मंगळवार, १७ नोव्हेंबर, २०२०

भार

जगन्नाथपुरीत दोन दिवस, तीन रात्र राहणार होतो. तशी व्यवस्था एका गुरुकुलात केली होती. पैकी एक दिवस रविवारच्या सुट्टीचा असल्याने आराम होता आणि दुसरा दिवस राष्ट्रियसंस्कृत संस्थान मध्ये धडकण्याचा होता. सुट्टीच्या दिवशी आराम करून झाल्यावर दर्शन घ्यायला जाणार होतो.  बंगालच्या उपसागरातून होणारा सूर्योदय दुसऱ्या दिवशी बघायचा होता. वसंत पंचमी पंधरवड्यावर होती. फेब्रुवारीचा महिना, माघाची थंडी- असं सगळं छान वातावरण होतं.
दुपार नंतर पाय मोकळे करायला, थोडासा बाजार फिरून रबडी, रसगुल्ला आणि दूधातल्या मिठाया खायला, ओडिशी कलाकृती असेली सूती-खादी वस्त्र बघायला बाहेर पडलो आणि फिरत फिरत मंदिरातून दर्शन घेऊन बाहेर आलो. तेव्हा तिथे जमावाचा घोळका दिसला. पत्रकारांचे कॅमेरे, माईक, पुष्पगुच्छ, हार, उपरणी आणि त्या सगळ्यांचा मध्यबिंदू असलेली मागच्या कॅरियरवर पेटाऱ्यांच्या आकाराच्या दोन तीन  बॅगांचं वजन वाहणारी  एक घोडा सायकल आणि तिच्या कृतज्ञतेने नतमस्तक झालेला एक सायकल स्वार.
तो गोंधळ मला परिचयाचा होता. एकूण सायकलस्वाराकडे बघता त्यांचं वय बरंच असावं असं वाटलं. मी दूर उभं राहून गर्दी कमी व्हायची वाट बघत होतो. जरा वेळाने ती ओसरली. सायकल शिवाय मला कोणी मी सायकलस्वार आहे असं ओळखू शकणार नाही अश्या वेशात फिरायचो. पांढरा सूती कुर्ता, मंदिरात जायचं असेल तर  धोतर नाहीतर ठरलेली राखाडी रंगाची ट्रॅक पॅण्ट. धोतर मल्टीपर्पज़ होतं. कधी तरी अंथरूण-पांघरुणाचं काम करायचं आणि कधीतरी संस्कृत वातावरणात मिसळून जायलाही मदत करायचं. तसा माझ्या वयाला न शोभणाऱ्या अजागळ वेशात त्या सायकलस्वारापुढे गेलो. आणि "मी भारत भ्रमण करतोय" सांगत, "कधी भेटता येईल?" म्हणून वेळ मागितली. त्या आधी "जोयोदेबो राऔत!" असा नावाचा परिचय करून घेताना सायकलस्वार बंगालचा आहे हे उच्चारणा वरून ओळखलं.  दुसऱ्या दिवशी काॅलेजची भेट आणि शिक्षकांबरोबर चर्चा यात त्यांना भेटणं राहून गेलं. पण निघायच्या दिवशी त्यांनीच फोन करून डाक बंगल्यावर बोलवून घेतलं, नाश्त्यासाठी. आता माझा वेश पूर्ण बदलला होता. पण 'सायकलस्वार' म्हणून न सांगता ओळखू येण्यासारखा होता.
मग भरपूर गप्पा रंगल्या. त्यांच्या घरची परिस्थिती हालाकीची असतांना त्यांनी यापूर्वी दोनदा भारतभ्रमण केले आहे.आता केवळ मध्यभारतातील काही जिल्हे ते रक्तदानाचं महत्व पटवून द्यायला फिरता आहेत. असं समजलं. घरा बाहेर सन्मान खूप मिळत असला तरी बंगाल राज्यात, "मी वेडा ठरवलो गेलो आहे; मला काडीचीही किंमत या समाजात नाही," हे ऐकून खरं तर त्यांनी त्या समाजाचं भीषण वास्तवच मला सांगितल्यासारखं झालं. जिल्हा, तालुके, किलोमीटर, गावं यांची लांबच्या लांब आकडेवारी त्यांना तोंडपाठ होती. ती  ऐकून मला बरंच विचित्र वाटलं. मी जेमतेम किलोमीटरचा हिशोब ठेवत होतो. जिल्हे आणि जिल्हाधिकारी इत्यादि आकडे माझ्या गावीही नव्हते. पण, त्यांनी आजवर दरवेळेला घेतलेली मेहनत, केलेले काम हे इतके तात्पुरते उरले होते की मागच्या सात वर्षात तीन वेळा भारतात फिरलेला माणूस  आज दीन होऊन कोणाच्या तरी सहाय्यतेसाठी वाट बघतो; एखादे ठिकाणी स्थिरावू शकत नाही. घरात सन्मानचिन्हे वाढली तरी माश-भात खाण्यासाठी डबे राकामेच असतात. मागच्या खेपेला एका राजकीय पक्षाने काही हजार रुपये देऊन त्यांचा वापर  प्रचारासाठी करून घेतला आणि गावो गावी अत्यंत दीन वागणूक मिळेल याची व्यवस्था लावली. "अतिथिः देवो भव" याच्या उलट आलेले सगळे अनुभव ते कोळून प्यायले आणि पुढची मोहीम आखतांना अधिक खंबीर झाले.
त्यांचे ते थक्क करणारे अनुभव ऐकत मी अनेक चुका टाळल्याचे माझ्या लक्षात आले. त्यातल्या प्रमुख दोन- 1. राजकीय पक्षांकडून सहाय्य. 2. सन्मान चिह्नादिंचा स्वीकार स्पष्टपणे टाळणं!
त्या घोडा सायकलवर पन्नास साठ किलोचा भार कसला? शाली आणि सन्मान चिह्नांचा; असंख्य प्रमाण पत्रांचा!
जो समाज माणसाच्या श्रमाला, अनुभवांना किंमत देऊ शकत नाही तो प्रमाण पत्रांना कसली किंमत देणार, रद्दीचीच ना?
उगाच विचार डोकावून गेला.

नंतर त्यांच्याशी बरेचदा फोनवर बोलणं झालं. बंगाल मध्ये शिरलो; परिस्थितीने गांजलेले, अज्ञानाने फसवलेले आणि समाजाने दाबून टाकल्याने शांत झालेले 'मर्दबंगाली' जेव्हा जेव्हा दिसले तेव्हा जयदेव राऊतांची आठवण झाली.
बंगाल मध्ये कम्यूनिस्ट वाऱ्यांची वादळे येतात. पण, तिथला समाज त्या वादळांसाठीच, त्या वादळांनीच बनला आहे असं सारखं वाटत राहतं.
-सम्प्रिः।


रविवार, २६ जुलै, २०२०

महाराष्ट्रात शिरतांना...

26/7/2019
देवरी, ता.गोंडिया, महाराष्ट्र
तेवीस जुलैला बिलासपुरचा निरोप घेतला. आलीशान महा मार्गावरून रायपुरच्या दिशेने प्रवास सुरू झाला. महिन्याभराच्या शिरीरिक विश्रामानंतर पहिल्या दिवशी एकशे बावीस कि.मी. चा पल्ला. दिवसभर काही वाटलं नाही. खरी मजा दुसऱ्या दिवशी होती.
जावरा-मध्यप्रदेश मध्ये  राहत असलेल्या बाबूलाल नाहर काकांशी अगदी मुलासारखा जोडला गेलोय. हिमाचल-जम्मू भागात पोहचे पर्यंत त्यांचा रोज सकाळी न चुकता फोन यायचा. मग मीच अनिश्चितप्रकारे अधून मधून संपर्कक्षेत्राच्या बाहेर होतो. राजस्थान मधे जयपुरला पोहचतांना एक मोबाईल खराब झाल्याने काही दिवस त्यांच्याशी संपर्क ठेऊ शकलो नव्हतो. रोजच्या रोज फोन उचलण्यात मलाच काही अडचणी होत्या. ते त्यांच्याही नंतर लक्षात आलं. मग फोनचं सातत्य कमी झालं. पण मलाच सकाळी फोन वाजला नाही की, किंवा सकाळच्या वेळेत कोणा इतरांनी फोन केला असेल तर अगदी न चुकता नाहर काकांची आठवण येते. बिलासपुरला असतांना सहज त्यांचा फोन झाला. मी रायपुरला जाणार आहे म्हटल्याबरोबर त्यांनी तिथल्या ओळखीचा संपर्क क्रमांक दिला. (ADHR) Association for Democratic Human Rights संस्थेच्या श्रीमती. शिल्पा नाहर ह्यांनी रायपुरला राहण्याची आणि पत्रकार परिषदेची व्यवस्था करून ठेवली होती.
चोवीस तारखेला रायपुर सोडतांना दुर्ग आणि राजनंदगावातील व्यवस्था झालेली होती. दोन वृत्तपत्रात बातम्या आल्या होत्या, दुर्गच्या शाळेतही आधीपासून बोलून ठेवण्यात आलं होतं. रायपुर सोडतांना रस्त्यात एक खासगी शाळा लागली. तिथे पाच मिनीटाची वेळ मिळाली होती. दुर्गला एक सायकल क्लब आहे. त्यांनी माझी व्यवस्था केली होती. शाळेच्या मुख्याध्यापिका डाॅ. द्विवेदी यांनी उल्लेखनीय कामगिरी करत छत्तीसगढ बोर्डात इंग्रजीला पर्यायी विषय असलेला संस्कृत काढून टाकत, किंवा संस्कृतला पर्यायी विषय असलेला इंग्रजी विषय काढून टाकत दोन स्वतंत्र विषय शिकता यायवे यासाठी सरकार दरबारी यशस्वी रित्या चपला झिजवल्या  आहेत. मी संस्कृत विषयाचा अभ्यासक असल्याने साहजिकच त्या खूप खूश झाल्या होत्या. तिथे अकरावी बारावीच्या विद्यार्थ्यांशी संवाद साधला.
संध्याकाळी राहण्याची व्यवस्था राजनंदगावा जवळील दन्तचिकित्सा महा विद्यालयाच्या अतिथीगृहात होती. माझी उत्तम व्यवस्था करणाऱ्या डाॅ. जैनांशी केवळ फोन वर बोलणं होत होतं. दुसऱ्या दिवशी माझ्या बरोबर सायक्लवायला मी दिलेल्या साडेसहाच्या ठोक्याला जैन हजर. डाॅ. जैनांचा मुलगा होता, श्री. शिरीष जैन. मागच्या पाच वर्षांपासून सातत्यपूर्वक सायक्लवणे आणि तीन वर्षांपासून धावणे यामुळे ह्या अभियंत्याचं संपर्क क्षेत्र विस्तारलं होतं. सकाळी डाॅ. जैनांच्या घरी चहा आणि गप्पा झाल्या. संपूर्ण जैन कुटूंब धावण्याच्या व्यायामाशी जोडलं गेलं होतं. पुढचा देवरीच्या प्रवास सुरू झाला. शिरीषदादा माझ्या बरोबर चाळीस कि.मी. सायक्लवत एका गावा पर्यंत आले.
तेवीस तारखेला पाच मिनीटं रिपरीप्ता पाऊस लागला असावा. चोवीस तारखेला सकाळी निघतांनाच पंधरा वीस मिनीटं मुसळधार पाऊस कोसळून गेला आणि पंचवीस तारखेला संध्याकाळ पर्यंत एकाही सरीने भिजवण्याचे कष्ट घेतले नाहीत. बिलासपुरमधल्या महिन्याभराच्या वास्तव्यात जेमतेम 4 दिवस पाऊस पडला असेल. यंदा छत्तीसगढला दुष्काळाशी सामना करायचा आहे. संपूर्ण रस्ता जमीन अंकुरली होती. पण तुरळक ठिकाणीच भातलावणी झालेली दिसत होती. भूमिची कुस भरल्या शिवाय भात लावणीसाठी चिखल होणार कसा? रायपुरला पोहचतांना एक शेतकरी काका भेटले.दुष्काळा मुळे कष्टी भाव चेहऱ्यावर नाहीत किंवा बोलण्यात तक्रारीचा सूर नाही. त्यांनी गावात स्वतःचं हासं करून घेतलंय. स्वतःच्या मुलाला शेतकी क्षेत्रात अभ्यास करायला प्रोत्साहन दिलंय. तो सध्या कृषीविद्यापीठात पी.एच.डी. करतो आहे. म्हणून त्या दहा एकर जमिनीच्या राजाच्या चेहऱ्यावर आनंद आहे. खरंच, त्यांच्याशी गप्पा मारून आनंद झाला.
राजनंदगाव सोडल्या पासून घनदाट वनक्षेत्रातून जाणारा रस्ता सुरू झाला. मधे छोटी छोटी गावं लागत होती. माध्यमिक विद्यालय काही दिसलं नाही. एकाही झाडाची सावली रस्त्यावर पडू नये याची व्यवस्था करत हा चौपदरी महामार्ग या घनदाट वनक्षेत्रात बांधला गेलाय. माझा प्रवास चितळे मास्तरांच्या होकायंत्र फॅशनच्या टोपीच्या दिशेने सुरू आहे- ईशान्य-नैऋत्य! त्यामुळे काही  गोष्टींची मला आधीच कल्पना होती ती, सुरळीत घडते आहे. सी-विंड्स! दक्षिण-पश्चिम-नैऋत्येकडून येणारे मौसमी वारे, अर्थातच मला प्रतकूल ठरणारे, माझा वेग मंदावत आहेत. त्यांवर मात करणारा महाराष्ट्रात शिरण्याचा आनंद कोण वर्णवू शकेल?
अपण नव्याने सुरुवात केली आहे हे रायपुरहून निघाल्यावर सायकलवर बसताच जाणवलं. बसणंच कठीण झालं होतं. त्याबरोबर मागच्या वर्षभरात आणि उन्हाळ्यातही न घडलेला एक प्रकार घडला होता. Sun burn! डावा हात जळत होता. Sun screen lotion लावून बिलासपूर हून बाहेर पडलो होतो. पण पाच मिनीटाच्या सरीने ते वाहून गेलं. तसं मळभ होतं. तरी हे कसं घडलं काय माहीत? संपूर्ण चोवीस तारखेचा पासष्ठ कि.मी चा प्रवास आणि संध्याकाळ 'खालून आग वर आग आग बाजूंनी' म्हणत गेला. मग पंचवीस तारखेला सकाळी डोळे उघडणं अवघड गेलं तेव्हा अगदी नव्याने सुरुवात केल्याची जाणीव झाली. वर्षभरापूर्वीची झोपेची स्थिती. शरीर सुशेगी वलयात किती पटकन शिरतं!

महाराष्ट्रात शिरलो. शिरतांना छान गाणं लावून एखादी चित्रफित काढायची होती. पण, वेशीवर एकही फलक नव्हता. जो होता तो इंग्रजीत. निराश व्हायला झालं. तसाच देवरीत शिरलो. दुर्गमधल्या सायकस्वारांच्या ओळखीने इथे सोय झाली होती. मध्ये एकही शाळा न लागल्याने साडेतीनलाच पोहचलो होतो. तिथेच शाळेतले एक शिक्षक भेटले. गोंडी, छत्तीसगढी बोली आणि मराठी भाषा या विषयावर बाबूराव मडावी विद्यालयातल्या आठवी-नववी-दहावीच्या विद्यार्थ्यांशी संवाद साधला.
आता, बिहार मध्ये असतांना पुढच्या आणि मागच्या चाकाचा तुटलेला एक-एक आरा दुरुस्ती साठी नागपुरची वाट बघतोय.

#सायकलोपासना #cyclopasana #pitambari #पितांबरी #bergamontindia #jnanaprabodhini #ज्ञान_प्रबोधिनी #dombivali_cycle_club

मंगळवार, ९ जून, २०२०

भालका तीर्थ

दिवस 121- 29/10/2018, सोमनाथ
आज सकाळी लवकर उठून सोमनाथ मंदीर गाठायचं. रात्री झोपतांनाच ठरवलं होतं. नशीबाने सकाळी कुठलाही रिपू आड आला नाही. अंघोळ करून साडेसहाला सोमनाथ संस्कृत विद्यापीठातून बाहेर पडलो. बोटींच्या तळापाशी सूर्योदय होतांना दिसला. प्राप्त स्थानी फोटो वगैरे काढायचे प्रयत्न केले. बहुदा निष्फळच! सोमनाथ मंदीरापाशी पोहचलो. सायकल सुरक्षितपणे ठेवणे ही चिंता होतीच. आणि आत गेल्यावरही फोटो काढता येणार नव्हते. मला सायकल ला सोडून आत जाणे काही प्रशस्तकर वाटत नव्हते.  कळसाला नमस्कार करून बाहेरूनच फोटो काढून सायकल समोर बसून लिहूया. असं म्हणत त्याच त्या समुद्रा समोर जमीनीवर आदळणाऱ्या लाटांचा आवाज ऐकत नंदी आणि त्रिशूळाची प्रतिकृती असलेला फडकता भगवा झेंडा असलेल्या मंदीराचा काहीसा भाग भिंती आडून दिसेल असा बसलोय. तोच तो समुद्र म्हणायचं कारण 31 डिसेंबर 2017 ला- "ख्रिस्ती सौर वर्षाचा शेवटचा सूर्यास्त, मुंबईच्या अधिक पश्चिमेला जाऊन, दक्षिण ध्रुवापर्यंत अबाधित पसरलेल्या महासागरासमोर उभ्या असलेल्या सोमनाथाच्या किनऱ्यावर, समुद्राच्या पाण्याने शीत केलेला वारा झेलत, पौर्णिमेसाठीची एकच कोर कमी असलेल्या वर्षानुवर्ष सोमपान केलेल्या  चंद्राच्या सौम्य प्रकाशात, या वर्षी अनुभवता आला..."
दहा महिन्यांनंतर त्याच जागी बसलो होतो. कोवळ्या उन्हात. सकाळचे आठ वाजून गेले होते. तरी चंद्र आकाशात रेंगाळत होता.
भालका तीर्था विषयी ऐकून होतो. गूगल बाबाच्या मार्गदर्शनाखाली तिथे पोहचलो. पुन्हा एकदा एक  एक लोक कथा! इथे योगेश्वराला बाण लागला आणि श्रीकृष्णाचा देहांत झाला. माझ्यातला नास्तिक आणि अज्ञान बाहेर डोकावत होतं. त्या कथे विषयी साशंकता. कारण बाहेरून दिसायला हल्लीचं बांधकाम असलेलं श्रीकृष्णाचं मंदीर. आत शिरलो. आत खूप सुंदर देखणी मूर्ति. तिथे उभं राहून एक शांतता पसरली मनात. त्यातला रस शांत होता की करुण शोधायचा प्रयत्न करत होतो. ज्याक्षणी तो करुण वाटला त्याक्षणी गीतेतले श्लोक आठवले. 'नैनं छिन्दन्ति शस्त्राणि...'
पण.तरही "कहो ना प्यार है संपतांना जे हृतिक रोशन मरतांना जे दुःख होतं तसं काहीसं जाणवत होतं. जिथे महाभारताचं युद्ध घडलं, जिथे गीता सांगितली गेली त्या कुरुक्षेत्री गेलो. कृष्ण लीला रंगल्या ती यमुना दोन-तीनदा ओलांडली. "तव भगिनीचा धावा ऐकूनि धाव घेई गोपाळा" म्हणणारी द्रौपदी- तिने जिथे जल समाधी घेतली ती जागा बघितली.  कृष्ण सुदामाची भेट झाली त्या द्वारकेला गेलो... आणि आता कृष्णाचा देहांत! डाॅ. अरुणा ढेरे म्हणतात महाभारताच्या पाऊलखूणा भारतभर पसरलेल्या आहेत. खरंच! मी काही महाभारताचा अभ्यास करायला निघालो नव्हतो. मी काही महाभारत वाचलं नव्हतं. पण ज्याच्यामुळे या भूमिला भारत हे नाव मिळालं ते महाभारत मला काही सोडत नव्हतं.
आणि या कथेतल्या नायकाचा मृत्यू! दुःख वाटलं.(अजून गीतेपासून बराच लांब आहे याची जाणीव झाली.) पण प्रवासाचा भाग आहे म्हणून स्वीकारलं!
#bgm #bergamontbicycles #starightfromstpauli #bergamontindia #सायकलोपासना #cyclopasana #pitambari

शनिवार, २१ मार्च, २०२०

कोरोनापर्व। 'कुरु नु पर्व'

प्रार्थये जनानुशासनं, स्वयमनुशीलनञ्च।
गृहात् बहिरागत्य बहूनि अनुदिनकार्याणि कर्तुकामा वयं बहुत्र स्पर्शयामः। कोरोनाविषाणोः संसर्गः न वायुजन्यः स तु स्पर्शजन्यः इति न विस्मरेम। बहिर्देशात् आगतैः प्रवासीभिः अस्माकं देशे अनवगतैः स्पर्शैः स विषाणुः प्रसारितः। वस्तुनि तस्य जीवमानः द्वादशघण्टामात्रम्।मानवशरीरस्थे कफे जीवति सः। वसन्तः वमनस्य ऋतुः। कफोत्सर्गे कफहननं ऋतुचर्येषु आचार्यैः सूचितम्। अस्माकं स्वास्थ्यं वर्धयितुं वमनमाचरेम।

गृहात् बहिर्न गन्तव्यमिति तु अभ्यासकेभ्यः ज्ञानोपासना पर्व। अस्माकं व्यवहारे बहून् असंस्कृतशब्दान् वयं योजयामः। तेषां कृते सहजसंस्कृतशब्दनिर्माणं शक्यं किम्? सार्थधातुपाठं स्वीकृत्य प्रयोगाणि कुर्याम। यदि न संस्कृते तर्हि स्वस्वमातृभाषासु अपि एवमेव कर्तुं शक्यते। निर्मितः नूतनः शब्दः यदि न प्रयुक्तः चेत् स मृतो भवेत्। यतः विनाप्रयोगं शब्दः मृतः, वाक्यं मृतं, भाषा मृता भविष्यति। अतः नूतनशब्दं प्रयुज्य लेखनं कुर्याम। 

भाषायाः अवगमनं नाम भाषाचिन्तनेन प्रकटित-भाषास्वरूपदर्शनम्। न कोऽपि भाषां पाठयितुम् शक्नोति। सा दर्शयति स्वरूपं भाषा-उपासकाय। अस्मिन् एकान्तपर्वणि भाषायाः उपासनां कुर्याम।

कालोऽयं कालाय अनेकानाम्।  वयं विरलाः संस्कृतज्ञाः न तेषु अनेकेषु भवेम इति संकल्पं कृत्वा जनानुशासनं, स्वयमनुशीलनं, सर्वकारनियमानुमोदनं आचरेम।

-सम्प्रिः।
सौर 2 चैत्र शके 1942.
2020ख्रि.

मंगळवार, १० मार्च, २०२०

त्याचे दर्शन सकळां

पंढरीच्या विठोबाला
मी पंढरपुराहून आणले,
माझ्या दारावर त्याला
सगळ्यांसाठीच ठेवले...॥
गाभाऱ्यात मंदिराच्या
भक्ताची हेटाळणी,
मन गाभाराच व्हावे
वसो ज्ञाना तुकाची  रे वाणी!॥
नाही पंढरपुरा येणे
झाले चंद्रभागेचे दर्शन
दीपले माझे मन
पाहून मंदिर तुझे छान॥
सभामंडपी कीर्तन,
देश ऐक्याचे ते गान
भक्ति-ज्ञानाच्या योगाने
हरपलेले देहभान॥
जवळ येता रे गाभरा
ओलावलल्या नेत्रकडा,
आत बघणार होतो
ट्रेनमधल्या पांडुराया॥
पैस, हरिपाठ,
अभंग अन् गवळणी
तानांची आरती
तैसी दिसे गा विठाई?॥
प्रवेशिलो गाभाऱ्यात
तैसी थाप पाठीवर
दुरून दर्शन ते झाले ,
कानी "सरका पुढे, सरका पुढे"॥
ठेवण्या मस्तक त्याचे पायी
दृष्टी पायाशी खिळलेली
थाप दुसरी पडली,
"सरका पुढे"ची ती घाई.॥
अर्पिता तुळशी हार
रूप सुंदर पाहिले, मग
तिसऱ्या थापे सरशी
सोडला गाभारा मनाने.॥
मग आलो घरी घेऊन
एक विठोबा मनीचा
ज्याचे दर्शन रे व्हावे
सकळां येता जाता...॥
-सम्प्रिः।

मंगळवार, ३ मार्च, २०२०

पथनियमानां पालनम्।

डोम्बिवल्याः टिळकनगरे घटितः प्रसंगोऽयम्। कश्चित् मनुष्यः भ्रमणध्वनियन्त्रे वदन् अश्वशक्तिधारीद्विचक्रिकां चालयन् साईमंदिरपुरतः स्थिते संकीर्णे मार्गे मम पुरतः आगतः। अहमपि अश्वशक्तिधारीद्विचक्रिकां चालयमानः एव। भ्रमणध्वनियन्त्रे वदन्तं नियमोल्लंघनकुरवन्तं तं दृष्ट्वा सावेगं तस्य पुरतः गतवान्। स्थगिते तस्य ममापि च वाहने आमुखे। यतः भवान् यन्त्रे वदन् वाहनं चालयति अतः भवता एव वाहनं पृष्ठे नेतव्यम् इति एकवाक्येनेव सः उक्तः मया।  कथं अधावयत् मयि तव वाहनं? त्वया एव वाहनं पृष्ठे नेतव्यम् इति तस्य विनम्रतां त्यक्त्वा प्रतिवादः आरब्धः। नियमोल्लंघनं दृष्ट्वा मया तु सकारणमेव धावयितम् आसीत् मे वाहनम्। इदानीं धौतवस्त्रधारी 'ब्राह्मण'कुली अहमिति' सः प्रतिवादं कृतवान्। एतेन प्रतिवादेन अहं पृष्ठे न नयानि मे वाहनमिति संकल्पमेव  कृतवान्। अहं जीन्स तथा च "keep calm पठ पुत्र व्यकारणम्" इति लिखितं टीशर्ट धारयन् आसम्। पथां नियमाः वर्णभेदं पश्यन्ति किम्? सायकलोपासनायां बहुवारं मृत्युमदर्शयत् मां नियमोल्लंघकाः। इदानीं मम नगरे नाहं पश्यामि वर्णं वा धर्मं वा नियमोल्लंघकस्य। तमुक्तवान्, "कोऽपि वा भवतु ते वर्णः  नियमानां पालनं तु भवता मयाऽपि च करणीयमेव। भवान् यन्त्रे वदन्तं वाहनं चालयित्वा तन्न कृतवान्। अहं तु इतः पृष्ठे न गच्छानि। भवता गन्तव्यम्। पञ्च वा षड् निमिषेभ्यः आवां तत्रैव स्थितौ। "मम इच्छा अतः अहं वदानि यन्त्रे। त्वं किमर्थमधावयत् मयि?" "यथा भवतः इच्छा यन्त्रे वक्तुम् तथैव ममापि धावयितुं भवति।"
अन्ये पथिकाः स्थिताः अग्रे पृष्ठे च उभयानपि परितः सर्तुं निवेदनं चक्रुः।
अन्ततः येन नियमोल्लंघितः तेनैव  पृष्ठगमनं कृतम्।
वयं सर्वे कार्यकर्तारः। पथनियमानां पालनं सर्वेषां कर्तव्यम्। धौतवस्त्रं धारयतु वा पठाणीं धारयतु। पथनियमेषु शिथिलता न कस्यापि कृते। नियमोल्लंघनेन भूयमाने मृत्युसमये न वस्त्रं न वर्णं न वा धर्मं पश्यति यमः। यस्य मृत्युः भवति न स पुनरागच्छेत्। यस्य नियमोल्लंघनकारणात् मृत्युः सः तु आनन्देन संचरेत् इति भारतस्य पथां दुर्दैवम्।
-सम्प्रिः।

शनिवार, २२ फेब्रुवारी, २०२०

थेट प्रक्षेपण

दुपारी दीडच्या दरम्यान जाई ताईचा, "डोंबिवलीत आहेस का?" विचारणारा फोन आला. रात्रीच्या कार्यक्रमासाठी माझा संपर्क ती अग्रेषित करणार होती. मी काहीच विचार न करता होकार देत गेलो.
नंतर स्वतःला आरश्यात बघितलं आणि विचार करत बसलो. कांजिण्या येऊन जेमतेम बारा दिवस होऊन गेले होते. संध्याकाळी साडे चारला रात्रीचा कार्यक्रम नक्की झाल्यानंतर कधीतरी नाकावरची खपली पडली.
मी ज्या कार्यक्रमात गप्पा मारणार होतो  तिथे डाॅ. माहुलीकर बाई, डाॅ. वीणा सानेकर बाई, डाॅ. अभिजीत देशपांडे सर यांसारख्या माझ्या आयुष्यात वंदनीय स्थान असणाऱ्या, मनात आदरयुक्त भिती असलेल्या व्यक्ती येऊन गेल्या होत्या.
चेहरा प्रदर्शनीय दिसेल का? आपल्याला हिरवे कपडे घालू नका असं सांगण्यामागचं कारण काय असेल? इथपासून या कार्यक्रमाच्या प्रतिष्ठेपर्यंतचं सगळंच थोडं थोडं का होईना दडपण घेऊन साडे नऊच्या बातम्या सुरू झाल्या.

 वृत्तनिवेदकासमोर बातमी वाचतांना काय असतं? तो/ती समोर बघतो/ते तेव्हा समोर कॅमेरा असेल तर बातम्या कुठून वाचता येतात? एखादी ओळ सुटली तर? शब्द चुकला तर? अक्षर गलपटलं तर? खरंच थेट प्रक्षेपण असतं का की, गंडवतात आपल्याला?  घरी बसून बातम्या बघतांना या प्रश्नांवर बाबा आणि सयुरी  बरोबर अनेकदा चर्चा झाली होती. आज वृत्तनिवेदकाच्या बाजूला बसून ती सगळी प्रक्रिया प्रत्यक्ष बघत होतो. खरं थेट प्रक्षेपण. अजून एक दडपण!
वेळेचं काटेकोर गणित. दहाव्या मिनीटाला स्वागतपर झालेला नमस्कार आणि ठरवलेला पहिला प्रश्न. आता, "the ball is in my court." याची झालेली जाणीव. मला जे सांगायचंय, जे बोलायचंय, ज्या शब्दात बोलायचंय त्याचं परे पासून वैखरीपर्यंतचं स्वातंत्र्य मलाच! दहा मिनीटं- सहाशे सेकंदांची तेवढी चौकट आहे. एकही नकारात्मक विचार बाहेर न पडता दहा मिनीटं केवळ सकारात्मक बोलायचंय. अभिव्यक्ती स्वातंत्र्यात स्वतःला मर्यादा घातलेल्या बऱ्या असतात.  त्यामुळे स्वातंत्र्याचा तोल स्वैराचाराकडे ढळत नाही.
या सगळ्या गोंधळात, एकाच भाषेत अस्खलित बोलायचं असतं. एखादा शब्द सुचला नाही की? दुसऱ्या भाषेतल्या शब्दाची कुबडी घ्यायची नाहीये म्हणून रिकामी जागा.....ब्लँक! घडाळ्याचा काटा पुढे सरकतोय. कॅमेरा सुरू आहे. महाराष्ट्र बघतोय. अमेरिकेतून मित्र थेट युट्यूबवर बघतोय. अडलेल्या स्वल्पविरामापुढे क्रियापद वापरून पूर्णविराम करत पुढचा मुद्दा सुरू झाला. आता जे शब्द सुचतायत, टिपलेल्या कागदावर जे शब्द दिसतायत तेवढेच मुद्दे घेऊन आपला विषय मांडला जात असतांनाच दहाव्या मिनीटाला आपण आल्या बद्दल आभार मानले जातात. आपल्या समोरच्या कॅमऱ्यावरचा लाल दिवा बंद होतो. आता मागच्या दहा मिनीटात काय घडलंय हे आपल्याला चांगलंच माहीत असतं. ते आठवण्यात काही अर्थ नसतो. "क्षण तो क्षणात गेला. सखे हातचा सुटोनि..." म्हणत सोडून देण्यात शहाणपण असतं. परीक्षा संपल्यावर उत्तरपत्रिकेत लिहीलंय ते बरोबर की चूक हे आठवणं जितकं निरर्थक तितकंच हेही. पुढल्या परीक्षेला जातांना मागच्या उत्तरपत्रिकेतल्या चुका होणार नाहीत याची काळजी घेणारा अभ्यास करू. आत्ता आनंद वा दुःख साजरा करायची गरज नाही.
एवढाच विचार करून त्या हिरव्या पडद्यासमोरील खुर्चीचा निरोप घेत एक वेगळ्या अनुभवाच्या धुंदीत बस पकडून मग ट्रेन मध्ये बसत मुंबईचा निरोप घेतला. एक अनुभव दूरदर्शनाच्या थेट प्रक्षेपणात सहभागी होण्याचा...

रविवार, ९ फेब्रुवारी, २०२०

नातं

व. पु. काळे एकटेपणा आणि एकांत यातला भेद खूप छान समजावून सांगतात.
मृत्यूचा प्रवास एकांताचा असतो. पाच पती असलेल्या द्रौपदीचं मरणही एकटेपणात होतं. "नाथवती अनाथवत्" असं द्रौपदीचं विशेषण ईरावती कर्वे सांगतात.
    शेवटी तिथे माणसाला एकटंच जावं लागतं.
त्या एकांताच्या प्रवासाला निघतांना
एकटेपणा न जाणवणं म्हणजे,
आयुष्य जगल्याचं सर्टिफिकेट असतं. असं मला वाटतं.
कारण,
..........................................................
यम.
यमाचा रेडा.
आणि माझं
जन्मजात नातं आहे.

त्याला माझा पुळका कधी येईल
ते काही सांगता यायचं नाही
त्याच्या हाकेला नाही म्हणणं
मला काही जमायचं नाही.

तो दाराशी आला
की,
"साजण दारी उभा, काय आता करू..."
वगैरे आठवायचाही अवधी नसेल
कोणाला सावरावं
कोणाला आवरावं
काही माझ्या हाती नसेल

कश्यातही न गुंतता
कुणातही न अडकता
सहज त्याच्या बरोबर
जाता यायला हवं.
माझ्यासकट तू, तो, ती, ते
यादगारीपुरतेच थांबलेत
एवढंच लक्षात ठेवायला हवं.

शेवटी मरणानंतर उरतं काय?
छोटीशी यादगारीच ना?
ती
मला निर्माण करता यावी
एवढाच वेळ
दिलाय मला त्याने

यादगारी तयार झाल्यावर
मारलीच कधी मी त्याला हाक
तर माझी निराशा नाही करणार तो
आणि
मला कधीही बोलवायला आलाच तो
तर
मी का करावी त्याची निराशा?
जाईनच आनंदाने
हसत...

एकमेकांना समजून घेण्यात
आहे जे रहस्य
तेच खरं जन्मजात
सुरू झालेलं नातं.
यम.
यमाचा रेडा आणि
माझं...
-सम्प्रिः।

माघ पौर्णिमा 2020ख्रि.

सोमवार, ३ फेब्रुवारी, २०२०

प्रसंग- मन वज्र हवे...

सायकलसहल यशस्वीरित्या पार पडली. पंधरवड्यापूर्वी कौशिक बरोबर झालेला फोनवरील संवाद आठवला. मी हादरलो होतो. पण सावरायचं म्हणून कौशिकला फोन करून प्रसंग कथन केला.
अशीच एका शाळेची सातवी ते दहावीच्या विद्यार्थ्यांची सायकल सहल पंढरपूरला जात होती. दिवसभरात शंभर-सव्वाशे किलोमीटरचा पल्ला होता. पुढे एक दादा, मागे एक दादा. शेवटी एक टेम्पो देखील होता. मध्ये एका रांगेत सारे विद्यार्थी शिस्तबद्ध पद्धतीने, रस्त्याच्या डाव्या बाजूनी सायक्लवत होते.   पंढरपूर पासून वीस किलोमीटरचं अंतर राहिलं असावं. तासा दीड तासाने चंद्रभागेच्या किनारी विठूरायाचं दर्शन होणार याचा विचाराने सगळ्यांच्याच मनात आनंद खुलत होता.
समोरून एखादी गाडी आपल्या अंगावर येईल असं कुणाला वाटायचं काहीच कारण नव्हतं. सगळेच डाव्या टोकावरून चालले होते. पण. एक टेम्पो ट्राव्हलर जोरदार वेगाने समोरून आली, लेन कापत परस्पर एका छोट्या सायकलस्वाराला धडक देऊन थांबली.
नववीत शिकणारा तो विद्यार्थी. काही फूट उडून फेकला गेला. स्वतःच्याच शरीरातून वाहणारं रक्त पाहत वेदनांनी कळवळत रस्त्यावर पडला. इतर गाड्या थांबल्या. लोकं जमा होऊन कुजबूज करू लागली. त्याच्या मित्रांनी दादाला आवाज दिला. सगळीच मुलं घाबरली होती. दादाला त्याच्या जवळ पोहचे पर्यंत दीड मिनीटाचा अवधी गेला होता. "आता काही उठू शकत नाही." "किती रक्त वाहतंय." "काही खरं नाही." वगैरे वाक्यांनी बघ्यांची चर्चा  रंगत चालली होती.
दादाने प्रसंगावधान दाखवून त्याला तत्काळ उचलून एका गाडीत ठेवलं. वाहन चालकाला लोकांनी आडवून धरलेलंच होतं. वाहातं रक्त थांबवायला पंढरपूर गाठणं आवश्यक होतं. तोवर त्याला शुद्धीत ठेवणंही गरजेचं होतं. गप्पा मारत, इकडचे तिकडे प्रश्न विचारत पंढरपूरच्या इस्पितळात ते पोहचले. संपूर्ण उपचार इथे मिळू शकणार नाहीत हे डाॅक्टरांनी सुरुवातीलाच सांगितलं. जमतील तितके प्रथमोपचार करून रुग्णवाहिकेने दीनानाथ मंगेशकर इस्पितळाची वाट धरली.
दुसरा दादा इतर मुलांना धीर देत  पंढरीची वाट पूर्ण करत होता. तिथून शाळेच्या मुख्याध्यापकांना बोलवलं गेलं. घरीदेखील प्राथमिक माहिती पोहचवली गेली.  दीनानाथला पोहचे पर्यंत त्याला शुद्धीत ठेवणं कठीण होतं. रक्तस्रावामुळे तो बेशुद्ध पडला होता. इस्पितळात पूर्वसूचना देऊन ठेवली होती. त्यानुसार थोडी तयारी करून ठेवली होती. एम. आर. आय, एक्स. रे वगैरेचे रिपोर्ट आले.  पयाला  रक्तपुरवठा करणारी वाहिनी दुखावली होती. पाय कापायला पर्याय नव्हता.
ही गोष्ट पचवणं कुणालाच शक्य नव्हतं. दादा, मित्र, मुख्याध्यापक, पालक... ही खरी संयम आणि विवेकाची परीक्षा होती.
वास्तव स्वीकारणं.
सगळ्या शस्त्रक्रिया पार पडल्या. तीन दिवस, दोन दादा इस्पितळात येऊन जाऊन चोवीस तास असायचे. त्यानंतर त्या वाहनचालकावर रीतसर गुन्हा दाखल करण्यात आला. ज्या दादाने घटनास्थळावरून विद्यार्थ्याला उचललं त्याच्या तोंडून मी हे सगळं स्तब्ध होऊन ऐकत होतो. पालकांनी सहन केलेला आघात आणि आयोजकांना दिलेलं सहकार्य ऐकून निःशब्द झालो होतो. दादांनी पालकांचा विश्वास कमावला होता म्हणजे नेमकं काय? ते ऐकत होतो.
वाहनचालक सोडून इतर *कोणाची* चूक होती?
दादाने त्याक्षणी सगळे विचार सोडून देऊन घेतलेला निर्णय आणि केलेली कृती आपण अश्या वेळी करू शकू का? पालकांनी दादा आणि शाळेच्या व्यवस्थापनाला जबाबदार धरलं असतं तर? पालकांनी स्वतःच्या जबाबदारीवर पाल्यांना सायकलसहलीला पाठवावं असं आपण नेहमी सांगतो. पण, अश्या वेळी पालकांना भावनाह्वेग आवरता आला नाही तर?
मी स्वतः स्वतःचं मरण कमी वेळा का जवळून बघितलंय?
वेगाच्या हाव्यासाने एका क्षणात एखाद्या चिमुरड्याचं भविष्य हिरावून घेणाऱ्या वाहनचालकाला काय शिक्षा होईल? आपली न्यायव्यवस्था शिक्षा करू शकेल का?
ओलावलेल्या डोळ्यांसह असंख्य प्रश्नांचं रणकंदन डोक्यात माजलं होतं. 
दादा म्हणून आपण मनाने खंबीर असायलाच हवं. अश्या प्रसंगांसाठी हजरजबाबी व्हायलाच हवं. सायकलसहलीची जबाबदारी पालकांचा विश्वास कमावत सुरू होते. हा प्रसंग कोणावरही कधीही कोसळू शकतो.
एवढाच विचार करून कौशिकला फोन लावला होता.

-गंधार.
03/02/2020

मंगळवार, २८ जानेवारी, २०२०

आठवतंय?

आज
अनेक महिन्यांनी
आपल्याला मिळालेला
हा एकांत...
तूही किती आनंदली अहेस
तुलादेखील स्मरत असतीलच ना
साऱ्या आठवणी
सहवासातल्या
अपल्याच!

स्वच्छ आकाश
त्याचे निळे रंग.
कापसासारखे तरंगणारे
पांढरे ढग.
वाट चुकून भरकटलेला
एखादा मेघ
विसावा देणारा.
दूरवर दिसणारे हिरवेगार
डोंगर.
ताप्तं ऊन.
त्यात विसावा देणारं
जीव मुठीत घेऊन
उभं असलेलं
एखादं झाड
छाटलेलंच.

लांबसडक रस्ता
काही
वाहनं जीवघेणी
अंगचटीला आलेली
एका क्षणात संपवणरी
सारंच
भीतीही
भिववून
नाहिशी झालेली.

अंगावर आदळणारा वारा
घोघावणारा
कधी
मागून वेग देणारा
तर कधी
समोरून येऊन
आडवणारा.

लोकांचे
नेत्रकटाक्ष
आश्चर्यकारी.
कौतुकाची थाप देणारे
तर कधी वेडे ठरवणारे
आपल्यालाच!

गोंधळून गेलेली
जनावरं...
एकत्र मार्गक्रमण
करणाऱ्या आपल्याला
पाहूनच.

वर्षभराचे ऋतू
देशभरातल्या जागा
तिथल्या त्यांच्या छटा
विविधांगी.

सारं सारं काही
अगदी काही
महिन्यांपूर्वीचं...
ह्या एकांतात तुला
आठवत असतीलच
सारी स्वप्नं, सारे विचार
आपल्याबद्दलचेच
काही इतिहासातले
काही भविष्यातले
वृक्षहीन रस्त्यावर
तळपत्या सूर्याच्या
प्रकाशात पाहिलेले
मृगजळासारखेच!

आठवतायत ना?
-सम्प्रिः ।
28/1/2020
डोंबिवली-पाली यात्रा

https://anchor.fm/gandhar-dombivalikar/episodes/ep-ee89ua


डोंबिवली-पाली-डोंबिवली

28/1/2020

कोरोना पूर्वीच्या माघी चतुर्थीला या दौऱ्याला निघालो तेव्हा संकल्प वगैरे काही केला नव्हता. पण गणेश चतुर्थीला निघतोय म्हणून काहीतरी वेगळं, खास करावं असं मनापासून वाटलं. डोंबिवलीला पहिली गणपतीबाप्पा मोरया घोषणा देऊन जी टांग मारली सायकलला ती अथर्वशीर्ष म्हणतंच! त्याची आवर्तनां मागून आवर्तनं अगणिकवेळा होत राहिली. सायकलंचं चाक थांबलं की अथर्वशीर्षपठणही थांबायचं. या नियमाने डोंबिवली ते पाली  हा  प्रवास पूर्ण झाला. मधे अनेक विचार मनात डोकावत होते. नुकतंच झालेलं भारत भ्रमण, त्यानंतर झालेले सत्कार समारंभ वगैरे... घरी परतल्यानंतर हा पहिलाच मोठा दौरा होता. दुपारी माणगाव जवळ एका  झाडाखाली निवांत थांबून एक मौन संवाद घडला. तो असा- मी विविध अनुभव आणि ही सायकल...

माघ शुद्ध चतुर्थी शके 1941
आज 
अनेक महिन्यांनी 
आपल्याला मिळालेला हा एकांत...
तूही किती आनंदली अहेस
तुला देखील स्मरत असतीलच ना
साऱ्या आठवणी
सहवासातल्या 
आपल्याच!

स्वच्छ आकाश
त्याचे निळे रंग.
कापसासारखे तरंगणारे 
पांढरे ढग.
वाट चुकून भरकटलेला 
एखादा मेघ 
विसावा देणारा.
दूरवर दिसणारे हिरवेगार
डोंगर.
ताप्तं ऊन.
त्यात विसावा देणारं
जीव मुठीत घेऊन 
उभं असलेलं 
एखादं झाड
छाटलेलंच.

लांबसडक रस्ता
काही
जीवघेणी वाहनं
अंगचटीला आलेली
एका क्षणात संपवणरी 
सारंच
भीतीही
 भिववून 
नाहिशी झालेली.

अंगावर आदळणारा वारा
घोघावणारा
कधी
मागून वेग देणारा
तर कधी 
समोरून येऊन
आडवणारा.

लोकांचे 
नेत्रकटाक्ष
आश्चर्यकारी
कौतुकाची थाप देणारे
तर कधी वेडे ठरवणारे
आपल्यालाच!

गोंधळून गेलेली 
जनावरं
एकत्र मार्गक्रमण करणाऱ्या आपल्याला
पाहूनच.

वर्षभराचे ऋतू
देशभरातल्या जागा
तिथल्या त्यांच्या छटा
विविधांगी.

सारं सारं काही
अगदी काही 
महिन्यांपूर्वीचं
ह्या एकांतात तुला 
आठवत असतीलच 
सारी स्वप्नं, सारे विचार
आपल्या बद्दलचेच
काही इतिहासातले
काही भविष्यातले
वृक्षहीन रस्त्यावर
तळपत्या सूर्याच्या 
प्रकाशात पाहिलेले
मृगजळासारखेच!

आठवतायत ना?

#dombivli_cycle_club #cyclopasana #सायकलोपासना
-सम्प्रिः ।

डोंबिवली-पाली यात्रा


रविवार, १९ जानेवारी, २०२०

प्रतिक्रिया

अन्न शिजवल्या हातांना
प्रतिक्रियेची आस असते...

आला घास
पोटात कोंबल्यासारखे
चुळा भरायला
मागे वळलेले हात
अन्न शिजवल्या
हातांचे कष्ट-
धूण्यातले
सोलण्यातले
किसण्यातले
वाफवण्यातले
भाजण्यातले
वाटण्याले
लाटण्यातले
तळण्यातले
आनंदाने फुलून
चेहऱ्यावर ठेवलेल्या
स्मित हास्याने
भूकेल्या पोटी
वाढण्यातले
कधीच न वाटलेले...
कष्ट!
जाणवून देत असतात...
प्रतिक्रिया न देता
सुधारण्यातला वाव
काढून टाकत
चवीतली चव
कमी करत
भूक मारणारे
करंटे बनून मागे फिरणारे
भुक्कड हात!

कारण,
अन्न शिजवल्या हातांना
प्रतिक्रियेची आस असते...

पतंग

मकरावरल्या संक्रांतीचे
सण येतात
पतंग हवेत
झेप घेतात
काटाकाटीच्या स्पर्धेत
एकमेकांचे
मांजे कापून
भरदलावर उडत
गूल होत
कुठल्याश्या
झाडात.
फांदीवर.
अँटीनावर.
सळीवर.
वायरमध्ये.
अडकून पडतांना
चेहऱ्यावरच्या
कुत्सित हास्याच्या भावना
बघत
आताशा,
मी पतंग उडवणंच सोडून दिलंय...

आयुष्याचाच पतंग झालाय
त्याला उडवतंय कोण?
ते शोधतोय.

संक्रमण?
फार पूर्वीच होऊन गेलंय
गुंतलेला मांजा
न कापता
स्वतःलाच
सोडवता येईल कसा?
ते बघतोय

गाडी सुटली
त्या संध्याकाळी
संक्रात कोसळली होती
गाडी पोहचली माझ्या गावी.
रीळाला ढील देऊन
रीळ रीता करून
पतंग
भरदलावर सोडता
झाली होती
ती.

तेव्हापासून
सुटलेला मांजा
एकमेकांत गुंतत
भरदलात
पतंग भटकतोय...
गात,
'न कुठले नकाशी
न अनुमान काही'

संक्रांत...
प्रत्येक अक्षांशावर
कोसळत्ये
दररोज

त्या मांजाचं टोक
पायदळी तुडवलं गेलंय
अनेकींच्या...
मधला गुंता
वाढत गेलाय...
एखाद्या
झाडात.
फांदीवर.
अँटीनावर.
सळीवर.
वायरमध्ये.
कुठेतरी
अडकलेल्या मांज्यावर
वाऱ्याचे झुरके घेणारा
हा पतंग!

या पतंगाला
उडवणं
सोपं नव्हतं.
तिला कदाचित
जमलंच नसतं.
काचेची पूड करून,
मांज्यावर तार
मीच चढवली होती.
एका घावेत
ती,
पतंगच
सोडती झाली!

पायदळी तुडवल्या
मांज्याला
अजूनही काचेची धार आहे.
हेलकावे खाणारा
पतंग
अजूनही प्रतीक्षेत आहे.
मांज्यावरची काच
स्पर्शून
जाणीव होणाऱ्या
संवेदनशील.
नाजूक.
पण कणखर.
अश्या कुणी.
तिच्या...

आताशा,
मी पतंग उडवणंच
सोडून दिलंय...
आपल्या
मांज्यावरच्या धारेने
इतरांचे मांजे
कापल्यावर
भरदलावर
गूल होऊन
भटकत राहणारा
पतंग...
रोज कोसळणारी
संक्रांत...
गुंतणारा
मांजा...
सारं सारं...
जखमी करून
गेलंय...
कधीतरी
या कविता
लिहित्या...
बोटांना.

-सम्प्रिः।

बुधवार, १५ जानेवारी, २०२०

बेडूक

वैद्य असलेले जुळे आश्विनौ बाहेर पडतात ती वेळ. रात्र म्हणता येणार नाही अशी रात्र नाही पहाट म्हणता येईल असंही उजाडलेलं नाही. माघाकडे झुकणाऱ्या अष्टमीच्या चंद्राबरोबर तशीच थंडी पडलेली. खिडकीतून वाऱ्याचे लोट अधून मधून अंगावर काटा आणणारे. जागा- स्वच्छ. समोर दार, मागे खिडकी. इतर दोन्ही बाजूची अर्धी भिंत फरश्यांनी चकचकीत. पण, वरच्या भिंतीवर ओल येऊन पोपडे उडालेले.
नुकत्याच उठलेल्या काही पाखरांचा आवाज, मोराचा केकारव, डुलकी लागत असावी असं भासवणाऱ्या पेंगुळलेल्या रातकि़ड्याचा आवाज. वाऱ्याच्या झुळूकीबरोबर डुलणाऱ्या हुरड्यासाठी तयार झालेल्या ज्वारीच्या पीकांचा मागच्या शेतातून येणारा आवाज. बाकी सगळीच शांतता. आपण हालचाल केल्यावर खोलीत घुमेल इतकाच मनुष्यनिर्मित आवाज.
डोळ्यावरची झोप अर्धवट उघलेली असतांना अश्या नहाणी घर कम पाश्चात्य पद्धतीच्या शौचालयात बसलेल्या आपल्यावर, मागल्या बाजूला असलेल्या खिडकीवरच्या पाईप वरून एक बेडूक उडी मारतो. ही उडी अंगावर असेल तर?

अंघोळ करत असतांना समोरून मारलेली ही उडी बघितली आणि दुसऱ्या दिवशी घडू शकणाऱ्या प्रसंगाच्या कल्पनेने, त्या बेडकाचा बंदोबस्त करायला हवा असा, मानवी विचार मनात आला. टणाटण उड्या मारणारा तो बेडूक, सौर बंबाने गरम पाण्याची ऊब घेऊन अधिकच तरतरीत झाला. वर पोहचायची वाट शोधू लागला.

मातीत झोपायचं सोडून, विहिरीत रहायचं सोडून, बेडूक इथं कुडकुडायला का आला असावा?

दिवसभरात त्या बेडकाची जागा न्याहाळून हेरून ठेवली होती. दुसऱ्या दिवशी पहाटे आधी त्याचा शोध घेतला. त्याला बाहेर काढणं कठीण होतं. तो जमिनीवर आल्यावर त्याला छोट्या बादली खाली झाकून ठेवलं. मानवी स्वभाव! दुसरं करू तरी काय शकणार?

प्रत्येक जण आपापल्या कूपात (विहिरीत) राहणारा. प्रत्येकाला आपलाच कूप स्वच्छ, सुंदर आणि उत्तम वाटणारा. त्या कूपाच्या बाहेरचं जग विद्रूप, कुरूप मानणारा. आपलाच कूप वाढावा यासाठी आटापीटा चाललेला. या सगळ्या स्पर्धेपासून अलिप्त राहून जगू इच्छिणारा तो, भिंतीवरला बेडूक. भीती वाटावी त्याची, त्याच्या वेगळ्या विचारांची म्हणूनचकी काय, मानवी स्वभावाने त्याला बांधून टाकलं बंद बादलीत. काही वेळ बांधलेलं राहून तरी शिकेल एखाद्या कूपानुसार ढाळून घेऊन रहायला. लाल, हिरव्या, निळ्या, भगव्या किंवा पांढऱ्या झेंड्याखाली.

प्रभाकर पेंढारकरांच्या रारंग ढांगच्या एकशे चौऱ्याहत्तराव्या पानावर कर्नल राईट विश्वनाथला विचारतात-

"...ज्याचा जीवनाशी संबंध नाही आणि जे मनापासून पटलेलं नाही ते विद्यार्थ्यांना शिकवण्याची पाळी शिक्षकावर येते. राज्यकर्त्यांच्या लहरीनुसार संशोधनाचे विषय शास्त्रज्ञांना निवडावेच लागतात...
...सैन्यात नसेल पण बाहेर तरी तुली अपेक्षित असलेलं स्वातंत्र्य आहे का?”

लेखकाला ‘ह्या जगात सर्वसुखी माणसाइतकाच दुर्मिळ स्वतंत्र माणूसही आहे काय?’ हा प्रश्न सतावतोय.

-सम्प्रिः।