शनिवार, २७ मे, २०२३

अजूनही ती शिकवते आहे...

चक्री थांबक अडकला! चाक पुढेही जाईना मागेही येईना. पर्यटकांचा नाविन्यपूर्ण उत्साह जिथे ओसंडून वाहतो अश्या गणगौर घाटावर जात असतांना म्हणजे जगदीश मंदिरापुढचा उतार उतरतांना हा प्रसंग घडला. आम्ही जात होतो पिछोलाच्या पलिकडल्या तीरावर. पण तळ ठोकला गणगौरघाटावरच.
जगदीश, मेहेरालोक आणि मी, आमच्या सायकलींची काहीना काही कामं निघाली होती. ती करायला बापू बाजारातले पंजाब सायकलचे दुकान गाठले. कामं आटोपली. माझ्या थांबकाची तार बदलायची होती. ती बदलली. चिकित्सकाने एक नट हलत नसल्याचे दाखवून दिले. मी तेव्हा त्याला तेला विषयी विचारलं. ते तेल त्याच्या गावीही नव्हतं. पण थांबक नीट लागूही लागला म्हणन बघू नंतर म्हणत सोडून दिलं... आणि नंतर म्हणजे लगेच असणार होतं हे कुणी पाहिलं होतं? अचानक एका उतारवार चाक हालेच ना. माझ्याकडच्या अवजारांनी थांबक काढून टाकायचा प्रयत्न केला. दातखीळ बसावी तशी चक्री थांबकाच्या चकत्यांमधे अडकली होती आणि त्याबरोबर चाकही अडकलं होतं. 
मी दोघांनाही घरी जायला सांगितलं. कारण इतक्या गर्दीत आपल्यासाठी कोणी तरी तात्कळत थांबल्याचं दडपण मला नको होतं. 
  चढ-उतार, छोट्या गल्ल्या, बेशिस्त वाहतूक, भोचकपणा भरलेले बिनकामाचे रिकामटेकडे स्थानिक रहिवासी यांमधून वाट काढत हार्डवेअरचे दुकान शोधत सायकलचा मागचा भाग हातात उचलून किलोमीटरभर पायपीट केली. 
मधे मधे थांबत होतोच. एका पाणपोईपाशी थांबलो. तेव्हा लक्षात आलं, तास-दीडतासापूर्वी ऊसाचा रस पिल्यानंतर काहीच पोटात गेलेलं नव्हतं. इथल्या कोरड्या ऊन्हात चक्कर येऊन पडल्या शिवाय तहान लागल्याचं समजत नाही. लिटरभर पाणी पिलं. एक रिक्षेवाला त्याच वेळी तिथे पाण्याच्या बाटल्या भरायला थांबला आणि मी पाणी पिण्या आधी त्याने बाटली नळाखाली धरून नळ आडवला. मला बाटलीभर पाणी दिलं. म्हणून तो लिटरभराचा हिशोब लागला. त्याच्याकडे जवळच्या दुकानाची चौकशी केली. चौकात पोहचल्या शिवाय माझ्या कामाचं एकही दुकान लागणार नव्हतं. ही बोळ पर्यटकांसाठी आकर्षक वस्तू मिळतील अशी होती. नंतर सोनारांची गल्ली मग चौकात कापडांची दुकानं आणि त्याच्या पलिकडे लोहार वस्तीत, चढावर, शनिमंदिराच्या गल्लीत हार्डवेअर! जुनं उदयपुर टेकड्यांवर वसलेलं आहे. दोन टेकड्यांमधे एक पोल म्हणजे दरवाजा असणारा चौक आहे. मला जायचं होत हाथी पोलला. 
अनेक महिने-वर्ष न फिरवल्याने काही नट बोल्ट घट्ट होऊन बसले आहेत. वंगण जळून ऑक्सिडेशन झाल्याचा परिणाम.  असा प्रसंग उद्भल्यावरच ते हे लक्षात आणून देतात. ही समस्या त्यातलीच असावी. 30, 45, 66 यांपैकी कुठलंसं WD / Zorik वगैरे तेल मिळालं तर अडकलेला थांबक सुटू शकेल अशी शक्यता रचितने फोन वर बोलून दाखवली. अश्यावेळी रचित आठवायचं कारण - त्याने केटू सायकल्स बरोबर लोणावळा घाट चढायचा सराव केलेला आहे. त्या अनुभवांमुळे अश्या तांत्रिक बाबींविषयी त्याने ऐकलेलं आहे. ह्या साऱ्या गोष्टी प्रत्यक्ष अनुभवातूनच शिकता येतात. अभिषेक कोयंडेने मोहीमांमधून घेतलेले अनुभव रचितने ऐकले आहेत. म्हणून त्याला फोन केला. चक्री थांबक अडकून चाक जाम होते हे यापूर्वी फक्त ऐकले होते. आज माझ्या सायकलवर घडले होते!

हाथी पोलला एका भल्या दुकानादाराशी बोलून सायकल तिथे ठेवली. "पाच नाही दहा मिनीटांनंतर ये. पण येऊन घेऊन जा नाहीतर इथेच पडून राहिल सायकल" त्याने मला भीती घातली. त्याची काळजी रास्त होती. मी सायकल घ्यायला परत आलोच नाही तर? 
 तेल शोधायला गल्ली फिरू लागलो. आज तेल शनिदेवावर चढत आसल्याने शनिवारी हार्डवेअरची गल्ली बंद असल्याचं समजलं. तसं घडलं तर बापू बाजारापर्यंत किमान दीड किलोमीटरचा रस्ता सायकला चुकीच्या प्रकारे मिरवत कापावा लागणार होता. एक दुकान चुकून उघडं होतं त्याच्यकडे AM 70 सापडलं. आनंदात तेल घेऊन बाहेर पडलो. शनिमंदिरा बाहेरची रांग पाहून आज माझा शनिदेव सायकलचा थांबक आहे अश्या विचारात असतांना शिरस्त्राण दुकानात विसरल्याचं लक्षात आलं. पुन्हा चढ चढून पायपीट करून आलो. 
ते तेल फवारता, पाचव्या सेकंदाला थांबक मोकळा झाला. माझा जीव भांड्यात पडला. चाक फिरलं. थांबक काढून टाकला. माझ्या चेहऱ्यावरचा आनंद पाहून दुकानदार काकांनी चौकशी केली. हात धुवायला रिनची वडी आणि पाणी दिलं. आता पुन्हा दुकानात जाऊन काम करवून घेणे नको. आपण जितकं जमू शकेल तितकं, जेवढं जमेल तेवढं काम स्वतःहून केलं की परिणामांची जबाबदारी स्वतःवर घेता येते. दुसऱ्याने केलेल्या कामच्या वाईट परिणामांना मनस्ताप होतो. आता मागचा थांबक नव्हता. पुढच्या थांबकाच्या जीवावर मोकळी हवा घ्यायला# फतेहसागर गाठला. #सायकलोपासना #उदयपुर