मंगळवार, १६ जुलै, २०१९

आणि आता माताजी

संस्कृत शिकायला सुरुवात करून एक तप पूर्ण झालंय. मागचं संपूर्ण वर्ष तपोपूर्तीचं वर्ष होतं. मागच्यावर्षी जानेवारी-मार्च महिन्यात भारतभ्रमणाचे विचार आल्यानंतर "ह्याच वर्षी निघायला हवं" यावर मनाने शिक्कामोर्तब केला तो केवळ 'तपोपूर्ती'चे औचित्य साधून.
दोन वर्षांपूर्वी गुरुपौर्णिमेला टीचर पासून बाईंपर्यंत हे मनोगत लिहीलं होतं. तपोपूर्तीचे वर्ष संपतांना यात 'आणि आता माताजी' याची भर पडली आहे. गुरुपौर्णिमेला एका गुरुकुलात, गुरुसान्निध्यात राहून शिकण्याचा अगदी न ठरवता घडून आलेला हा योग आहे.

टीचर पासून बाईंपर्यंत... आणि आता माताजी.

पुण्यातला एक किस्सा जो नावानिशी सांगायला खूप अभिमान वाटतो; कारण त्याने भाषेच्या अभ्यासाविषयी एक दृष्टी  दिली आणि भाषेकडे बघण्याचा दृष्टीकोन बदलला. तो आजच्या निमित्ताने लिहितो.
मांडे बाई, कात्रे बाई, गाडगीळ बाई यांचे तास संवादात्मक असायचे. प्रत्येक विषयावर चर्चा व्हायची. प्रश्न विचारले जायचे, मतं घेतली जायची आणि बरेचदा तास कधी संपायचा हे बाईंनी सांगितल्या शिवाय समजत नसे. पहिल्या दोन सत्रांत सर्वात जास्त ओरडा ज्याला मिळाला किंवा ऐकून घ्यावं लागलं तो कदाचित् मीच असीन!
कारणही तसंच होतं. एखादा विषय समजणं सोपं असतं. पण त्यावर चर्चा करतांना तोच समजवणं, महाकठीण. तेही कदाचित मुंबईत सोपं गेलं असतं. पण, पुण्यात नाही.
"तुम्हा मुंबईतल्या लोकांना एका भाषेत अभिव्यक्त होता येत नाही का?" "एकतर मराठीतून बोल, किंवा इंग्रजीतून." विषय संपला!
हे पहिल्या वर्षात वेगवेगळ्या शब्दांत कित्येकदा ऐकलंय, याची गणना नाही.
गाडगीळ बाई आणि मांडे बाई एकदा एका भाषेतून शिकवायल्या लागल्या की अस्खलित एकच भाषा बोलतात. सुरूवातीला कठीण वाटत होतं. पण सवय झाली मग.
या सगळ्यात, माझ्या डोंबिवली-पुणे-डोंबिवली प्रवासाने विचार करायला खूप छान वातावरण दिलं होतं. खरंच होतं, अर्धवट जाणल्या गेलेल्या भाषेने संवादात परिपूर्णता  येणे शक्यच नव्हते.
एकदा गाडगीळ बाई संपूर्ण वर्गात माझं बोलणं मधेच थांबवून, मला बोलल्या. कुठेतरी लागलं! ट्रेन मधे ठरवलंच अस्खलित मराठी बोलायचा सराव रोजच्या भाषेच्या वापरात करायचा.
डोंबिवलीतल्या मित्रांना त्याचा त्रास होत होता पण नंतर त्यांनाही सवय झाली असावी.
दुर्दैवाने इंग्रजी माध्यमाच्या शाळेत शिकलो होतो आणि शिक्षण संपताना मात्र सुदैवाने संपूर्ण मराठी माध्यमातला विद्यार्थी बनलो होतो. इंग्रजी बद्दल आता किंचिदपि द्वेष नव्हता आणि त्या भाषेशी संपर्क तुटू नये म्हणून डोंबिवली ते कर्जत इंग्रजी वृत्तपत्र वाचायचा संकल्प केला होता.
बाकी या संकल्पाने आपण भाषांच्या किती जवळ जाऊ शकतो याची स्वतःलाच नव्याने जाणीव झाली. म्हणून क्लास सुरू करतांना "एका भाषा सम्यक् अध्येतव्या" हे एकच सूत्र रुजावं एवढं ध्येयं ठवलं.
गुरूंनी पिळलेले कान आणि त्यातून घडलेलो मी या बाबतीत इतरांना बि घडवायची इच्छा जागृत ठेवतो.

संस्कृत शिकायला सुरुवात करून आता दहा वर्ष झाली.
शालेय अभ्यासक्रमातील मथितार्थ पोहचवणा-या अस्मिता टीचर, काळे मॅडम, दंडगे मॅडम;
महाविद्यालयात पारंपारिक संस्कृत बरोबरच नवनवीन संशोधनात्मक विषय माझ्या पर्यंय पोहचावेत म्हणून नेहमी झटणाऱ्या वैष्णवी मॅडम आणि पुणे विद्यापीठातील रसाळ सर, अनघा जोशी बाई, कात्रे बाई, मांडे बाई आणि गाडगीळ बाई या संस्कृत क्षेत्रातील माझ्या सर्व गुरूंना आजच्या निमित्ताने अभिवादन!
............................2017.........................

दोन हजार पाच साली डाॅ. ए. पी. जे अब्दुल कलाम यांच्या हस्ते राष्ट्रपती पुरस्कार प्राप्त झालेल्या डाॅ. पुष्पा दीक्षित ज्यांना, सगळेच विद्यार्थी माताजी म्हणतात, त्यांच्या बिलासपुर येथील घरी-गुरुकुलात मी मागील तेवीस दिवसांपासून राहतोय.
शाळा-महाविद्यालय-विद्यापीठातून शिक्षण घेणाऱ्या आपणा शहरी मंडळींना इथल्या जीवना विषयी किंचिदपि कल्पना नसल्याची खात्री बाळगून पुढचं लिखाण करतो आहे.
प्रवासामध्ये मी अतिथी म्हणून अनेक गुरुकुलांना भेटी दिल्या. बहुतांश गुरुकुलं वेदाध्ययनाविषयीची होती. रुद्री, पुरुषसूक्त, कर्मकांड यांचं अध्ययन आणि आपापल्या शाखेच्या रक्षणासाठी वेदांचं रटन हा सर्वसामान्य सार्वत्रिक अभ्यासक्रम. बेलोरा-अमरावती, सामख्याळी-गुजरात आणि काणकोण-गोवा येथील अपवाद वगळता सगळीच गुरुकुलं मंदीरसंस्थांशी जोडलेली होती. पैकी, गोव्यातील गुरुकुलात शास्त्राध्ययन होत होतं. कर्नाटकातील मठसंस्कृती गुरुकुल परंपरेचाच एक आधुनिक प्रयोग होता. जिथे राज्यसरकारने निश्चित केलेला पाठ्यक्रम विद्यार्थ्यांना मठातच असलेल्या शाळेत शिकवला जात होता. संस्कृतच्या अभ्यासाला विशेष महत्व असल्याने दहावी-बारावी नंतर शास्त्राध्ययनासाठी संस्कृत पाठशाळेचा वेगळा वर्ग या मठाचाच भाग होता.
त्या सगळ्या गुरुकुलांपेक्षा माताजींचं गुरुकुल व्याकरण शास्त्राध्ययपाच्या उद्देशाने वेगळं आहे.
"जिज्ञासा गुरुनिष्ठा च सतताभ्यासनिश्चयः।
एकाग्रता महत्वेच्छा एतत्विद्यार्थीलक्षणम्॥"
या विद्यार्थी लक्षणांची परीक्षा गुरुकुलात रोज होत असते. वरील लक्षणांपैकी गुरुनिष्ठा हा गुण सोडल्यास इतर सगळ्या गुणांचा अनुभव आपण शिक्षण घेतांना घेत असतो. गुरुनिष्ठा आणि गुरुसेवा या दोहोंमुळेच गुरुकुलातलं जीवन इतर शिक्षणापेक्षा वेगळं आहे. घरातलं बागकाम, स्वयंपाक, धूणी-भांडी, स्वच्छता, बाजार-हाट ह्या सगळ्या गोष्टी गुरुसेवा म्हणून करत
तद्विद्धि प्रणिपातेन परिप्रश्नेन सेवया।
उपदेक्ष्यन्ति ते ज्ञानं ज्ञानिनस्तत्त्वदर्शिनः॥
प्रश्न विचारत, जिज्ञासेची पूर्ती करत विषयातील तत्त्व जाणलेल्या गुरूंकडून योग्य ते मार्गदर्शन मिळवणे हे गुरुकुलातील अध्ययनाचं वैशिष्ट्य आहे.
माताजी सनातनी विचारसरणीच्या आहेत. बाजारातून रेडीमेड खाद्यपदार्थ वगैरे आणण्याचे त्यांना पटत नाही. पोषाखात धौतवस्त्र अनिवार्य. सकाळी पाचला उठून, आदल्या रात्री वाटून दिलेली साफसफाईची कामं पूर्ण करून स्नानादी शुचिर्भूत होण्याची कर्म आटोपून सात वाजता सूत्रपाठ आणि धातुपाठ सुरू होतो. तासाभराच्या पठनानंतर आरती आणि न्याहारी झाल्यावर नऊ वाजता नवीन शिकण्याचा वर्ग सुरू होतो. दिवसभराचा अभ्यास देऊन झाल्यावर संध्याकाळी दिवस भरात झालेल्या अभ्यासाची परीक्षा होते.
गुरु मार्गदर्शन करत असतात. अधून मधून शिकवतही असतात. अभ्यास करून प्रश्न विचारला गेला नाही तर; आणि रोज होणाऱ्या परीक्षेत नापास झालो तर आपण नवीन आलेल्यांच्या वर्गात (पुन्हा पूर्वीचंच शिकायला) जाऊन बसतो. "पासींग मार्क्स 100 होते है, पासींग मार्क्स 99 नही होते," असं माताजी नेहमी सांगतात.  आपल्यापेक्षा अधी शिकलेले वयाची मर्यादा न ठेवता आपल्याला शिकवत असतात आणि आपण पुढे गेल्यावर नवीन येणाऱ्यांना शिकवण्यासाठीच शिकायचं असतं. वर्षानुवर्ष पिढ्यानुपिढ्या भारतीय परंपरेचा ज्ञानसाठा जीवंत राहिला, तो असाच. वयाने लहान असणाऱ्यांबरोबरच्या आणि आमच्या बरोबरच्या व्यवहारात माताजी भेद करतात. अनुशासन बनून रहावं म्हणून उठता बुक्की बसता लाथ आणि परीक्षेत चांगली उत्तर दिल्यावर, चांगलं काम केल्यावर आंबा, केळ, चाॅकलेट वगैरे बक्षीस मिळणं हे लहान विद्यार्थ्यांसाठी नित्याचं असतं. वयाने मोठ्या असलेल्या आम्हाला शाब्दिक टोमण्यांचा मारा पुरून उरतो. माताजींचं व्याकरणशास्त्राला स्वतःचं देणं आहे. चार हजार सूत्रं समजावून सांगत दोन हजार धातूंवर प्रक्रिया करण्याची नवीन शैली त्यांनी विकसित केली आहे. अष्टाध्यायी शिकणं सोपं नाही. पण म्हणून कुठलाही पंडीत सूत्र बाद करायला धजावला नाही. कुठलं सूत्र आधी शिकावं आणि कुठलं नंतर ह्यात आजवर विविध प्रयोग  होत आले आहेत. ळकाराचं उच्चारण आधुनिक संस्कृतात उत्तरभारतात लोप पावलं असलं तरी दक्षिणभारतात ते जीवंत आहे, ज्यामुळे उत्तर भारतीयांनी बनवलेलं "ळकारस्य डकारः..." वगैरे वार्तिक प्रत्यक्षात फोल ठरतं. सांगायचा मुद्दा असा की, माताजी जे शास्त्र शिकवतात ते सोप्पं असल्याचा कुठलाही दावा त्या करत नाहीत. आमच्या सारख्या विद्यार्थ्यांनाच त्यांच्या पद्धतीने शिकतांना ते सोपं वाटू लागतं. जे कठीण आहे ते कठीणच आहे. अभ्यास करून, प्रसंगी जरासे पाठांतर करून हळू हळू समजून घेत त्याला सोपे करणं हे शिक्षण शास्त्राचं तत्त्व गुरुकुलपद्धतीला समजलंय.
ते अजून आधुनिक शिक्षण तज्ज्ञांचा गावी फिरकत नसल्याचं दोन वीस बवीस सारख्या 'सोपे' करण्यावरून दिसून येतं.
आठ ते बारा वयोवर्षाचा बटू घर सोडून गुरुगृही अध्ययन करायला येतो. पुढील बारा वर्षात विविध शास्त्रांमध्ये पारंगत होण्यासाठी गुरु आपल्या शिष्यावर मेहनत घेतो. एक गुरु घडविला जात असतो. ह्या शास्त्राध्ययनाच्या स्वरूपात पैसा बसत नाही याचा प्रत्यय तिबेटी विश्वविद्यालयाच्या भेटीतही आला होता.

नोकरी करायची पैसा कमवायला. पैसा कमवायचा मुलांना चांगलं शिक्षण द्यायला. पैसा नसेल तर चांगलं शिक्षण नाही? कर्ज काढून शिक्षण घ्यायचं. शिक्षण संपल्यावर काढलेल्या कर्जाचं आणि खर्चिलेल्या पैश्याचं भांडवल करत भविष्यातील मुलांच्या शिक्षणासाठी पैश्याच्या मागे लागायचं... याच पैश्याने वैद्यक क्षेत्र, शैक्षणिक क्षेत्र आतून पूर्णपणे पोखरलं गेलंय. कुठल्या दुष्टचक्रात अडकलाय भारत?

आज माताजींना गुरुदक्षिणा विचारली. विद्यार्थ्याकडून पैसे घेणार नाही म्हणून माताजींनी पैसे घेण्याचे नाकारले. दीक्षित दांपत्यांनी स्वतःची सगळी मिळकत ह्या गुरुकुलाला चालवण्यासाठी देणगी म्हणून दिली आहे. माताजींच वय पंचहात्तरी पार आहे तर बापूजींच वय पंच्याऐंशी पार. माताजी सवतःच्या घरात आम्हा 15-20 विद्यार्थ्यांना सांभाळतातच. त्याच बरोबर अर्धांगवायूने अधू होऊनही स्वतःची कामं स्वतःच करण्याचा अट्टहास करणाऱ्या बापूजींची सेवाशुश्रूषा करतात. काही वर्षांपुर्वी घरातल्या आणखीन एक सदस्या ज्यांना सगळे फुवा म्हणतात त्यांचा एक पाय काही आजारामुळे कापावा लागला. त्यांची शुश्रूषा माताजीच करतात. वीस वर्षांपूर्वी पाणिनीय शोध संस्थान ही संस्था निर्माण झाली. या संस्थेच्या कर्त्या करवित्या माताजीच. दोन कामचुकार मोलकरिणी मदतीला असल्या तरी सकाळचा सगळ्यांसाठीचा नाश्ता  कित्येकदा माताजींना स्वतःच्या हाताने करावा लागतो. सकाळची वेळ पाठांतरासाठीची असल्याने विद्यार्थ्यांना त्या सांगत नाहीत. गुरुकुलातला उत्तम गुरु हा आईची ममता आणि शिक्षकाचे कठोतरत्व यातील योग साधतो. माताजी आणि बापूजींनी प्रोफेसर म्हणून सेवानिवृत्त झाल्यावर आपलं सारं संचित केवळ संस्कृत पाठशाळा चालवण्यासाठी अर्पित केलं. आज संस्थेला कोणी ठोस उत्तरदायी नसला तरी असंख्य विद्यार्थी माताजींकडून प्राप्त केलेले ज्ञान घेऊन भारतभर पसरले आहेत, काही भारताबाहेरही गेले आहेत. अध्ययन आणि अध्यापनाचा गुण स्वतःत भिनवून इथून बाहेर पडलेला विद्यार्थी जिथे जातो तिथे जिज्ञासू विद्यार्थ्याच्या शोधात असतो...
हे गुरुकार्य आहे. ते पुढे चालू राहण्यासाठीच आशीर्वाद मागायचे असतात आजच्या दिवशी...

गुरुपौर्णिमा, शके 1941
ख्रिस्ताब्द- 2019

सोमवार, १ जुलै, २०१९

वर्षान्त, सुरुवात पावसाळ्याची...

30/6/2019
दिवस 365
"गंधार, आठवतोय का रे वर्षभरापूर्वीचा दिवस?"
रात्री बारा साडे बारा पर्यंत न संपलेला, मागच्या तीन चार दिवसांपासून वाढलेली नातेवईक, मित्र मंडळी आणि हितचिंतक यांच्या शुभेच्छांचा वर्षाव झेलत संपला. भेटायला? अक्काही आल्या होत्या. अनेक वर्षांनंतर. अर्णव आणि रोहन यांची माझ्या बरोबर सुरू असलेली धावपळ. आई बाबा आणि सयुरीचं मी सांगीन ते आणि मला लागेल ते केलं गेलेलं काम. हो, कारण त्यांच्यासाठी हे सगळंच नवीन होतं. माझ्यासाठीही  सगळं तितकंच नवीन होतं.
सकाळी दार उघडलं. दारात उंदीर अर्धवट मरून पडला होता. दार उघडण्याच्या आवाजाने घाबरून एक मांजर आणि तिचं पिल्लू अर्धा मजला उतरून खाली जाऊन बसले. आणि पिल्लू दूरूनच म्याऊ म्याऊ करत होतं. मांजरीने तो उंदीर अर्धवट मारून वर पर्यंत आणला असावा. मांजर त्याला उंदीर मारायला शिकवत होती. मला निघायला अजून तासभर होता. मी म्हटलं, जाईल ती तासभरात खाली घेऊन. म्हणून दार बंद केलं. पण येणारे पेपर वाले आणि दूधवाले यांमुळे पिल्लू बिचकून जात होतं. शेवटी मीच पिशवी  हाताला लावून उंदराला बाहेर फेकून आलो. द अल्केमिस्ट वाचलेला मी, सहाजिकच, "हा कुठला शकून?" असा प्रश्न तेव्हा पडला. समजेलंच नंतर म्हणत विचार दूर सारून प्रवास सुरू झाला.
ते पिल्लू बिचकत बिचकत मारून खायला शिकलं. शिकलं नसतं तर भूकेने त्याला शिकवलं असतं. कदाचित् मला ते तेच सांगत होतं. आलेली परिस्थिती स्वीकार. नाहीतर काही खैर नाही.
सायकलवर गतिमापक बसवण्यासाठीही घाबरणारा मी... माझं ते काम, वर्षभरापूर्वी अर्णव आणि रोहनने केलं होतं. "मला यातलं काही समजत नाही. ते बघा तुम्ही" असं म्हणून त्यांच्यावर ते काम मी ढकललं होतं. हा प्रसंग मला सिक्कीम मध्ये स्वतःवर हसवत होता. मला एक नवीन सायकलस्वार भेटला होता. नंतर आम्ही सिलीगुडी पर्यंत एकत्र सायक्लवलं. भेटल्यावर त्याला सामान लावायचा एक राॅड नीट लावता आला नसल्याने सारखं थांबावं लागतंय हे समजलं.  सगळी अवजारं काढून मी त्याच्या सायकलचा राॅड नीट लावून दिलाच. त्याच बरोबर थांबक (ब्रेक) वगैरे सगळी छोटी कामं केली. वर्षभरापूर्वी मी त्या कामांना हात लावला नसता.

मागील तीनशे पासष्ठ दिवसांचा डोळ्यात न मावणारा आलेख डोळ्यांसमोर उभा करू पाहतोय. प्रबोधिनीत सुमेधने घेतलेली मुलाखत आठवली. "पांघरसी जरी असला कपडा येसी उघडा जासी उघडा" असं गाणं माझ्या पोषाखावरून दिलं होतं. डोंबिवली सायकल क्लबची जर्सी. पूर्ण बाह्यांची हिरव्या रंगाची जर्सी. जिच्यावर प्रायोजकांची चह्न होती. एकतीस मार्चला सगळ्यांचे प्रायोकत्व संपले. सायकल पूर्णपणे माझी झाली. लोकं बाकी काहीही वाचणायात अक्षम असली तरी, कंपन्यांची नावं त्यांच्या चटकन लक्षात येतात. एस. बी. आय तर गावा गावातल्या घरा घरात पोहचली आहे. मी त्या कंपनीने पाठवलेला प्रचारक आहे. मला गलेलठ्ठ पगार वगैरे मिळतो आणि मी नोकरीही लावून देऊ शकतो. हे सगळं जर्सी वरचं चिह्न सांगत असतं. या पूर्वग्रहांनी भेटून बोलणाऱ्यांकडे दुर्लक्ष करतांना कधी कधी मानसिक त्रास होतोय असं वाटायचं. बर्गमाॅण्टच्या टी शर्टवर "Straight from St. Pauli" असं लिहीलेलं असल्याने ते वाचू शकणारे दक्षिणभारतीय मी ख्रिस्ती धर्माच्या प्रचारासाठी फिरतोय असा पूर्वग्रहानिशी बोलत. असल्या चिह्नांकित पूर्वग्रहांमुळे कधी कधी दिवसाचा खर्च सातशे च्या पार जात. मावशीने अमेरिकेहून नवीन जर्सी पाठवली होती. तिला मी बघितलीही नव्हती. मला सायकलचं प्रायोजकत्व मिळवून देणाऱ्या, साहीर भाईंनी त्यांच्या दुकाना तर्फे जर्सी दिली होती. अश्या दोन जर्सी घरी होत्या. मार्च संपल्यावर कपडे बदलूयात असा विचार आला. तेव्हा खरंतर डी.सी.सी ची जर्सी जुनी वाटू लागली होती. कलकत्त्यात असतानाची गोष्ट. चेन्नईत नवीन ट्रॅकपँण्ट घेतल्या होत्या. जुन्या फेकून दिल्या होत्या. डोंबिवली सायकल क्लबची जर्सी रुधीर मोघेच्या पुढाकाराने आम्हा सर्वांपर्यंत पोहचते. तिची आखणी लौकिक लाड ने केली आहे. कंटाळा आला म्हणून कपडे बदलले पण, चुकल्यासारखं वाटू लागलं. भारताचा झेंडा, माझं नाव, डोंबिवली सायकल क्लबचं नाव, आपत्कालीन क्रमांक, रक्तगट, चेन असलेला एक खिसा आणि पूर्ण बाह्या. यामधे सुशेगीवलय निर्माण झालं असावं. बाकीच्या जर्सी अर्धबाही असल्याने वेगळं आतापरक्षी आवरण (sun gloves) घालायला लागू लागलं. ते घालण्याचा त्रास नव्हता पण धुवायला दोन नग कपडे वाढले होते. मी माझ्या रोजच्या जर्सीला मीस करू लागलो होतो. "वासांसि जीर्णानि यथा विहाय..." हा श्लोक आठवायला गत्यंतर नव्हतं. रुधीर आणि लौकिक ने माझ्या जर्सीवर खास मेहनत घेतली होती. असलेला साचा संपादित करून ती चिह्न त्यावर बसवली. माझा देवनागरी लिपीतून नाव लिहीण्यासाठी आग्रह होता. डोंबिवलीत माझ्या एकट्याच्या जर्सी वर देवनागरी लिपीत माझं नाव आहे. माझी अट तशीच होती आणि असते. शंभर रूपये जास्त देईन पण रोमन लिपीत नाव नकोय. पण लोकांच्या मागास मानसिकतेने या मोहीमेसाठी छापलेल्या जर्सीवर रोमन मधेच नाव छापलं गेल्याने हातात नवीन जर्सी पडल्या पडल्या संताप झाला होता. नंतर त्याचीही सवय झाली, पर्याय नसल्याने स्वीकारणं भाग होतं. शेवट पर्यंत जर्सीवरची चिह्न निश्चित करता करता रुधीर आणि लौकिक ने खूप मेहनत घेतली होती. त्यांचे आभार नक्की मानायला हवेत. गुवाहाटीत आई बाबा दुसऱ्या जर्सी घेऊन आले आणि मी एका अर्थाने प्रायोजक मुक्त झालो. जर्सीचा फायदा इतकाच की ती रोज संध्याकाळी धुवून सकाळी वाळलेली असते. कमी मळते. म्हणजे मळत असली तरी फारशी दिसत नाही. लवकर वाळत असल्याने पावसाळ्यात रोज भिजता येते.
शेवटचा नवीन ऋतू झेलण्यासाठी बिहार-उत्तर प्रदेशात सायक्लवत होतो. जर्सीने चार-पाच दिवसातच काळ्या पाण्याची आठवण करून दिली. अंगभर घामोळ्याने संध्याकाळी जर्सी काढल्यावर आग आग व्हायची. ग्रीष्म ऋतूत पारा पंचेचाळीशी ओलांडायचा, रोज!
साडे आठ नऊ ला ऊन तापलं की संध्याकाळी सहा पर्यंत सूर्याला कोणी आवरू शकत नसे. कॅण्डीड पावडरचा डबा संपवून नयसील अर्धी संपवत चार दिवस सहन केल्यावर पुढल्या दिवशी सुती कुर्ता वापरायचं ठरवलं. "ऊष्णकाले भवेत् शीतं शीतकाले भवेत् ऊष्णं खादीवस्त्रम्" असं काहीसं बोधवाक्य घेऊन सरकारी खादी भांडार चालतं, ते उगाच नाही. जर्सीला बॅगतच राम राम ठोकला.
वर्षभरात सोयी-गैरसौयीची गणितं बनली आहेत, सुटली आहेत.
मला साखरेची पुरणपोळी अजिबात आवडत नाही. खरं तर आई अणि काकूने केलेल्या पुरण पोळी खेरीज सगळ्याच पुरणपोळ्या अगोड असतात माझ्या जिभेसाठी. रात्रीच्या जेवणाचा बेत पुरणपोळीचा होता. पण, पुरण आम्हालाच शिजवायचं होतं. पोळ्या आम्हालाच करायच्या होत्या. माताजी मार्गदर्शन करत होत्या. तसं आम्ही करत होतो. पुरण शिजवण्यासाठी एक कढई मी घेतली. शिजवता शिजवता वादळी वाऱ्यासह, वीजांच्या कडकडाटासह पाऊस सुरू झाला. रविवारी आई गिर्यारोहणाला गेली होती. अक्षत ने act110 ची नदीत नहाण्याची छायाचित्र इन्स्टावर टाकली होती.  मी कूलरच्या हवेत मुंबईला मीस करत होतो. वादळी पावसाने दिलासा दिला. काय योग जुळून आला होता. तीनशे पासष्ठावा दिवस आणि पुरणपोळीचा बेत!
तर झालं असं होतं,  
एम्. ए. चं पहिलं वर्ष संपलं होतं. दुसऱ्या वर्षी गम् धातू पासून गच्छति रूप बनण्याची प्रक्रिया पाठ्यक्रमात होती. बिलासपुरच्या गुरुकुलात ती वेगळ्या पद्धतीने शिकण्यासाठी जायचं ठरलं. तिकीटं काढली. पण शेवटपर्यंत तिकीटं कन्फर्म झाली नाहीत आणि आमचा बिलासपुर दौरा रद्द झाला. योग-दिवशी ताईच्या नातेवईकांच्या घरी निवासाची व्यवस्था होती. संध्याकाळी ती घटना आठवली आणि दुसऱ्या दिवशी माताजींना भेटायला जायचं ठरवलं. चौदा ऑगस्टला घरी पोहचायचंय म्हणत दिवस-अंतराची गोळा बेरीज् केली आणि गुरुकुलात रहायचं नक्की करून आलो. म्हटलं तसं, गम् चा गच्छ् कसा होतो? वन्दे हा शब्द कसा बरं बनतो? या सगळ्या प्रक्रिया शिकायला मी इथे थांबलो आहे. डाॅ.पुष्पा दीक्षित (माताजी) यांचं घर हे गुरुकुल आहे. त्या पाणिनीची अष्टाध्यायी स्वतःच्या नवीन पद्धतीने शिकवतात. शब्दांचे अनुशासन आहे. एक छोटेखानी चार हजार सूत्रांचा संगणक. संस्कृतचं व्याकरण असंख्य algorithams आणि conditionsनी भरलं आहे. धातू द्या. विवक्षा सांगा तुम्हाला तयार शब्दरूप मिळेल. तर, अश्या ह्या संगणकाचे काही प्रोग्रॅम शिकायला, प्रक्रिया शिकायला मी बिलासपुरातल्या गुरुकुलात 23 जुलै पर्यंत राहणार आहे. एक ऑगस्टला नागपुर आणि सात आठ ऑगस्टपर्यंत शेगाव मार्गे जळगावला पोहचत नाशिक मार्गे डोंबिवलीत पोहचीन.
गुरुकुलातल्या जीवनाबद्दल नंतर स्विस्तर लिहीनच पण थोडक्यात सांगायचं तर मराठीतल्या पुस्तकातला अरुणी हा धडा आठवणारे अनुभव आहेत. त्याच बरोबर स्वाध्याय-प्रवचन-गुरुसेवा ह्या तीन सूत्रींचा अनुभव घेतोय. सकाळी सात ते संध्याकाळी सात वर्ग असतात. विद्यार्थी दशेत गेल्याने शिक्षकांपाससून चोरून काही कामं करावी लागतात. त्यातलं आजवर केलेलं पहिलं काम म्हणजे हा लेख लिहीणं आहे. पुरणपोळी खाऊन होईस्तोवर आकाश निरभ्र झालं होतं. पुरणपोळी खाताना काकाची आठवण आली नाही असं होत नाही. जेवण झाल्यावर फोन करायचं ठरवलं. मी गच्चीत बसून स्वतःलाच प्रश्न विचारला... वर्षभरापूर्वीची रात्र आठवतेय का? भरून आलं. फोन न करता लिहीणं बरं वाटलं.

30/6/2019
बिलासपुर, छत्तीसगड.