गुरुवार, १० जुलै, २०२५

चळवळीतले लेख - भाग २


20 जून
शाळेत हिंदी शिकवणे हा राजकीय कट आहे. हिंदी लादणे शिक्षणतज्ज्ञांच्या, भाषातज्ज्ञांच्या मता विरोधातले धोरण व राजकीय आचरण आहे...

मी गुरुदेव रविंद्रनाथ ठाकूरांना आपले गुरु मानतो. मानवाला मुक्तपणे घडायचे असेल, स्वतंत्र जगायचं असेल तर गुरुदेवांना वाचावं. पुलंचेही दैवत होते गुरुदेव.
मराठी आणि बंगालीचं विशेष भाषिक नातं आहे. जशी बंगाली तशीच आसामी. हिंदी न शिकता बंगाली किंवा आसामी शिकणं आपल्या घराला अधिक समृद्ध करेल.

कुठलीही भारतीय भाषा आत्मसात करायची गुरुकिल्ली म्हणजे संस्कृत. इतर सर्व भारतीय भाषांच्या व्याकरणावर इंग्रजी किंवा पाश्चात्य भाषेच्या व्याकरणाचा प्रभाव आहे. संस्कृतचे व्याकरण संपूर्ण भारतीय आहे. किंबहुना संस्कृतचे व्याकरण शिकून आपण इतर भारतीय भाषेचे व्याकरण आपण होऊन समजून घेऊ शकतो.
हिंदी ऐवजी संस्कृत शिकून साऱ्या भारतीय भाषांची दारं उघडता येतील तुमच्या घराला...

लिपीभेदामुळे दुरावलेली मल्याळम, कन्नड, तेलुगू आणि तमीळ शिकायला सुरुवात केली की खरं तर भारतीय लिप्यांची एकसंधता समजतेच पण त्याबरोबर एका प्रवाहात नदी सारख्या वाहणाऱ्या भारतीय भाषांची एकात्मता आधिक ठळक जाणवते... 
हिंदी सारख्या उर्दू व इंग्रजीचे प्रभुत्व असलेल्या दुबळ्या भाषेपेक्षा ह्या भिन्नलिपीतील नवीन भाषा शिकून स्वतःच्या घराला समृद्ध करणे कधीही श्रेयस्कर, नाही का?

कोंकणी म्हणजे मराठीची बहीण. कोंकणीतली शब्द संपदा मराठीला समृद्ध करणारी आहे. घरात कोंकणी शिकून गोव्यासारखे सुशेगीवातावरण निर्माण करणे आपल्याच हातात आहे...

लहान मुलांना भाषे मधला फरक समजत नाही. शाळेसारखी अडाणी शिक्षणव्यवस्था मुलांच्या मनात भाषाभेद कोरून ठेवते. देवनागरी लिपी शिकून चार पाच भाषांची दारं आपोआपच उघडलेली असतात. रामरक्षा स्तोत्र किंवा अथर्वशीर्ष वाचून पाठ करायला शाळेत संस्कृत शिकवण्याची गरज नव्हती. मराठी शिकून ते वाचत वाचत पाठ करता आलेच होते की...

बेअक्कल आणि अशिक्षित आंधळ्या संघकार्यकर्त्यांना भुलू नका. राजकीय पक्षांच्या स्वार्थी धोरणांना भुलू नका. 

भाषातज्ज्ञ, शिक्षणतज्ज्ञ आणि स्वतःचे हिंदी न शिकता व्यवहारात कुशल होता येत असल्याच्या अनुभवातून सुजाण नागरिक बना. 
हिंदीला महाराष्ट्रातून हद्दपार करा. 

शाळेत हिंदी शिकून आपल्या पाल्याला हिंदी शिकवून मागास बनवू नका...

मराठी उत्तम करा. महाराष्ट्राला स्वतंत्र करा. महाराष्ट्रधर्म टिकवा.
जय मराठी.

-गंधार डोंबिवलीकर,
हल्ली मु. उदयपुर, राजस्थान

21 जून
लहान मुलांना भाषाभेद समजत नाही. कानावर पडणारे शब्द इतर अवयवांनी मिळणाऱ्या अनुभवांशी स्वाभाविकपणे जोडले जात मुलांमधील भाषा विकसित होत असते.

प्राथमिक शिक्षणात तिसरी भाषा म्हणून सर्वसामान्यपणे (by default) हिंदी लादल्यावर, कोवळ्या मुलांच्या मेंदूवर भाषाभेदाने हिंदीचा नकाशा (brain map) कसा बरं तयार होईल?

1. देवनागरी लिपीत अस्तित्वात असलेले ळ आणि ण ज्या भाषेत कटाक्षाने टाळले जाऊन, उच्चारण ल व न ने भ्रष्ट केले जाते ती भाषा म्हणजे हिंदी.
2. श व ष या दोन वर्णांतील उच्चारणात ज्या भाषेत भेद नाही ती भाषा म्हणजे हिंदी.
3. ऱ्हस्व-आदी दीर्घ-अंत हा नियम मराठीत असतो. तसा कुठलाही नियम नसलेली ऱ्हस्व दीर्घात गोंधळ निर्माण करायला लावणारी भाषा म्हणजे हिंदी.
4. ज्या वर्णाचं उच्चारण मराठीत द्न्य असे केले जाते त्याच वर्णाला ग्य म्हणून उच्चारायला लावणारी भाषा म्हणजे हिंदी.
5. नुक्ता का वापरला जातो हे सांगू न शकणारी भाषा म्हणजे हिंदी.
6. अनुस्वार आणि चंद्रबिंदूत गोंधळ निर्माण करणारी भाषा म्हणजे हिंदी
7. चौदाखडी न जुमानता इंग्रजी नावांना बाराखडीत बसवून इंग्रजीचे उच्चारण भ्रष्ट करायला लावते अशी भाषा म्हणजे हिंदी.
8. संस्कृतोद्भव शब्दांना ऊर्दूद्भव शब्द आणि इंग्रजी शब्दांचे स्वतंत्र देशी शब्द न बनवता देवनागरीकरण स्वीकारते ती भाषा म्हणजे हिंदी.

या अनुषंगाने 1996-97 साली मनावर कोरला गेलेला प्रासंगिक गोंधळ लिहायला आवडेल. मी तीन-चार वर्षांचा असीन. शेजारी कच्छी काकू राहत. सकाळी दहा-अकराच्या सुमारास दाराशी कलिंगडवाला आल्यावर माझ्या काकूने आणि शेजारच्या काकूंनी एकत्र कलिंगड विकत घेतले. दुपारी दोन-तीनची वेळ असेल. जेवणं होऊन वामकुक्षीही झाली होती. संध्याकाळ व्हायला वेळ होता. शेजारच्या काकू, "काकू आहे क्या? कलिंगड खाया? कलिंगड मीठा होते ने?" म्हणून माझ्याशी मोडक्या हिंदीत बोलल्या. मागून माझी काकू आली. तिने मान डोलवत "हा अच्छा मीठा था" म्हणून उत्तर दिलं.
"मीठा!" कलिंगड मीठा कसं असेल? माझ्या काकूने दिलेल्या उत्तराने मी अधिकच पेचात पडलो. आपण तर कलिंगडावर मीठ टाकले नव्हते. मग कलिंगड मीठा कसं असेल? मी त्या प्रश्नाने बेचैन झालो होतो. काकूला मी विचारलेला प्रश्न समजेना आणि मीठा म्हणजे गोड कसं हे मला समजेना.

पाचवी ते सातवी शाळेत सक्तीने हिंदी शिकवली गेली. हा प्रश्न काही तेव्हाही सुटला नव्हता. एम ए करत असतांना ट्रेनच्या प्रवासात मीठ आणि मीठा यांचा एकमेकांशी संबंध नसल्याचा साक्षात्कार झाला. साधारणपणे दोन दशकं त्या प्रश्नाची गाठ मनात आडकून बसली होती.  
मी इंग्रजी माध्यमात शिकल्याने अश्या कित्येक गाठी बांधल्या गेल्या असतील याला काही तोड नाही. काळा बरोबर काही सुटल्या काही सुटण्याचे साक्षात्कार होत असतात.

भारत फिरत असतांना हिंदी शिकवणाऱ्यांचे विदारक चित्र दिसलं. शिक्षकांनाच देवनागरीचे उच्चारण येत नसल्याने भयानक हिंदी शिकवली जात आसल्याचं समोर आलं. तर, कुठेतरी शब्दसंपदाच उपलब्ध नसल्याने इंग्रजी शब्दांचे देनागरी लिप्यंतरण करून हिंदी वाक्य बनवली जात असल्याचे चित्र दिसले. हिंदी वर्तमानपत्रांमधील दयनीय भाषा हे जीवंत उदाहरण आहे हिंदीच्या गुणवत्तेचे.

भारतीय भाषेचा अभ्यासक म्हणून एकच अधोरेखित करू इच्छितो,
प्राथमिक शिक्षणात तिसऱ्या भाषेची सक्ती आणि त्यातही हिंदीची सक्ती मुलांसाठी घातक आहे. 

एक देश एक भाषा - हा भुरसटलेला पाश्चात्य विचार जेव्हा तुम्ही सोडून द्याल तेव्हा तुम्ही खऱ्या अर्थाने भारतीय व्हाल.

कारण, ही माझी भाषा आहे; ही त्याची भाषा आहे पासून सुरू झालेला प्रवास जेव्हा साऱ्या भारतीय भाषा माझ्या आहेत इथवर येऊन पोहचतो तेव्हा मी खरा भारतीय असतो. 
ऐका म्हणजे ऐकले जाल!

-गंधार डोंबिवलीकर,
हल्ली मु. उदयपुर, राजस्थान

22 जून
परवाच्या फेसबूक लेखात भारतीय भाषांचं गुणगान गायलं. 
नंतर वाटलं कशासाठी? 

ह्या भाषांच्या राजकीय कूरघोडींना पाठिंबा द्यायला? छे! आपला प्रवाह भाषारत सायकलोपासना Cyclopasana मुळे वेगळा घडलाय, आपण घडवलाय म्हणून आपण भारतीय भाषांचं गुणगान गाऊ शकतो.
ज्यांचे मार्ग राजकारणी आखत आहेत ते रस्ता चुकतायंत हे स्पष्ट दिसतंय. त्यांची वाटचाल लाचारी, मुजोरी, चाकरी करणारा समाज घडवणारी आहे!

प्राथमिक शिक्षणात तिसरी भाषा?
मी, एक भाषा अभ्यासक म्हणून मला विचाराल तर, प्राथमिक स्तरावर (वयाच्या आठ वर्षांपर्यंत) दुसरी भाषा शिकण्याचीही गरज नाही. हा काळखंड मुक्त संचाराचा. शरीराला वळण लावण्याचा. लेखणी धरण्यासाठी, चित्र ओळखण्यासाठी, शब्द ऐकण्यासाठी, पर्यावरण न्याहाळण्यासाठी. काही साचे निर्माण करण्यासाठी. म्हणजे, रंगातला भेद, आकारातला भेद, स्पर्शातला भेद, आवाजातला भेद, चवीतला भेद, इत्यादी...
सात पदार्थ आणि चोवीस गुणांचे साचे तयार झाले की मग सुरू होतो अनुभवांचे वर्गीकरण करायचा प्रवास. किंबहूना प्रत्येक साच्याच्या आकलनासहित हा प्रवास सुरू झालेलाच असतो. अनुभवांच्या आधारे प्रत्येक साच्यातील समृद्धी वाढत असते.

हा सारा साच्यांचा प्रपंच कशासाठी? 
लहान मुलांच्या मनात भाषाभेदाचा साचा निर्माण करायची आवश्यकता असते का? हे जाणण्यासाठी. याचं सरळ उत्तर नाही असं आहे. म्हणून प्राथमिक स्तरावर एकच भाषा म्हणजे मातृभाषाच शिकवली जायला हवी. 
का? 
"संस्कृत मराठीपासून वेगळी भाषा आहे. ती कठीण असते हं. तीत खूप पाठांतर असतं." असं लहानपणीपासून बिंबवलं गेल्यावर आयुष्याचा कुठच्याही टप्प्यावर संस्कृत आपलीशी, सोपी वाटणे शक्य आहे का?

आज जे पालक अजाणतेपणामुळे आपल्या पाल्यांना इंग्रजी माध्यमात घालतात. त्यांच्याशी संवाद साधल्यावर असे लक्षात येते की, ह्या पालकांच्या लहानपणी इंग्रजी मराठीपेक्षा कठीण असल्याचे त्यांच्या मनावर बिंबवले गेले आहे. चांगल्या गुणवत्तेचे इंग्रजीचे शिक्षण त्यांना मिळाले नसल्याने, त्यांची इंग्रजी कच्ची राहिली व त्या मनातल्या भीतीमुळे त्यांनी आपल्या पाल्याला इंग्रजी माध्यमात टाकले!

काही शहरी पालकांची मराठी माध्यम स्वीकारण्याची तयारी असली तरी, आज पुरेशी साधनंच उपलब्ध नाहीत आणि, ग्रामीण पालकांच्या मनातील भीतीचे (उपरोक्त) भूत त्यांना मराठी माध्यम स्वीकारू देत नाही. शिक्षणाचा बाजार मांडलेल्या संस्थांनी नीतीमत्तेची नीचतम पातळी गाठली आहे.

 यातून निर्माण होणारा सामाजिक दाब निवळण्यासाठी कोणी प्रयत्न करायला हवे?

ह्या शैक्षणिक समस्या आणि राज्याच्या शैक्षणिक गरजा राज्य सरकारने ओळखणे गरजेचे आहे. दिल्ली पुढे हुजरेगिरी करत तुघलकी फरमाने काढून राज्य चालू शकत नाही. त्रिभाषासूत्र प्रथमिक स्तरावर महाराष्ट्रावर लादण्यासाठी कुठचेही राज्यस्तरीय सर्वेक्ष केले नसल्याचे समजते. असले तुघलकी निर्णय महाराष्ट्राने स्वीकारू नयेत...
-गंधार डोंबिवलीकर,
हल्ली मु. उदयपुर, राजस्थान

8 जुलै
आज संघाच्या प्रचार प्रमुखांनी दिल्लीतून भाषण ठोकलं! 
उशीरा सुचलेलं शहाणपण... कारण संघाचे मुखपत्र म्हणवून घेणारे साप्ताहिक विवेक मागील महिन्याभरापासून भाजपचे मुखमपत्र बनून दुर्दैवी महाराष्ट्राच्या खोटार्ड्या माननीय मुख्यमंत्र्यांच्या फतव्यांचा उदो उदो करण्यात गुंग होते. आजच्या संघप्रचार प्रमुखांच्या भाषणावर विश्वास कसा ठेवावा?
भाषा अभ्यासक, मानसशास्त्रज्ञ या अभ्यासू मंडळींकडून सातत्याने मराठी अभ्यास केंद्र च्या माध्यमातून केल्या गेलेल्या मागण्या बिनशर्त मान्य कराव्यात. अन्यथा दिल्लीतून झालेले रेशीमबागेचे भाषण थोतांडच मानावे लागेल.
मी देशाचा कार्यकर्ता म्हणून या चळवळीत उतरलोय फक्त मराठीसाठी. यापूर्वी आणि अजूनही संघातील कार्यकर्त्यांशी संपर्कात आहे. भारत फिरत असतांना अगदी हक्काने रेशीमबागेत राहायला गेलो. भाजपचे मराठी भाषा विकास मंत्री मा. तावडे जींचे हस्ताक्षर असलेले पत्र माझ्याकडे होते. ते पाहून, "तुम्ही भाजप कार्यालयात जा. इथे हे पत्र चालणार नाही" असे स्पष्ट सांगण्यात आले. भाजप आणि संघ वेगळे आहे से बिंबवण्याचा प्रयत्न असावा. मी संस्कृतभारतीच्या कार्यकर्त्यांच्या मदतीने रेशीम बागेत राहिलो. https://cyclopasana.blogspot.com/2018/09/4.html?m=1
हा लेख लिहीला. 
हा सगळा २०१८चा इतिहास डोळ्यासमोरून जात असता, आजची स्थिती मात्र फार निराशा निर्माण करणारी आहे. संघ म्हणजेच भाजप आणि भाजप म्हणजेच संघ. आणि महाराष्ट्र म्हणजे दिल्लीला पैसा पाठवणारी कोंबडी हे वास्तव सहज दिसतंय. विकेंद्रीकरण न करता एकाधिकारशाहीने निर्णय घ्यायचे. भाषिक आणीबाणी हे त्याचेच प्रतिक.
भाषेबाबत भारत फिरून स्वतःचे विचार तयार झाल्याने ते देशहितासाठी, ऐक्यासाठी आणि सांस्कृतिक रक्षणासाठी वापरायचे झाल्यास मला संघाचा नाही, देशाचा कार्यकर्ता होण्याची अधिक गरज वाटते. राजकारण आणि संघकारण दोहोंना दूर ठेवत मातृभाषेसाठी मराठी अभ्यास केंद्रासोबत त्रिभाषा सूत्राच्या विरोधात चळवळीत मी उतरलो आहे. 
डॉ. दीपक पवार - Dr. Deepak Pawar सरांसारखं दमदार, अभ्यासू नेतृत्व लाभलेली ही चळवळ सगळ्या राजकीय पक्षांना एकत्र घेऊन केवळ मराठीच्या विकासासाठी विशुद्ध मनाने सुरू आहे. कारण भाषा समृद्ध करण्यासाठी राजाश्रय गरजेचा असतो. सरकार जर राज्यभाषेच्या उरावर उठलं असेल तर आंदोलन अटळ आहे. हिंदी लादणे थांबवायलाच हवे. त्रिभाषासूत्र रद्द व्हायलाच हवे. नरेंद्र जाधवांची समिती तत्काळ रद्द व्हायला हवी. मराठी माध्यामाच्या शाळांचे प्रश्न सुटायला हवेत. सीबीएसईच्या तालावर राज्य शिक्षण मंडळाला नाचवण्याचा प्रस्ताव रद्द व्हायला हवा.

9 जुलै
उत्तरभारतीयांच्या स्व-ओळखीचा प्रश्न!

एका मारठीद्वेषट्या मराठी उद्योजकाने लिंक्ड इन वर मराठी माणसांना Identity crisis असल्याचा इंग्रजीतून लेख टाकला. अमेरिकेत राहणाऱ्या एका ब्लाॅगर डाॅक्टरने देखील त्रिभाषासूत्राच्या समर्थनार्थ एक ब्लाॅग बनवला.

वाईट बोलू नये तर, का? असाही प्रश्न पडतोच. विशिष्ट पक्षाच्या राजकारण्यांनी पादल्यावरही सुगंध येतोय म्हणणारे मराठी लोक मराठीवर बेतले आहेत हेच महाराष्ट्राचे दुर्दैव! 
या लोकांनी कधी वेळ मिळालाच तर संघ-भाजप आणि जातीचे चष्मे काढून यावर विचार करावा. जमलं तर देशभरातील शाळा फिराव्यात, झेपली तर, भाषाशास्त्राची पुस्तकं वाचावीत. बदललेले मत प्रकट करायला विसरू नये. सगळ्यांचेच मराठीला राजाश्रय मिळवून देणाऱ्या चळवळीत स्वागत असेल. 
'चांगलं राहणीमान' मिळण्यासाठी भारत सोडलेल्या कितीही उच्चशिक्षित असलेल्या माणसाने भारतातील सामाजिक परिस्थितीवर भाष्य न ठोकलेलं बरं. त्यात आपण वैद्यकीय क्षेत्रातले आहोत आपला आणि भाषेचा, भाषाशास्त्राचा काही एक संबंध नाही याची जाणीव नेहमीच असावी.

ह्या दोहोंपैकी स्व-ओळखीच्या मुद्द्यावर लिहायचे ठरवले.
Identity crisis महाराष्ट्रात भारतातील सगळ्यांना सामावून घेणाऱ्या मराठी माणसाला आहे की, हिंदी-इतर भाषा कानावर पडायचाही ज्यांना त्रास होतो अश्या उत्तरभारतीयांना आहे? बहुतांश उत्तर भारतीयांची मातृभाषा हिंदी नाही. शाळांमध्ये "माझी मातृभाषा हिंदी" असल्याचं घोकून घेतलं गेलेलं, बहुधा - हिंदी हीच आपली राष्ट्रभाषा असल्याने तीच आपली मातृभाषा असल्याचं चुकीचं पढवलं गेलेलं आहे. या चुकीच्या संस्कारात घडलेल्या उत्तरभारतीयाला दक्षिण भारतात आल्यावर ज्याचा सामना करावा लागतो, तो म्हणजे खरा Identity crisis; तो मराठी माणसाला नसून सबंध उत्तर भारताला असल्याचे सिद्ध करता येईल यात शंका नाही.
माझी मातृभाषा अहिरणी, मालवणी, वऱ्हाडी, आगरी हे सांगायला महाराष्ट्रात कुठल्यही शाळेत मज्जाव नाही. मराठीच्या बोलींची ओळख मराठी अभिमानाने मिरवते. नुस्ती मिरवत नाही, बोलींतील शब्दांचा स्वीकार करून मराठी समृद्ध होत आहे. तसे ऊर्दू-उद्भव हिंदीत घडतांना दिसत नाही. हिंदीतील नवीन शब्दसंपदा इंग्रजीच्या देवनागरीकरणातून जन्म घेत आहे. इथेच उत्तरभारतातील बोल्या कश्या मरतात याचे गमक आहे. लोक-बोलीतील साहित्य हे मराठीचा अविभाज्य घटक असल्याने मराठी माणसाला कधीच स्व-ओळखीचा प्रश्न निर्माण झालेला नाही. तसे उत्तर भारतात घडलेले नाही. 
मी व्याकरणावर बोट ठेऊन - मी चहा पिला, काॅफी पिली, दूध पिलं. तीनही प्रयोग पुण्यातल्या मराठीच्या दृष्टीने रूढार्थाने जरी चुकीचे ठरवले तरी मराठी बोली आणि व्याकरणदृषट्या कसे चपखल बरोबर आहेत हे पटवून देत आगरी बोलीचा मराठीवर प्रभाव दाखवून देत असतो. ते माझ्या डोंबिवलीकर ओळखीमुळेच!

केंद्र सरकारच्या मराठी विरोधी हिंदी लादणाऱ्या धोरणांमुळे मराठी तरुणांचा स्पर्धा-परीक्षांमधील सहभाग आणि त्यातील सफलता मर्यादित आहे. पण, मराठी तरुण खूप कमी प्रमाणात सरकारी नोकऱ्यांवर अवलंबून होता, आहे. स्वतःच्या प्रामाणिक स्वभावामुळे महाराष्ट्रबाहेरही स्वाभिमानाने काम करण्याची प्रवृत्ती मराठी माणसात दिसून येते. मराठी द्वेष्ट्या राज्यसरकारने दिल्लीची चाटायला महाराष्ट्र विकायला काढला, महाराषातले उद्योगधंदे महाराष्ट्राबाहेर नेले, राज्यसरकारी नोकऱ्या अमर्ठी उद्योजकांना विकल्या तेव्हा मराठी माणूस खऱ्या अर्थाने अस्वस्थ झाला.हिंदी लादणारी मराठी विरोधी मुघली फरमानं ही तर केवळ ठिणगी.

"ऐका म्हणजे ऐकले जाल" हे भाषा स्वातंत्र्याचे सूत्र मराठी माणसाने अनेक दशकांपासून स्वीकारलेलं दिसतं. स्व-ओळखीचा प्रश्न न सुटलेल्या उत्तरभारतीयांमधे ती स्वीकारशीलता आहे का? असण्याचे संभवतच नाही. माझी भाषा काय आहे हे न ओळखता, हिंदीच आहे असे थोपवले गेले असल्यास; ही माझी भाषा, ही तुझी भाषा हा भेद आपसुकच निर्माण होतो. सगळ्या भारतीय भाषा माझ्या आहेत म्हणण्यासाठी आधी स्वतःची ओळख स्पष्ट व्हावी लागते...
-गंधार

चळवळीतले लेख भाग -१

सामदामदंडभेद जेव्हा आपल्याच मूळावर घाव घालतो तेव्हा त्याच आचरणाला धूर्त, छल, कपट असे म्हणतात... राज्यकर्त्या पक्षाने सत्तेचा गैरवापर करून मराठी आवाज दाबायचा सर्वतोपरी प्रयत्न केला आहे.
महाराष्ट्रावर लादलेल्या भाषिक आणीबाणी विरोधात लिहिलेली जानेवारी ते एप्रिल २०२५ या दरम्यानची फेसबूक प्रकटने इथे संकलित केली आहेत. 

4 जानेवारी
IRCTC Ministry of Railways, Government of India 
No #marathi news paper in 22962 Ahmedabad-Mumbai vande bharat express? 
PNR - 8807390996 Reaching Vadodara

Requesting to respect multi culutarlism of India and provide Newspaper in the state languages of destination place and the departure place. 
 
ट्रेन मधे गुजराती, हिंदी, इंग्रजी वर्तमान पत्र वाटण्यात आले. मराठी वर्तमान पत्राची मागणी करता उपलब्ध नसल्याचे सांगण्यात आले. गुजरातहून महाराष्ट्रात जाणाऱ्या ट्रेन मधे राजस्थान पत्रिका उपलब्ध आहे पण एकही मराठी वर्तमान पत्र उपलब्ध नाही. ही खेदाची बाब आहे. मराठी एकीकरण समिती - महाराष्ट्र राज्य कृपया नोंद घ्यावी.
दिनांक - ५ मार्च २०२५
PNR-8529637665
Trn: 22962
अहमदाबाद-मुंबई वंदे भारत एक्सप्रेस
अहमदाबादेत गुजराती, हिंदी व इंग्रजी वृत्तपत्रांचे वितरण करण्यात आले. मराठी वृत्तपत्र उपलब्ध नसल्याचे सांगण्यात आले. लेखी तक्रार करण्यासाठी तक्रार वही सातत्याने मागितल्याने आम्ही व्यवस्था करू असे आश्वासन देण्यात आले. बडोद्याला वृत्तपत्र न मिळाल्याने पुन्हा तक्रारवहीची मागणी केल्यावर टी.टी. कॅप्टन - श्री. नाईक यांनी तक्रारवही न देण्यासाठी मांडवणी सुरू ठेवली.
पण तक्रारवही देण्यात आलेली नाही. 
आग्रह धरून ठेवल्यामुळे सुरतला मराठी वृत्तपत्र मिळेल असे आश्वासन दिले गेले आहे. पण लेखी तक्रार नोंदवून घेतली जात नाही आहे. 

मुंबईला जोडणाऱ्या ट्रेन मध्ये मराठी वृत्तपत्र सहज उपलब्ध होत नसल्याची लेखी मागणी करणे गुन्हा आहे का?

21 मार्च
...आणि मी हराळीतून रातोरात गाशा गुंडाळायचा निर्णय घेतला!

आ. लताताई गेल्या. ही आठवण लिहावी का? यावर निश्चय होत नव्हता. "सरकारी शाळा सीबीएसई होणार" अशी बातमी वाचल्यावर ती आठवण पुन्हा ताजी झाली. 

भारतभ्रमण करून झाले. पुढे काय करावे यासाठी ठोस मार्ग सापडत नव्हता. शैक्षणिक क्षेत्रात काम करायची तीव्र इच्छा होती. भारतातील भाषांवर, भाषाशिक्षणावर काम करायचं. सुरुवात कुठून करायची ते कळत नव्हतं. Sayuree Kulkarni वाणिज्य क्षेत्रातील काॅर्पोरेट जाॅबला कंटाळून लहान मुलांना इंग्रजी शिकणं सोपं जावं म्हणून वर्षभरासाठी शैक्षणिक प्रयोग करायला हराळीत गेली होती. Shruti Phatak काकू मराठी शिक्षणावर प्रयोग करीत होत्या. 

 मीही हराळीला जाण्याचे ठरवले. तिथे गेल्यावर आठवड्याभरात माझ्या कामाचा आवाका निश्चित झाला होता. हराळीच्या सभोवतालच्या 20 किलोमीटर त्रिज्येतील चार आश्रमशाळा आणि एका ग्रामीण शाळेमधे अनुभवाधिष्ठित अभ्याक्रमावर आधारित शिक्षणपूरक उपक्रम घ्यायचे ठरले. पुढील महिन्याभरात हराळीतले ग्रंथालय लावायचे काम करायचे ठरवले. उरलेला वेळ हराळीतल्या शाळेतील शिक्षक, विद्यार्थी, निवासी विद्यार्थ्यांचा अभ्यास यात जात असे.

"आपण एका चौकटीत स्थिरावलो आहोत. आणि दुसऱ्या चौकटीत स्थिरावलेल्यांना आपल्या चौकटीत ओढून आणण्याचा अट्टहास आपण करत आहोत" (2.12.2019 डायरीतलं पान) या विचाराने त्रास होऊन रोज रात्री झोपत होतो. त्यावेळच्या राज्य सरकारने आठवीपासून गणित व विज्ञान सक्तीने इंग्रजी माध्यमात असावे असा निर्णय घेतला होता. शिक्षकांना अभिव्यक्त होता यावं अशी इंग्रजी ही काही भाषा नाही. ती काही एखादे प्रशिक्षणवर्ग घेऊन कोणी शिकू शकत नाही. सातवी पर्यंत ज्या संकल्पना मराठीत शिकवल्या गेल्या त्याचे इंग्रजी प्रतिशब्द स्पेलिंग पाठ करत लक्षात ठेवणे विद्यार्थ्यांनाही त्रासाचे होते.
आश्रमशाळेतले उपक्रम तिथली गरज ओळखून आखायचे होते. सहावीतल्या मुलांना बाराखडीची अक्षर ओळख नव्हती, इंग्रजी स्पेलींगं तर दूरची गोष्ट. त्यात गणित इंग्रजी माध्यमातून. म्हणजे शिक्षणाचा बट्ट्याबोळ करायला सरकारने एकही संधी सोडली नव्हती. फेब्रुवारी महिन्यात बोर्डाच्या परीक्षा, पूर्वपरीक्षा सुरू झाल्या. प्रत्येक परीक्षा केंद्रावर गाईडचा वापर करून उत्तरपत्रिका भरल्या गेल्या. करणार काय? शिक्षकही हतबल, विद्यार्थी सक्षम होणार कुठून? त्यापूर्वी आठवीपर्यंत सरसकट पास करायचा सरकारी निर्णय झालेला होता. नापासांची संख्या वाढली तर, शाळेचं अनुदान बंद होण्याची टांगती तलवार. पहिल्या पिढीतले शिक्षण घेणारे विद्यार्थी आणि पोटार्थी शिक्षक त्या दोघांनाही समजू न शकलेले सरकारी शैक्षणिक धोरण. भारतीय लोकसंख्येची एक मोठी फळी शिक्षणापासून शिक्षणापासून दूर होतांना मी अनुभवत होतो. हीच फळी पुढे देशोधडीला लागणार होती. जोवर सरकारी धोरणं समाजाभिमुख होत नाहीत तोवर कितीही ज्ञान प्रबोधिनी उभ्या राहिल्या तरी काहीही उपयोग नाही. नोव्हेंबर २०१९ पासून फेब्रुवारी २०२० पर्यंत हराळीत राहून जी शिक्षण क्षेत्राची राखरांगोळी होतांना पाहिली. सरकारी चुकीच्या धोरणांनी हतबल झालेलो मी आणि सरकार पुढे हतबल असलेली केंद्रसरकार सोबत काम करणारी प्रबोधिनी सारखी शैक्षणिक संस्था या दोन्ही स्थितींनी, "मी शहरी शिक्षणावरच काम करीन, गावात शिक्षणासाठी जाणार नाही" असे ठरवून हराळी सोडले. 

अभ्यासाचे माध्यम हा सरकारला पोरखेळ वाटत आहे असे आज राज्यसरकारने सरकारी शाळा सीबीएसई करायच्या घेतेलेल्या निर्णयावरून दिसून येत आहे. 

हराळी सोडले तेव्हा मी हराळी का सोडतो आहे ते मनात स्पष्ट नव्हते. पुढे टाळेबंदीत त्यावर सविस्तर विचार झाला आणि मनातली तगमग शांत झाली. २०१९च्या दसऱ्याला आ. लताताईंचे आशीर्वाद घ्यायला गेलो. शिक्षण क्षेत्रात काम करायची इच्छा प्रकट केल्यावर, महाबळेश्वर जवळ एक मोडकळीला आलेली शाळा आहे तिथे हेडमास्तर म्हणून लागणार का असे विचारले होते. त्यावेळी माझ्याकडे हेडमास्तर पदासाठी पूरक शैक्षणिक अनुभव नव्हता. म्हणून मी ती संधी नाकारली. टाळेबंदीत पुन्हा एका शाळेत अनुभव घेतला आणि बी एड सारखा गाढव बनवणारा औद्योगिक अभ्यासक्रम पूर्ण केला. इंग्रजाळलेल्या गर्दभनिर्मिती कारखान्यांचा सरकारकडून होत असलेला विस्तार पाहून फार वाईट वाटते. 
-गंधार, उदयपुर सौर फाल्गुन 30 शके 1946 ख्रि. 2025


5 एप्रिल
भाषा भाषा म्हणजे काय रे भाऊ?
बँक ऑफ इंडियातून आई बाबांनी नामांकन अर्ज आणला. (जानेवारी २०२५ ची गोष्ट)

हिंदी आणि इंग्रजी भाषा होत्या त्यावर. दोन दिवसांसाठीचा पाहूणा म्हणून डोंबिवलीत गेलो होतो. माझी सही त्या नामांकन अर्जावर हवी होती. 

मराठीची मागणी करून, लेखी अर्ज करावेत असे मी आजवर करत आलो आहे. रक्त माझं उफाळून येतं इतकं की, मी हिंदी आणि इंग्रजी अर्जावर सही करणार नाही म्हणून आई बाबांना तंगवलं. त्यांनी बँकेत जाऊन मराठी अर्जाची मागणी करायला हवी ही माझी अपेक्षा!

अनेक दशकं केंद्र सरकारची नोकरी केल्याने मराठी भाषा कुठल्याही कामकाजात अस्तित्वात असू शकत नाही हे मनामनात भिनलंय या पिढीच्या. असं, आई बाबांच्या वयाच्या लोकांशी बोलल्यावर लक्षात येतं. सरकारशी कोण भांडणार? त्यातून काहीही हाशील होत नाही. कागदी घोडे नाचवले जातात, बदल कुठलाही घडत नाही. हे त्यांचे केस पिकलेले अनुभव त्यांची उदास प्रकृती सांगत असतात. न्याय ही या देशातील कपोलकल्पित गोष्ट आहे. शाहण्या माणसाने कोर्टाची पायरी चढावी लागेल असे काहीही या देशात करू नये. हे सर्वसामान्य मध्यमवर्गीय मराठी घरातील विचार कुठून निपजले? दशकानुदशके राजकीय व आर्थिक फायद्यासाठी शिक्षणातून पसरवण्यात आलेल्या चुकीच्या माहितीतून. 

एक ग्राहक म्हणून माझा हक्क! संघराज्य भारतातील महाराष्ट्राचा मतदार नागरिक म्हणून माझा हक्क! करदाता जबाबदार नागरिक म्हणून माझा हक्क! 

माझी जबाबदारी, माझ्या हक्कासाठी लढायची? भाषेसारख्या प्राथमिक हक्कासाठी मी देशोधडीला लागावं हीच तथाकथित स्वतंत्रभारताची इच्छा आहे का?

मला माझे हकक सहज मिळू नयेत, असे मिळालेले, पदरात पडलेले तथाकथित स्वातंत्र्य?

स्वतंत्रते भगवति त्वामहं यशोयुतां वंदे
म्हणून स्वातंत्र्यवीर सावरकारांचे झेंडे मिरवणारे तथाकथित हिंदुत्ववादी संघाचे कार्यकर्ते या माझ्या भाषिक स्वातंत्र्याविरोधात बेशरमपणे भाषणं ठोकतात तेव्हा लाज वाटते संघाची!

गुरुदेव रविंद्रनाथ ठाकूरांचे भाषेवरील विचार पु.लं. खूप छान सांगतात.
"एका भाषेने युनिफॉर्मिटी येईल, युनिटी ही निराळी संकल्पना आहे." (मुक्काम शांतिनिकेतन)

भारताला युनिफॉर्मिटी हवी की युनिटी? 
माझी भाषा स्वीकारली जाणार नसेल तर, मी इतरांची भाषा का स्वीकारावी?
भाषा हा देवाण घेवाणीने फुलत जाणारा, समृद्ध होणारा व्यापार आहे. फक्त आमचच ऐका आणि आमचंच वाचा म्हणत राहिलात तर त्याला तसेच उत्तर मिळेल. हे संघराज्य भारतातील विविध राज्यांत हिंदी भाषा लादू पाहणाऱ्यांना ठणकावून सांगणे गरजेचे आहे.

एक भाषा लादली जाते तेव्हा युनिटी तिथेच ब्रेक होते! (ऐक्य तिथेच तुटते)

मराठीत युनिफॉर्म या शब्दाला प्रतिशब्द नाही. ती संकल्पनाच मराठी नाही. मराठी म्हणजे अहिरणी, आगरी, वऱ्हाडी, कोळी, कातकरी, मालवणी, इत्यादी सगळ्या बोली वैविध्याची मोळी बांधून सजलेली भाषा. तीत ऐक्य आहे. युनिफॉर्मिटी आणायचा प्रयत्न केला की खांदेश, मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्र, कोकण असे तुकडे बाहेर पडतात.

संघराज्य भारताला भारतातील ऐक्य टिकवायचं असेल तर, भाषिक युनिफॉर्मिटीचा नाद सोडायला हवा. मागील अठ्ठ्यात्तर वर्षात भारताची ही गरज एतद्देशीय सरकारला समजत नसेल तर शके १९४७ हे वर्ष भाषिक स्वातंत्र्यासाठी लढण्यासाठीच आहे समजा! 

ही भाषा माझी, ती भाषा त्याची इथून सुरू झालेला प्रवास जेव्हा सगळ्या भारतीय भाषा माझ्या आहेत इथवर नेऊन पोहचवतो तेव्हा आपण खरे भारतीय होतो. आधी #मातृभाषा उत्तम असेल तरच ही आदर्श उदात्तता संभवते. 

महाराष्ट्र नेहमीच उदात्त राहिला. त्या बदल्यात महाराष्ट्राला काय मिळाले? गुजरात, मध्यप्रदेश, कर्नाटक मधील मराठी माध्यमाच्या शाळा बंद पाडल्या गेल्या. महाराष्ट्रात अजूनही गुजराती, कन्नड आणि हिंदी माध्यमाच्या शाळा आहेत. का? उदात्तता! 
(गुजरात-महाराष्ट्र सीमेवरील, बेळगाव, महाराष्ट्र-कर्नाटक सीमेवरील, जबलपुर, सगर, उज्जैन (म.प्र.) मधील मराठी माध्यमाच्या शाळा स्वातंत्र्योत्तर काळात तेथील राज्यसरकारने सक्तीने बंद केल्या. तिथे झालेली मराठीची गळचेपी महाराष्ट्राने मुकेपणाने सहन केली.) 
आणि बदल्यात महाराष्ट्राला काय मिळते? मराठीची हेटाळणी? हे का सहन करावे?

-उदयपुर, राजस्थान
17 एप्रिल
हिंदी भाषा अहिंदी राज्यांवर लादल्यामुळे भारताचे पाकिस्तान व बांगलादेशासारखे तुकडे होतील हे वास्तव आहे. 
प्रत्येक भाषेला समान महत्त्व देऊन विविधतेने नटलेल्या भारतीय परंपरांचा पाईक होणारे भारतीय घडवूयात...
#NEP2020 च्या चुकीच्या अंमल बजावणीचा कडाडून विरोध करूयात. महाराष्ट्रात पहिली ते पाचवी मराठी अनिवार्य आणि इतर दोन्ही भाषा स्वीकारण्याचे स्वातंत्र्य पालकांना आणि शाळेला असायला हवे.
केंद्र सरकार महाराष्ट्रावर हिंदी लादत असेल तर महाराष्ट्राने संघराज्याचा भाग का असावे? 
गुरुदेव रविंद्रनाथ ठाकूरांनी म्हटले आहे - "एक भाषा लादल्याने युनिफाॅर्मिटी येईल, युनिटी (ऐक्य) ही निराळी संकल्पना आहे." 
आपण ऐक्य टिकवणारे, सर्व भारतीय भाषांचा आदर करणारे भारतीय घडवू... विविधतेने नटलेल्या देशात युनिफॉर्मिटी आणाल तर देश विभंगेल, भाषिक कटुता भाषिक कुरघोडीने सहज निपजेल...
हिंदी लादण्यासाठी सर्वतः होणारे प्रयत्न निषेधार्ह आहेत.
कुठल्याही इयत्तेत मराठी सक्तीची असल्याचा उल्लेख नाही. हिंदी व इंग्रजी सक्तीची असल्याचे स्पष्ट नमूद. 
दक्षिणभारतीय भाषा, संस्कृत त्रिभाषा सूत्रातून हद्दपार. 
पूर्वग्रहदूषित नवीन शैक्षणिक धोरणाच्या अंमलबजावणीचा तीव्र निषेध!

हे हिंदी लादण्या विरोधात भाषिक स्वातंत्र्याचे युद्ध तमीळनाडू प्रमाणे महाराष्ट्राला तथाकथित स्वतंत्र भारतापासून दूर होण्याची नांदी ठरू नये हीच भारतमातेचरणी प्रार्थना.
जय मराठी, जय महाराष्ट्र
वंदे मातरम्

18 एप्रिल
संघ वाले, संस्कृत भारती वाले,
विवेकानंद केंद्र वाले, Vivek saptahik - साप्ताहिक विवेक वाले

हिंदी लादायच्या मुद्द्यावर मूग गिळून गप्प!

ह्या दिल्ली शासित भारतात आमच्या संस्कृतीचे स्वातंत्र्य आहेच कुठे?

वंदे मातरम् बोल, हिंदीची गुलामी सोड!

हिंदी लादा आणि भारताला तोडा...

21 एप्रिल
भ्याड आणि दुबळ्या वृत्तीच्या माननीय मुख्यमंत्र्यांनी हिंदी सक्तीने शिकवण्याचा निर्णय मागे घेतला. कुठलीही भाषा तिसरी भाषा म्हणून शिकता येईल असे स्पष्ट केले. मी अभिनंदन करणार नाही. भांडवलशाहीची फॅक्टरी म्हणून सुरू झालेल्या, इंग्रजी माध्यमाच्या शाळा बंद करण्याची धमक जेव्हा दाखवली जाईल तेव्हा खऱ्या अर्थाने नवीन शैक्षणिक धोरण 2020 चा विजय होईल.