आजी आजोबा घरात असण्याने काय परिणाम घडतो?
एकदा जेवतांना आई बाबा सयुरी बरोबर या विषयावर चर्चा झाली. मागील पिढीचे आचार विचार पुढे देण्याचं काम आजी-आजोबांकडे सोपवलेलं असतं. मुलं जन्मजात निरीक्षक असतात. आई-बाबा वळण लागावं म्हणून ओरडतात, धम्मकलाडू देतात पण त्याच वेळी हक्काने गोड लाडू मागायची जागा आणि कौतूकादि लाड करण्याचं स्थान आजी आजोबांचं असतं.
घरातला सगळ्यात मोठा प्रेमाच्या मायेचा कोपरा आजी कडे असतो. "चांगलं रहावं, चांगलं खावं.... हे असं करू नये, वागू नये..." ही समजुतीची वाणी कितीही खट्याळपणे वागण्याला नातवावर संस्कार करत असते.
आमच्या घरात इतर सगळ्या नातवंडांमध्ये आजीचा सर्वाधिक सहवास मला लाभला. लहानपणी बोट धरून विठ्ठलमंदिरात घेऊन जाण्यापासून खूप दंगा केला म्हणून मला एक चापटी मारल्यावर स्वतःच रडे पर्यंत आजी बरोबर खूप आठवणी आहेत. तिने मला पांडुरंगावरची भक्ती दिली. आपण ब्राह्मण आहोत. आपल्यावर समाजात चांगलं राहण्याची जबाबदारी आहे. पण, मंदिरात गोकुळ-अष्टमीला सगळे एकत्र येऊन काला करतात. तो प्रसाद सगळ्यांनी खायचा असतो. भजन सुरू होतांना भक्ताच्या जातीचा एकच बुक्का असतो. हे सतत आजीच्या गोष्टींमधून माझ्यावर संस्कारित केलं गेलं. संघातील लोकांबद्दल आणि कामा बद्दल तिला नेहमी आदर होता. ती आपली माणसं आहेत. आपणच शाखेत गेलं पाहिजे. तिच्याकडून माझ्या कानावर भजनं, गवळणी, अभंग असं लोकहसाहित्य पडायचं. सुदाम्याचे पोहे, द्रौपदीची जरदारी चिंधी, विट्ठल कुंभाराची माती मळतांनाची गोष्ट, संत ज्ञानेश्वर, तुकाराम, नामदेवांच्या गोष्टी...कृष्णाच्या, रामाच्या, विट्ठलाच्या असंख्य गोष्टी तिने मला सांगितल्या. मी इंग्रजी शाळेत शिकत होतो. पण, "आपल्यात असं असतं" हे सांगायचं काम आजीचं! आपल्यात म्हणजे कोणाकडे? 'मराठी लोकांमध्ये'. अगदी लहानपणापासूनच मराठी माझा आवडता विषय झाला याचं कारण आजीचं हे "आपलेपण". मराठीच्या पुस्तकात आजीचे घड्याळ नावाची कविता होती. आजी म्हटली की डोळ्यासमोर उभी रहायला आकृती लागावी ती आकृती माझ्या आजीच्या स्वरूपात होती. नऊवारी काष्टा नेसलेला आणि त्यात ती झोपेतून उठवते आहे ही कवितेमधली कल्पना. आजीलाही तिच्या शाळेत या कविता होत्या. त्या तिच्या तोंडपाठ होत्या याचं आम्हाला आश्चर्यंच वाटायचं. माझी शाळा, विमान, आजीचं घड्याळ या कविता आम्ही पाठ करत असतांना तिला आमच्या पुढचे पाद आठवायचे.
आजीने तिच्या तारुण्यात खूप कष्ट सहन केले. कुळ कायद्यात जमीन जाऊ नये म्हणून आजोबा नोकरी सोडून (फरकांड्यात) खेडेगावात शेती करायला आले. आणि मुलांच्या शिक्षणासाठी राहता वाडा सोडून तालुक्याच्या गावी भाड्याच्या घरी कुटुंबाला हलवलं. साहजिकपणे पैश्याची चणचण रोजचीच. पण त्यातही आजीने सगळ्या मुलांना शिकवलं, स्वतःच्या पायावर उभं केलं. "कोणाकडूनही काहीही मागायचं नाही आणि घ्यायचंही नाही." हे तत्त्व तिने शेवट पर्यंत पाळलं आणि आमच्यावर बिंबवलं. माझ्या जन्मा आधीच आजोबा गेले. मग आजीला बाबांनी आणि काकाने डोंबिवलीला आणलं. नंतर आजोबांनी बांधलेल्या कासोद्याच्या घरात फक्त सणासुदीला एकत्र दिवाळी पुरती आजी रहायची. तिच्या सगळ्या सूनांपैकी ऑफीसला जाणारी एकटी माझी आईच, सगळ्यात धाकटी. आजी असायचीही आमच्याकडेच. पण मी सासू सुनांनी भांडणं आणि वाद फक्त मराठी मालिकांमध्ये बघितले. मतभिन्नता- पिढीतील आणि शहरी-ग्रामीण वातावरणातील बदलाने नक्की असायची. पण ते सगळे समजूतदारपणात विरून जायचे. सण आले की आजीमध्ये वेगळाच उत्साह संचारायचा. तेलवाती, तूपवाती, पूजेचे साहित्य यावर बारीक लक्ष ठेऊन ती तयारी करायची. आणि ते करतांना सगळ्या रूढी परंपरा आमच्या पर्यंत कशा पोहचतील याची दक्षताही घ्यायची. तिने तिच्या मुलांचे सुगीचे दिवस बघितले.
2011 साली एक काका अचानक गेले. सहा भावंडांपैकी एक! नंतर मोठी मुलगी गेली. त्यानंतर ती शरीराने आणि मनाने जे खचली, ती शेवट पर्यंत त्यातून बाहेर येऊ शकली नाही. त्यानंतर पूजेच्या तयारीसाठी पहिल्यांदा ती दूर राहिली तेव्हा मला खूप चुकल्या चुकल्यासारखं झालं होतं. पण नंतर ती अधिक खंगत चालली आणि आम्हाला त्याची सवय होऊ लागली. तिला लोळा-गोळा झालेलं आयुष्य अजिबात नको होतं. पण दुर्दैवाने तिच्या वाटेला दोन ते तीन वर्ष परावलंबत्व आलं. सयुरीचं लग्न उभं राहत होतं. आजीला भास होत होते. तिला बोलवायला मुलगा, मुलगी, आजोबा, तिचे आई वडील येत. "नातीचं लग्न झाल्यावर येते म्हणून सांग त्यांना आजी." तिला सांगितल्यावर ती भानावर येऊन हसायची.
डोळ्यावर कितीही ग्लानी असो, आजी संपूर्ण रामरक्षा माझ्या बरोबर म्हणायची आणि शेवटी नमस्कारही करायची. रामरक्षेची गोष्टच आहे. आमच्या शेजारी सावंत काकू रहायच्या. आजी आणि त्यांनी मिळून पुस्तक वाचत वाचत आम्हाला अथर्वशीर्ष शिकवलं. मग, "उच्चारण सुधरावं, जीभ हलकी व्हावी" म्हणून रामरक्षा स्तोत्र शिकवण्याचा प्रयत्न केला. मोठ्या आत्येला हे समजलं. तिने कुठूनतरी रामरक्षेची दोन छोटी पुस्तकं आणून दिली. माझी रामरक्षा पाठ झाली. आजीचे पाय असह्य दुखायचे. तेव्हा ती जोरजोरात कण्हत असे. "आजी गं शरीर जीर्ण झालं, दुसरं नवीन घ्यायची वेळ झालीये. रामाचा जप कर." असं म्हणत रामरक्षा मोठ्याने म्हणायला सुरुवात केली की आजी शांत व्हायची. वेदना पचवायची शक्तीच जणू तिला रामरक्षा देत असे.
तिला सगळीच नातवंडं आवडायची. पण मी जरा जास्तच. आज मी समोर असतांनाच तिने शेवटचा श्वास सोडला. आई, बाबा दोघंही तिला बघून आले, तिच्याशी बोलून आले. तिने कोणालाही काहीही उत्तर दिलं नाही. मी प्राणवायुमापक घेऊन आजीच्या हाताला आणि पायाला लावून हृदयाचे ठोके मोजायचा प्रयत्न करत होतो. तिचा श्वास मंद सुरू होता. तो हे माझे प्रयत्न सुरू असतांनाच थांबला. डोळे अर्धोन्मिलीत होते. जीभेची हालचाल पूर्ण थांबली होती. मी तिचा हात हातात घेतला, चार थेंब पाणी पाजलं. कपाळावर हात ठेवला. पाणी बाहेर आलं नाही. आजीने ते थेंब पीले होते. अशी माझी आजी संपूर्ण आयुष्य जगली. तिने नातवंडं, पत्वंडं पाहिली, मुलांचे सुखी संसार अनुभवले. तिच्या आत्म्याला सद्गती मिळो हीच रामाचरणी प्रार्थना.