दुपारी दीडच्या दरम्यान जाई ताईचा, "डोंबिवलीत आहेस का?" विचारणारा फोन आला. रात्रीच्या कार्यक्रमासाठी माझा संपर्क ती अग्रेषित करणार होती. मी काहीच विचार न करता होकार देत गेलो.
नंतर स्वतःला आरश्यात बघितलं आणि विचार करत बसलो. कांजिण्या येऊन जेमतेम बारा दिवस होऊन गेले होते. संध्याकाळी साडे चारला रात्रीचा कार्यक्रम नक्की झाल्यानंतर कधीतरी नाकावरची खपली पडली.
मी ज्या कार्यक्रमात गप्पा मारणार होतो तिथे डाॅ. माहुलीकर बाई, डाॅ. वीणा सानेकर बाई, डाॅ. अभिजीत देशपांडे सर यांसारख्या माझ्या आयुष्यात वंदनीय स्थान असणाऱ्या, मनात आदरयुक्त भिती असलेल्या व्यक्ती येऊन गेल्या होत्या.
चेहरा प्रदर्शनीय दिसेल का? आपल्याला हिरवे कपडे घालू नका असं सांगण्यामागचं कारण काय असेल? इथपासून या कार्यक्रमाच्या प्रतिष्ठेपर्यंतचं सगळंच थोडं थोडं का होईना दडपण घेऊन साडे नऊच्या बातम्या सुरू झाल्या.
वृत्तनिवेदकासमोर बातमी वाचतांना काय असतं? तो/ती समोर बघतो/ते तेव्हा समोर कॅमेरा असेल तर बातम्या कुठून वाचता येतात? एखादी ओळ सुटली तर? शब्द चुकला तर? अक्षर गलपटलं तर? खरंच थेट प्रक्षेपण असतं का की, गंडवतात आपल्याला? घरी बसून बातम्या बघतांना या प्रश्नांवर बाबा आणि सयुरी बरोबर अनेकदा चर्चा झाली होती. आज वृत्तनिवेदकाच्या बाजूला बसून ती सगळी प्रक्रिया प्रत्यक्ष बघत होतो. खरं थेट प्रक्षेपण. अजून एक दडपण!
वेळेचं काटेकोर गणित. दहाव्या मिनीटाला स्वागतपर झालेला नमस्कार आणि ठरवलेला पहिला प्रश्न. आता, "the ball is in my court." याची झालेली जाणीव. मला जे सांगायचंय, जे बोलायचंय, ज्या शब्दात बोलायचंय त्याचं परे पासून वैखरीपर्यंतचं स्वातंत्र्य मलाच! दहा मिनीटं- सहाशे सेकंदांची तेवढी चौकट आहे. एकही नकारात्मक विचार बाहेर न पडता दहा मिनीटं केवळ सकारात्मक बोलायचंय. अभिव्यक्ती स्वातंत्र्यात स्वतःला मर्यादा घातलेल्या बऱ्या असतात. त्यामुळे स्वातंत्र्याचा तोल स्वैराचाराकडे ढळत नाही.
या सगळ्या गोंधळात, एकाच भाषेत अस्खलित बोलायचं असतं. एखादा शब्द सुचला नाही की? दुसऱ्या भाषेतल्या शब्दाची कुबडी घ्यायची नाहीये म्हणून रिकामी जागा.....ब्लँक! घडाळ्याचा काटा पुढे सरकतोय. कॅमेरा सुरू आहे. महाराष्ट्र बघतोय. अमेरिकेतून मित्र थेट युट्यूबवर बघतोय. अडलेल्या स्वल्पविरामापुढे क्रियापद वापरून पूर्णविराम करत पुढचा मुद्दा सुरू झाला. आता जे शब्द सुचतायत, टिपलेल्या कागदावर जे शब्द दिसतायत तेवढेच मुद्दे घेऊन आपला विषय मांडला जात असतांनाच दहाव्या मिनीटाला आपण आल्या बद्दल आभार मानले जातात. आपल्या समोरच्या कॅमऱ्यावरचा लाल दिवा बंद होतो. आता मागच्या दहा मिनीटात काय घडलंय हे आपल्याला चांगलंच माहीत असतं. ते आठवण्यात काही अर्थ नसतो. "क्षण तो क्षणात गेला. सखे हातचा सुटोनि..." म्हणत सोडून देण्यात शहाणपण असतं. परीक्षा संपल्यावर उत्तरपत्रिकेत लिहीलंय ते बरोबर की चूक हे आठवणं जितकं निरर्थक तितकंच हेही. पुढल्या परीक्षेला जातांना मागच्या उत्तरपत्रिकेतल्या चुका होणार नाहीत याची काळजी घेणारा अभ्यास करू. आत्ता आनंद वा दुःख साजरा करायची गरज नाही.
एवढाच विचार करून त्या हिरव्या पडद्यासमोरील खुर्चीचा निरोप घेत एक वेगळ्या अनुभवाच्या धुंदीत बस पकडून मग ट्रेन मध्ये बसत मुंबईचा निरोप घेतला. एक अनुभव दूरदर्शनाच्या थेट प्रक्षेपणात सहभागी होण्याचा...

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा