23/8/18
हिमाचल...
धूके, पाऊस, श्वासाचे ठोके मोजायला लावणारे चढ, बोटं दुखवणारे उतार, घाट चढा-उतारावरच्या पूर्वीच्या अनेक आठवणी, थकवा शमवणारी दृष्ये आणि बरंच काही...
25/8/18
हिमाचल प्रदेश इतके शांत राज्य आहे की शाळेत डोकावल्या शिवाय शाळा सुरू असल्याचा पत्ता लागत नाही. अनेक दिवस सुट्ट्या असल्यामुळे शाळांमधे जाता आलं नव्हतं आणि मग वर सांगितल्याप्रमाणे नवीन राज्यातलं नवीन वातावरण! शाळा सुरू झाल्या आहेत हे समजायला तीन दिवस गेले.
काल बिलासपूर(हि.प्र.) हून मंडीला जायचे ठरवले होते. नाश्त्याला थांबल्यावर यंदा पहिल्यांदाच शैक्षणिक स्थितीवर गप्पा मारता आल्या. या आधीच्या गावांमधे दुकानदार आणि शिक्षण यांचा सद्यशैक्षणिक स्थिती विषयी फारसं घेणं देणं नसल्याचा अनुभव आला होता.
सुंदरनगरला विविध महाविद्यालय आहेत असंही समजलं. सरकारी संस्कृत महाविद्यालय तिथे असल्याचं समजताच तिथे जायचं ठरवलं. सुंदरनगर बस स्थानकापासून वर पहाडामधल्या या महाविद्यालयात पोहचता पोहचता तिथल्या खडतर जीवनाविषयी जाणीव झाली. आजुबाजूच्या नऊ जिल्ह्यातून मुलं इथे शिकायला आलेली आहेत. आणि संस्कृतसाठी या राज्यात बरेच 'अच्छे दिन' असल्याचे सानंद कानावर आले. आज संस्कृतदिवसाचा मोठा उत्सव संध्याकाळी सुंदरनगर मधे होणार आहे. माझ्यासाठी पर्वणी होती. कारण शासनाकडून अनुदान मिळवून संस्कृतोत्सव साजरा होणे, हे पहिल्यांदाच ऐकत होतो, ते अनुभवण्याची मज्जाच काही ओर!
दरम्यान शिमला विद्यापीठात जायची खूप इच्छा होती पण चार दिवसांची वाढ पुढचा लेहचा प्रवास अधिक खडतर करू शकेल असं सगळ्यांकडून ऐकून होतो. त्यामुळे शिमल्याला जाता याणार नसल्याची खंत होती. सायकल ठेवायची सोय झाली तर बसने एकादिवसात जाऊन येण्याचा विचार डोक्यात होता. सुंदरनगरमधे महाविद्यालयाच्या आचार्यांसमोर तो प्रकट केल्या केल्या त्यांनी मला निश्चिंतपणे सायकल आणि सामान ठेऊन शिमल्याला जाऊन यायला सांगितलं. शिमल्याची व्यवस्थाही लावून दिली.
सकाळी चाळीस किलोमीटर सायकल चालवत सुंदरनगरला पोहचलो होतो. नंतर चार-पाच तासाचा बसचा प्रवास. नुसते घाट! रात्री 9.30 ला तिथे पोहचे पर्यंत कधी एकदा प्रवास संपून झोपतोय इतकी शीणता वाढली होती. पण मी शिमल्यात होतो. गुलाबी थंडीत मुंबईत जसे वातावरण असते तसेच इथे होते. 14 अंशावर पारा होता. हिमाचलातील अनोखी शांतता होती. इतक्या रात्री एका नवीन शहरात उतरण्याची माझी पहिलीच वेळ! पण एक वेगळीच आर्द्रता या पौर्णिमेसाठी एक कला अपूर्ण असलेल्या चंद्राचा आनंद घ्यायला प्रोत्साहित करत होती. नंतर संस्कृत भारतीच्या कर्यकर्त्यांबरोबर संस्कृतचा अभ्यास आणि हिमाचली बोलीवर नंतर साडे अकरापर्यंत गप्पा रंगल्या.
एकूणच यावर्षीचा संस्कृतदिनोत्सव विशेष प्रकारे साजरा करणार आहे यात शंका नाही!
आज दुपारी शिमल्याहून निघून संध्याकाळी सुंदरनगरला पोहचीन.
#bgm #bergamontbicycles #starightfromstpauli #bergamontindia #pitambari
#सायकलोपासना #cyclopasana
-शिमला
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा