गुरुवार, २५ एप्रिल, २०१९

भाषारत 13

रोईंग, अरुणाचल प्रदेश
सकाळी सहाला पुरी-घूघनी आणि  लाल चहाचा नाश्ता करून पासीघाट सोडलं. सीयांग् नदीचं पात्र ओलांडून मेबोला पोहचलो तेव्हा साडे आठ वाजले होते.
केक आणि अमूल ताजा प्यायलो आणि तिखट मिठातल्या शेंगदाण्यांचं पाकीटही विकत घेतलं. एका ठिकाणी मक्याच्या चिवड्याची पाकीटं मिळाली होती. ती तीन घेऊन ठेवली. सिलूक ला पोहचलो तेव्हा डांबूकचा रस्ता बंद असल्याचं समजलं. पर्यायी रस्ता म्हणून नदी पात्रातून पायी चालून एक जंगल ओलांडायचा सल्ला मिळाला. सिलूक च्या पुढे जेमतेम दोन किलोमीटर गेल्यावर पक्का रस्ता संपला. एक टपरी होती. तिथे डांबूकला जाणाऱ्या रस्त्याविषयी चौकशी केली. एकतर आलो त्या रस्त्याने चाळीस कि.मी  पासीघाटकडे मागे फिरणं किंवा उजवीकडच्या पर्यायी 'रस्त्याने' जाणं हेच पर्याय समोर होते. आकाश निळेक्षार दिसत होतं, निरभ्र! हवेत गारवा असला तरी सूर्य छान भाजून काढत होता. पाण्याच्या बाटल्या भरलेल्या होत्याच. मी त्याच रस्त्याने मागे फिरणार नव्हतो. टपरी वरच्या आंटीने काळजी व्यक्त करत ब्लेसींगस दिले तेव्हा अकरा वाजले होते. तिखट शेंगदाणे खाऊन सायकलवर बसून उजवीकडच्या मार्गाला लागलो.
सायकल आरित होण्यापेक्षा टायर फाटण्याची भिती जास्त होती. पण चालण्यापेक्षा सायक्लवणं संयुक्तिक होतं. नदी पात्रातील दगडी वाट तास-दीड तासात संपली आणि भोपर-दावडीच्या पावसाळ्यातील टेकड्या आठवाव्यात तशी चिखल माततीतून पण घनदाट जंगलाने व्यापलेली वाट सुरू झाली. रचितला अश्या रस्त्यांवर सायक्लवायला आवडतं! त्यासाठी त्याला खास विशिष्ट ठिकाणी जावं लागतं. मला असल्या रस्त्याने सहज जाता जाता "भोऽक्" केलं होतं.

उरलेलं अंतर किती आहे? या प्रश्नाची प्रसंगी राग आणणारी पण मजेशीर उत्तरं मिळतात. दोन टोकाची उत्तरं देऊन प्रश्न विचारणाऱ्याचे समाधान होते असा काहीसा (गैर)समज इथल्या लोकांमधे आहे.प्रवासातील अर्धा वेळ "वो बहोत दूर है. पैदल से तो बहोत मुश्कील होगा ना. दो घंटा लग जाएगा" आणि मग अर्धा रस्ता "पोहच ही गये यही पर है." अशी उत्तर ऐकण्यात गेला. आपण रस्ता चुकलो नाही आहोत याची खात्री तेवढी सुख देऊन जात होती.
पाणी संपलं. तसा मुख्य रस्त्यापासून फार दूर नव्हतो. रस्ता नसलेला मार्ग संपून कच्चा रस्ता लागला होता. तशी रहदारीही वाढली होती- आठ-दहा मिनीटांनी एखादी गाडी जाऊ लागली होती. मागच्या तीन तासात जेमतेम दहा गाड्या गेल्या असतील, वस्ती तर नव्हतीच. आता बाजूला शेत जमीनही दिसू लागली होती. एका शेतकऱ्याने थांबून विचारपूस केली. पाणी कुठे मिळेल म्हणून मी विचारल्यावर समोरच्या घराकडे बोट दाखवून "माझंच घर आहे." सांगत दिलासा दिला. पाणी भरून घेतलं आणि पुढे निघालो. पोटात कावळे ओरडत होते. नदी पात्रात चटके बसवणारं ऊन होतं म्हणून थांबून काही चिवडा खालला नव्हता. नंतर जंगलात थांबलो की माश्यांचा त्रास म्हणून दोन घोट पाणी पिण्याचं सोडून न थांबता पुढे जाणं सुरू ठेवलं होतं.
योगायोगाने एक भेट घडली. जवळ जवळ वीस किलोमीटरचा रस्ता नसलेले- दगडी नदी पात्र आणि कीर्र जंगल यांतून प्रवास केल्यावर बोमजीर गावात पोहचलो होतो. मुख्य रस्त्याला लागणारा चढ चढलो. आणि तिथे एका ईसमाने हात दाखवून स्मितहास्य देत सायकल थांबवली. मी महाराष्ट्रातून आलोय म्हटल्यावर सहज पणे, "मै ठाने मे गया था. वो सायकल समीट के लिए." हे शब्दच प्रचंड आनंद देणारे पण, विश्वास न बसवणारे होते. रोईंग पासून 19 कि.मी दूर एका गावात कोणीतरी डोंबिवली सायकल क्लबला ओळखणारा आणि मीही ज्या संमेलनाला नव्हतो त्या संमेलनासाठी ठाण्यात जाऊन आलेला सायकलस्वार भेटला होता. अगदी "मक्तूब" म्हणावं तसंच हे सगळं विधिलिखित होतं.
दुपारचे दोन-अडीच वाजून गेले होते. जेवणासाठी पुढे मुख्य रस्त्यावर हाॅटेल मिळणार होतं. डुक्कराचं, बोकडाचं किंवा कोंबड्याचं मांस खाणार नव्हतो.  आजचं जेवण अरुणाचली, कसं असेल कुणास ठाऊक!
"स्टीम राईस मिलेगा, स्टीम माश मिलेगा. हम तो यही खाता है ना."
वाफवलेलं ते जेवण, "उदरभरण नोहे जाणी जे यज्ञ कर्म" म्हणत खाललं गेलं. वेगळी चव होती. अजून मासे खाण्यात पटाईत न झाल्याने काटे काढायला वेळ लागत होता. काटे काढतांना उडलेली माझी तारांबळ बघून हाॅटेलची  मालकीण मनसोक्त हसत होती. मला वाफवलेला पाला आणून दिला आणि चवीला बांबूचं लोणचं. वस्ती जवळून सायक्लवतांना एक विशिष्ट प्रकारचा वास हवेत पसरलेला असायचा. तो या वाफवलेल्या माश्याचा असतो हे समजलं. दुसऱ्या दिवशी सकाळपर्यंत हातातून तो गेला नाही. तोंडाला चव यावी म्हणून लिंबू सरबताची बाटली घेतली. प्रवासात पहिल्यांदाच पॅक्ड लिंबू सरबत पीलं. सव्वातीन ला साक्लवणं सुरू केलं.

मला भिती कश्यापासून वाटते? याचं उत्तर मिळालं होतं. दूरवर पसरत जाणाऱ्या स्वतःच्याच सावल्या घाबरवत होत्या. खरं तर जंगलातून प्रवास करतांना मला अनेकांनी विचारलेला प्रश्न आठवला. "भिती नाही वाटत का एकट्याने प्रवास करतांना?" यावर माझं उत्तर एका संस्कृत वैयाकरणाला शोभेल तसं नेहमीच असतं. "कस्मात् भयम्?" (कोणापासून भिती?)
रात्री मी गाढ झोपेत असतांना भूकंप येऊन गेला होता. नैसर्गिक रित्या मरण कसंही येऊ शकतं. त्यासाठी एकटं असण्याची गरज नसते. मानव निर्मित मरणासाठी माणूसकी मरावी लागते. मादक प्येये तिला मारण्यात यशस्वी होतात. दूरवर पसरलेल्या सावल्या सूर्यास्ताची वेळ जवळ आणतात आणि स्थानिक संस्कृतीचा भाग असलेल्या तांदूळाच्या दारूचा वास दरवळवतात. दारू म्हटल्याने तोंड वाकडं करायची गरज नव्हती. ती खूप चांगलं औषध आहे. पण ती किती प्रमाणात घ्यावी याचा विवेक नसल्याने संध्याकाळी पाच नंतर धूंद होऊन बरळणाऱ्यांची संख्या नाकारता येत नाही. त्याच्यापासून भिती. साडेचार-पाच पर्यंत रोईंग गाठायचं होतं. पाच म्हणजे सूर्यास्त होण्याची वेळ. फारसं कुठेही न बघता आता पाय मारले जात होते. महा मार्ग होता. अजूनही स्थानदर्शक (gps) बंदच होतं. कुठल्याही पाटीवर रोईंगचं नाव दिसत नव्हतं. मेका मात्र होतं. "मेका पासून रोईंग तीन किलोमीटरच्या अंतरावर आहे." इथल्या लोकांच्या अंतराच्या अंदाजावर माझा विश्वास बसत नाही. तीनचं तेरा नसावं अशी प्रार्थना करत मेका मधे पोहचलो. चार पसतीस झाले होते.
माझ्या प्रवासातील ईशान्यतम टोक, रोईंग. पावणे पाचला पोहचलो. काही अंशांच्या फरकाने परशुराम कुंड अधिक पूर्वेला असेल. पण ते पर्यटन स्थळ म्हणून. माझ्या अभ्यासाच्या दृष्टीने रोईंग पासून पुढचा प्रवास परतीचा प्रवास आहे. त्याक्षणी फोटो काढतांना दिवसभरातील अनिश्चितता आणि तिच्यामुळे आलेला ताण विसरून आनंद झाला.
आजची व्यवस्था विवेकानंद केंद्रात करवून घ्यायची होती. इथे पोहचलो तेव्हा कल्याण आश्रमाचा प्रगत प्रशिक्षण वर्ग सुरू होता. संघाच्या ईशान्य भारतातील पूर्णवेळ कार्यकर्त्यांशी भेटी झाल्या.
प्रबोधिनीने ईशान्य भारतातील शैक्षणिक संघटनांबरोबर केलेलं काम शाळा बंद असताना देखील माझ्या पाठीशी उभं होतं. दिवेकर सरांचा शैक्षणिक कामासाठी इथे फोन आला. ज्यांच्याशी बोलणं सुरू होतं त्यांच्यासमोर मी बसलो होतो. "डोंबिवलीतला सायकलवाला पोहचला का!" सरांचे उद्गार! पुणे प्रशालेतून दहावी झालेले विद्यार्थी  तेज़ूला आले आहेत असं समजलं. त्यांचे संपर्क मिळाले.
दिशा देणारं मार्गदर्शन स्वतःला भरकटण्यापासून थांबवायला महत्वाचं असतं. रिवाॅच संस्थेच्या विजय स्वामी सरांशी भेट झाली ती त्याचसाठी.
हा सगळा योग आहे, न ठरवता घडलेला.
24-25/4/2019