ख्रि. ३१.१२.२०२१
दैनंदिनी लेखनाची कला भारतीय भाषांना इंग्रजांनी शिकवली. मनाला मोकळेपणाने गद्य शब्दात अभिव्यक्त करता येऊ शकतं- यावर भारतीयांना विचार करायलाही वातावरण मिळालं नसावं. भारतीय समाज गर्दीत रमणारा. व्यक्तिगत स्वयंकेंद्रितपणा इथे दुर्मीळ. तो दुष्टप्रवृत्तीतच दिसत असावा. सद्प्रवृत्तीत त्याचं प्रकटीकरण काव्य आणि तत्वज्ञानातच झालं. त्यामुळे इथे लिखाण झालं ते परार्थासाठी. कल्हणाची राजतरंगिणी हा एकमेव अपवाद वगळता इतिहासाला थेट पुरून उरतील असे दैनंदिनीत अभिव्यक्त झाालेले साहित्य भारतात दुर्लभच.
पुलंचं 'वंगचित्रे' वाचून झाल्यावर 'मुक्काम शांतिनिकेतन' वाचायला घेतलं. चांगली डायरी वाचल्याशिवाय आपणही तसा विचार करू शकतो आणि आपल्यापुरता का होईना मांडू शकतो असं वाटू शकत नाही. आजवर विचार करून मांडण्याचा प्रयत्न नकळतपणे झालाही असेल पण, त्या लेखनाला दैनंदिनीत स्थान आहे, लेखात नाही. हे सांगायचं काम देशपांड्यांनी केलं. देशपांड्यांनी हा प्रयोग वापरण्याचे कारण सध्या मी कॉ. भारती ऊर्फ सुनीता ठाकूर-देशपांडे यांचं 'आहे मनोहर तरी' वाचतोय.
त्या पुस्तकाविषयी सांगायचं तर, ते एक वैचारिक आहे, आयुष्याच्या उत्तरार्धात लिहीलं गेलेलं... मी रोज दहा-वीस पानच वाचतोय. संस्कृतचा "अंधभक्त अभ्यासक" नसल्याने, कृतींमधून बाईंनी मांडलेल्या द्वंद्वात मीही अनेकदा अडकत असतो, एखाद्या बाजूला नकळत झुकतही असतो. तसल्याच कृती-परिणामांची सारासार विवेकी चर्चा आगदी ओघवत्या शैलीत गप्पा मारावी तशी पुस्तकात येते. परिणामांची अनुभवी गाठोडी बाई आपल्या समोर मोकळ्या करत असतात आणि महाजन बनण्यासाठीच्या स्वतंत्र मार्गाचा उपदेश करत असतात...
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा