बुधवार, ५ सप्टेंबर, २०१८

भाषारत-3

मेघमार्ग भाग-1

मुंबईत पावसाळा स्थिरावू पाहतो आहे. आषाढ लागला की चार-पाच दिवस न उघडणारे आकाश घरी बसलेल्यांना दरवर्षी पावसाळ्याचा विद्रूप चेहरा दाखवते. दुर्गभ्रमंती करणाऱ्यांसाठी, शेतकऱ्यांसाठी योग्य महिन्यात योग्य पाऊस पडण्यासारखे दुसरे सुख नसते. शहरवासीयांना मात्र पगाराचे आणि कार्यालयातल्या कामांच्या चिंतांचे खापर पावसावर तोंडसुख घेत फोडल्याशिवाय गत्यंतर नसते. नागरी असुविधा लख्ख दिसाव्यात म्हणून पाऊस स्वच्छ पाणी कोसळवीत असतो. शेतकऱ्यांसाठी देवदूत असलेला पाऊस शहरवासीयांना भेसूर वाटत असतो.
थोडक्यात, मुंबईतल्या पावसाला स्पिरीट चा वास आल्याने मुंबईच्या तोंडचे पाणी पळते!

मग अशी आखलेली मोहीम ऐकतांना अनेकांच्या मनात पावसापाण्याची चिंता फार. कधीतरी सांगावसं वाटतं- "कोकणातला पाऊस इज् कोकणातला पाऊस नन् ऑफ मध्यभारतातला पाऊस"

गंमतीचा विषय वगळता,
मला भारत फिरायचा तर आहे. पण, आपला प्रवास कसा करावा? सुरुवात डोंबिवलीपासून केली तरी जावं कुठल्या दिशेने? सुरू कधी करावं? या विषयावर विचार करण्यात काही दिवस घालवले.
आषाढाचा पहिला दिवस; पहिला ढग रामगिरीवर धडकेल, धडकला. हे वर्णन अनेकांना भूलवतं. कर्नाटकात तर 'यक्षगान' नावाचा लोकनृत्यप्रकार आहे. रामायण-महाभारत हे जसं भारतीय समाजात पेरलं गेलं, रूजलं; तितकंच विखूरलं गेलं एकसंध असलेलं कालिदासाचं मेघदूत.
मागच्या लेखात "मेघमार्ग दिसला" असं म्हटल्याप्रमाणे तिथी आणि पहिला मार्ग दिसला. आषाढाच्या पहिल्यादिवशी रामगिरीहून निघायचे.
त्यापूर्वीचा प्रवास ट्रेन ने करायचा का?
नाही तर! जर कालिदास मेघाला वाकड्यामार्गाने उज्जैनला पाठवू शकतो तर मी सायकलवरून डोंबिवली का वगळावे?
डोंबिवली-ओतूर-संगमनेर-टोका-औरंगाबाद-लोणार-वाशिम-मंगृळ चावला-वर्धा-नागपूर-रामटेक
आषाढाच्या पहिल्या दिवसाच्या 10-12 दिवस आधी निघून आषाढाच्या पहिल्या दिवशी रामटेकहून मेघमार्गाने हरिद्वार पर्यंत जायचे.
हा मेघ मार्ग, मेघ मार्ग म्हणजे काय रे भाऊ?
यक्षाला त्याच्या शहरातून एक वर्षभरासाठी तडीपार होण्याची शिक्षा दिली होती. तो रामटेकवर ऱ्हायला आला. बायकोची लै आठवण येत व्हती त्याला. मंग आषाढाच्या पहिल्या दिसी त्याला ढग दिसला. ढग तर  कुठे बी जाऊ शकतो ना! यक्षाने त्याला घरचा रस्ता सांगितला. आसं ढगाशी कोणी बोल्तं का? यक्ष, बिचारा एकटा व्हता ना! कोणाशी बोलणार? आठ महिने एकटा राहिल्यावर तो ढगाशी त्याचा भाऊ असल्यासारखा बोलला.
त्याने ढगाला सांगितलेला मार्ग म्हणजे मेघ मार्ग.

रामटेक-सावरी-बालाघाट-मुक्की-सम्नापूर-अमरकंटक-दिंडोरी-जबलपूर-भेडाघाट-उदयपुरा-देहगाव-विदिशा-सिहोर-एकलेरा-उज्जैन.

कालिदासाने उज्जैन पर्यंत खूप रेंगाळवलं मेघाला. हा मार्ग सूक्ष्म निरीक्षणं सांगत पूर्ण केला. पुढच्या मार्गात सूक्ष्म निरीक्षण होती पण रेंगाळलेपणा नव्हता. घाई होती अलका नगरी पर्यंत पोहोचण्याची.
उज्जैनच्या पुढचा मार्ग नंतर सांगीनच.
दरम्यान उज्जैन पर्यंतच्या मार्गात ओळखीच्या शाळा असतील, विशेष प्रयोगशील शाळा असतील तर जरूर कळवा.
  #bgm #bergamontbicycles #starightfromstpauli #bergamontindia ची #helix 3.5i बरोबर प्रवास करायला उत्सुक आहे...

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा