शुक्रवार, ३१ डिसेंबर, २०२१

दैनंदिनी

ख्रि. ३१.१२.२०२१

दैनंदिनी लेखनाची कला भारतीय भाषांना इंग्रजांनी शिकवली. मनाला मोकळेपणाने गद्य शब्दात अभिव्यक्त करता येऊ शकतं- यावर भारतीयांना विचार करायलाही वातावरण मिळालं नसावं. भारतीय समाज गर्दीत रमणारा. व्यक्तिगत स्वयंकेंद्रितपणा इथे दुर्मीळ. तो दुष्टप्रवृत्तीतच दिसत असावा. सद्प्रवृत्तीत त्याचं प्रकटीकरण काव्य आणि तत्वज्ञानातच झालं.  त्यामुळे इथे लिखाण झालं ते परार्थासाठी. कल्हणाची राजतरंगिणी हा एकमेव अपवाद वगळता इतिहासाला थेट पुरून उरतील असे दैनंदिनीत अभिव्यक्त झाालेले साहित्य भारतात दुर्लभच.


पुलंचं 'वंगचित्रे' वाचून झाल्यावर 'मुक्काम शांतिनिकेतन' वाचायला घेतलं. चांगली डायरी वाचल्याशिवाय आपणही तसा विचार करू शकतो आणि आपल्यापुरता का होईना मांडू शकतो असं वाटू शकत नाही. आजवर विचार करून मांडण्याचा प्रयत्न नकळतपणे झालाही असेल पण, त्या लेखनाला दैनंदिनीत स्थान आहे, लेखात नाही. हे सांगायचं काम देशपांड्यांनी केलं. देशपांड्यांनी हा प्रयोग वापरण्याचे कारण सध्या मी कॉ. भारती ऊर्फ सुनीता ठाकूर-देशपांडे यांचं 'आहे मनोहर तरी' वाचतोय.

त्या पुस्तकाविषयी सांगायचं तर, ते एक वैचारिक आहे, आयुष्याच्या उत्तरार्धात लिहीलं गेलेलं... मी रोज दहा-वीस पानच वाचतोय. संस्कृतचा "अंधभक्त अभ्यासक" नसल्याने,  कृतींमधून बाईंनी मांडलेल्या द्वंद्वात मीही अनेकदा अडकत असतो, एखाद्या बाजूला नकळत झुकतही असतो. तसल्याच कृती-परिणामांची सारासार विवेकी चर्चा आगदी ओघवत्या शैलीत गप्पा मारावी तशी पुस्तकात येते. परिणामांची अनुभवी गाठोडी बाई आपल्या समोर मोकळ्या करत असतात आणि महाजन बनण्यासाठीच्या स्वतंत्र मार्गाचा उपदेश करत असतात...


संभषणावेळी होणाऱ्या शाब्दिक व्यापाराविषयी त्या लिहीतात- प्रत्यक्ष संभाषणात आपण जी प्रत्युत्तरे करतो ती तशी विचारपूर्वक नसतातच. कधी विनोद, कधी तात्कालिक बचाव, कधी कुरघोडी तर कधी संभाषणाची निरर्थक हौस वगैरे अनेक पातळ्यांवर आपण बोलत राहतो.   दैनंदिनीत मात्र -काठावर बसून तिऱ्हाइताच्या दृष्टीने पाहण्याच्या- प्रयत्नात शब्द स्फुरतात. त्यात आपण स्वतः ‘स्वतः’ राहत नसल्याने संकोचाचा अडथळाही नसतो. तो स्वतःशीच निर्भीडपणे चाललेला मौनसंवाद असतो- स्वतःविषयी, कृत्यांविषयी, वातावरणाविषयी, निसर्गाविषयी, सारासार, सदसद्विवेक वगैरे बुद्धिने विचार करून मांडलेला.

स्वतः विषयी विचार कसा करावा हे आहे मनोहर तरी मधून शिकता येऊ शकतं. तर, आपल्या सभोवतालच्या कुठल्या गोष्टी दैनंदिनीत असाव्यात हे पुलंची दैनंदिनी वाचून समजतं.

वरील दोन्ही लेखकांमुळेच २०२२ ख्रिस्ताब्दात नियमित दैनंदिनी लिहावी असं स्वतःहून वाटू लागलं आहे. म्हणून तोच संकल्प! असे जाहीर करतो. दरम्यान, लिहीण्याचा सराव वर्षभरात यापूर्वी केला आहे. त्यालाही दैनंदिनी म्हणता येऊ शकते. त्यातील एका दिवसाचे पान दिनांक न छापता पुढील भागात सगळ्यांसाठी खुले करत आहे...


मंगळवार, १४ डिसेंबर, २०२१

झिम्मा

झिम्मा चित्रपटाला माझ्याकडून
तीन तारे!
एका उत्तम कथावस्तूचे, विषयाचे दिग्दर्शकाने, संगीत संयोजकाने तीनतेरा वाजवल्यामुळे पाचातून उणे दोन.
हा संपूर्ण चित्रपट केवळ अभिनेता आणि अभिनेत्रींच्या उत्तम अभिनयाने उचलून धरला आहे. म्हणून नट आणि नटींना अभिनयासाठी पाचपैकी पाच तारे!
का बघावा? अभिनय आणि विषयासाठी, हासण्यासाठी!
नव्या दिग्दर्शकाला प्रोत्साहन देण्यासाठी...

विषय तसा गंभीर आहे, प्रत्येक भारतीय स्त्रीच्या मनाला भिडणारा आहे, सहृदय पुरुषांना विचार करायला लावणारा आहे, समाज घडवणारा आहे, महिलांना समजून घेणारा आहे, अभिनेत्रींच्या माध्यमांतून विविध वयोगटातल्या, विविध सांसारिक पार्श्वभूमी असलेल्या महिलांचे मन बोलतं करणारा आहे. म्हणून नाव झिम्मा! अर्थातच हसत खेळत एकमेकींचे मनं उलगडणारा पारंपारिक खेळ.

कथा सुरूच होते विविध भारतीय घरांमधून. तिथून इंग्लंडला पोहचेपर्यंतचा प्रवास प्रेक्षकांना खिळवून ठेवतो, चित्रपटाच्या परमोच्च बिंदूपर्यंत घेऊन जातो.
त्यानंतरचा चित्रपट इंग्लंडदर्शन घडवतो. तिथे पोहचल्यावर हास्य-करुण-वीर रसांमध्ये कथा गुंफली आहे.
हास्य रसाला साद घालायच्या प्रयत्नात अनेक ठिकाणी दिग्दर्शकाकडून विषय हातचा सुटला आहे किंवा गंभीरता दाखवण्याच्या नादात रसभंग तरी केला आहे.

चित्रपटाचा शेवट वीररसाने होतो. व्हाॅट्सअॅप संवादांचा खूप परिणामकारक उपयोग दिग्दर्शकाने इथे केला आहे.  मनाची धीटाई, दृढनिश्चयता दाखवण्यात एकूणच "बरे" यश आले आहे. मध्ये अनेकदा विषय सुटल्याने शेवटी- पूर्णतेच्या पट्टीवर वीरतेला पाऊण न्याय देता आला आहे.

 जिथे विषय हातचा सुटला ते प्रसंग वेगळ्या प्रकारे, वेगळी दृष्य दाखवत अधिक खुलवता आले असते. प्रेक्षकांना समरस करवून घेण्यात कुठेतरी दिग्दर्शक मागे पडला आहे. "बघतोस काय मुजरा कर" नंतर दिग्दर्शकाचा दुसराच चित्रपट असल्याने बऱ्याच चुका क्षम्य आहेत. त्यामानाने त्याने खूप मोठी उडी मारली आहे.

पार्श्वसंगीताचे काम -दृश्य चित्रांबरोबर अदृष्ट मानवी भावना प्रेक्षकांच्या मनाच्या गाभ्यापर्यंत पोहचवण्याचे असते.  चित्रपटातील अनेक मूक भांगांना अभिनायाने खुलवले खरे, पण त्याबरोबर संगीत असते तर तेच मनाला भिडले असते, डोळे पाणावून सोडले असते. ते राहून गेले आहे.
संपूर्ण चित्रपटात सतार, बासरी इत्यादि भारतीय वाद्यांचे तुकडे आहेत. पण, ते विषयाला सुसंगत असतीलच याचा काही नेम नाही.
पारंपारिक झिम्मा काव्य साहित्यला आधुनिक साद चित्रपटाच्या माध्यमातून घालता आली असती. पण त्याजागी आधुनिक गीत प्रकार टाकायचा अट्टहास केलेला दिसतो.

एकूण चित्रपट चित्रपटगृहात जाऊन बघण्यासारखाच आहे. कारण, स्त्रीवर्गाच्या मनाचा थारा घेण्याचे, पुरुषवर्गाचे कान टोचण्याचे, पॅडविषयी खुलेपणाने बोलून जनजागृतीचे काम विषयाने आणि अभिनयाने हसवत हसवत-गंभीर बनवत केले आहे.
तेव्हा चित्रपटगृहात जाऊन चित्रपट नक्की बघा.
-गंधार

मंगळवार, २३ नोव्हेंबर, २०२१

तोट्यातली नोकरी = राजीनामा


तोट्यातली नोकरी = राजीनामा

गरजा आणि पुरवठा, श्रम आणि मोबदला, वेळ आणि किंमत, कर्म आणि धर्म-
ह्या द्वंद्वांवर योग साधण्याचा सातत्याने केलेला प्रयत्न अयशस्वी ठरला. शेवटी, तोट्यातली नोकरी सोडावी लागली.
दीड वर्ष ज्या संस्थेसाठी स्वतःची यांत्रिक उपकरणं (मोबाईल, लॅपटाॅप, हेडफोन, इंटरनेट) वापरत निरपेक्षपणे काम केलं. त्यातील एखादं उपकरण आता कधीही बंद पडलं तर,
नवीन घेण्याचं आर्थिक सामर्थ्य जी संस्था देऊ शकत नाही, पाठीशी उभी राहू शकत नाही,
त्या संस्थेसाठी केलेली नोकरी तोट्यातली आहे असे समजावे.
दीड वर्ष  सातत्याने वेगळेपणा दाखवणारे, नाविन्यपूर्ण उपक्रम केले,
त्या कष्टाची व गुणवत्तेची किंमत संस्थेला समजत नसेल तर
त्या संस्थेसाठीची नोकरी तोट्यातली आहे असे समजावे.

शाळेत राजीनामा टाकतंना, "तुमचा धर्म कुठे गेला होता?" असा विचारलेला प्रश्न संस्थानिकांना अपमानास्पद वाटला.
"हितं मनोहारि च दुर्लभं वचः" (हिताचे आणि मनाला आनंद देणारे शब्द एकाच वेळी मिळणे दुर्लभ आहेत.) मग कमी खर्चात चांगल्या कामाचा आनंद कसा मिळेल?  स्कल कॅण्डीच्या भावात बोसची अपेक्षा कश्याला?
चांगला शिक्षक टिकवायचा असेल तर नवऱ्यावर अवलंबून असलेल्या गृहिणीचा हातखर्च भागावा इतका तुटपुंजा पगार कसा चालेल?
नुस्ती पाठ थोपटावून तोंडभर स्तुती उपयोगाची नाही. "तुरीयं हि वाचो मनुष्या वदन्ति" (मनुष्य तुऱ्या सारखी उडती आणि दिखाऊ वैखरी वाणी बोलतात.)
भारतभ्रमणानंतर हा अनुभव रोजचाच! त्या शब्दांना न भुलणे परिस्थितींनी शिकवले.

खरं तर, निसर्ग देवतांनीही तीनही ऋतूंमध्ये तोट्याचे संकेत दिले. अनपेक्षितपणे तीन ऋतूंत तीनदा चष्मे बदलावे लागले, आयुष्यात पहिल्यांदाच! म्हणूनच ते विशेष संकेत. उन्हाळ्यात पेपर तपासतांना नंबर वाढला म्हणून, पावसाळ्यात वरुणदेवतेने चष्मा उडवून नेला म्हणून आणि हिवाळ्यात न समजता एकाएकी चष्मा नाहीसा झाला म्हणून. मला हे मक्तूब वाटलं.

सर्वसामान्य प्राथमिक गरजा मिटवणं सोडलं तर, ह्या नोकरी अंती माझ्या हातात फारसं काही राहिलं नाही. संस्थेने शिक्षकाचे राहाणीमान टिकवून ठेवले तर शिक्षक शाळेची गुणवत्ता टिकवू शकतो इतकं साधं गणित संस्थेला समजलं नाही. ही आश्चर्याची गोष्ट आहे. फी न भरणाऱ्या पालकांनाही ते समजलेलं नसतंच!
असो,



राजिनाम्याने माझा अहंकार सुखावला आणि संस्थेला परवडणारा दुसरा शिक्षक मिळाला, याबद्दल आनंदच आहे.
मुलांना सोडतांना वाईट वाटतं. पण, ह्या भांडवलशाही स्वीकारलेल्या देशात व्यवहार कुणालाही सुटत नाही हे सातत्याने अनुभवाला येतं. शाळा पालकांना दुसरी शाळा शोधायला सांगू शकत नाही आणि पालक अंथरूण बघून पाय पसरवत नाहीत, सरकारही शिक्षणात राजकारण शोधतं ही दुर्दैवाची गोष्ट आहे.

 दर वर्षी एक विषय "स्वाध्यायप्रवचनाभ्यां न प्रमदितव्यम्" या व्रताला धरून एका जिज्ञासू विद्यार्थ्याला पैश्याचा गंधही न लावता शिकवतो. तो वेळ माझ्यासाठी भांडवलशाहीमुक्त आनंदी अध्ययनाचा असतो. बरं वाटतं. कारण पैश्याने लादलेल्या अहंकार आणि स्वाभिमाना पलिकडचा तो वर्ग असतो. स्वतःचा अभ्यास विस्मरणात न जावा म्हणून घेतलेला. कोणालाही पैश्याने विकत घेता येत नाही. आर्थार्जनासाठी अस्तित्वात आलेल्या संस्थांनी कुणाच्याही गुणवत्तेचा अनादर न करता हात खुले ठेवावेत इतक्याच अपेक्षेने मी संस्थेचं छत्र शोधत असतो. पण संस्थाच जेव्हा तोट्यावर उभी असते, दोन हात (देणारे आणि घेणारे) खुले सोडत नाही तेव्हा, तिथे फार काळ टिकता येत नाही.

भारत गरीब देश नाही. हे ओडिशा-अरुणाचलातल्या श्रीमंतीने दाखवलं. गरिबी आपण स्वतःवर लादून घेतो. संस्थानिकांनी कष्टाला न दिलेल्या किंमतीने आर्थिक दरी मात्र निर्माण केली जाते, प्रत्येक क्षेत्रात. मी त्या दरीत पडू नये म्हणून हा राजीनामा!

शनिवार, २५ सप्टेंबर, २०२१

माझी गति

मी सायकलचं काम करण्यात मूर्ख आहे. असा माझा ठाम विश्वास होता. माझ्या बरोबर सायक्लवणाऱ्यांनी माझी गती बघून त्या 'ढ'पणाचा स्वीकार केला होता. आणि माझ्या भारतभ्रमणाच्या पूर्वतयारीत तांत्रिक काम, (mechanical work) nut-bolt वगैरेंची कामं  मला करायला न लावता त्यांनीच परस्पर करून टाकली होती. दिवाळीच्या सुट्टीत दुकानात सायकल ठेऊन मी शिवथरघळीत निघून गेलो होतो. "सायकलचं काम करायला कोणी तरी आहे, आपण कशाला डोकं घालायचं?" इतकाच विचार. दुकानदाराने सायकलकडे दुर्लक्ष केल्यावर ऐनवेळी मित्रांनीच धावपळ करून कामं पूर्ण केली.

पण इतर वेळी घरातून बाहेर पडल्यावर नकळतच मला माझ्या  सायकलची कामं एकट्याने करावी लागली होती. याची मला जाणीव सुद्धा नव्हती.

सिक्कीमला जातांना- सिलिगूडीच्या पुढे एक घाट चढतांना-  केरळहून घरी न सांगता आलेला एक सायकलस्वार सामानाचं वजन सांभाळत काहीतरी डागडूजी करतांना रस्त्यात थांबलेला दिसला.
मी थांबून विचारपूस केली. माझं 16,000 किमी. सायक्लवून झालं होतं! तो मात्र पहिल्यांदाच पर-राज्यामध्ये स्वतःचे पहिले 100 किमी पूर्ण करतांना झगडत होता.
मी mechanical works मध्ये कितीही मंद असलो तरी, आता हा 16,000 चा आकडा स्वतःत अहंकार निर्माण करत होता. "आता इतकं साधं काम जमलं नाही तर तुझ्या 16,000 किमी सायक्लवण्याचा काय उपयोग?" अहंकारी मनाने स्वतःला विचारलं. आणि खरतर, मी ते त्याच्या सायकलचं काम अगदी लीलया करून टाकलं.

नंतर स्वतःशीच हसलो. "च्यायला! आपल्याला हे कसं जमलं?" "मी मूर्ख, मी मंद! कोणी ठरवलं?" मीच! आणि मित्रांवर परावलंबी झालो. "मी केलेलं काम माझ्या मित्रांनी बघितलं असतं तर ते आवाक् झाले नसते का?" त्या क्षणी त्यांच्या आठवणीने मन गद्गदून गेलं होतं.

त्या वेळी प्रबोधिनीत शिकवलेलं आणि अनेकदा म्हटलेलं, गुणगूणलेलं गाणं आठवलं-

निद्रेमधूनि जागा होता नवाच मी मजला दिसतो
उलगडणारी दूनिया भोवती मी मध्ये माझा नसतो
साखर झोपेमधली हसरी स्वप्नमालिका अवतरते
कठोर, अवघड सारे सरूनि आसमंत होती हिरवे॥

क्षितीज नवे मज सतत बोलवी साथीला सन्मित्र हवे...

कोणीही कश्यातही मूर्ख नसतं. प्रत्येकाची आकलन गती, विविधविषयांसाठीची कमी जास्त असू शकते. प्रत्येकाने आपापला वेळ घ्यावा. आणि इतरांनाही घेऊ द्यावा.

मुलांना प्रत्येक परीक्षेत शंभारापैकी शंभर मार्क मिळावेत यासाठी पालक प्रयत्नांची पराकाष्ठा करत मुलं आणि शिक्षकांमागे लागलेले दिसतात. संस्कृतच्या बाबतीत तर, कमी मार्क पडले की हिंदी घेण्याचे सल्ले दिले जातात. समोर येणाऱ्या परिस्थितींबरोबर माझ्या हातांना तांत्रिक कामांची सवय होऊ शकली. तशीच, थोडे प्रयत्न घेऊन- दिलेला अभ्यास पूर्ण करून, आपल्या बुद्धीला एखाद्या विषयाच्या अभ्यासाची गोडी आपण लाऊ शकणार नाही का? 
वेळ लागेल म्हणून प्रयत्न का सोडावेत?

नववीच्या पुस्तकात शिकतो तेच-
प्रारभ्यते न खलु विघ्नभयेन नीचैः
प्रारभ्य विघ्नविहता विरमन्ति मध्याः।
विघ्नैः पुनः पुनरपि प्रतिहन्यमानाः
प्रारब्धमुत्तमजना न परित्यजन्ति॥

-सम्प्रिः।

शनिवार, ४ सप्टेंबर, २०२१

शिक्षक-पोळा




संस्थेचा शिक्षक-पोळा

शिक्षक होण्यासारखं दुसरं सुख नाही. विशेष करून, आपण ठरवून शिक्षकी पेशा स्वीकारला असेल, हतबलता म्हणून तो आपल्या नशिबी आला नसेल तर,  प्रत्येक वेळी मुलांबरोबर स्वतः घडत जाण्याचा अनुभव शिक्षकाला सगळ्या समस्यांवर मात करायला मदत करतो.

रोज काहीतरी नवीन सुचल्यामुळे आयुष्याची सृजनशीलता अखंडित राहते. प्रत्येक विद्यार्थ्याच्या यशातून होणारा आनंद आयुष्याची संजीवनी ठरत असतो. दुसरीकडे प्रत्येक विद्यार्थ्याच्या अपयशातून होणारे दुःख शिक्षकाला स्वतःच्या चुका दाखवत मार्गदर्शक म्हणून घडवत राहतं. वर्गात मुलांनी केलेल्या चेष्टा मस्करीचा आनंद घेत वयाच्या कुठल्याही टप्प्यावर शिक्षकाला स्वतःतलं बाल्य चिरतरूण ठेवता येतं. प्रत्येक विद्यार्थी माणूस म्हणून वेगळा असल्याचा स्वीकार शिक्षकाला करावा लागतो. आपल्याकडून घडत असलेली भविष्यातील राष्ट्रिय संपत्ती म्हणून त्याच्याशी  वर्गात "आदर्शवादी" संवाद साधावा लागतो. तोच शिक्षकाच्या अंतःकरणाला बाहेरील विद्रूप वास्तवाची तीव्रतेने जाणीव करून देतो, मनातल्या मनातच!

चितळे मास्तर या आनंदाच्या जोरावर जगत असले तरी, त्यांना वास्तवाची जाणीव नव्हती का? की, अव्यावहारिक पणाचं झापड ह्या जडणघडणीच्या अनुभवानेच त्यांना लावलं होतं?

 

परंपरागत सुप्रतिष्ठित पांढरपेशी समजला जाणारा शिक्षकी पेशा शिक्षणातील भांडवलशाही वृत्तीने लाचार झाला आहे, पोखरून टाकला गेला आहे. शाळा शिक्षक-संचालितते कडून संस्था-संचालित झाल्यापासून शिक्षक हा संस्थेला पैसा मिळवून देणारा नंदीबैल झाला आहे. शेतकऱ्यासाठी बैल असतो तसाच! या वर्षी सोमवारी बैल पोळा आणि रविवारी- पाच सप्टेंबरला शिक्षक दिन म्हणजेच शिक्षण संस्थांसाठीचा "शिक्षक पोळा" आल्याने शिक्षकी पेशातल्या ह्या वास्तवावर हा दृष्टिक्षेप.-

शिक्षक वर्षभर शिकवत असतो. शिक्षणसंस्था पालकांकडून भरमसाठ फिया घेतात. पण, शिक्षकाला पगार मात्र नाममात्रच असतो. काही संस्था भरपूर पगार देतात पण शिकवण्याचं स्वातंत्र्य देत नाहीत... म्हणजे, ठरवलेली वाक्यच बोलायची. त्यापेक्षा एकही वेगळा शब्द उच्चारायचा नाही, वगैरे! अशी बंधनं असतात शिक्षकांवर. उत्तम पगार असलेले शिक्षक, विद्यार्थ्याच्या शैक्षणिक विकासोपयोगी कामांव्यतिरिक्त कारकुनी कामातच अधिक जुंपले जातात. "रेकाॅर्ड्स" च्या नावाखाली असंख्य बिनडोक कामं शिक्षकावर लादली जातात. शिक्षकाच्या यांत्रीकरणाची पायाभरण बी.एड सारख्या असृजनशील अभ्यासक्रमात केली जाते. बाकी काहीच करता आलं नाही म्हणून केवळ उदरनिर्वाहासाठी शिक्षकी पेशा स्वीकारणारे शिक्षक जी.आर.च्या आधारे चालत विद्यार्थ्याचा विचार न करता असृजनशील यंत्रमानवासारखे काम करतात. त्यावरच संस्थांचे निभावते. रेकाॅर्ड्सच्या अधारे प्रमाणपत्र मिळवणं. त्यासाठी खोट्या दिखावू उपक्रमांना जन्माला घालणं. आणि "उत्तमतेचा ठसा" स्वतःवर लावून घेणं. त्या आधारे विद्यार्थी संख्या वाढवत शाळा "मोठी" करणं. अनुदानादि सरकारी सोयी अथवा सवलती मिळवणं, दिखाऊ प्रकल्पांसाठी अर्थसाहाय्य मिळवणं. आणि त्या सगळ्यासाठी लागणाऱ्या कामात शिक्षकाला जुंपणं; हा आधुनिक शिक्षण क्षेत्रावर भांडवलशाहीचा झालेला परिणाम आहे.

शिक्षण घ्यायचे नोकरीसाठी. नोकरी करायची पैसा कमवायला. पैसा कमवायचा मुलांना 'चांगलं' शिक्षण द्यायला. पैसा नसेल तर 'चांगलं' शिक्षण नाही? कर्ज काढून शिक्षण घ्यायचं. शिक्षण संपल्यावर काढलेल्या कर्जाचं आणि खर्चिलेल्या पैश्याचं भांडवल करत भविष्यातील मुलांच्या शिक्षणासाठी पैश्याच्या मागे लागायचं...

त्यासाठी सगळ्यात महत्वाचं "प्रमाणपत्र". 'येन केन प्रकारेण' ते मिळवण्याचं उद्दिष्ट नसलेला शिक्षक संस्थांसाठी बिनकामाचा. कुठल्या दुष्टचक्रात अडकलाय भारत? नॅक प्रमाणांकनासाठी एखादं विद्यापीठ किंवा महाविद्यालय महिन्या-दोन महिन्यासाठी तात्पुरत्या नियुक्त्या करतं. एखादा खोटा प्रकल्प, एखादी प्रयोगशाळा यंत्रणेसहित उभी राहते, दोन महिन्यासाठीच. भविष्यात कुठल्याही कामासाठी उपयोगी न पडणाऱ्या भंपक विषयावरच्या पी.एच.ड्या, इथून तिथून चोरून केलेल्या- बहुतांशी खोट्याच! वाटल्या जातात. त्यांच्या जोरावर शैक्षणिक संस्थेतील जागा भरल्या जातात. तीनहजाराचा कॅमेरा शाळेत नऊ हजारात खरेदी केला जातो. संस्थेचा पैसा असाच संपला की कारकुनी शिक्षकांची पगारकपात सुरू होते. जागा टिकवण्यासाठी केलेला "त्याग". याच भांडवलशाही विचाराने आजचे शैक्षणिक क्षेत्र आतून  पोखरून पोकळ केलं गेलंय. 

अत्याधुनिक यंत्रणांनी शाळा 'हायटेक' करणं काही विशेष नाही. त्यासाठी लगतो संस्थाकेंद्रित पैसा! आणि रेकाॅर्ड्सची कारकुनी रद्दी. पण शैक्षणिक गुणवत्ता टिकवण्यासाठी लागतात विद्यार्थ्यांना समजून घेणारे चितळेमास्तर. कारकुनी नाकारत संस्थेला चोख उत्तर देत वेळ पडल्यास पालकांनाही जाब विचारणारे! -संस्थांना न परवडणारे...

आपण पिढ्यान्पिढ्या बायकोच्या डोळ्यात मोती  भरतांना पाहणारे,  झिजलेल्या चपला वापरणारे चितळे मास्तरच घडवत तर नाही आहोत ना?

 

शिक्षकाला मिळणाऱ्या मानधनावर-पगारावर उपरोक्त विविध कारणांनी घासाघीस करणाऱ्या, प्रसंगी डल्ला मारणाऱ्या सरकार-संस्था आणि पालकांना आजच्या शिक्षक दिनी हाच खुला सवाल.

-गंधार.

शुक्रवार, १९ मार्च, २०२१

आजपासून वर्षभरापूर्वी- भाग दोन

रत्नागिरी आणि मी


एकट्याने राहण्याचा निर्णय घेतांना डोक्यात दिवसभरात काय काय करता येऊ शकतं, करायचं आहे याची रूपरेषा अस्फुटपणे आखली होती. त्यात सकाळी आणि संध्याकाळी जसं जमेल तसं सायक्लवायची, रत्नागिरीतले रस्ते धुंडाळण्याची कल्पना होती. सकाळी किल्ल्यावर, संध्याकाळी भाट्यात, कधी भगवती बंदरावर वगैरे जाण्याचं डोक्यात होतं. रत्नागिरी आश्चर्याचे धक्के देत होती. दोन्ही दिवस मला इंद्रधनुष्य दिसले.
आमच्या घराला आंब्याच्या पानांचं तोरण आहे ते निसर्गदत्तच! पूर्वेकडे असलेल्या आंब्याच्या झाडाच्या फांद्या घराच्या पत्र्यावर येऊन पानांची तोरणं स्वतःहून बांधतात. या रत्नागिरीला निसर्गानेच इंद्रधनुष्याचं तोरण लावल्या सारखं वाटलं अगदी मेघदूतातल्या आलका नगरीला आहे तसं! मनात अणि वतावरणात सकारात्मकता भरली होती.
हे घर घेण्या आधी आई बाबांनी माझ्या आणि सयुरीपुढे दोन विकल्प ठेवले होते. पुणे, नाशिक की रत्नागिरी? माझं एम.ए. संपत आलं होतं. मी पुण्याला पूर्त ओळखलं होतं. लहानपणापासून आजी आजोबांनी रत्नागिरीचा जो लळा लावला होता, त्याने सर्वानुमते रत्नागिरीत घर घ्यायचं ठरलं.

माझं आजोळ रत्नागिरीतलं. ज्येष्ठ पत्रकार अरविंदकाका कोकजे माझे आजोबा. सगळ्या उन्हाळी सुट्ट्या आम्ही आंबे खात आजी आजोबांच्या पत्रकार काॅलनीतल्या घरात घालवल्या.   कोकण रेल्वे सुरू होण्या आधी बोरिवलीहून सुटणाऱ्या जांभळ्या-हिरव्या रंगाच्या पवन ट्रॅव्हल्स किंवा घाटगे पाटीलच्या बसने आम्हाला बोरिवलीचे आजी-आबा रत्नागिरीला घेऊन जायचे ते चांगलं आठवतंय. पत्रकार काॅलनी म्हणजे रत्नागिरी स्टेशन जवळ, शहरापासून दहा किलोमीटर दूर, वरच्या बाजूला. ट्रेन सुरू झाली आणि आजोबांच्या घरी पोहचणं अधिक सोयीचं झालं. ट्रेन सुरु झाल्याच्या  पहिल्या वर्षी अगदी ठरवून सगळ्यांनी कोकणकन्येने  प्रवास केल्याची आठवण आई बाबा सांगतात. परवा, बाबा असतांना वरती आजी आजोबांना भेटून आलो. "नंतर निवांत येईन." असं सांगून आलो.


पहिल्या मजल्यावर राहणारा मामा म्हणजे माझ्या आईचा आतेभाऊ.  वर, आजोबांकडे आल्यावर खाली मामाकडे न जाताच परतलोय असं कधी घडलं नाही. वाड्याच्या आजूबाजूला 2-3 फणसाची झाडं होती. डावीकडे कलमी आंब्याची तटबंदी असल्या सारखी दोन तीन कलमं रांगेत होती. त्यामुळे वाड्यात शिरलं की गोड घमघमाट असायचा. आमचं मामाकडे जाणं आणि मामीचं फणसाचं सांदण घालणं अगदी ठरवल्या सारखा बेत असायचा. जोशीपाळंदेतून मामाकडे पोहचल्याचं मला फारसं आठवत नाही. फाटक हायस्कूलच्या बाजूला घनदाट झाडांमधून जाणारी एक पाऊलवाट होती. वरच्या आळीतून त्या पायवाटेने चालत पोहचतांना एकदम गावात आल्यासारखं वाटायचं. रत्नागिरीच्या "विकासा" बरोबर मामाच्या वाड्याचाही विकास झाला. पायवाटेसमोर इमारतीची तटबंदी उभी राहिली. आता त्या पायवाटेवर जायचं म्हणे उड्या मारून जावं लागतं.

एकूणच, रत्नागिरीच्या घरात प्रचंड प्रसन्न वाटत होतं. शुक्रवारी संध्याकाळी भाट्यात गेलो, तिथून कुर्लीच्या किनाऱ्यावर गेलो. मुखपट्टी लावण्यावर बराच भर दिला जात होता. मी, खर्च करून उगाच कशाला आपलंच तोंड बंद करायचं? असा विचार करून मोठा रुमाल घडी करून तोंडाला बांधला होता.
तेव्हा लोकांच्या चेहऱ्यावरचं भय आणि मनातली चिंता बघून एक स्वगत लिहीलं-
"मी, ती, हा निसर्ग, आणि त्यात, मानवानेच निर्माण करून सोडलेला तो सूक्ष्म प्राणघातक विषाणू. कांजिण्यांचा विषाणू आपल्या शरीरातच असतो असं म्हणतात. प्रतिकारशक्ति कमी झाली की कांजिण्या येतात. आयुष्यातून एकदाच. विषाणूने कांजिण्या होत असल्या तरी त्यांची गणना पित्तजव्याधीत होते आणि शरीरातली सारी ऊष्णता बाहेर पडते. आयुर्वेदात तीन दोषांपैकी कुठल्याही दोषाचं प्रमाण डळमळलं की अस्वास्थ्य निर्माण होतं. एखाद्या रोगाकडे शरीराचा अंतर्गतभाग म्हणून बघायचा दृष्टिकोन मला आयुर्वेदाने दिला. आयुर्वेदाच्या दृष्टीने कोरोना हा कफजन्य रोग आहे. कफावर नियंत्रण मिळवलं की तो विषाणू तग धरू शकतच नाही.
एकांतवासासाठी रत्नागिरीत आलोय. डोंबिवलीत असल्यापासून त्या रोगाची लक्षणं आणि बरे झालेल्यांच्या प्रतिक्रिया बघून अधून मधून वैद्याबरोबर चर्चा करत होतो. शिशिरऋतूत पसरलेला आजार ग्रीष्मात नियंत्रणात आणता येईल, वसंतात वमन केलं तरंच!
वैद्यांनी एक छान दृष्टांत दिला आहे. "सांडलेल्या साखरेला मुंग्या लागल्या की आपण मुंग्या मारतो की साखर झाडून काढतो?" मानवी शरीरातल्या कफावर विषाणू जगत असेल तर विषाणूचा प्रदुर्भाव होऊच नये म्हणून कफहनन करावं. #सायकलोपासना साठी पावसच्या मार्गावर होतो. विश्वेश्वराच्या घाटीवर पोहचलो. WHO ची पाश्चात्य अभ्यासानुसार दिली गेलेली सतर्कता, अॅलोपथीच्या दृष्टीने बरोबर असेलही कदाचित् पण, आयुर्वेदाच्या ठायी अंतूबर्व्याचे शब्दात, "विश्वेश्वराच्या घाटीवर कुराण वाचून दाखवण्या सारखं आहे. तो बोंबलतोय तिथे. त्याचा ह्यास उपयोग नाही, ह्याचा त्यास उपयोग नाही."
आपण आधुनिक रोगांकडे वेगळ्या दृष्टीने, चरकाच्या/वाग्भटाच्या दृष्टीने बघू शकतो का? तेवढे सामर्थ्यवान वैद्य निर्माण होतील असा अभ्यासक्रम आपण विद्यार्थ्यांना देऊन त्यांना प्रयोगक्षम, कृतिशील करतो का? की एमबीबीएसला प्रवेश न मिळाल्याने बीए एमएसच्या डीग्र्या घेऊन अलोपथीची औषधं देऊ करणारे डाॅक्टरच आपण बनवू इच्छितो?"

मी पंचकर्मातील वमन करायचं ठरवलं आणि परतलो. तसा रत्नागिरीतल्या वैद्यांचा संपर्क मिळवला. पुढल्या आठवड्यातल्या गुरुवारची वेळ दाते वैद्यांकडून घेतली.  जिन्या जवळ लहान सायकली ठेवल्या होत्या. त्यांच्या जवळ माझी सायकल जिन्याला कुलूपबंद केली. तोच रात्री इमारतीच्या व्हाअॅट्स अॅप ग्रूपवर कोणीतरी "ही सायकल जिन्यात लावली आहे." असं फोटोसहित टपाल (post) टाकलं.
खरं तर तो प्रकार माझ्या डोक्यातच गेला होता. कुणाच्याही रस्त्यात न येणारी माझी सायकल काहीतरी खुचपटं काढायची म्हणून कुठलातरी नियम दाखवत बाहेर ठेवायला मला सांगितलं होतं. रिकामटेकडे धंदे! सहकारी गृहनिर्माण संस्थेतला अतिशिक्षित असहकार भोगण्याचा हा पहिला प्रकार होता. मी सायकल दुसऱ्या मजल्यावर उचलून आणली. घरात ठेवली. लहानमुलांच्या इतर सायकली तश्या तिथेच होत्या. मी नवीन. उगाच वाद नकोत म्हणून शांत राहिलो. असले खवचट प्रकार इथे घडणार असतील तर अवघड आहे. ठकासी ठक व्हावे लागेल. मनोमन ठरवले! तसा पुण्याचा दोन अडीच वर्षांचा अनुभव होताच गाठीस
19/3/2021
डोंबिवली.

मंगळवार, १६ मार्च, २०२१

आजपासून वर्षभरापूर्वी... भाग पहिला

आजपासून वर्षभरापूर्वी...
बरोब्बर एका वर्षापूर्वी मी रत्नागिरीचा प्रवास केला होता. ट्रेनचं आरक्षण शेवट पर्यंत मिळालं नव्हतं. म्हणून बाबांनी गाडीने मला तिथे सोडलं... सतरा मार्च 2020!
भोवताली बऱ्याच गोष्टी वेगळ्या घडत होत्या. समाज माध्यमांवर, वृत्तवाहिन्यांवर भारता बाहेरच्या देशांमध्ये "टाळेबंदी" सुरू असल्याची बातमी होती. एक विषाणू शरीरातला प्राणवायू शरीरापासून तोडून टाकतो आणि ताप आल्यावर लोकं तडफडून मरतात अश्या प्रकारच्या चित्रफिती पसरल्या होत्या. भारतात नुकताच शिमगा होऊन गेला होता. तसल्या चित्रफिती बघून भारतीयांनी विषाणूच्या नावाने शिमगा घातला होता. विषाणू हा चर्चेचा आणि चेष्टेचा विषय बनून राहिला होता.
आम्ही रत्नागिरीच्या प्रवासात परस्पर चिपळूणलाच जेवणासाठी थांबलो, एका हाॅटेलात. मुंबई-गोवा महामार्ग बऱ्यापैकी रिकामा होता. महाराष्ट्रात पंधरा तारखेपासूनच अर्धीटाळेबंदी लागू करण्यात आली होती. पण, मुख्यमंत्र्यांच्या त्या निर्णयाचीही चांगलीच थट्टा उडवली गेली होती. काही लोक भीऊन घरी बसले होते, भारताबाहेरच्या वृत्तांवर विश्वास ठेवत होते. तर, माझ्यासारखे काही निश्चिंतपणे फिरत होते. आम्ही रत्नागिरीला पोहचलो. बाबा दोन दिवसांतच निघणार होते. त्यांच्या बरोबर त्यांचा मित्रही होता. परतीच्या प्रवासात सोबत म्हणून आलेला. त्यांना गणपतीपुळे-पावस चं दर्शन व्हावं म्हणून तिथे जाण्या विषयी चौकशी केली. तर समजलं पंधरा तारखेपासून मंदिरं बंद आहेत. कुठेही न जाता बाबा आणि त्यांचा मित्र एकोणीस तारखेला डोंबिवलीला परतले. मी माझी सायकल रत्नागिरीला नेली होती. तिचा टायर बदलायचा होता. टायर डोंबिवलीहूनच घेऊन गेलो होतो. ते काम करून सायकल सज्ज केली. आता रत्नागिरीत मी, माझी सायकल आणि माझी पुस्तकं असेच आम्ही राहणार होतो.
मोदींनी रविवारी एकदिवसाच्या संपूर्ण टाळेबंदीसाठी आवाहन केलं होतं. तो पहिला रविवार जवळ येत होता.
रत्नागिरीतलं घर तसं नवीनच. स्वयंपाक घरात जेमतेम सामान होतं. बाबांनी जाण्या आधी पंधरा वीस दिवसांसाठी पुरेल इतका किराणा आणि काही भांड्यांच्या वस्तू वगैरे डी मार्ट मधून आणल्या होत्या. माझा स्वयंपाकाचा छंद मी रत्नागिरीत जोपासणार असल्याने जास्तच आनंदात होतो. एप्रिलच्या पहिल्या आठवड्यात शिकवण्या सुरू करायला डोंबिवलीत जायचं ठरलं होतं.
तो पाश्चात्य वैद्यकशास्त्राला सापडलेला विषाणू, राजकीय निर्णयाने लादलेली टाळेबंदी या सगळ्या गोष्टींकडे फारसं लक्ष न देण्याचं मी मनोमन ठरवलं होतं.
रत्नागिरीतल्या नवीन घराचा शेजार कसा आहे हे माहीत नव्हतं. रस्तेही डोक्यात बसले नव्हते. टिळक आळी काँग्रेस भवनापाशी संपते, वरची आळी गोखले नाक्यापाशी आणि गोखले नाका ते काँग्रेसभवन या रस्त्याला जोशी पाळंदेचा रस्ता समांतर आहे. हे समजायला शनिवार पर्यंत सात-आठवेळा सायकलवरून अनेकदा चुकत त्या रस्त्यांवर फिरावं लागलं. रत्नागिरीच्या रस्त्याचा थोडासा अंदाज आला होता. पण दोन रस्त्यांचाच! इमारतीत पहिल्या मजल्यावर मामा राहत असल्याने तसा निश्चिंत होतो. पण, तो अर्णब गोस्वामीचा भक्त होता. त्यामुळे बाबा डोंबिवलीला परतल्यावर मी एकटा रत्नागिरीत कसा राहू शकीन याबाबत त्याला चिंता होती. तो वृत्तवाहिन्या बघून घाबरून गेलेला होता. त्याने अनेकदा डोंबिवलीला जाण्याविषयी विचारलं, विविध मार्ग सांगितले.
पण, मी एकट्याने रत्नागिरीत राहण्याचा निश्चय केलेला होता.
17/3/2021
डोंबिवली.

गुरुवार, २५ फेब्रुवारी, २०२१

आजी

आजी आजोबा घरात असण्याने काय परिणाम घडतो?
एकदा जेवतांना आई बाबा सयुरी बरोबर या विषयावर चर्चा झाली. मागील पिढीचे आचार विचार पुढे देण्याचं काम आजी-आजोबांकडे सोपवलेलं असतं. मुलं जन्मजात निरीक्षक असतात. आई-बाबा वळण लागावं म्हणून ओरडतात, धम्मकलाडू देतात पण त्याच वेळी हक्काने गोड लाडू मागायची जागा आणि कौतूकादि लाड करण्याचं स्थान आजी आजोबांचं असतं.
घरातला सगळ्यात मोठा प्रेमाच्या मायेचा कोपरा आजी कडे असतो. "चांगलं रहावं, चांगलं खावं.... हे असं करू नये, वागू नये..." ही समजुतीची वाणी कितीही खट्याळपणे वागण्याला नातवावर संस्कार करत असते.
आमच्या घरात इतर सगळ्या नातवंडांमध्ये आजीचा सर्वाधिक सहवास मला लाभला. लहानपणी बोट धरून विठ्ठलमंदिरात घेऊन जाण्यापासून खूप दंगा केला म्हणून मला एक चापटी मारल्यावर स्वतःच रडे पर्यंत आजी बरोबर खूप आठवणी आहेत. तिने मला पांडुरंगावरची भक्ती दिली. आपण ब्राह्मण आहोत. आपल्यावर समाजात चांगलं राहण्याची जबाबदारी आहे. पण, मंदिरात गोकुळ-अष्टमीला सगळे एकत्र येऊन काला करतात. तो प्रसाद सगळ्यांनी खायचा असतो. भजन सुरू होतांना भक्ताच्या जातीचा एकच बुक्का असतो. हे सतत आजीच्या गोष्टींमधून माझ्यावर संस्कारित केलं गेलं. संघातील लोकांबद्दल आणि कामा बद्दल तिला नेहमी आदर होता. ती आपली माणसं आहेत. आपणच शाखेत गेलं पाहिजे. तिच्याकडून माझ्या कानावर भजनं, गवळणी, अभंग असं लोकहसाहित्य पडायचं. सुदाम्याचे पोहे, द्रौपदीची जरदारी चिंधी, विट्ठल कुंभाराची माती मळतांनाची गोष्ट, संत ज्ञानेश्वर, तुकाराम, नामदेवांच्या गोष्टी...कृष्णाच्या, रामाच्या, विट्ठलाच्या असंख्य गोष्टी तिने मला सांगितल्या. मी इंग्रजी शाळेत शिकत होतो. पण, "आपल्यात असं असतं" हे सांगायचं काम आजीचं! आपल्यात म्हणजे कोणाकडे? 'मराठी लोकांमध्ये'. अगदी लहानपणापासूनच मराठी माझा आवडता विषय झाला याचं कारण आजीचं हे "आपलेपण". मराठीच्या पुस्तकात आजीचे घड्याळ नावाची कविता होती. आजी म्हटली की डोळ्यासमोर उभी रहायला आकृती लागावी ती आकृती माझ्या आजीच्या स्वरूपात होती. नऊवारी काष्टा नेसलेला आणि त्यात ती झोपेतून उठवते आहे ही कवितेमधली कल्पना. आजीलाही तिच्या शाळेत या कविता होत्या. त्या तिच्या तोंडपाठ होत्या याचं आम्हाला आश्चर्यंच वाटायचं. माझी शाळा, विमान, आजीचं घड्याळ या कविता आम्ही पाठ करत असतांना तिला आमच्या पुढचे पाद आठवायचे.

आजीने तिच्या तारुण्यात खूप कष्ट सहन केले. कुळ कायद्यात जमीन जाऊ नये म्हणून आजोबा नोकरी सोडून (फरकांड्यात) खेडेगावात शेती करायला आले. आणि मुलांच्या शिक्षणासाठी राहता वाडा सोडून तालुक्याच्या गावी भाड्याच्या घरी कुटुंबाला हलवलं. साहजिकपणे पैश्याची चणचण रोजचीच. पण त्यातही आजीने सगळ्या मुलांना शिकवलं, स्वतःच्या पायावर उभं केलं. "कोणाकडूनही काहीही मागायचं नाही आणि घ्यायचंही नाही." हे तत्त्व तिने शेवट पर्यंत पाळलं आणि आमच्यावर बिंबवलं. माझ्या जन्मा आधीच आजोबा गेले. मग आजीला बाबांनी आणि काकाने डोंबिवलीला आणलं. नंतर  आजोबांनी बांधलेल्या कासोद्याच्या घरात फक्त सणासुदीला एकत्र दिवाळी पुरती आजी रहायची. तिच्या सगळ्या सूनांपैकी ऑफीसला जाणारी एकटी माझी आईच, सगळ्यात धाकटी. आजी असायचीही आमच्याकडेच. पण मी सासू सुनांनी भांडणं आणि वाद फक्त मराठी मालिकांमध्ये बघितले. मतभिन्नता- पिढीतील आणि शहरी-ग्रामीण वातावरणातील बदलाने नक्की असायची. पण ते सगळे समजूतदारपणात विरून जायचे.   सण आले की आजीमध्ये वेगळाच उत्साह संचारायचा. तेलवाती, तूपवाती, पूजेचे साहित्य यावर बारीक लक्ष ठेऊन ती तयारी करायची. आणि ते करतांना सगळ्या रूढी परंपरा आमच्या पर्यंत कशा पोहचतील याची दक्षताही घ्यायची. तिने तिच्या मुलांचे सुगीचे दिवस बघितले.
2011 साली एक काका अचानक गेले. सहा भावंडांपैकी एक! नंतर मोठी मुलगी गेली.  त्यानंतर ती शरीराने आणि मनाने जे खचली, ती शेवट पर्यंत त्यातून बाहेर येऊ शकली नाही. त्यानंतर पूजेच्या तयारीसाठी पहिल्यांदा ती दूर राहिली तेव्हा मला खूप चुकल्या चुकल्यासारखं झालं होतं. पण नंतर ती अधिक खंगत चालली आणि आम्हाला त्याची सवय होऊ लागली. तिला लोळा-गोळा झालेलं आयुष्य अजिबात नको होतं. पण दुर्दैवाने तिच्या वाटेला दोन ते तीन वर्ष परावलंबत्व आलं. सयुरीचं लग्न उभं राहत होतं. आजीला भास होत होते. तिला बोलवायला मुलगा, मुलगी, आजोबा, तिचे आई वडील येत. "नातीचं लग्न झाल्यावर येते म्हणून सांग त्यांना आजी." तिला सांगितल्यावर ती भानावर येऊन हसायची.
डोळ्यावर कितीही ग्लानी असो, आजी संपूर्ण रामरक्षा माझ्या बरोबर म्हणायची आणि शेवटी नमस्कारही करायची. रामरक्षेची गोष्टच आहे. आमच्या शेजारी सावंत काकू रहायच्या. आजी आणि त्यांनी मिळून पुस्तक वाचत वाचत आम्हाला अथर्वशीर्ष शिकवलं. मग, "उच्चारण सुधरावं,  जीभ हलकी व्हावी" म्हणून रामरक्षा स्तोत्र शिकवण्याचा प्रयत्न केला. मोठ्या आत्येला हे समजलं. तिने कुठूनतरी रामरक्षेची दोन छोटी पुस्तकं आणून दिली. माझी रामरक्षा पाठ झाली. आजीचे पाय असह्य दुखायचे. तेव्हा ती जोरजोरात कण्हत असे. "आजी गं शरीर जीर्ण झालं, दुसरं नवीन घ्यायची वेळ झालीये. रामाचा जप कर." असं म्हणत रामरक्षा मोठ्याने म्हणायला सुरुवात केली की आजी शांत व्हायची. वेदना पचवायची शक्तीच जणू तिला रामरक्षा देत असे.
तिला सगळीच नातवंडं आवडायची. पण मी जरा जास्तच. आज मी समोर असतांनाच तिने शेवटचा श्वास सोडला. आई, बाबा दोघंही तिला बघून आले, तिच्याशी बोलून आले. तिने कोणालाही काहीही उत्तर दिलं नाही. मी प्राणवायुमापक घेऊन आजीच्या हाताला आणि पायाला लावून हृदयाचे ठोके मोजायचा प्रयत्न करत होतो. तिचा श्वास मंद सुरू होता. तो हे माझे प्रयत्न सुरू असतांनाच थांबला. डोळे अर्धोन्मिलीत होते. जीभेची हालचाल पूर्ण थांबली होती. मी तिचा हात हातात घेतला, चार थेंब पाणी पाजलं. कपाळावर हात ठेवला. पाणी बाहेर आलं नाही. आजीने ते थेंब पीले होते. अशी माझी आजी संपूर्ण आयुष्य जगली. तिने नातवंडं, पत्वंडं पाहिली, मुलांचे सुखी संसार अनुभवले. तिच्या आत्म्याला सद्गती मिळो हीच रामाचरणी प्रार्थना.