Day 62, 31/8/2018 कोकसर,
मी ज़े अनुभव घेतोय ते फक्त माझ़े आहेत. याची ज़ाणीव होणं वेगळा आनंद देऊन ज़ातं. महांकाळाच्या दरबारी आरती सुरू झाल्यावर, ऋषिकेशला दुथठी भरून अविरत वाहणाऱ्या गंगेच्या आरतीच्या वेळी किंवा आज, 53 कि.मी. चा शारीरिक आणि मानसिक क्षमतांचा कस लावणारा रोहतंगचा चढ चढून तिथे पोहचल्यावर आणि पार केलेल्यानंतरचे विस्मयकारी दृष्य पाहून डोळ्यातून घळा घळा वाहणारे पाणी फक्त त्या 'माझ्याच' असलेल्या अनुभवाचं असतं...
बाकीची मंडळी शरीराला आरामदायी वाटणाऱ्या वाहनातून माझ्यावर धूर, धूळ आणि क्वचित् खड्ड्यातला चिखल उडवत इथे पोहचलेली आहेत असा थोडासा अभिमानी हेकस भाव आनंद वाढवत असतोच. पण त्याहीपेक्षा आनंद असतो आपण बरंच काही कमावल्याचा!
काल चुकीच्या आहारामुळे पित्त उफाळून आलं. जेमतेम 10 किमीचा चढ पार केला होता. आणि नाश्ता करून झाल्यावर अर्ध्या तासात, पुढचे चार कि.मी. पूर्ण होण्याच्या आत शरीर भर असह्य खाज सुटून पित्त उठलं. डाॅ.सायलीशी फोन वर बोलणं झालं. आयुर्वेदानुसार उपचार सुरू करायला सायकल कोठीला एका हाॅटेलदारावर विश्वास ठेऊन मनालीला आलो. नंतर दिवसभर फोनवरून "अंडर ऑब्ज़र्वेशन्" असल्यासारखा डाॅ.च्या संपर्कात होतो.
एखादा वैद्य आणि मानस्शास्त्रज्ञ पाठीशी खंबीरपणे उभे असले की, शरीर व मनाच्या व्याधींविषयी कसली चिंता असावी? याचा अनुभव या प्रवासात येतोय.
मनालीतल्या त्या वाढीव दिवसात खूप विविध विचार मनात आले. अगदी इथून कुल्लूला जाऊन दुसऱ्या मार्गाने प्रवास करूया इथपासून केलांग पर्यंत जाऊन तर बघूया इथ पर्यंत.
सात वाजता कोठीला जाणारी बस निघणार होती. मी सव्वा सहालाच बस स्टॅण्डवर जाऊन दूध पित गप्पा मारत पुढच्या वातावरणाचा-हवामानाचा अंदाज घेतला.
कोठीहून सुरू झाला "जे जे प्रतिकूल तेच बहुदा घडेल" असं वाटून गेलेला 30 कि मी सलग चढ असलेला रोहतांगचा प्रवास. वाटून गेलेला यासाठी कारण नंतर जे अनुभवत होतो ते फार विलक्षण होतं. आशेचा किरण कोणीतरी दाखवत असल्या सारखा चोहोबाजूंनी ढग-धुक्याने वेढलेले एक निळ्या आकाशाचे वर्तूळ सदैव डोक्यावर किंवा डोळ्यांसमोर असायचे. वातावरण कितीही बिघडलं तरी ते तसंच!
दृष्यमानता कमी झाली की तिथूनच प्रकाश पडायचा पुढील वाटेवर. मढ़ीला पोहचलो तेव्हा ऊन होतं. जेवण झालं आणि वर काळे ढग साचू लागले. सतरा किमी चा चढ बाकी होता. वाटेत बरीच जणं अंगठे दाखवत होती. गाडी मंदावत गप्पा मारत होती. फोटो काढण्यासाठी थांबवत होती- मला एक घोटभर पाणी प्यायला संधी देत होती.
शेवटचे तीन-चार कि.मी. आशेचा किरण नाहीसा झाला. चार वाजत होते. धुक्याने वाट दिसेना. चढ खडा वाटू लागला 1X2 च्या गीअर वर देखील काठीण्य जाणवू लागलं. पाऊस सुरू होत होता. वाऱ्याने उजवीकडून येत थेट कानात थेंब शिरावेत असा वारा!
सव्वा चारची वेळ येणाऱ्या गाड्यांना हात दाखवत, "ओर कितने किलोमीटर बाकी है?" हा प्रश्न विचारण्या इतका धीर सुटत चालला होता. पुढे 20-22 किमी. उतार उतरायचाय याची भितीही होतीच.
साडे चार वाजता जरा गर्दी दिसू लागली आणि मी रोहतंग ला पोहचलो होतो. हा आनंद स्नीकर खाऊन शरीराला ट्रीट दिली. दोन चार फोटो काढले. "आगे भी ऐसाही खराब मौसम होगा क्या?"
"सीर्फ दो किलोमीटर मौसम बिलकूल साफ हो जाएगा."
रोहतंगच्या दुसऱ्या बाजूला साफ मौसम असल्याचं मढ़ीतही ऐकलं होतं.
तरीही साशंक मनाने उतरायला सुरूवात केली. अर्धा किलोमीटरचा अवकाश. समोर दिसणारे विलोभनीय दृष्य डोळ्यांच्या काळ्या कैदेत बंद करून ठेवण्यासारखं होतं. काळे ढग मागे राहिले होते. समोर हिमाच्छादित शिखरांवर पश्चिमेकडील सूर्याचा प्रकाश पडला होता. त्यावरील पांढरा शिखराला उजळवीत होता.डोंगर रांगांमधून वाहणाऱ्या नद्यांचे ओहोळ गोठले होते. उजवीकडून डावीकडे हिरवळीकडून वाळवंटाचा मार्ग स्पष्ट दिसत होता.
मी हिमालयाचा यात्रिक होतो.
थोडे उतरलो आणि एक इंद्रधनुष्य!
हा कालिदास वरून माझ्यावर लक्ष ठेऊन आहे का?
"यक्षराजगृहात् उत्तरस्यां दिशि वर्तते अस्माकं गेहम्। सूरपतिधनुः च अरुणा तोरणेन अलंकृतं तद् दूरात् अपि लक्ष्यम्।"
दहावीतल्या यक्षमेघ संवादातली वाक्य आठवली. आपण हेच बघायला तर इथे आलोय! काल आलेले नकारात्मक विचार वाईट वातावरणाबरोबरच मागे राहीले. पाऊस आणि वारा सुरू झाला. पण, त्या आनंदात रमून जात कोकसरला कधी पोहचलो हे समजलं देखील नाही.
#bgm #bergamontbicycles #starightfromstpauli #bergamontindia #pitambari
#सायकलोपासना #cyclopasana
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा