30/6/2019
दिवस 365
"गंधार, आठवतोय का रे वर्षभरापूर्वीचा दिवस?"
रात्री बारा साडे बारा पर्यंत न संपलेला, मागच्या तीन चार दिवसांपासून वाढलेली नातेवईक, मित्र मंडळी आणि हितचिंतक यांच्या शुभेच्छांचा वर्षाव झेलत संपला. भेटायला? अक्काही आल्या होत्या. अनेक वर्षांनंतर. अर्णव आणि रोहन यांची माझ्या बरोबर सुरू असलेली धावपळ. आई बाबा आणि सयुरीचं मी सांगीन ते आणि मला लागेल ते केलं गेलेलं काम. हो, कारण त्यांच्यासाठी हे सगळंच नवीन होतं. माझ्यासाठीही सगळं तितकंच नवीन होतं.
सकाळी दार उघडलं. दारात उंदीर अर्धवट मरून पडला होता. दार उघडण्याच्या आवाजाने घाबरून एक मांजर आणि तिचं पिल्लू अर्धा मजला उतरून खाली जाऊन बसले. आणि पिल्लू दूरूनच म्याऊ म्याऊ करत होतं. मांजरीने तो उंदीर अर्धवट मारून वर पर्यंत आणला असावा. मांजर त्याला उंदीर मारायला शिकवत होती. मला निघायला अजून तासभर होता. मी म्हटलं, जाईल ती तासभरात खाली घेऊन. म्हणून दार बंद केलं. पण येणारे पेपर वाले आणि दूधवाले यांमुळे पिल्लू बिचकून जात होतं. शेवटी मीच पिशवी हाताला लावून उंदराला बाहेर फेकून आलो. द अल्केमिस्ट वाचलेला मी, सहाजिकच, "हा कुठला शकून?" असा प्रश्न तेव्हा पडला. समजेलंच नंतर म्हणत विचार दूर सारून प्रवास सुरू झाला.
ते पिल्लू बिचकत बिचकत मारून खायला शिकलं. शिकलं नसतं तर भूकेने त्याला शिकवलं असतं. कदाचित् मला ते तेच सांगत होतं. आलेली परिस्थिती स्वीकार. नाहीतर काही खैर नाही.
सायकलवर गतिमापक बसवण्यासाठीही घाबरणारा मी... माझं ते काम, वर्षभरापूर्वी अर्णव आणि रोहनने केलं होतं. "मला यातलं काही समजत नाही. ते बघा तुम्ही" असं म्हणून त्यांच्यावर ते काम मी ढकललं होतं. हा प्रसंग मला सिक्कीम मध्ये स्वतःवर हसवत होता. मला एक नवीन सायकलस्वार भेटला होता. नंतर आम्ही सिलीगुडी पर्यंत एकत्र सायक्लवलं. भेटल्यावर त्याला सामान लावायचा एक राॅड नीट लावता आला नसल्याने सारखं थांबावं लागतंय हे समजलं. सगळी अवजारं काढून मी त्याच्या सायकलचा राॅड नीट लावून दिलाच. त्याच बरोबर थांबक (ब्रेक) वगैरे सगळी छोटी कामं केली. वर्षभरापूर्वी मी त्या कामांना हात लावला नसता.
मागील तीनशे पासष्ठ दिवसांचा डोळ्यात न मावणारा आलेख डोळ्यांसमोर उभा करू पाहतोय. प्रबोधिनीत सुमेधने घेतलेली मुलाखत आठवली. "पांघरसी जरी असला कपडा येसी उघडा जासी उघडा" असं गाणं माझ्या पोषाखावरून दिलं होतं. डोंबिवली सायकल क्लबची जर्सी. पूर्ण बाह्यांची हिरव्या रंगाची जर्सी. जिच्यावर प्रायोजकांची चह्न होती. एकतीस मार्चला सगळ्यांचे प्रायोकत्व संपले. सायकल पूर्णपणे माझी झाली. लोकं बाकी काहीही वाचणायात अक्षम असली तरी, कंपन्यांची नावं त्यांच्या चटकन लक्षात येतात. एस. बी. आय तर गावा गावातल्या घरा घरात पोहचली आहे. मी त्या कंपनीने पाठवलेला प्रचारक आहे. मला गलेलठ्ठ पगार वगैरे मिळतो आणि मी नोकरीही लावून देऊ शकतो. हे सगळं जर्सी वरचं चिह्न सांगत असतं. या पूर्वग्रहांनी भेटून बोलणाऱ्यांकडे दुर्लक्ष करतांना कधी कधी मानसिक त्रास होतोय असं वाटायचं. बर्गमाॅण्टच्या टी शर्टवर "Straight from St. Pauli" असं लिहीलेलं असल्याने ते वाचू शकणारे दक्षिणभारतीय मी ख्रिस्ती धर्माच्या प्रचारासाठी फिरतोय असा पूर्वग्रहानिशी बोलत. असल्या चिह्नांकित पूर्वग्रहांमुळे कधी कधी दिवसाचा खर्च सातशे च्या पार जात. मावशीने अमेरिकेहून नवीन जर्सी पाठवली होती. तिला मी बघितलीही नव्हती. मला सायकलचं प्रायोजकत्व मिळवून देणाऱ्या, साहीर भाईंनी त्यांच्या दुकाना तर्फे जर्सी दिली होती. अश्या दोन जर्सी घरी होत्या. मार्च संपल्यावर कपडे बदलूयात असा विचार आला. तेव्हा खरंतर डी.सी.सी ची जर्सी जुनी वाटू लागली होती. कलकत्त्यात असतानाची गोष्ट. चेन्नईत नवीन ट्रॅकपँण्ट घेतल्या होत्या. जुन्या फेकून दिल्या होत्या. डोंबिवली सायकल क्लबची जर्सी रुधीर मोघेच्या पुढाकाराने आम्हा सर्वांपर्यंत पोहचते. तिची आखणी लौकिक लाड ने केली आहे. कंटाळा आला म्हणून कपडे बदलले पण, चुकल्यासारखं वाटू लागलं. भारताचा झेंडा, माझं नाव, डोंबिवली सायकल क्लबचं नाव, आपत्कालीन क्रमांक, रक्तगट, चेन असलेला एक खिसा आणि पूर्ण बाह्या. यामधे सुशेगीवलय निर्माण झालं असावं. बाकीच्या जर्सी अर्धबाही असल्याने वेगळं आतापरक्षी आवरण (sun gloves) घालायला लागू लागलं. ते घालण्याचा त्रास नव्हता पण धुवायला दोन नग कपडे वाढले होते. मी माझ्या रोजच्या जर्सीला मीस करू लागलो होतो. "वासांसि जीर्णानि यथा विहाय..." हा श्लोक आठवायला गत्यंतर नव्हतं. रुधीर आणि लौकिक ने माझ्या जर्सीवर खास मेहनत घेतली होती. असलेला साचा संपादित करून ती चिह्न त्यावर बसवली. माझा देवनागरी लिपीतून नाव लिहीण्यासाठी आग्रह होता. डोंबिवलीत माझ्या एकट्याच्या जर्सी वर देवनागरी लिपीत माझं नाव आहे. माझी अट तशीच होती आणि असते. शंभर रूपये जास्त देईन पण रोमन लिपीत नाव नकोय. पण लोकांच्या मागास मानसिकतेने या मोहीमेसाठी छापलेल्या जर्सीवर रोमन मधेच नाव छापलं गेल्याने हातात नवीन जर्सी पडल्या पडल्या संताप झाला होता. नंतर त्याचीही सवय झाली, पर्याय नसल्याने स्वीकारणं भाग होतं. शेवट पर्यंत जर्सीवरची चिह्न निश्चित करता करता रुधीर आणि लौकिक ने खूप मेहनत घेतली होती. त्यांचे आभार नक्की मानायला हवेत. गुवाहाटीत आई बाबा दुसऱ्या जर्सी घेऊन आले आणि मी एका अर्थाने प्रायोजक मुक्त झालो. जर्सीचा फायदा इतकाच की ती रोज संध्याकाळी धुवून सकाळी वाळलेली असते. कमी मळते. म्हणजे मळत असली तरी फारशी दिसत नाही. लवकर वाळत असल्याने पावसाळ्यात रोज भिजता येते.
शेवटचा नवीन ऋतू झेलण्यासाठी बिहार-उत्तर प्रदेशात सायक्लवत होतो. जर्सीने चार-पाच दिवसातच काळ्या पाण्याची आठवण करून दिली. अंगभर घामोळ्याने संध्याकाळी जर्सी काढल्यावर आग आग व्हायची. ग्रीष्म ऋतूत पारा पंचेचाळीशी ओलांडायचा, रोज!
साडे आठ नऊ ला ऊन तापलं की संध्याकाळी सहा पर्यंत सूर्याला कोणी आवरू शकत नसे. कॅण्डीड पावडरचा डबा संपवून नयसील अर्धी संपवत चार दिवस सहन केल्यावर पुढल्या दिवशी सुती कुर्ता वापरायचं ठरवलं. "ऊष्णकाले भवेत् शीतं शीतकाले भवेत् ऊष्णं खादीवस्त्रम्" असं काहीसं बोधवाक्य घेऊन सरकारी खादी भांडार चालतं, ते उगाच नाही. जर्सीला बॅगतच राम राम ठोकला.
वर्षभरात सोयी-गैरसौयीची गणितं बनली आहेत, सुटली आहेत.
मला साखरेची पुरणपोळी अजिबात आवडत नाही. खरं तर आई अणि काकूने केलेल्या पुरण पोळी खेरीज सगळ्याच पुरणपोळ्या अगोड असतात माझ्या जिभेसाठी. रात्रीच्या जेवणाचा बेत पुरणपोळीचा होता. पण, पुरण आम्हालाच शिजवायचं होतं. पोळ्या आम्हालाच करायच्या होत्या. माताजी मार्गदर्शन करत होत्या. तसं आम्ही करत होतो. पुरण शिजवण्यासाठी एक कढई मी घेतली. शिजवता शिजवता वादळी वाऱ्यासह, वीजांच्या कडकडाटासह पाऊस सुरू झाला. रविवारी आई गिर्यारोहणाला गेली होती. अक्षत ने act110 ची नदीत नहाण्याची छायाचित्र इन्स्टावर टाकली होती. मी कूलरच्या हवेत मुंबईला मीस करत होतो. वादळी पावसाने दिलासा दिला. काय योग जुळून आला होता. तीनशे पासष्ठावा दिवस आणि पुरणपोळीचा बेत!
तर झालं असं होतं,
एम्. ए. चं पहिलं वर्ष संपलं होतं. दुसऱ्या वर्षी गम् धातू पासून गच्छति रूप बनण्याची प्रक्रिया पाठ्यक्रमात होती. बिलासपुरच्या गुरुकुलात ती वेगळ्या पद्धतीने शिकण्यासाठी जायचं ठरलं. तिकीटं काढली. पण शेवटपर्यंत तिकीटं कन्फर्म झाली नाहीत आणि आमचा बिलासपुर दौरा रद्द झाला. योग-दिवशी ताईच्या नातेवईकांच्या घरी निवासाची व्यवस्था होती. संध्याकाळी ती घटना आठवली आणि दुसऱ्या दिवशी माताजींना भेटायला जायचं ठरवलं. चौदा ऑगस्टला घरी पोहचायचंय म्हणत दिवस-अंतराची गोळा बेरीज् केली आणि गुरुकुलात रहायचं नक्की करून आलो. म्हटलं तसं, गम् चा गच्छ् कसा होतो? वन्दे हा शब्द कसा बरं बनतो? या सगळ्या प्रक्रिया शिकायला मी इथे थांबलो आहे. डाॅ.पुष्पा दीक्षित (माताजी) यांचं घर हे गुरुकुल आहे. त्या पाणिनीची अष्टाध्यायी स्वतःच्या नवीन पद्धतीने शिकवतात. शब्दांचे अनुशासन आहे. एक छोटेखानी चार हजार सूत्रांचा संगणक. संस्कृतचं व्याकरण असंख्य algorithams आणि conditionsनी भरलं आहे. धातू द्या. विवक्षा सांगा तुम्हाला तयार शब्दरूप मिळेल. तर, अश्या ह्या संगणकाचे काही प्रोग्रॅम शिकायला, प्रक्रिया शिकायला मी बिलासपुरातल्या गुरुकुलात 23 जुलै पर्यंत राहणार आहे. एक ऑगस्टला नागपुर आणि सात आठ ऑगस्टपर्यंत शेगाव मार्गे जळगावला पोहचत नाशिक मार्गे डोंबिवलीत पोहचीन.
गुरुकुलातल्या जीवनाबद्दल नंतर स्विस्तर लिहीनच पण थोडक्यात सांगायचं तर मराठीतल्या पुस्तकातला अरुणी हा धडा आठवणारे अनुभव आहेत. त्याच बरोबर स्वाध्याय-प्रवचन-गुरुसेवा ह्या तीन सूत्रींचा अनुभव घेतोय. सकाळी सात ते संध्याकाळी सात वर्ग असतात. विद्यार्थी दशेत गेल्याने शिक्षकांपाससून चोरून काही कामं करावी लागतात. त्यातलं आजवर केलेलं पहिलं काम म्हणजे हा लेख लिहीणं आहे. पुरणपोळी खाऊन होईस्तोवर आकाश निरभ्र झालं होतं. पुरणपोळी खाताना काकाची आठवण आली नाही असं होत नाही. जेवण झाल्यावर फोन करायचं ठरवलं. मी गच्चीत बसून स्वतःलाच प्रश्न विचारला... वर्षभरापूर्वीची रात्र आठवतेय का? भरून आलं. फोन न करता लिहीणं बरं वाटलं.
30/6/2019
बिलासपुर, छत्तीसगड.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा