या ख्रिस्ती वर्षात स्वतःला
घडवणारी एक जबाबदारी ऑफिसात निभावली. वार्षिक अहवाल लिहिण्याची वेळ आली तेव्हा
रूढी आणि नियम या विषयावर एक लेखच तयार झाला.
प्रश्न साधा होता - रुढी पाळाव्यात, विवेकाने वागावे की पथदर्शक नियम बनवावेत?
दोन्ही संकल्पनेतील भेद जाणून
घेतल्यावर, आता साम्य बघूयात.
सामूहिक कार्यात सातत्य आणण्यासाठी कार्यपद्धतीच्या धारणा रूढी आणि नियमांनी निश्चित केल्या जातात.
आमच्या संस्थेचं काम शून्यातून
उभं राहिलं. पाया आणि उद्देश परंपरागतच, पक्के होते. पण, तंत्रज्ञान
नवीन. त्यामुळे कार्यप्रणाली शून्यातून विकसित करावी लागणार होती. अनेक अनुभवांतून
नकळतपणे कामाच्या पद्धती, रूढी निर्माण होत होत्या. त्यात
सुसूत्रता असावी म्हणून नियम बनवले जात होतेच. पण, नियम
बनवण्यात सुसूत्रता नव्हती. किंबहुना त्याची गरज भासत नव्हती. कामाचा आवाका वाढू
लागला तश्या परस्पर विरुद्ध रूढी समोर येऊ लागल्या. रूढींच्या अहंकारांतून भांडणं
वाढली. कामाच्या वेगावर परिणाम होऊ लागला. ज्यांनी नियम बनवायचे, त्यांच्याच रूढींचे अहंकार नियमांच्या कामात अडथळा बनत होते. मग हट्ट धरून
बंड करावे लागले. नियम बनवण्यात सुसूत्रता आणली गेली. पूर्वग्रह न ठेवता नियम
बनवणे, सगळ्यांचे पूर्वग्रह-रूढी ऐकून घेत एक मार्ग काढणे
आणि ज्यांच्या पूर्वग्रहांना, अविवेकी रूढींना मोडलं गेलंय
त्यांचा रोष पचवणे ही प्रक्रिया स्वतःला घडवणारी होती.
ती कशी?
नियमांची पहिली संहिता
सगळ्यांसमोर ठेवली. ती स्वीकारणं कठीण जाणार होतं. सगळ्यांच्या कलेने त्यात बदल
करणं मला वेदना देत असे. सगळ्यांच्या सूचना ऐकून डोकं भंडावून जायचं. आपण केलेल्या
कामावर हातोडा मारला गेला की वाईट वाटायचंच. त्यातून काहीतरी अधिक खंबीर घडत होतं
असेल. हे मनाला समजवावं लागलं. मग मनाचं उत्तर यायचं, "समकृती
समकृती समकार्य…”
संहिता संस्कृतमधे होती. नवीन कार्यप्रणाली, तिही तंत्रज्ञानाचा अंतर्भाव असलेली; संस्कृतात लिहिण्यासाठी नवीन शब्द बनवावे लागणार होते, जुन्या शब्दांना नवीन अर्थ द्यावे लागणार होते. माझं संस्कृत नवीन शिक्षण पद्धतीतून घडलेलं. संहितेतील नवीन शब्दप्रयोगांवर निरुक्तशास्त्र आणि राजवाड्यांचा मोठा प्रभाव दिसत होता. तो परंपरागत विद्वानांना पटणे अशक्यच होते. स्वीकारार्ह संस्कृतसाठी पारंपारिक आणि आधुनिक दोन्ही संस्कार असलेली भाषा वापरणे गरजेचे होते. त्यासाठी गुरुकुलात शिकलेल्या एका विद्वानासोबत पंधरा दिवस रोज बैठका होतं. एकमेकांना कान पकडायला लवतील अश्या बैठका! वळवू तशी वळेल इतकी लवचिकता असलेल्या भाषेचा हा दुष्परिणामच होता. एका बैठकीत कुठल्याश्या शब्दावर मी अडून बसलो होतो. मी केलेल्या तर्क वितर्काने पारंपारिक विद्वानाच्या सहनशक्तीच्या मर्यादा ओलांडल्या असाव्यात. तो बैठकीची खोली सोडून जाऊ लागला. त्याला पुन्हा जागेवर बसावण्याचं कसब मला दाखवता आलं ते खाली उल्लेखिलेल्या शक्तींमुळेच.
ह्या प्रक्रियेत मी मराठी!
म्हणून, कोणीतरी मला उपहासाने आंबेडकर म्हटले. मी हे काम हाती घेण्यापूर्वी
ज्यांनी हे काम सांभाळले त्याही मराठीच होत्या. खरं तर, इतके
वर्ष मराठी लोकांनीच या कामी पुढाकार घ्यावा हे विशेषच नव्हते का! असं घडलं की,
आपसूकच एखाद्या समाजगटावर खार खाणारे जन्माला येतात. म्हणूनच ही
चेष्टा सुचली असावी. मला मात्र मराठी असल्याचा अभिमान वाटलाच, प्रोत्साहनही मिळाले आणि जबाबदारीची जाणीवही झाली. छत्रपती शिवाजी महाराज,
भारतरत्न डाॅ. बाबासाहेब आंबेडकर, लोकमान्य
टिळक यांचा वारसा लाभलेला मी एक! फाशीची शिक्षा मरेपर्यंत नसू शकते याची जाणीव
लोकमान्य टिळकांनी इंग्रजांना करून देत, असलेल्या
नियमांत स्पष्टता आणायला भाग पाडले. डाॅ बाबासाहेब आंबेडकरांनी भारत देशाला
संविधान दिलं. महाराजांनी स्वराज्यासाठी किती नियम बनवले असतील, अष्टप्रधानांच्या मसलतीत त्यांचे किती नियम बदलले असतील. रोज सकाळी केलं जाणारं महाराजांचं स्मरण महाराष्ट्रधर्माला अधिक बळावणारं
असतं आणि तेच बळ रोष पचवायच्या कामी येत होतं, बैठकीतून उठून
न जाण्यासाठी बळ देत होतं. छोट्या अपमानांनी नाराज होऊन कसं चाललं असतं?
सगळ्यांच्या सल्ल्यांचा
अंतर्भाव करत काही महिन्यांनी आमच्या कार्यप्रणालीची नियमावली तयार झाली. ती माझी
एकट्याची नव्हतीच. संस्थेची होती. नियमांची सवय होऊ लागली तशी भांडणं कमी झाली.
कामाचा वेग वाढला. रूढी कडक होण्या आधी त्यांच्यावर विवेक-अविवेकाचे संस्कार घडवून
त्यांचे काय करावे याचीही कार्यप्रणाली तयार झाली.
हा प्रवास खूप छान होता.
आमी बी घडलो तुमी बी घडा ना!
