बुधवार, ५ सप्टेंबर, २०१८

भाषारत-2

प्रतिकूल तेच बहुधा घडेल (पूर्वतयारी)
हाती घेतलेलं काम सोडून देण्यासाठी आपण स्वतःलाच कारणं देतो. काम सुरू करण्या आधीच या कारणांची यादी करून ठेवली तर?
सावरकरांना दोन जन्मठेपांची शिक्षा सुनावली गेली होती. तिची अंमलबजावणी कशी आणि कधी सुरू होईल याची कोणालाच कल्पना नव्हती. अंदमानला जाण्या अगोदर डोंगरीच्या तुरुंगात असतांना केव्हा कुठला आदेश येईल ते अनिश्चित. एक राजकीय बंदी म्हणून बऱ्याच सवलती सुरुवातीला मिळाल्या. पण त्या घेतांना आखडता हात घेत "प्रतिकूल तेच बहुधा घडेल" या विचारांनी तयारी सुरू झाली.
पुण्यातील दोन रात्रीचे मुक्काम  सैनिकी अभियंत्यांच्या घरी होते. दर तीन वर्षांनी घर-बदल. भूजचा भूकंप, त्सुनामी नंतर  अंदमानातील पुनर्वसन अश्या असंख्य खडतर अनुभवांनी समृद्ध असलेले हे घर माझ्या तयारीसाठी माझी मुलाखत घ्यायला तयार होते. सर्व प्रतिकूल परिस्थिती निर्माण झाल्या असता काय करावे? यासाठी प्रतिकूल परिस्थितींची यादी त्यांनी माझ्या समोर ठेवली आणि समस्या परिहार करायला सांगितले. याचा फायदा पुढे होईलच आणि परतीच्या मार्गावरही झाला.
पुण्याला जातांना रोहन सोबत होता. एकमेकांना प्रोत्साहन देत कुठलाही त्रास न होता  पुण्याला पोहचलो. एक सर खोपोलीत भिजवून गेली होती.  बाकीचा सारा प्रवास ठणठण गोपाळा!येताना मात्र एकट्यानेच येण्याचे ठरले होते.
पुण्याला जाण्याचे एक मुख्य कारणंच खरेदी करण्याचे होते. मुंबईहून आणलेले कॅरियर सायकल ला बसले नाही म्हणून जातानाचे सामान रचित बरोबर ट्रेनने पाठवले. पुण्यात कॅरियर लावून मिळेल याच आशेने.
सुखावणाऱ्या आशांचा अपेक्षा भंग झाला की प्रतिकूल परिस्थिती निर्माण झाल्याचे जाणवू लागते. कॅरियर मिळाले नाही. परततांना ते सामान पाठीवरून आणण्या शिवाय पर्याय नव्हता.
हवामान खात्याचे भाकित सपशेल खोटे ठरले होते. पश्चिमेकडून येणारा उलटा वारा, ढगांचे आच्छादन काढून टाकलेला सूर्य शरीर पोळवीत वेग मंदावत होता. पाय, एकही दुखत नव्हता. पण बसून राहणेच कठीण होते.
ट्रेनमध्ये सायकल टाकून घरी येण्यासाठी कारणांची यादी मनात घर करू पाहत होती. 1-2 दा m-indicator वर ट्रेनचे वेळापत्रकही बघून झाले. हा मनाचा दुबळेपणा घात करू शकेल. असा विचार येताच; सावरकरांचे "प्रतिकूल तेच बहुधा घडेल" हा लेख आठवला.
आषाढात टळटळीत ऊन लागेल. उलटा वारा वेग अवरोधेल. बैठक सोलवटली जाऊन असंख्य वेदना होतील. चढावर गति कमावणारा प्रत्येक पाय कष्टदायी ठरेल. एखादे गावात जराही सहकार्य मिळणार नाही. कुठेतरी सायकल नादुरुस्त होईल.  भर पावसात कदाचित् दुरुस्त करावी लागेल. लेहचा चढ चढतांना ठरवल्यापेक्षा बरेच कमी अंतर पार करता येईल. राहण्याची व्यवस्था नव्याने करावी लागेल. सगळंच सामान पाठीवर वहावं लागलं तर?
10-15 किलोचे हे ओझे पाठीवर घेऊन सायकलवरच घरी पोहचायला हवं. एरवी 8 तासात पुणे-डोंबिवली सायकलिंग पूर्ण करू शकतो आज भलेही 12 तास लागतील.
पण, "जे जे प्रतिकूल तेच बहुधा घडेल!" असे गृहीत धरूनच मनाची तयारी आता पासूनच केली पाहिजे.
या प्रतिकूलतेतून अनुकूल मार्ग काढण्यासाठी
#bgm #bergamontbicycles #starightfromstpauli #bergamontindia ची #helix 3.5i  सरसावेलंच!...

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा