दिवस 75, 13/9/2018
बाप्पा अंत पाहत होता!
या शिवभूमी म्हणवल्या जाणाऱ्या चंबा खोऱ्यात एकही गणपती मंदीर असू नये! मनाने स्वीकारलं. रूपहीन शब्दात्मक ब्रह्माची आराधना करावी. अथर्वशीर्षाची आवर्तनं सुरू झाली. त्यांना गणना नव्हती. खिंडी पर्यंत चढून उतरणे आणि दुसरी खिंड चढणे एवढेच काय ते रस्त्याचे स्वरूप होते. मधेच खचलेला रस्ता आणि पाण्यात वितळणारे डोंगर, एक भयाण नैसर्गिक वास्तव दाखवत होते. रस्त्यात दिसणारी लाल फुलं "रक्तपुष्पैः सुपूजितम्" म्हणत बाप्पाच्या मूर्तिची आठवण करून देत होती.
हजार एक मीटर ऊंचीवर पोहचलो होतो. पूर्वेकडील दरीचे दृष्य साफ दिसत होते. काकिरा नावाचं छोटसं खेडेगाव. बाहेरील माणसाला सरकारी विश्रामगृहाचाच तेवढा आसरा! खोली मिळाली. "काही नाही तर बाप्पाच्या वडीलांचे दर्शन घेऊ." मनाची समजूत घालणं सुरू होतं. उगाच मनाचे श्लोक म्हणण्याची इच्छा झाली. "मना श्रेष्ठ धारिष्ट्य जीवी धरावे"
कसले धारिष्ठ्य नि कसले काय!
अंघोळ उरकून बाहेर आलो. गावात ढग शिरले होते. वादळी वाऱ्यासह पाऊस सुरू होता. रोजचच आहे! दिवसभर घामाने भिजवायचं आणि संध्याकाळी पाऊस. बसा खोलीतच!
तासाभरात सगळे निघून गेलेले होते. क्षितीजापर्यंत आभाळ खुले!
मंदीर शोधायला गावात फेरफटका मारला. शिवमंदीर वरच्या बाजूला असल्याचं समजलं. दुकानातून वस्तूही घ्यायच्या होत्याच. दुकानदाराकडे चौकशी केली. गणपती मंदीर नाहीये हे माहीत असूनही, "यहा पर कोई गणपतिमंदीर वगैरा है?" त्यानेही मी कुठून आलोय वगैरे विचारलं आणि खाली गणपति बसतो. आता आरती सुरू झाली असेल म्हणून सांगितलं. विकत घेण्यासाठी काढून ठेवलेलं सामान, "बादमे लेके जाता हूँ." म्हणत खाली गेलो. बाप्पाची मूर्ती बघून, "रूप पाहता लोचनी..." म्हणण्या जोगा आनंद झाला. शंकराची भजनं चालू होती.
शांत बसलो.
मन बेचैन होतं. घर, राधा नगर आणि समोर बसलेला बाप्पा!
वास्तविक चंबा हा एकमेव जिल्हा असा आहे की जिथे एका राजघराण्याचंच राज्य चाललं. त्यामुळे सार्वजनिक गणेशोत्सव वगैरे इथे साजरे करावे लागलेच नाही. दोन वर्षांपूर्वीच ही सार्वजनिक गणेशोत्सवाची प्रथा सुरू केल्याचं समजलं. मुंबईचं अनुकरण करण्याचा प्रयत्न!
एका आरतीत आरती आटोपली! बाकी पुरुषसूक्त आणि वैदिक देवतांच्या मंत्रांनी संध्यावंदन करावे तसे विधि. मनात आलं 'नये है यह. अजून बरीच प्रॅक्टीस बाकी आहे.'
कसलीही भीड न बाळगता एकदा जोरात ओरडूया...
आवाज दिला... "गऽणपती बाप्पा मोरया, मंगऽऽल मूर्ती मोरया." प्रतिसाद मिळाला.
चार पाच वेळा आवाज दिला. जीवात जीव आल्यासारखं वाटलं.
आता जरा बरं वाटतंय. बाप्पाने खरंच अंत पाहिला होता!
काल प्रथमेशशी बोलणं झालं. तसे आम्ही दोघे समदुःखी होतो. तो शिक्षणासाठी याच ऑगस्ट महिन्यात अमेरिकेला गेलाय. त्याचे शब्द आठवले, "एखाद वेळेस दिवाळी चालेल, गुढीपाडवा चालेल, पण यार गणपतीला घरी नाहीये. किती विचित्र वाटतंय! हट् यार!"
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा