मंगळवार, १३ जून, २०२३

अबोल दगड

अरावलीत फिरतांना इथे प्रेरणा देणारा इतिहासच नाही अशी खंत वाटली. प्रेरणा देणारी जाणीव म्हणजे इतिहास? कसा बरं तो? 

का फिरावं? तर, दगडांना बोलतं करण्यासाठी. शब्दान् अक्षरयितुं पाषाणम्। पण हे दगडच अचेतन असतील तर? 
नासदासीन्नो सदासीत्तदानीं ...
त्यावेळी सत् नव्हते असत् ही नव्हते म्हणणाऱ्या नासदीय सूक्तात पुढे, इच्छेतून रेतसकिरण हलला, अन् जगाची उत्पत्ती झाल्याचा सिद्धांत मांडला आहे. 
हे जे हलणं असतं, त्या जाणीवेतूनच इतिहास घडत असतो. स्वातंत्र्यासाठी घोड्यांच्या टापा सहन करणारी जमीन त्या ध्येयवादी हालचालीने पावन होत असते. रोजच्या हालचालीतलं ध्येयच इतिहास घडवत असतं. "Eventful आयुष्य जगता आलं पाहिजे" हे प्रबोधिनीतलं एक प्रेरक वाक्य. आयुष्य सगळेच जगतात. पण events इतिहास घडवतात. विचारातली आणि कार्यातली उदासीनता इतिहास कसा घडवणार? रोज काहीतरी नवीन सुचलं पाहिजे, कालच्यापेक्षा आज पुढे गेलं पाहिजे. हे चैतन्याचं लक्षण.

डोंबिवलीला इतिहास आहे का? शालिवाहन काळातले मानले गेलेले एखाद दोन शिलालेख सोडले तर, इंग्रजांनी रेल्वे रूळ टाकेपर्यंत कुठलीच ऐतिहासिक हालचाल घडल्याचे पुरावे डोंबिवलीत आढळून येत नाहीत. त्यामानाने गणेश घोळ, खिडकाळी, कल्याण बंदर, गांधारी हा डोंबिवली भोवतालचा परिसर इतिहासपूर्ण असल्याचे जाणवते. इतिहास नाही म्हणजे जीवन नव्हते का? तर, नाही! त्या जीवनात कुठलाही बदल नव्हता ऋतूंमागून ऋतू येत होते आणि जात होते. असेल हरी तर देईल खाटल्यावरी ही गत!

बदल नित्य असतो- प्रवाही, चैतन्यमय जीवनासाठी. औदासीन्यात बदल संभवणे अशक्यच.राजस्थान मागास वाटतो तो उदासीनतेने. जुनी मातीची घरं, जाती व्यवस्थेने जखडलेला समाज, बलाढ्यांसमोर झुकण्याची रीत, किती शतके आणि पिढ्या तसेच सुरू असले असेल ह्या राजस्थानातल्या अरावलीत... इथे फिरतांना ते औदासीन्य आणि इतिहासरहितपण ठळकपणे जाणवले. रिकामी, दारं खिडक्या नसलेली मातीची घरं पाहून आश्चर्य वाटलं. मग लक्षात आलं ही मेंढपाळांच्या कबिल्यांची निवासस्थानं. 
  मेंढपाळ पाहिले की मला आठवतो "द अल्केमिस्ट" पुस्तकातला सॅन्तियॅगो - नायकाच्या भूमिकेत असलेला मेंढपाळ आठवतो. तो मेंढपाळ नायक होऊ शकला; मेंढपाळाच्या चौकटीत न बसणाऱ्या स्वप्नांनी, नव्या विचारांनी. तो इतर मेंढपाळांपासून वेगळा ठरला. तसेच होते जोनाथन सीगल चे. समुद्रपक्षी-जोनाथन! ऊंचच ऊंच भरारी घेत, शारीरिक, मानसिक क्षमता ओलांडत अजरामर ठरला!

 मौर्य-सातवाहन-चालुक्यांपासून ते अगदी पानसरे-भिड्यांपर्यंत महाराष्ट्रातली वैचारिक हालचाल थांबल्याचे कुठेही दिसत नाही. हेमाद्रिच्या लिपीनिर्मितीच्या हालचालीतून निर्माण झालेला मराठा, छत्रपती शिवाजीरायांच्या राज्यव्यवहारकोशाने गरजता राहिला, सावरकरांच्या शब्दनिर्मितीने निनादत राहिला, शाहीरांच्या डफ-टुणटुणीतून गात राहिला. हा इतिहास पावलोपावली बोलता यावा इतकी महाराष्ट्रातली माती जीवंत आहे.
महाराष्ट्रापासून दूर राहिल्याशिवाय याचा प्रत्यय कसा येणार? निसर्गाचं प्रवाही नित्यत्व विश्वव्यापून आहे. माणसाच्या प्रवाही नित्यत्वाला जोड लागते विचारांची, विवेकाची, कणा असल्याच्या जाणीवेची. इतिहास रोज घडवता येतो. 
अरावलीच्या कुशीत बसून सह्याद्रीचे वारे आठवावेसे वाटतात इथल्या अबोल दगडांमुळेच!
#सायकलोपासना #cyclopasana

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा