26/7/2019
देवरी, ता.गोंडिया, महाराष्ट्र
तेवीस जुलैला बिलासपुरचा निरोप घेतला. आलीशान महा मार्गावरून रायपुरच्या दिशेने प्रवास सुरू झाला. महिन्याभराच्या शिरीरिक विश्रामानंतर पहिल्या दिवशी एकशे बावीस कि.मी. चा पल्ला. दिवसभर काही वाटलं नाही. खरी मजा दुसऱ्या दिवशी होती.
जावरा-मध्यप्रदेश मध्ये राहत असलेल्या बाबूलाल नाहर काकांशी अगदी मुलासारखा जोडला गेलोय. हिमाचल-जम्मू भागात पोहचे पर्यंत त्यांचा रोज सकाळी न चुकता फोन यायचा. मग मीच अनिश्चितप्रकारे अधून मधून संपर्कक्षेत्राच्या बाहेर होतो. राजस्थान मधे जयपुरला पोहचतांना एक मोबाईल खराब झाल्याने काही दिवस त्यांच्याशी संपर्क ठेऊ शकलो नव्हतो. रोजच्या रोज फोन उचलण्यात मलाच काही अडचणी होत्या. ते त्यांच्याही नंतर लक्षात आलं. मग फोनचं सातत्य कमी झालं. पण मलाच सकाळी फोन वाजला नाही की, किंवा सकाळच्या वेळेत कोणा इतरांनी फोन केला असेल तर अगदी न चुकता नाहर काकांची आठवण येते. बिलासपुरला असतांना सहज त्यांचा फोन झाला. मी रायपुरला जाणार आहे म्हटल्याबरोबर त्यांनी तिथल्या ओळखीचा संपर्क क्रमांक दिला. (ADHR) Association for Democratic Human Rights संस्थेच्या श्रीमती. शिल्पा नाहर ह्यांनी रायपुरला राहण्याची आणि पत्रकार परिषदेची व्यवस्था करून ठेवली होती.
चोवीस तारखेला रायपुर सोडतांना दुर्ग आणि राजनंदगावातील व्यवस्था झालेली होती. दोन वृत्तपत्रात बातम्या आल्या होत्या, दुर्गच्या शाळेतही आधीपासून बोलून ठेवण्यात आलं होतं. रायपुर सोडतांना रस्त्यात एक खासगी शाळा लागली. तिथे पाच मिनीटाची वेळ मिळाली होती. दुर्गला एक सायकल क्लब आहे. त्यांनी माझी व्यवस्था केली होती. शाळेच्या मुख्याध्यापिका डाॅ. द्विवेदी यांनी उल्लेखनीय कामगिरी करत छत्तीसगढ बोर्डात इंग्रजीला पर्यायी विषय असलेला संस्कृत काढून टाकत, किंवा संस्कृतला पर्यायी विषय असलेला इंग्रजी विषय काढून टाकत दोन स्वतंत्र विषय शिकता यायवे यासाठी सरकार दरबारी यशस्वी रित्या चपला झिजवल्या आहेत. मी संस्कृत विषयाचा अभ्यासक असल्याने साहजिकच त्या खूप खूश झाल्या होत्या. तिथे अकरावी बारावीच्या विद्यार्थ्यांशी संवाद साधला.
संध्याकाळी राहण्याची व्यवस्था राजनंदगावा जवळील दन्तचिकित्सा महा विद्यालयाच्या अतिथीगृहात होती. माझी उत्तम व्यवस्था करणाऱ्या डाॅ. जैनांशी केवळ फोन वर बोलणं होत होतं. दुसऱ्या दिवशी माझ्या बरोबर सायक्लवायला मी दिलेल्या साडेसहाच्या ठोक्याला जैन हजर. डाॅ. जैनांचा मुलगा होता, श्री. शिरीष जैन. मागच्या पाच वर्षांपासून सातत्यपूर्वक सायक्लवणे आणि तीन वर्षांपासून धावणे यामुळे ह्या अभियंत्याचं संपर्क क्षेत्र विस्तारलं होतं. सकाळी डाॅ. जैनांच्या घरी चहा आणि गप्पा झाल्या. संपूर्ण जैन कुटूंब धावण्याच्या व्यायामाशी जोडलं गेलं होतं. पुढचा देवरीच्या प्रवास सुरू झाला. शिरीषदादा माझ्या बरोबर चाळीस कि.मी. सायक्लवत एका गावा पर्यंत आले.
तेवीस तारखेला पाच मिनीटं रिपरीप्ता पाऊस लागला असावा. चोवीस तारखेला सकाळी निघतांनाच पंधरा वीस मिनीटं मुसळधार पाऊस कोसळून गेला आणि पंचवीस तारखेला संध्याकाळ पर्यंत एकाही सरीने भिजवण्याचे कष्ट घेतले नाहीत. बिलासपुरमधल्या महिन्याभराच्या वास्तव्यात जेमतेम 4 दिवस पाऊस पडला असेल. यंदा छत्तीसगढला दुष्काळाशी सामना करायचा आहे. संपूर्ण रस्ता जमीन अंकुरली होती. पण तुरळक ठिकाणीच भातलावणी झालेली दिसत होती. भूमिची कुस भरल्या शिवाय भात लावणीसाठी चिखल होणार कसा? रायपुरला पोहचतांना एक शेतकरी काका भेटले.दुष्काळा मुळे कष्टी भाव चेहऱ्यावर नाहीत किंवा बोलण्यात तक्रारीचा सूर नाही. त्यांनी गावात स्वतःचं हासं करून घेतलंय. स्वतःच्या मुलाला शेतकी क्षेत्रात अभ्यास करायला प्रोत्साहन दिलंय. तो सध्या कृषीविद्यापीठात पी.एच.डी. करतो आहे. म्हणून त्या दहा एकर जमिनीच्या राजाच्या चेहऱ्यावर आनंद आहे. खरंच, त्यांच्याशी गप्पा मारून आनंद झाला.
राजनंदगाव सोडल्या पासून घनदाट वनक्षेत्रातून जाणारा रस्ता सुरू झाला. मधे छोटी छोटी गावं लागत होती. माध्यमिक विद्यालय काही दिसलं नाही. एकाही झाडाची सावली रस्त्यावर पडू नये याची व्यवस्था करत हा चौपदरी महामार्ग या घनदाट वनक्षेत्रात बांधला गेलाय. माझा प्रवास चितळे मास्तरांच्या होकायंत्र फॅशनच्या टोपीच्या दिशेने सुरू आहे- ईशान्य-नैऋत्य! त्यामुळे काही गोष्टींची मला आधीच कल्पना होती ती, सुरळीत घडते आहे. सी-विंड्स! दक्षिण-पश्चिम-नैऋत्येकडून येणारे मौसमी वारे, अर्थातच मला प्रतकूल ठरणारे, माझा वेग मंदावत आहेत. त्यांवर मात करणारा महाराष्ट्रात शिरण्याचा आनंद कोण वर्णवू शकेल?
अपण नव्याने सुरुवात केली आहे हे रायपुरहून निघाल्यावर सायकलवर बसताच जाणवलं. बसणंच कठीण झालं होतं. त्याबरोबर मागच्या वर्षभरात आणि उन्हाळ्यातही न घडलेला एक प्रकार घडला होता. Sun burn! डावा हात जळत होता. Sun screen lotion लावून बिलासपूर हून बाहेर पडलो होतो. पण पाच मिनीटाच्या सरीने ते वाहून गेलं. तसं मळभ होतं. तरी हे कसं घडलं काय माहीत? संपूर्ण चोवीस तारखेचा पासष्ठ कि.मी चा प्रवास आणि संध्याकाळ 'खालून आग वर आग आग बाजूंनी' म्हणत गेला. मग पंचवीस तारखेला सकाळी डोळे उघडणं अवघड गेलं तेव्हा अगदी नव्याने सुरुवात केल्याची जाणीव झाली. वर्षभरापूर्वीची झोपेची स्थिती. शरीर सुशेगी वलयात किती पटकन शिरतं!
महाराष्ट्रात शिरलो. शिरतांना छान गाणं लावून एखादी चित्रफित काढायची होती. पण, वेशीवर एकही फलक नव्हता. जो होता तो इंग्रजीत. निराश व्हायला झालं. तसाच देवरीत शिरलो. दुर्गमधल्या सायकस्वारांच्या ओळखीने इथे सोय झाली होती. मध्ये एकही शाळा न लागल्याने साडेतीनलाच पोहचलो होतो. तिथेच शाळेतले एक शिक्षक भेटले. गोंडी, छत्तीसगढी बोली आणि मराठी भाषा या विषयावर बाबूराव मडावी विद्यालयातल्या आठवी-नववी-दहावीच्या विद्यार्थ्यांशी संवाद साधला.
आता, बिहार मध्ये असतांना पुढच्या आणि मागच्या चाकाचा तुटलेला एक-एक आरा दुरुस्ती साठी नागपुरची वाट बघतोय.
#सायकलोपासना #cyclopasana #pitambari #पितांबरी #bergamontindia #jnanaprabodhini #ज्ञान_प्रबोधिनी #dombivali_cycle_club