941
गुवाहाटी
0 कि.मी.
लिहून पोस्ट करे पर्यंत दुसऱ्या दिवशीची सकाळ उजाडते आहे. पण लिहीलं जातंय याला जास्त महत्व देतोय.
फार गंमतीशीर प्रश्न विचारले जातात कुठेही गेल्यावर. म्हणजे वाचकांना गंमतीशीर वाटतील असे, किंवा वाचकांनाही पडतील असे.
सायकलच्या हस्तकावर (हॅण्डल वर) एक चमकणारा नट (nut-bolt wala) असतो जो आडव्या हस्तकाला उभ्या काट्याशी (forkशी) जोडतो. त्या चमकणाऱ्या नट कडे बघून, हे सायकल सुरू करायचं बटन आहे असा भाबडा समज जन सामान्यांत असतो.
डोळस निरीक्षण क्षमतेच्या अभावाने माझी सायकल बघणाऱ्यां भारतीयांच्या सुस्साट काल्पनिक भरार्या उडत असतात.
माझ्या सायकलवरील पाण्याच्या बाटल्या या इंधनाने भरलेल्या आहेत आणि सायकल ही बॅटरीवर चालू लागणे व तश्या सायकलने फिरणे हे बड्या लोकांच्या ऐशो आरामाचं काम आहे. सरकार अश्या लोकांना प्रचारासाठी पगारी नोकरीवर पाठवते. मी पाण्याची बाटली काढून पाणी प्यायलो की कमालीचं दुःखं होतं कल्पनागारांना. मग ती 'सीस्टम' माझ्या बॅगेत किंवा पुढच्या हस्तकावर लावलेल्या खोक्यात आहे यावर खात्री पटलेली असते. मी चेन उघडतो आणि त्यातून एखदं चाॅकलेट काढतो. त्यातच कचरा टाकतो आणि चेन बंद करतो. हे निरीक्षण सुरू असतं. कल्पनागारांवर दुसरा आघात झालेला असतो. त्य "बटनाने जी पी एस सुरू होतं आणि मला 4डी नकाशा दिसतो. मला सरकार रस्ते सांगते या अदृष्य स्क्रीनच्या माध्यमातून!
एकेक कल्पना फक्त ऐकायच्या असतात.
"
या संपूर्ण प्रवासाचं नियोजन मी गूगल नकाशावरून निघण्या आधीच केलेलं आहे. मी घरी असतांना गूगल नकाश्यावर दोनदा हा संपूर्ण मार्ग टप्प्या टप्प्याने बघितला, आखला. मग टंकन करायचं काम करतांना सोऽहम् मदतीला होता. कट्ट्यावर ही गोष्ट सांगितली की वाऱ्यासारखी घरापर्यंत पोहचेल. जे मला नको होतं. म्हणून सुरवातीचं नियोजन अगदी खासगीत बरंचसं घरा बाहेर सायक्लवणाऱ्या मित्रांबरोबर आणि घरी एकट्याने केलं.
घरी हे नकाशावरचं काम व्हायचं.

नकाशा बघणं, वाचणं हे काही जन्मजात शिकून आलेलं कौशल्य नाही. छोट्या छोट्या फेऱ्यांचं आयोजन-नियोजन करता करता नकाशा वाचणं शिकू लागलो.

पुण्यात प्रशांत सरांना भेटायला गेलो. त्यांनी मला उपासना मंदिरात बोलावलं. वर्ग सुरू होता भूगोलाचा. प्रबोधिनीतला वर्ग, मी पहिल्यांदाच बघत होतो. अनेक कृती पत्रिका एका मागोमाग एक दिल्या गेल्या, प्रत्येक कृतिपत्रिके वर आधारित असलेला विषय सर समजावत. मुलं ती सोडवत. त्यावर चर्चा होत. मधे पाच मिनीटाची मोकळीक आणि वर्ग संपला.
विषय नकाशा वाचन आणि नकाशा बनवणं हा होता. दिशांवर विचार करायला शिकवलं जात होतं. मधल्या मोकळ्या पाच मिनीटाच्या वेळेत आमच्या गप्पा झाल्या. मला सरांनी मुलांसमोर  विषय मांडायला सांगितला. मी मानसिकरित्या अजिबात तयार नव्हतो. प्रबोधिनीतले विद्यार्थी. त्यातही माझ्या डोक्यातील विचार स्पष्ट व्हावेत म्हणून मी सरांकडून मार्गदर्शन घ्यायला आलेलो, म्हणजे डोक्यात विचार स्पष्ट आहेत की नाहीत याविषयी जाणीव नाही. त्यात विद्यार्थ्यांशी त्यांना समजेल अश्या पातळीवर विषय घेऊन जाऊन बोलणं.
प्रचंड दडपण, भिती मनात साठवून वर्गासमोर उभा राहिलो.5-10 मी. बोलून झाल्यावर सर म्हणाले, "त्यांना तू फिरणार आहेस त्या गावांपैकी दहा शहरांची नावं दे शोधायला."
मी नावं सांगितली.माझी नियोजनाची वही वाचून वाचून ती पाठ झाली होती. नंतर सरांनी नकाशा कसा वाचायचा हे समजावत पुण्याचा नकाशा, आपल्या घराच्या 200 मी. परिघात असणाऱ्या वास्तू, रस्त्यांचा नकाशा बनवण्याचा गृहपाठ दिला. तास संपला.
घरी परततांना, ट्रेन मधे एक वेगळा आनंद अनुभवत होतो.

परवा कोणीतरी फोन वर, "तुला रस्ता कसा समजतो?" असा प्रश्न विचारला. "कागदावरच्या चित्रांची सांगड वातावरणाशी घालता आली की तो कागद समजतो."
तशी दृष्टी विकसित व्हायला तितकाच वेळ द्यावा लागतो.
पाठांतर न आवडणाऱ्या मला संस्कृत शिकून एक तप पूर्ण झालंय आणि सायकलस्वार म्हणून सायक्लवतांना 7 वर्ष! या सगळ्याची सांगड घालायचं काम प्रबोधिनी करते.

पहिल्या सायकल सहलीचं नियोजन करतांना सुमेध, निखीलला, "मला काही गूगलवरचं समजत नाहीये" असं म्हणत संगणकावर गूगल नकाशा दूरूनच बघितला होता. नंतर क्रीडा भारतीची उज्जैनची सायकल सहल झाली. आपण किती प्रवास केलाय या उत्सूकतेपायी गूगलवर उज्जैन ते डोंबिवलीचा रस्ता असंख्य वेळा बघितला. सायकलने जाऊन आलोय म्हणजे, कुठे जाऊन आलोय हे नकाश्यावर बघता यायला हवं. म्हणून दरवेळेस डोंबिवलीच्या आजूबाजूची ठिकाणं नकाश्यावर बघितली.
तेव्हाच लक्षात आलं डोंबिवलीला तीनही बाजूंनी खाडी किनारा आहे आणि चौथ्या दिशेला डोंगर आहेत. कुठेही रस्ता विकसित नसल्याने, रेल्वे हेच डोंबिवली बाहेर पडायचं एकमेव माध्यम आहे. प्रबोधिनीच्या दुसऱ्या सायकल सहली पर्यंत स्वतः नकाशा वाचू शकीन इतक्यावेळा नकाशे बघितले होते. प्रबोधिनी मला घडवत होती.

एका गावातल्या शाळेत मुख्याध्यापकांना मी केलेला प्रवास सांगितला आणि ते चकीत झाले ते फक्त मी सांगत  असलेल्या शहरांची नावं ऐकून. मग त्यांनी नकाशावाचना विषयी चौकशी केली. त्यांना त्यांच्याच गावाच्या आजूबाजूचा नकाशा गूगलवर दाखवला आणि त्यात रस्ता कसा शोधायचा हेही!
सायक्लवण्याचे #सायकलोपासना होतानाचा हा नकाशा मजेशीर आहे.

-गंधार.

रविवार, २४ मार्च, २०१९

तेल, कर्क

Saur 3 Chaitra 1941
Today's ride 63.63kms
Dhupguri-Coochbehar

भारतभरात विविध तेलांचा वापर करत रोजचं जेवण बनतं. जिथे जे पिकतं त्याचं तेल! शेंगदाणे, खोबरे, तीळ, मोहरी हे तेलाचे पारंपारिक प्रकार. मानसोल्लास नावाच्या संस्कृत ग्रंथात अकराव्या शतकात, जेवण बनवतांना, वांगे भाजून त्याला सुटलेलं तेल काढलं जात आणि ते वापरून जेवण केलं जाण्याचं वर्णन आहे. सूर्यफूल, तांदूळ, ऑलिव्ह वगैरे हल्लीची तेलं.
प्रत्येकाच्या घरात आई-मावशी-आत्या-काकू-मामी-आजी-ताई सगळ्या बाई माणसांचं स्वतःच्या घरात वापरलं जाणाऱ्या तेलावर विशेष प्रेम असतं. घरच्या जेवणाला त्या तेलामुळेच चव येते अशी धारणा घरा-घरात रुजलेली दिसते. हाॅटेल मॅनेजमेंट करून आलेला उत्तम स्वयंपाकी देखील वापरल्या जाणाऱ्या तेलाविषयी काटेकोरपणा पाळतो.
घरातून बाहेर पडणाऱ्या मुलाला साधारणपणे संपूर्ण समाजाचे, खासकरून घरातून बाहेर न पडलेल्या पुरुषव्यक्तीचे आणि  समस्त स्त्रीबांधवांचे जे सर्वसामान्य प्रश्न असतात त्यातला एक म्हणजे तेल, त्याची चव आणि खाणं!
पण खरं सांगू का,
त्या त्या प्रांतातील, ते ते जेवण त्या त्या तेलात इतकं चविष्ट लागतं की, तुम्ही जर माझ्या सारखे अस्सल खवय्ये असाल तर सरसों का तेल असो की खोबरेल् तेल असो त्यात तयार झालेल्या लिट्टी पासून मासळी पर्यंत, त्यात तळलेल्या फणसाच्या गऱ्यापासून  मालपुव्या पर्यंत सगळे पदार्थ खूप चविष्ट लागतात.
मी घरच्या जेवणाची आठवण येण्यासाठी स्वतःकडे कारण ठेवत नाही. अनेक घरांमधील जेवण खाललं आहे. ते घरचंच जेवण होतं असं म्हणतो.
विविध चवींनी आणि तेलांनी नटलेल्या खाद्यपरंपरांचा मला अभिमान आहे!
मला कोणी आतिथ्य देण्यासाठी मराठमोळं जेवण करायचा प्रयत्न केला की अजिबात आवडत नाही. कारण ती 'ना घर का, ना घाट का' चव बनलेली असते!
"चार दिनों की बात है,
रोज़ नया खाना खाना है
पेट भरके जीना है"
ईशान्य भारत फिरून झाला की राष्ट्रीय भाजी कोणती? यावर लिहीणार आहे...
सदर तैलसंस्कृती विषयी लिहीण्याचं कारण, योगायोग!
कोणीतरी मला "सरसों का तेल आवडतं का?" विचारलं. फार सरळ उत्तर न देता, "सायकलवर सूर्यफूलाच्या तेलाचा डबा घेऊन फिरता आलं असतं तर नाही म्हणण्यावर विचार केला असता." असा सूर्यफूलाचा उल्लेख केला आणि अहो आश्चर्य! आजच्या प्रवासात दोनहून जास्त सूर्यफूलाची शेतं दिसली. अनेक महिन्यांनी सूर्यफूल बघितलं.
प्रवासाचा काही वेळ या योगायोगावर विचार करण्यात गेला.

सायक्लवतांना अनेक विचार  डोक्यात घोळत असतात, रेंगाळत असतात. #सायकलोपासना #भाषारत असल्याने भाषे विषयी प्रामुख्याने असतात.
आदल्या दिवशी लिलेल्या लेखांमधील शब्दांवर उगाच विचार होत होता.
"मकरवृत्त= tropic of Capricorn
कर्कवृत्त= tropic of Cancer
विषुवृत्त= equator?"

प्रश्न वाचकांना सोडवता आला तर वाचायला आवडेल. मी, "कर्क" या एकाच शब्दावर विचार करत होतो.

मला हा ध्वनिवाचक वाटतो. खेकडा कटर् कटर् आवाज करतो.  "कर् कर् इति ध्वनिं करोति स कर्कः"
आकृतिबंधाने कर्कत्व विविध गोष्टींवर पसरलंय. रास-वृत्त (खगोल), रोग, कर्कटक, वगैरे शब्द रोजच्या व्यवहारातले.

"कर्कटक" हा शब्द लहानपणी सहज कानावर पडायचा, हळू हळू मौन झालाय. दुकानात गेल्यावर जुना गुजराती दुकानदारही कर्कटक काढून देईल. पण नवीन दुकानदार पेचात पडेल "नवीन" शब्द ऐकून आणि लहान मुलालाच, "याला कंपास म्हणतात," म्हणून शिकवेल.
पुढल्या वेळी दुकानात जाताना तो लहान मुलगा का म्हणून कर्कटक शब्द वापरेल?
"आडवं झालं कर्कटक तिरडवर इंग्रजीने बांधलेल्या..."
बोली मरते म्हणजे काय होतं?
शब्द संचय, वाक्य रचनेतील वैविध्य अटत जातं, नाविन्य मरतं. भाषेचे भाषिकच बोलीला मारत असतात आणि स्वतःहूनच तिला तिरडीवर बसवत असतात. भाषा मरू शकत नाही. ती नित्य आहे. एका बोलीचा भार दुसरी बोली स्वीकारते. कर्कटक शब्दाचा भार कंपास शब्दाने उचलला. वस्तू तिथेच राहिली. माणसाला वस्तूचं हवं असणंही तिथेच राहीलं. प्रकट होताना केवळ शब्द बदलला.
फार जास्त तांत्रिक झालं, माफ करा.
पण या प्रक्रियेसाठी समाजही तितकाच कारणीभूत असतो. आठवी पासून कर्कटक वापरायला सुरूवात होते. आणि आठवी पासून सगळ्याच शाळा सेमी इंग्रजी झाल्या की कर्कटक शब्दाचे मरण उद्भवते...
#bergamontindia #bergamontbicycles #21dayschallenge #dombivlicycleclub #bikeport #Pitambari #cyclopasana

शनिवार, २३ मार्च, २०१९

श्वानाप्रिय मी भाग-3

Today's ride 83kms.
Siliguri to Dhupguri
Saur 2 Chaitra  1941

माझ्या सायकलने कुत्र्याला उडवलं. नंतर सायकल पडली. तिच्या बरोबर मीही पडलो.

#श्वानाप्रिय मी भाग -3

तर झालं असं, की माझ्या समोरचा रस्ता सुस्साट रिकामा होता. नुकतच रेल्वे फाटक उघडलं होतं. माझ्या मागे अश्वशक्तिधारी गाड्यांची स्पर्धा सुरू होण्या पूर्वी मी वरदळीचा पट्टा ओलांडण्याच्या प्रयत्नात तीसचा वेग बसल्या बसल्याच गाठला होता. उजव्या बाजूला मासळीबाजार होता. लोकं कुतूहलाने वेगवान #bergamontbicycles कडे बघत होते. ती ऐटीतच रस्ता कापत होती.
तेवढ्यात एका तांबड्या कुत्र्याने डावीकडून धावत येत माझ्या समोर रस्ता ओलांडला. रस्त्याच्या कडेला एक काळं कुत्र कान टवकारून बघतंय दिसल्या बरोबर पाय मारणं थांबवलं. पंचवीस पर्यंत वेग उतरला असेल.   आता अजून वेग घेतला तर कुत्र्याला माझ्या मागून जावं लागेल. म्हणून जोर लावून अठ्ठावीस पर्यंत पोहचलो. तोच माझ्या समोरून तो रस्ता ओलांडायला वाकडा धावला. त्याला "विश्चकद्रा" म्हणतात (वेडीविकडी पावलं टाकणारा) असं निरुक्तात वाचलं होतं ते अनुभवायचं होतं.
मी कच्चकन थांबक दाबला बावीस पर्यंत उतरलो. त्याच्या पुढे अजून थांबक खेचणं म्हणजे डिस्क तोडणे किंवा चाक आऊट जाण्याचे संकट स्वतःवर ओढावण्यासारखं होतं. मी थांबक सोडून देत वेगाला बावीस वरून शून्यापर्यंत आणण्याचं काम कुत्र्यावर सोडलं.
हे काळं कुत्र मांजरीपेक्षा चपळ निघालं. छान आवाज करून निघून गेलं धावत पुढे.
शीरस्त्राण होतं. डोक्याला काही लागलं नाही. कुत्र्याने सायकल छान थांबवली होती. कुठ्ठेही खरचटलं नाही. डावा तळहात रस्त्यावर ठेवला गेला. इतकं वजन त्यावर एकदम पडलं म्हणून तेव्हाच दुखलं. ते बरं झालं. दुखणं लगेच समजलं की अजिबात लागलेलं नसतं.
मी सायकल उचलली. न अडखळत उभा राहिलो. माझा छोटा मोबाईल खिश्यातून निखळून रस्त्यावर पडला होता. मला समजायच्या आत एका सज्जनाने माझं लक्ष वेधून मला आणून दिला. समोर मासळी बाजारतून काही जणं मला बोलवत होती. पायाला मुकामार वगैरे लागला नसल्याने, न लंगडत रस्ता ओलांडला. लोकांनी माझ्यासाठी जागा केली होतीच.
बसायला दिलं. शीरस्त्राण काढायला लावलं. कुठेही लागलं नाहीये बघून हातावर ठेवायला बर्फ दिला.
कोण? कुठला? वगैरे बंगालीत गप्पा झाल्या. मग त्यांना समजलं मी बंगाली नाहीये. "आमची बांगला वेगळी आहे."
"कशी बरं? काय नाव?"
"कामतापुरी बांगला"
त्यांनी मला कुठून आलास? म्हणून त्यांच्या त्या कामतापुरीत प्रश्न विचारला. फारसा काही फरक नाही जाणवला.

जसं सोलापूरातला अमराठी माणूस मुंबईतली मराठी पण समजू शकतो, तसंच. मराठी माणसालाच मराठीतला फरक कळेल. तसं काहीसं माझं आणि त्यांच झालं असावं.
मयनागुड़ी मासळी बाजारातली ही गोष्ट.
मला माझे श्वानाप्रियत्व वाढवायला एक कारण मिळालं होतं.

सरळ साध्या रस्त्यावर तीसचा वेग वगैरे पकडायला जोश कुठून आला होता? तर, निसर्गाने दिला होता. रस्त्याच्या दोन्ही बाजूंना पांढरी-गुलाबी रानफुलं होती. त्या पलिकडे चहाचे मळे होते अथांग पसरलेले. काही ठिकाणी भातशेती होती तर काही ठिकाणी गवताचे गालीचे... त्यात मधे गुलाबी रानफुलं. ईशान्येकडे जाणाऱ्या भारताचा अगदी अरूंद पट्टा ओलांडत होतो. दक्षिणेकडे बांगलादेश, उत्तरेकडे भूतान आणि मधे भारतात मी. फक्त स्वप्नात रंगवलेल्या, गप्पांत रंगलेल्या, पुस्तकात आणि वृत्तपत्रात वाचलेल्या ईशान्यभारताकडे मी जात होतो, जात आहे. डोंबिवलीत सूर्य पोहचेल तेव्हा मी त्याला तासाभरापूर्वी किंवा त्याहीपेक्षा आधी बघितला असेल. कधीही पाऊस पडेल. यंदा उन्हाळा जून महिन्यात बिहार-उत्तरप्रदेशात अनुभवीन. बाकी सगळा वेळ पाऊस आणि थंडी. आणि आताही, डोंबिवलीत सगळे पंख्या खाली घाम गाळत असतील कदाचित. मी मात्र हिमालयावरून येणारा गार वारा अनुभवतोय. मेघ दूत म्हणून रामटेकला आला असेलही माझ्या बरोबर हिमालयातही आला. मी त्याच्या घरी जातोय... मेघालयात...
आणि नद्या? त्यांना कसा विसरू? भारतातल्या फार कमी नद्या बघायच्या राहिल्या आहेत. सिलीगुडीत महानंदा ओलांडली, जलपायगुडीत तीस्ता, मग जलढाका. काचेसारखं पारदर्शक पाणी! खोल खोल तळ दाखवणारं. इतक्या नद्या बघितल्या आता एक नद बघायचाय, ओलांडायचाय, ब्रह्मपुत्र...😍😇
या निसर्गसंपन्न भारताचा मी एक नागरिक, विविधतेने नटलेल्या परंपरा अनुभवतोय. कंटाळा, म्लानता सुचणार तरी कशी आणि कुठून?
धूपगुड़ी, प.बंगाल