सौर चैत्र 8, 1941
गुवाहाटी
0 कि.मी.
लिहून पोस्ट करे पर्यंत दुसऱ्या दिवशीची सकाळ उजाडते आहे. पण लिहीलं जातंय याला जास्त महत्व देतोय.
फार गंमतीशीर प्रश्न विचारले जातात कुठेही गेल्यावर. म्हणजे वाचकांना गंमतीशीर वाटतील असे, किंवा वाचकांनाही पडतील असे.
सायकलच्या हस्तकावर (हॅण्डल वर) एक चमकणारा नट (nut-bolt wala) असतो जो आडव्या हस्तकाला उभ्या काट्याशी (forkशी) जोडतो. त्या चमकणाऱ्या नट कडे बघून, हे सायकल सुरू करायचं बटन आहे असा भाबडा समज जन सामान्यांत असतो.
डोळस निरीक्षण क्षमतेच्या अभावाने माझी सायकल बघणाऱ्यां भारतीयांच्या सुस्साट काल्पनिक भरार्या उडत असतात.
माझ्या सायकलवरील पाण्याच्या बाटल्या या इंधनाने भरलेल्या आहेत आणि सायकल ही बॅटरीवर चालू लागणे व तश्या सायकलने फिरणे हे बड्या लोकांच्या ऐशो आरामाचं काम आहे. सरकार अश्या लोकांना प्रचारासाठी पगारी नोकरीवर पाठवते. मी पाण्याची बाटली काढून पाणी प्यायलो की कमालीचं दुःखं होतं कल्पनागारांना. मग ती 'सीस्टम' माझ्या बॅगेत किंवा पुढच्या हस्तकावर लावलेल्या खोक्यात आहे यावर खात्री पटलेली असते. मी चेन उघडतो आणि त्यातून एखदं चाॅकलेट काढतो. त्यातच कचरा टाकतो आणि चेन बंद करतो. हे निरीक्षण सुरू असतं. कल्पनागारांवर दुसरा आघात झालेला असतो. त्य "बटनाने जी पी एस सुरू होतं आणि मला 4डी नकाशा दिसतो. मला सरकार रस्ते सांगते या अदृष्य स्क्रीनच्या माध्यमातून!
एकेक कल्पना फक्त ऐकायच्या असतात.
"
या संपूर्ण प्रवासाचं नियोजन मी गूगल नकाशावरून निघण्या आधीच केलेलं आहे. मी घरी असतांना गूगल नकाश्यावर दोनदा हा संपूर्ण मार्ग टप्प्या टप्प्याने बघितला, आखला. मग टंकन करायचं काम करतांना सोऽहम् मदतीला होता. कट्ट्यावर ही गोष्ट सांगितली की वाऱ्यासारखी घरापर्यंत पोहचेल. जे मला नको होतं. म्हणून सुरवातीचं नियोजन अगदी खासगीत बरंचसं घरा बाहेर सायक्लवणाऱ्या मित्रांबरोबर आणि घरी एकट्याने केलं.
घरी हे नकाशावरचं काम व्हायचं.
नकाशा बघणं, वाचणं हे काही जन्मजात शिकून आलेलं कौशल्य नाही. छोट्या छोट्या फेऱ्यांचं आयोजन-नियोजन करता करता नकाशा वाचणं शिकू लागलो.
पुण्यात प्रशांत सरांना भेटायला गेलो. त्यांनी मला उपासना मंदिरात बोलावलं. वर्ग सुरू होता भूगोलाचा. प्रबोधिनीतला वर्ग, मी पहिल्यांदाच बघत होतो. अनेक कृती पत्रिका एका मागोमाग एक दिल्या गेल्या, प्रत्येक कृतिपत्रिके वर आधारित असलेला विषय सर समजावत. मुलं ती सोडवत. त्यावर चर्चा होत. मधे पाच मिनीटाची मोकळीक आणि वर्ग संपला.
विषय नकाशा वाचन आणि नकाशा बनवणं हा होता. दिशांवर विचार करायला शिकवलं जात होतं. मधल्या मोकळ्या पाच मिनीटाच्या वेळेत आमच्या गप्पा झाल्या. मला सरांनी मुलांसमोर विषय मांडायला सांगितला. मी मानसिकरित्या अजिबात तयार नव्हतो. प्रबोधिनीतले विद्यार्थी. त्यातही माझ्या डोक्यातील विचार स्पष्ट व्हावेत म्हणून मी सरांकडून मार्गदर्शन घ्यायला आलेलो, म्हणजे डोक्यात विचार स्पष्ट आहेत की नाहीत याविषयी जाणीव नाही. त्यात विद्यार्थ्यांशी त्यांना समजेल अश्या पातळीवर विषय घेऊन जाऊन बोलणं.
प्रचंड दडपण, भिती मनात साठवून वर्गासमोर उभा राहिलो.5-10 मी. बोलून झाल्यावर सर म्हणाले, "त्यांना तू फिरणार आहेस त्या गावांपैकी दहा शहरांची नावं दे शोधायला."
मी नावं सांगितली.माझी नियोजनाची वही वाचून वाचून ती पाठ झाली होती. नंतर सरांनी नकाशा कसा वाचायचा हे समजावत पुण्याचा नकाशा, आपल्या घराच्या 200 मी. परिघात असणाऱ्या वास्तू, रस्त्यांचा नकाशा बनवण्याचा गृहपाठ दिला. तास संपला.
घरी परततांना, ट्रेन मधे एक वेगळा आनंद अनुभवत होतो.
परवा कोणीतरी फोन वर, "तुला रस्ता कसा समजतो?" असा प्रश्न विचारला. "कागदावरच्या चित्रांची सांगड वातावरणाशी घालता आली की तो कागद समजतो."
तशी दृष्टी विकसित व्हायला तितकाच वेळ द्यावा लागतो.
पाठांतर न आवडणाऱ्या मला संस्कृत शिकून एक तप पूर्ण झालंय आणि सायकलस्वार म्हणून सायक्लवतांना 7 वर्ष! या सगळ्याची सांगड घालायचं काम प्रबोधिनी करते.
पहिल्या सायकल सहलीचं नियोजन करतांना सुमेध, निखीलला, "मला काही गूगलवरचं समजत नाहीये" असं म्हणत संगणकावर गूगल नकाशा दूरूनच बघितला होता. नंतर क्रीडा भारतीची उज्जैनची सायकल सहल झाली. आपण किती प्रवास केलाय या उत्सूकतेपायी गूगलवर उज्जैन ते डोंबिवलीचा रस्ता असंख्य वेळा बघितला. सायकलने जाऊन आलोय म्हणजे, कुठे जाऊन आलोय हे नकाश्यावर बघता यायला हवं. म्हणून दरवेळेस डोंबिवलीच्या आजूबाजूची ठिकाणं नकाश्यावर बघितली.
तेव्हाच लक्षात आलं डोंबिवलीला तीनही बाजूंनी खाडी किनारा आहे आणि चौथ्या दिशेला डोंगर आहेत. कुठेही रस्ता विकसित नसल्याने, रेल्वे हेच डोंबिवली बाहेर पडायचं एकमेव माध्यम आहे. प्रबोधिनीच्या दुसऱ्या सायकल सहली पर्यंत स्वतः नकाशा वाचू शकीन इतक्यावेळा नकाशे बघितले होते. प्रबोधिनी मला घडवत होती.
एका गावातल्या शाळेत मुख्याध्यापकांना मी केलेला प्रवास सांगितला आणि ते चकीत झाले ते फक्त मी सांगत असलेल्या शहरांची नावं ऐकून. मग त्यांनी नकाशावाचना विषयी चौकशी केली. त्यांना त्यांच्याच गावाच्या आजूबाजूचा नकाशा गूगलवर दाखवला आणि त्यात रस्ता कसा शोधायचा हेही!
सायक्लवण्याचे #सायकलोपासना होतानाचा हा नकाशा मजेशीर आहे.
-गंधार.
छान लेख.वाचूनआवडला
उत्तर द्याहटवा