गुरुवार, १३ सप्टेंबर, २०१८

भाषारत 12

दिवस 75, 13/9/2018
बाप्पा अंत पाहत होता!
या शिवभूमी म्हणवल्या जाणाऱ्या चंबा खोऱ्यात एकही गणपती मंदीर असू नये! मनाने स्वीकारलं. रूपहीन शब्दात्मक ब्रह्माची आराधना करावी. अथर्वशीर्षाची आवर्तनं सुरू झाली. त्यांना गणना नव्हती. खिंडी पर्यंत चढून उतरणे आणि दुसरी खिंड चढणे एवढेच काय ते रस्त्याचे स्वरूप होते. मधेच खचलेला रस्ता आणि पाण्यात वितळणारे डोंगर, एक भयाण नैसर्गिक वास्तव दाखवत होते. रस्त्यात दिसणारी लाल फुलं "रक्तपुष्पैः सुपूजितम्" म्हणत बाप्पाच्या मूर्तिची आठवण करून देत होती.
हजार एक मीटर ऊंचीवर पोहचलो होतो. पूर्वेकडील दरीचे दृष्य साफ दिसत होते. काकिरा नावाचं छोटसं खेडेगाव. बाहेरील माणसाला सरकारी विश्रामगृहाचाच तेवढा आसरा! खोली मिळाली. "काही नाही तर बाप्पाच्या वडीलांचे दर्शन घेऊ." मनाची समजूत घालणं सुरू होतं. उगाच मनाचे श्लोक म्हणण्याची इच्छा झाली. "मना श्रेष्ठ धारिष्ट्य जीवी धरावे"
कसले धारिष्ठ्य नि कसले काय!
अंघोळ उरकून बाहेर आलो. गावात ढग शिरले होते. वादळी वाऱ्यासह पाऊस सुरू होता. रोजचच आहे! दिवसभर घामाने भिजवायचं आणि संध्याकाळी पाऊस. बसा खोलीतच!
तासाभरात सगळे निघून गेलेले होते. क्षितीजापर्यंत आभाळ खुले!
मंदीर शोधायला गावात फेरफटका मारला. शिवमंदीर वरच्या बाजूला असल्याचं समजलं. दुकानातून वस्तूही घ्यायच्या होत्याच. दुकानदाराकडे चौकशी केली. गणपती मंदीर नाहीये हे माहीत असूनही, "यहा पर कोई गणपतिमंदीर वगैरा है?" त्यानेही मी कुठून आलोय वगैरे विचारलं आणि खाली गणपति बसतो. आता आरती सुरू झाली असेल म्हणून सांगितलं. विकत घेण्यासाठी काढून ठेवलेलं सामान, "बादमे लेके जाता हूँ." म्हणत खाली गेलो. बाप्पाची मूर्ती बघून, "रूप पाहता लोचनी..." म्हणण्या जोगा आनंद झाला. शंकराची भजनं चालू होती.
शांत बसलो.
मन बेचैन होतं. घर, राधा नगर आणि समोर बसलेला बाप्पा!
वास्तविक चंबा हा एकमेव जिल्हा असा आहे की जिथे एका राजघराण्याचंच राज्य चाललं. त्यामुळे सार्वजनिक गणेशोत्सव वगैरे इथे साजरे करावे लागलेच नाही. दोन वर्षांपूर्वीच ही सार्वजनिक गणेशोत्सवाची प्रथा सुरू केल्याचं समजलं. मुंबईचं अनुकरण करण्याचा प्रयत्न!

एका आरतीत आरती आटोपली! बाकी पुरुषसूक्त आणि वैदिक देवतांच्या मंत्रांनी संध्यावंदन करावे तसे विधि. मनात आलं 'नये है यह. अजून बरीच प्रॅक्टीस बाकी आहे.'
कसलीही भीड न बाळगता एकदा जोरात ओरडूया...
आवाज दिला... "गऽणपती बाप्पा मोरया, मंगऽऽल मूर्ती मोरया."  प्रतिसाद मिळाला.
चार पाच वेळा आवाज दिला. जीवात जीव आल्यासारखं वाटलं.
आता जरा बरं वाटतंय. बाप्पाने खरंच अंत पाहिला होता!
काल प्रथमेशशी बोलणं झालं. तसे आम्ही दोघे समदुःखी होतो. तो शिक्षणासाठी याच ऑगस्ट महिन्यात अमेरिकेला गेलाय. त्याचे शब्द आठवले, "एखाद वेळेस दिवाळी चालेल, गुढीपाडवा चालेल, पण यार गणपतीला घरी नाहीये. किती विचित्र वाटतंय! हट् यार!"

बुधवार, १२ सप्टेंबर, २०१८

Dusky mind

Evenings are mind changers or mind builders of a person. They are the
realizers of the self by the feeling of either loneliness or bonding.
This period of the day with the dusking sun, quiet surrounding and free time makes us ask questions to ourselves regarding us; the people we met, we behaved with them till now.

For some of us it might be quite depressing with no one around and no one to think over. Because relationship is the greatest achievement of mankind. Strong bonds are created by minds. Empty mind is a devil’s house and creative mind always stays with some bonds either with a work or with a person. But, work engages mind for a time being but what remains then after that is an empty mind searching for a relation to think over.

Being a social animal, human has a fear of loneliness. This fear erupts with the dusky sun at the evening when he is alone. The empty loneliness, at the beginning might be frustrating and after getting used to it, sounding. Thus is the period of sunset mind building or
mind changing for any lonely person.

Being in relation does not ever mean the physical relation. Engaging the mind for a person on his/her future or the present along with ours is quite enough to discard the emptiness.

A perfect music can be helpful to get used to this feeling. Yaman raga, Gazal in Indian music are famous for the same, the mixture of feeling of sadness and happiness. The science of poetry call the
wordings “vipralamba śŗņgāra”, in which words express sadness of missing the unavailable loving person but happiness of remembering that person.

We can be the best friend of our self. Words have the power to express the sounds which form the words for expression in a language either spoken or musical. These languages speak to us in the way our mind needs; in the absence of any person; we form our own conversation with ourself. Thus being happy or sad is in control of our self if we get acknowledged to use language of ours. The word has power to express
everything.

Letter is a pictorial representation of any sound in any language.
Though scripts are associated with languages, languages have no bounds
of either of the scripts. That’s the power of any script to correctly represent a sound of any specific language, which conquers its association with the language. Writing is a gift to the mankind
wherein we can store our feelings in the form of a script.

It is now upto our brain which shall direct our mind to use the language or get adopted to it. The personal diary is waiting for our pen. Its evening, the time to speak with our mind either to build it
or change it.
-Gandhar.

शुक्रवार, ७ सप्टेंबर, २०१८

भाषारत-11

दिवस-63, केलांग 1/9/2018
आनंद आणि दुःख त्या त्या क्षणांपुरते मर्यादित असतात. त्यांच्या अनुभवांचे गोडवे-कडवे नंतर कैक प्रकारे गाता येतात. हे लिखाण हा देखील त्याचाच एक भाग.

रोहतंगच्या पुढे 22 कि.मीचा उतार उतरून कोकसरला पोहचलो होतो. शाळा इथून 13 किमी दूर असलेल्या सिस्सू गावात होती. तसा सकाळी आरामात 8-8.30 ला निघालो.  फ्लाॅवर, मुळा आणि विवध पालेभाज्यांनी रस्त्याच्या एकाबाजूचे चढ आणि दुसऱ्या बाजूचे उतार सजले होते. रोहतंगचा पास पार केल्यावर अशी विविध रंगी जीवसृष्टी 35-40 कि.मी च्या प्रवासानंतर बघायला मिळाली.
एरव्ही, बर्फ वितळून गेल्यावर नागडे पडलेले डोंगर माथे, बर्फाचा भार असह्य होऊन भूंस्खलनाने भूसभूशीत राहिलेले डोंगर उतार, यांवर एका पट्ट्यावर लालसर रानगवत माजलेलं होतं. काही ठिकाणी नव्याने अंकुरू पाहणारी देवदाराची रोपं डोकं वर काढू पाहत होती. बाकी सर्वत्र रखरखीत डोंगर उतार.
त्यांतल्या त्यात उंच पहाड अजूनही हिमाच्छादित होते. सूर्य ते सौंदर्यही हिरावून घेतांना 500-600 फूटांवरून कोसळणारे धबधबे निर्माण करून नकळतपणे सौंदर्यच निर्माण करत होता. तसा या पाण्याचा प्रवास फार किचकट नव्हता. सरळ खाली वाहणाऱ्या चंद्रा नदीतच त्यांना जायचं होतं. सूर्याच्या किरणांना टाळत पहाडाडून  लपलेल्या पाण्याला गोठवण्याचं काम वारा मात्र चोख बजावत होता. मोत्याचा एकसर धारण केलेली पृथ्वी ही कविकल्पना शब्दशः अनुभवता येत होती. मेंढपाळ येणाऱ्या हिवाळ्याच्या तयारीसाठी शेळ्यामेंढ्यांचे कळप डोंगरापलिकडे, मनालीला घेऊन जात होते. त्यांनी रस्ता भरला की पाच मिनीटे आहोत तिथेच उभे राहायची आता सवय झाली होती. शांत मेंढरं. आपापसात खेळत असतांना रक्तवर्णी शीरास्त्र(हेल्मेट) घातलेला मी आणि पंचवीस किलो सामान वाहणार्या #bgm #bergamontindia #straightfromstpauli बघून गोंधळून जात आणि सैरावैरा पळत बाजूने वाट काढत.
सिस्सूच्या शाळेत गेलो. छोटं गाव. कमी वस्ती. त्यात आज एक लग्न होतं. शाळेत मुलं आली नव्हती. जेमतेम 30 विद्यार्थी, आठवी पासून बारावी पर्यंतचे! त्यांच्याशी आणि शिक्षकांशी संवाद साधला तेव्हा लाहौल आणि स्पिती जिल्ह्यातील शिक्षणा विषयी बरीच माहिती मिळाली.

ऊन तापत होतं. बर्फावरील गार वारा त्याला थंड करत होता. चंद्रा नदीच्या काठाने जाणारा रस्ता संपणार होता. एका संगमापाशी येऊन थांबलो. इथे चंद्रा आणि भागा एकत्र येतात. या गावाला तंडी असं नाव आहे. तन दिले गेले ज्या ठिकाणी ते तंडी. अशी या नावाची व्युत्पत्ती सांगितली जाते. द्रौपदी ने या ठिकाणी जलसमाधी घेतली अशी लोककथा ऐकायला मिळाली.
पुढचा रस्ता भागा नदीच्या किनाऱ्याने सुरू झाला.
हा प्रवास नर्मदेसारखाच उलटा, मूळांपर्यंत जाणारा होता.
मी जात कुठे होतो? तर, या सगळ्या उपनद्या ओलांडत सिंधू नदीकडे...
जिच्यामुळे मी हिंदू म्हणून ओळखला जातो, जिच्यामुळे या भरतभूमीला इंडिया हे नाव मिळालं, जिचा शोध घेतांना इतर खंडातल्याही अनेक भागांना आणि जातींना चुकून इंडिया आणि इंडियन हेच नाव दिलं गेलं, त्या सिंधू नदीकडे जाणारा प्रवास!

मी केलांगला पोहचलो तेव्हा दुपारचे 2-2.30 झाले होते. थेट उच्च माध्यमिक शाळेचा वेध घेतला. शनिवार होता. अर्धा दिवस वगैरे शाळा असायची भिती. नशीबाने तसं काही नव्हतं. नववीच्या वर्गात संवाद साधला. मुलांना विषय आवडला.  मुलं छान खुलून प्रश्न विचारत होती. मीही फोन काढून फोटो वगैरे काढायला विसरलो. नंतर मुख्याध्यपकांना भेटलो तेव्हा त्यांच्या बरोबर मात्र न विसरता फोटो काढला. आता पांग ला पोहचेपर्यं शाळा असणार नव्हती. केलांगमध्ये 100% बौद्ध वस्ती असल्याने भाषा आणि उच्चारण यात बराच फरक जाणवला. भोटी भाषेविषयी तुरळक माहिती मिळाली.
#सायकलोपासना #cyclopasana #pitambari

बुधवार, ५ सप्टेंबर, २०१८

भाषारत-10

Day 62, 31/8/2018 कोकसर,

मी ज़े अनुभव घेतोय ते फक्त माझ़े आहेत. याची ज़ाणीव होणं वेगळा आनंद देऊन ज़ातं. महांकाळाच्या दरबारी आरती सुरू झाल्यावर, ऋषिकेशला दुथठी भरून अविरत वाहणाऱ्या गंगेच्या आरतीच्या वेळी किंवा आज, 53 कि.मी. चा शारीरिक आणि मानसिक क्षमतांचा कस लावणारा रोहतंगचा चढ चढून तिथे पोहचल्यावर आणि पार केलेल्यानंतरचे विस्मयकारी दृष्य पाहून डोळ्यातून घळा घळा वाहणारे पाणी फक्त त्या 'माझ्याच' असलेल्या अनुभवाचं असतं...
बाकीची मंडळी शरीराला आरामदायी वाटणाऱ्या वाहनातून माझ्यावर धूर, धूळ आणि क्वचित् खड्ड्यातला चिखल उडवत इथे पोहचलेली आहेत असा थोडासा  अभिमानी हेकस भाव आनंद वाढवत असतोच. पण त्याहीपेक्षा आनंद असतो आपण बरंच काही कमावल्याचा!
काल चुकीच्या आहारामुळे पित्त उफाळून आलं. जेमतेम 10 किमीचा चढ पार केला होता. आणि नाश्ता करून झाल्यावर अर्ध्या तासात, पुढचे चार कि.मी. पूर्ण होण्याच्या आत शरीर भर असह्य खाज सुटून पित्त उठलं. डाॅ.सायलीशी फोन वर बोलणं झालं. आयुर्वेदानुसार उपचार सुरू करायला सायकल कोठीला एका हाॅटेलदारावर विश्वास ठेऊन मनालीला आलो. नंतर दिवसभर फोनवरून "अंडर ऑब्ज़र्वेशन्"  असल्यासारखा डाॅ.च्या संपर्कात होतो.
एखादा वैद्य आणि मानस्शास्त्रज्ञ पाठीशी खंबीरपणे उभे असले की, शरीर व मनाच्या व्याधींविषयी कसली चिंता असावी? याचा अनुभव या प्रवासात येतोय.

मनालीतल्या त्या वाढीव दिवसात खूप विविध विचार मनात आले. अगदी इथून कुल्लूला जाऊन दुसऱ्या मार्गाने प्रवास करूया इथपासून केलांग पर्यंत जाऊन तर बघूया इथ पर्यंत.
सात वाजता कोठीला जाणारी बस निघणार होती. मी सव्वा सहालाच बस स्टॅण्डवर जाऊन दूध पित गप्पा मारत पुढच्या वातावरणाचा-हवामानाचा अंदाज घेतला.
कोठीहून सुरू झाला "जे जे प्रतिकूल तेच बहुदा घडेल" असं वाटून गेलेला 30 कि मी सलग चढ असलेला रोहतांगचा प्रवास. वाटून गेलेला यासाठी कारण नंतर जे अनुभवत होतो ते फार विलक्षण होतं. आशेचा किरण कोणीतरी दाखवत असल्या सारखा चोहोबाजूंनी ढग-धुक्याने वेढलेले एक निळ्या आकाशाचे वर्तूळ सदैव डोक्यावर किंवा डोळ्यांसमोर असायचे. वातावरण कितीही बिघडलं तरी ते तसंच!
दृष्यमानता कमी झाली की तिथूनच प्रकाश पडायचा पुढील वाटेवर. मढ़ीला पोहचलो तेव्हा ऊन होतं. जेवण झालं आणि वर काळे ढग साचू लागले. सतरा किमी चा चढ बाकी होता. वाटेत बरीच जणं अंगठे दाखवत होती. गाडी मंदावत गप्पा मारत होती. फोटो काढण्यासाठी थांबवत होती- मला एक घोटभर पाणी प्यायला संधी देत होती.
शेवटचे तीन-चार कि.मी. आशेचा किरण नाहीसा झाला. चार वाजत होते. धुक्याने वाट दिसेना. चढ खडा वाटू लागला 1X2 च्या गीअर वर देखील काठीण्य जाणवू लागलं. पाऊस सुरू होत होता. वाऱ्याने उजवीकडून येत थेट कानात थेंब शिरावेत असा वारा!
सव्वा चारची वेळ येणाऱ्या गाड्यांना हात दाखवत, "ओर कितने किलोमीटर बाकी है?" हा प्रश्न विचारण्या इतका धीर सुटत चालला होता. पुढे 20-22 किमी. उतार उतरायचाय याची भितीही होतीच.
साडे चार वाजता जरा गर्दी दिसू लागली आणि मी रोहतंग ला पोहचलो होतो. हा आनंद स्नीकर खाऊन शरीराला ट्रीट दिली. दोन चार फोटो काढले. "आगे भी ऐसाही खराब मौसम होगा क्या?"
"सीर्फ दो किलोमीटर मौसम बिलकूल साफ हो जाएगा."
रोहतंगच्या दुसऱ्या बाजूला साफ मौसम असल्याचं मढ़ीतही ऐकलं होतं.
तरीही साशंक मनाने उतरायला सुरूवात केली. अर्धा किलोमीटरचा अवकाश. समोर दिसणारे विलोभनीय दृष्य डोळ्यांच्या काळ्या कैदेत बंद करून ठेवण्यासारखं होतं. काळे ढग मागे राहिले होते. समोर हिमाच्छादित शिखरांवर पश्चिमेकडील सूर्याचा प्रकाश पडला होता. त्यावरील पांढरा शिखराला उजळवीत होता.डोंगर रांगांमधून वाहणाऱ्या नद्यांचे ओहोळ गोठले होते. उजवीकडून डावीकडे हिरवळीकडून वाळवंटाचा मार्ग स्पष्ट दिसत होता.
मी हिमालयाचा यात्रिक होतो.
थोडे उतरलो आणि एक इंद्रधनुष्य!
हा कालिदास वरून माझ्यावर लक्ष ठेऊन आहे का?
"यक्षराजगृहात् उत्तरस्यां दिशि वर्तते अस्माकं गेहम्। सूरपतिधनुः च अरुणा तोरणेन अलंकृतं तद् दूरात् अपि लक्ष्यम्।"
दहावीतल्या यक्षमेघ संवादातली वाक्य आठवली. आपण हेच बघायला तर इथे आलोय! काल आलेले नकारात्मक विचार  वाईट वातावरणाबरोबरच मागे राहीले. पाऊस आणि वारा सुरू झाला. पण, त्या आनंदात रमून जात कोकसरला कधी पोहचलो हे समजलं देखील नाही.
#bgm #bergamontbicycles #starightfromstpauli #bergamontindia #pitambari
#सायकलोपासना #cyclopasana

भाषारत-9

23/8/18
हिमाचल...
धूके, पाऊस, श्वासाचे ठोके मोजायला लावणारे चढ, बोटं दुखवणारे उतार, घाट चढा-उतारावरच्या पूर्वीच्या अनेक आठवणी, थकवा शमवणारी दृष्ये आणि बरंच काही...

25/8/18

हिमाचल प्रदेश इतके शांत राज्य आहे की शाळेत डोकावल्या शिवाय शाळा सुरू असल्याचा पत्ता लागत नाही. अनेक दिवस सुट्ट्या असल्यामुळे शाळांमधे जाता आलं नव्हतं आणि मग वर सांगितल्याप्रमाणे नवीन राज्यातलं नवीन वातावरण! शाळा सुरू झाल्या आहेत हे समजायला तीन दिवस गेले.
काल बिलासपूर(हि.प्र.) हून मंडीला जायचे  ठरवले होते. नाश्त्याला थांबल्यावर यंदा पहिल्यांदाच शैक्षणिक स्थितीवर गप्पा मारता आल्या. या आधीच्या गावांमधे दुकानदार आणि शिक्षण यांचा सद्यशैक्षणिक स्थिती विषयी फारसं घेणं देणं नसल्याचा अनुभव आला होता.
सुंदरनगरला विविध महाविद्यालय आहेत असंही समजलं.  सरकारी संस्कृत महाविद्यालय तिथे असल्याचं समजताच तिथे जायचं ठरवलं. सुंदरनगर बस स्थानकापासून वर पहाडामधल्या या महाविद्यालयात पोहचता पोहचता तिथल्या खडतर जीवनाविषयी जाणीव झाली. आजुबाजूच्या नऊ जिल्ह्यातून मुलं इथे शिकायला आलेली आहेत. आणि संस्कृतसाठी या राज्यात बरेच 'अच्छे दिन' असल्याचे सानंद कानावर आले. आज संस्कृतदिवसाचा मोठा उत्सव संध्याकाळी सुंदरनगर मधे होणार आहे. माझ्यासाठी पर्वणी होती. कारण शासनाकडून अनुदान मिळवून संस्कृतोत्सव साजरा होणे, हे पहिल्यांदाच ऐकत होतो, ते अनुभवण्याची मज्जाच काही ओर!
दरम्यान  शिमला विद्यापीठात जायची खूप इच्छा होती  पण चार दिवसांची वाढ पुढचा लेहचा प्रवास अधिक खडतर करू शकेल असं सगळ्यांकडून ऐकून होतो. त्यामुळे शिमल्याला जाता याणार नसल्याची खंत होती. सायकल ठेवायची सोय झाली तर बसने एकादिवसात जाऊन येण्याचा विचार डोक्यात होता. सुंदरनगरमधे महाविद्यालयाच्या आचार्यांसमोर तो प्रकट केल्या केल्या त्यांनी मला निश्चिंतपणे सायकल आणि सामान ठेऊन शिमल्याला जाऊन यायला सांगितलं. शिमल्याची व्यवस्थाही लावून दिली.
सकाळी चाळीस किलोमीटर सायकल चालवत सुंदरनगरला पोहचलो होतो. नंतर चार-पाच तासाचा बसचा प्रवास. नुसते घाट! रात्री 9.30 ला तिथे पोहचे पर्यंत कधी एकदा प्रवास संपून झोपतोय इतकी शीणता वाढली होती. पण मी शिमल्यात होतो. गुलाबी थंडीत मुंबईत जसे वातावरण असते तसेच इथे होते. 14 अंशावर पारा होता. हिमाचलातील अनोखी शांतता होती. इतक्या रात्री एका नवीन शहरात उतरण्याची माझी पहिलीच वेळ! पण एक वेगळीच आर्द्रता या पौर्णिमेसाठी एक कला अपूर्ण असलेल्या चंद्राचा आनंद घ्यायला प्रोत्साहित करत होती. नंतर संस्कृत भारतीच्या कर्यकर्त्यांबरोबर   संस्कृतचा अभ्यास आणि हिमाचली बोलीवर नंतर साडे अकरापर्यंत गप्पा रंगल्या.

एकूणच यावर्षीचा संस्कृतदिनोत्सव विशेष प्रकारे साजरा करणार आहे यात शंका नाही!
आज दुपारी शिमल्याहून निघून संध्याकाळी सुंदरनगरला पोहचीन.

#bgm #bergamontbicycles #starightfromstpauli #bergamontindia #pitambari
#सायकलोपासना #cyclopasana
-शिमला

भाषारत-8

45 व्या दिवसानंतर आच 52 व्या दिवशी लिहीतो आहे.

"मा भूदेवं क्षणमपि च ते विद्युता विप्रयोगः..."
भैरवीत म्हटलेली ही ओळ अंगावर काटा आणून जाते. 110 श्लोकात खिळवणारं मेघदूत एका एकी संपत असतं. "आता तू सानंद संचार कर" (इष्टान् देशान् जलद विचर) म्हणणारा यक्ष त्याच्या आलका नगरीच्या वर्णनाने आलकेत अडकवून ठेवत असला तरीही, दिशाहीन करून सोडतो.
चुकूनही तुझा आणि वीजेचा वियोग होऊ नये असे शुभाशीष व्यक्त करतो.
मेघदूत संपतं.
हीच दिशाहीनता हरिद्वारला मनात दाटली होती. थांबून काहीतरी शिकूया असं खूप वाटत होतं, वाटत आहे.

आई-बाबा आणि सयुरी बरोबर दोन दिवस आराम केला. ऋषिकेशहून देहरादूनचा प्रवास. मी सायकलने आणि आई बाबांनी माझा भार, माझ्या दोन बॅगा उचलून खाजगी वाहनाने केला. देहरादून त्यांना फिरायचं होतं. पण मी एक दिवस आराम करायचा ठरवल्यावर त्यांनीही आराम केला.  मग निघतांना तेच मेघदूतातलं वाक्य...
"भो भूदेव किमर्थमयं मक्तूबे विप्रयोगः?" (अरे भूदेवा, हा वियोग विधिलिखित का?) विचारावंसं वाटलं. गंगेकडून यमुने कडे जातांना डोळ्यात गंगा यमूना उभ्या असायच्याच!

यमूना ओलांडून हिमाचल प्रदेशात शिरलो. यमुना नदीचे खोल विस्तीर्ण पात्र. दूरवर पसरलेल्या शिवालिक डोंगररांगा, घनदाट अभयारण्य, मी आणि माझी सायकल! ज्यात भय नाही असे 'अभयारण्य'. पण आधीपासूनच त्यात भय असेल तर? ते आभयारण्य असायला हवं!
असो, मजेचा भाग वगळता, छोट्या छोट्या मानवी वसत्यांमुळे आभयारण्य अभयारण्य झाली आहेत.
इथे एका गावातून जाताना एक सातवीतला विद्यार्थी सायकलवर अर्धा किलोमीटर माझा पाठलाग करत आला आणि गप्पा मारू लागला. नंतर त्याच्या घरी घेऊन जात, "मेरा फ्रेण्ड है," म्हणत आईशी ओळख करून दिली. शनिवारचा दिवस होता. म्हटलं, शाळेला सुट्टी आहे का?
"वो दिल्ली मे कोई तो मर गया है. इसलिए होलिडे."
माहीत नसलेल्या व्यक्तीच्या दुःखात बुडालेली शाळकरी मंडळी पुढे घराघरातून मला हात दाखवत टाटा करतांना दिसली.
काही ठिकाणी गप्पा मारल्या. काही ठिकाणी नमस्कार स्वीकारून पुढे गेलो.
साकेती जीवाश्म संग्रहालय याच डोंगर रांगांच्या कुशीत वसलं आहे. प्राणी आणि मानवांच्या व्युत्पत्ती विषयक सुंदर अभ्यासपूर्ण संकलन इथे आहे. शिवालीक डोंगर रांगा जीवाश्मसंशोधना साठी विशेष महत्वपूर्ण मानल्या जातात.
हिमाचल आणि हरियाणाच्या सीमेवर कालाआंब नावाचं गाव आहे. औद्योगिक प्रकल्प हिमाचल प्रदेशात आणि निवासी विभाग हरियाणात. तिथे एका मंदीरात मुक्काम केलं. ते मंदीरही अर्ध हिमाचल आणि अर्ध हरियाणात होतं! हरि बोल महाराजांशी भाषाशास्त्र व त्या प्रांतातील भाषेच्या अभ्यासावर चर्चा झाली. 3,500 कि.मी. चा प्रवास पूर्ण करून चंडीगढला पोहचलो. वास्तविक बरंच मागे यावं लागलं होतं. केवळ, पुढील लेह च्या मार्गाची तयारी करायला! सायकल सुसज्ज करणे. हवामानानुसार कपड्यांची सज्जता करणे, त्यासाठी चंडीगढ सारखं दुसरं शहर नव्हतं.

#bgm #bergamontbicycles #starightfromstpauli #bergamontindia
#सायकलोपासना #cyclopasana

भाषारत-7

दिवस 45- कनखल

गुरुपौर्णिमेला दुपार नंतर उज्जयिनीत पोहचलो.
    दुसऱ्या दिवशी संध्याकाळच्या प्रदोष पूजेची वेळ.   बाजूचे वातावरण भक्ती भावनेत दंग झालेले होते. तो छप्पर टाकलेला साही बाजूंनी बंद असलेला मंडप वीजेच्या पांढऱ्या दिव्यांनी प्रकाशिला होता. गाभाऱ्यातील मूर्ती काही कोस दूरपासून स्पष्ट दिसावी म्हणून विशेष प्रकाश योजना केली गेली होती. आज, 2018 ख्रिस्ताब्दी.

मी ती बघायला आलोच नव्हतो.

शंकराने रक्ताने माखलेले गजचर्माचे वस्त्र अंथरल्यामुळे भ्यालेली पार्वती ती प्रदोष पूजा कधीच पाहू शकली नव्हती. उज्जयिनीत असलेल्या विशाल वृक्षाला मेघ वेढेल. संधिप्रकाशात लखलखणाऱ्या वीजेने ते वृक्षाचे दृष्य अधिक भयावह वाटेल. आणि पार्वती प्रदोष पूजा बघू शकेल!
मी मेघदूतातले शब्द अनुभवत इथे, महांकाळाच्या मंदीरात पोहचलो होतो.

समोर मशाल पेटली होती.  एका विशिष्ट लयीत आरतीचे दिवे सजवलेल्या त्या महांकाळच्या मूर्तीभोवती फिरवले जात होते. हात जोडले होते. उभ्या उभ्या डोळे मिटले गेले.  घंटेच्या प्रत्येक नादागणिक आणि नगाऱ्याच्या प्रत्येक घोषागणिक वाढणारे छातीचे ठोके स्वतःला ऐकू येत होते. डोळ्यातून ओघळणारे पाणी दुःखाचे वा चिंतेचे नव्हते. शब्दार्थ विस्तारण्याचा अनुभव आनंद वाढवीत होता. तो शब्दातीत होता.

आषाढाच्या पहिल्या दिवशी रामगिरीचे दर्शन घेऊन सुरू झाला होता मेघ मार्गाचा प्रवास. आम्रकूटावर विसावलेले मेघ बघितले. विन्ध्य पर्वतांतून वाहणाऱ्या असंख्य नद्या ओलांडल्या. मागेवळून पाहणाऱ्यांचे नेत्र कटाक्ष स्वीकारले. चंबळ ओलांडली, गभीरा ओलांडली. पानिपताचे मैदान ओलांडून कुरुक्षेत्री पोहचलो. दूर्गा भागवतांचे शब्द आठवत यमुना(कालिंदी) ओलांडली. आता येऊन पोहचलोय कनखल क्षेत्री, हरिद्वारी! मेघदूताचा भौगोलिक मार्ग इथे संपतो. पूर्वमेघात सांगितल्याप्रमाणे इथे एक नेढं आहे. मेघाला स्वतःचा आकार बदलून त्यातून थेट स्वर्गापर्यंत पोहचता येईल.  आलका नगरीला जाण्याचा तोच मार्ग.

या प्रवासात अनेक वेळा शब्दार्थ विस्तारल्याचे अनुभव आले.

*एक ऋणनिर्देश*
संस्कृत मेघदूत कंठस्थ नसताना असे अनुभव येणे शक्य नव्हते.
या प्रवासात असंख्य वेळा सुप्रसिद्ध निवेदाका आ. धनश्री लेले यांचे शब्द कानावर असायचे. माझ्या दहावी बारावी नंतरच्या एका मे महिन्यात सुलोना संस्कृत संस्थानम् या संस्थेने मेघदूताचा कार्यक्रम डोंबिवलीत आयोजित केला होता. त्याचं ध्वनिमुद्रण मी माझ्या अँड्राॅड नसलेल्या मोबाईलवर केलं होतं आणि बरेच वेळा ऐकलंही होतं. मेघदूताची गोडी वाढवण्याचे मोठे श्रेय त्या कार्यक्रमाला आहे. तेच शब्द कानावर होते. त्यामुळे त्यांचे ऋणनिर्देश करणे मी कर्तव्य समजतो.

जे मला मातृभाषेतील शब्दांतून गवसलं. ते अन्य भाषेतून खचितंच मिळू शकलं असतं.
मातृभाषेच्या अभ्यासाची जागृती वाढवणे याच कामासाठी ही
#भाषारत #सायकलोपासना #bgm #bergamontbicycles #starightfromstpauli #bergamontindia बरोबर सुरू आहे.
कारण शेवटी-
अनादि निधनं ब्रह्म शब्दतत्त्वं यदक्षरम्|
विवर्तते अर्थभावेन प्रक्रिया जगतो यतः॥
हीच ब्रह्मकाण्डाची सुरुवात आहे.

भाषारत-6

दिवस 41-
"संधिप्रकाशात अजून जो सोने तो माझी लोचने मिटो यावी..."
वगैरे प्रेम कवितेतल्या ओळी आठवाव्यात अश्या संध्याकाळी एका अनोळखी शहरात पोहचलो. प्रचंड आनंद मनात दाटला होता. त्या कवितेचा पुसटसा विचार येऊनही गेला. पण, ही जागा त्या कवितेसाठी नव्हती! तो आनंदही त्या कवितेसाठी नव्हता.
'इति-ह-आस' हा शब्द ज्या साहित्यात सापडला तेच साहित्य बोलतं होत होतं, फक्त वातावरणाने.
एकदा वाटलं, आता शंखाचा नाद कानावर पडेल. आजचे युद्ध संपले. आता उद्या सकाळी पुढचं युद्ध सुरू होईल.
तर दुसरीकडे वाटलं कोणीतरी या अस्ताला जाणाऱ्या सूर्या समोरील ढग हाताने बाजूला सारील आणि म्हणेल, "हा सूर्य, हा जयद्रथ!"
चिता पेटेल.
यादवी नष्ट होईल.
मी कुरुक्षेत्रावर होतो.
आयुष्याचं सार जिथे सांगितलं गेलं त्या भूमिवर होतो, आहे. उद्या गीता मंदीरात जाऊन एखादं पान वाचावं. तिथे ज्ञानेश्वरांनी यावं, विनोबांनी यावं, लोकमान्यांनी यावं. गीतेचं पान पुन्हा नव्याने उलगडावं, याच धर्मक्षेत्री.
#bgm #bergamontbicycles #starightfromstpauli #bergamontindia
#सायकलोपासना #cyclopasana