दिवस 45- कनखल
गुरुपौर्णिमेला दुपार नंतर उज्जयिनीत पोहचलो.
दुसऱ्या दिवशी संध्याकाळच्या प्रदोष पूजेची वेळ. बाजूचे वातावरण भक्ती भावनेत दंग झालेले होते. तो छप्पर टाकलेला साही बाजूंनी बंद असलेला मंडप वीजेच्या पांढऱ्या दिव्यांनी प्रकाशिला होता. गाभाऱ्यातील मूर्ती काही कोस दूरपासून स्पष्ट दिसावी म्हणून विशेष प्रकाश योजना केली गेली होती. आज, 2018 ख्रिस्ताब्दी.
मी ती बघायला आलोच नव्हतो.
शंकराने रक्ताने माखलेले गजचर्माचे वस्त्र अंथरल्यामुळे भ्यालेली पार्वती ती प्रदोष पूजा कधीच पाहू शकली नव्हती. उज्जयिनीत असलेल्या विशाल वृक्षाला मेघ वेढेल. संधिप्रकाशात लखलखणाऱ्या वीजेने ते वृक्षाचे दृष्य अधिक भयावह वाटेल. आणि पार्वती प्रदोष पूजा बघू शकेल!
मी मेघदूतातले शब्द अनुभवत इथे, महांकाळाच्या मंदीरात पोहचलो होतो.
समोर मशाल पेटली होती. एका विशिष्ट लयीत आरतीचे दिवे सजवलेल्या त्या महांकाळच्या मूर्तीभोवती फिरवले जात होते. हात जोडले होते. उभ्या उभ्या डोळे मिटले गेले. घंटेच्या प्रत्येक नादागणिक आणि नगाऱ्याच्या प्रत्येक घोषागणिक वाढणारे छातीचे ठोके स्वतःला ऐकू येत होते. डोळ्यातून ओघळणारे पाणी दुःखाचे वा चिंतेचे नव्हते. शब्दार्थ विस्तारण्याचा अनुभव आनंद वाढवीत होता. तो शब्दातीत होता.
आषाढाच्या पहिल्या दिवशी रामगिरीचे दर्शन घेऊन सुरू झाला होता मेघ मार्गाचा प्रवास. आम्रकूटावर विसावलेले मेघ बघितले. विन्ध्य पर्वतांतून वाहणाऱ्या असंख्य नद्या ओलांडल्या. मागेवळून पाहणाऱ्यांचे नेत्र कटाक्ष स्वीकारले. चंबळ ओलांडली, गभीरा ओलांडली. पानिपताचे मैदान ओलांडून कुरुक्षेत्री पोहचलो. दूर्गा भागवतांचे शब्द आठवत यमुना(कालिंदी) ओलांडली. आता येऊन पोहचलोय कनखल क्षेत्री, हरिद्वारी! मेघदूताचा भौगोलिक मार्ग इथे संपतो. पूर्वमेघात सांगितल्याप्रमाणे इथे एक नेढं आहे. मेघाला स्वतःचा आकार बदलून त्यातून थेट स्वर्गापर्यंत पोहचता येईल. आलका नगरीला जाण्याचा तोच मार्ग.
या प्रवासात अनेक वेळा शब्दार्थ विस्तारल्याचे अनुभव आले.
*एक ऋणनिर्देश*
संस्कृत मेघदूत कंठस्थ नसताना असे अनुभव येणे शक्य नव्हते.
या प्रवासात असंख्य वेळा सुप्रसिद्ध निवेदाका आ. धनश्री लेले यांचे शब्द कानावर असायचे. माझ्या दहावी बारावी नंतरच्या एका मे महिन्यात सुलोना संस्कृत संस्थानम् या संस्थेने मेघदूताचा कार्यक्रम डोंबिवलीत आयोजित केला होता. त्याचं ध्वनिमुद्रण मी माझ्या अँड्राॅड नसलेल्या मोबाईलवर केलं होतं आणि बरेच वेळा ऐकलंही होतं. मेघदूताची गोडी वाढवण्याचे मोठे श्रेय त्या कार्यक्रमाला आहे. तेच शब्द कानावर होते. त्यामुळे त्यांचे ऋणनिर्देश करणे मी कर्तव्य समजतो.
जे मला मातृभाषेतील शब्दांतून गवसलं. ते अन्य भाषेतून खचितंच मिळू शकलं असतं.
मातृभाषेच्या अभ्यासाची जागृती वाढवणे याच कामासाठी ही
#भाषारत #सायकलोपासना #bgm #bergamontbicycles #starightfromstpauli #bergamontindia बरोबर सुरू आहे.
कारण शेवटी-
अनादि निधनं ब्रह्म शब्दतत्त्वं यदक्षरम्|
विवर्तते अर्थभावेन प्रक्रिया जगतो यतः॥
हीच ब्रह्मकाण्डाची सुरुवात आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा