मंगळवार, २८ जानेवारी, २०२०

आठवतंय?

आज
अनेक महिन्यांनी
आपल्याला मिळालेला
हा एकांत...
तूही किती आनंदली अहेस
तुलादेखील स्मरत असतीलच ना
साऱ्या आठवणी
सहवासातल्या
अपल्याच!

स्वच्छ आकाश
त्याचे निळे रंग.
कापसासारखे तरंगणारे
पांढरे ढग.
वाट चुकून भरकटलेला
एखादा मेघ
विसावा देणारा.
दूरवर दिसणारे हिरवेगार
डोंगर.
ताप्तं ऊन.
त्यात विसावा देणारं
जीव मुठीत घेऊन
उभं असलेलं
एखादं झाड
छाटलेलंच.

लांबसडक रस्ता
काही
वाहनं जीवघेणी
अंगचटीला आलेली
एका क्षणात संपवणरी
सारंच
भीतीही
भिववून
नाहिशी झालेली.

अंगावर आदळणारा वारा
घोघावणारा
कधी
मागून वेग देणारा
तर कधी
समोरून येऊन
आडवणारा.

लोकांचे
नेत्रकटाक्ष
आश्चर्यकारी.
कौतुकाची थाप देणारे
तर कधी वेडे ठरवणारे
आपल्यालाच!

गोंधळून गेलेली
जनावरं...
एकत्र मार्गक्रमण
करणाऱ्या आपल्याला
पाहूनच.

वर्षभराचे ऋतू
देशभरातल्या जागा
तिथल्या त्यांच्या छटा
विविधांगी.

सारं सारं काही
अगदी काही
महिन्यांपूर्वीचं...
ह्या एकांतात तुला
आठवत असतीलच
सारी स्वप्नं, सारे विचार
आपल्याबद्दलचेच
काही इतिहासातले
काही भविष्यातले
वृक्षहीन रस्त्यावर
तळपत्या सूर्याच्या
प्रकाशात पाहिलेले
मृगजळासारखेच!

आठवतायत ना?
-सम्प्रिः ।
28/1/2020
डोंबिवली-पाली यात्रा

https://anchor.fm/gandhar-dombivalikar/episodes/ep-ee89ua


डोंबिवली-पाली-डोंबिवली

28/1/2020

कोरोना पूर्वीच्या माघी चतुर्थीला या दौऱ्याला निघालो तेव्हा संकल्प वगैरे काही केला नव्हता. पण गणेश चतुर्थीला निघतोय म्हणून काहीतरी वेगळं, खास करावं असं मनापासून वाटलं. डोंबिवलीला पहिली गणपतीबाप्पा मोरया घोषणा देऊन जी टांग मारली सायकलला ती अथर्वशीर्ष म्हणतंच! त्याची आवर्तनां मागून आवर्तनं अगणिकवेळा होत राहिली. सायकलंचं चाक थांबलं की अथर्वशीर्षपठणही थांबायचं. या नियमाने डोंबिवली ते पाली  हा  प्रवास पूर्ण झाला. मधे अनेक विचार मनात डोकावत होते. नुकतंच झालेलं भारत भ्रमण, त्यानंतर झालेले सत्कार समारंभ वगैरे... घरी परतल्यानंतर हा पहिलाच मोठा दौरा होता. दुपारी माणगाव जवळ एका  झाडाखाली निवांत थांबून एक मौन संवाद घडला. तो असा- मी विविध अनुभव आणि ही सायकल...

माघ शुद्ध चतुर्थी शके 1941
आज 
अनेक महिन्यांनी 
आपल्याला मिळालेला हा एकांत...
तूही किती आनंदली अहेस
तुला देखील स्मरत असतीलच ना
साऱ्या आठवणी
सहवासातल्या 
आपल्याच!

स्वच्छ आकाश
त्याचे निळे रंग.
कापसासारखे तरंगणारे 
पांढरे ढग.
वाट चुकून भरकटलेला 
एखादा मेघ 
विसावा देणारा.
दूरवर दिसणारे हिरवेगार
डोंगर.
ताप्तं ऊन.
त्यात विसावा देणारं
जीव मुठीत घेऊन 
उभं असलेलं 
एखादं झाड
छाटलेलंच.

लांबसडक रस्ता
काही
जीवघेणी वाहनं
अंगचटीला आलेली
एका क्षणात संपवणरी 
सारंच
भीतीही
 भिववून 
नाहिशी झालेली.

अंगावर आदळणारा वारा
घोघावणारा
कधी
मागून वेग देणारा
तर कधी 
समोरून येऊन
आडवणारा.

लोकांचे 
नेत्रकटाक्ष
आश्चर्यकारी
कौतुकाची थाप देणारे
तर कधी वेडे ठरवणारे
आपल्यालाच!

गोंधळून गेलेली 
जनावरं
एकत्र मार्गक्रमण करणाऱ्या आपल्याला
पाहूनच.

वर्षभराचे ऋतू
देशभरातल्या जागा
तिथल्या त्यांच्या छटा
विविधांगी.

सारं सारं काही
अगदी काही 
महिन्यांपूर्वीचं
ह्या एकांतात तुला 
आठवत असतीलच 
सारी स्वप्नं, सारे विचार
आपल्या बद्दलचेच
काही इतिहासातले
काही भविष्यातले
वृक्षहीन रस्त्यावर
तळपत्या सूर्याच्या 
प्रकाशात पाहिलेले
मृगजळासारखेच!

आठवतायत ना?

#dombivli_cycle_club #cyclopasana #सायकलोपासना
-सम्प्रिः ।

डोंबिवली-पाली यात्रा


रविवार, १९ जानेवारी, २०२०

प्रतिक्रिया

अन्न शिजवल्या हातांना
प्रतिक्रियेची आस असते...

आला घास
पोटात कोंबल्यासारखे
चुळा भरायला
मागे वळलेले हात
अन्न शिजवल्या
हातांचे कष्ट-
धूण्यातले
सोलण्यातले
किसण्यातले
वाफवण्यातले
भाजण्यातले
वाटण्याले
लाटण्यातले
तळण्यातले
आनंदाने फुलून
चेहऱ्यावर ठेवलेल्या
स्मित हास्याने
भूकेल्या पोटी
वाढण्यातले
कधीच न वाटलेले...
कष्ट!
जाणवून देत असतात...
प्रतिक्रिया न देता
सुधारण्यातला वाव
काढून टाकत
चवीतली चव
कमी करत
भूक मारणारे
करंटे बनून मागे फिरणारे
भुक्कड हात!

कारण,
अन्न शिजवल्या हातांना
प्रतिक्रियेची आस असते...

पतंग

मकरावरल्या संक्रांतीचे
सण येतात
पतंग हवेत
झेप घेतात
काटाकाटीच्या स्पर्धेत
एकमेकांचे
मांजे कापून
भरदलावर उडत
गूल होत
कुठल्याश्या
झाडात.
फांदीवर.
अँटीनावर.
सळीवर.
वायरमध्ये.
अडकून पडतांना
चेहऱ्यावरच्या
कुत्सित हास्याच्या भावना
बघत
आताशा,
मी पतंग उडवणंच सोडून दिलंय...

आयुष्याचाच पतंग झालाय
त्याला उडवतंय कोण?
ते शोधतोय.

संक्रमण?
फार पूर्वीच होऊन गेलंय
गुंतलेला मांजा
न कापता
स्वतःलाच
सोडवता येईल कसा?
ते बघतोय

गाडी सुटली
त्या संध्याकाळी
संक्रात कोसळली होती
गाडी पोहचली माझ्या गावी.
रीळाला ढील देऊन
रीळ रीता करून
पतंग
भरदलावर सोडता
झाली होती
ती.

तेव्हापासून
सुटलेला मांजा
एकमेकांत गुंतत
भरदलात
पतंग भटकतोय...
गात,
'न कुठले नकाशी
न अनुमान काही'

संक्रांत...
प्रत्येक अक्षांशावर
कोसळत्ये
दररोज

त्या मांजाचं टोक
पायदळी तुडवलं गेलंय
अनेकींच्या...
मधला गुंता
वाढत गेलाय...
एखाद्या
झाडात.
फांदीवर.
अँटीनावर.
सळीवर.
वायरमध्ये.
कुठेतरी
अडकलेल्या मांज्यावर
वाऱ्याचे झुरके घेणारा
हा पतंग!

या पतंगाला
उडवणं
सोपं नव्हतं.
तिला कदाचित
जमलंच नसतं.
काचेची पूड करून,
मांज्यावर तार
मीच चढवली होती.
एका घावेत
ती,
पतंगच
सोडती झाली!

पायदळी तुडवल्या
मांज्याला
अजूनही काचेची धार आहे.
हेलकावे खाणारा
पतंग
अजूनही प्रतीक्षेत आहे.
मांज्यावरची काच
स्पर्शून
जाणीव होणाऱ्या
संवेदनशील.
नाजूक.
पण कणखर.
अश्या कुणी.
तिच्या...

आताशा,
मी पतंग उडवणंच
सोडून दिलंय...
आपल्या
मांज्यावरच्या धारेने
इतरांचे मांजे
कापल्यावर
भरदलावर
गूल होऊन
भटकत राहणारा
पतंग...
रोज कोसळणारी
संक्रांत...
गुंतणारा
मांजा...
सारं सारं...
जखमी करून
गेलंय...
कधीतरी
या कविता
लिहित्या...
बोटांना.

-सम्प्रिः।

बुधवार, १५ जानेवारी, २०२०

बेडूक

वैद्य असलेले जुळे आश्विनौ बाहेर पडतात ती वेळ. रात्र म्हणता येणार नाही अशी रात्र नाही पहाट म्हणता येईल असंही उजाडलेलं नाही. माघाकडे झुकणाऱ्या अष्टमीच्या चंद्राबरोबर तशीच थंडी पडलेली. खिडकीतून वाऱ्याचे लोट अधून मधून अंगावर काटा आणणारे. जागा- स्वच्छ. समोर दार, मागे खिडकी. इतर दोन्ही बाजूची अर्धी भिंत फरश्यांनी चकचकीत. पण, वरच्या भिंतीवर ओल येऊन पोपडे उडालेले.
नुकत्याच उठलेल्या काही पाखरांचा आवाज, मोराचा केकारव, डुलकी लागत असावी असं भासवणाऱ्या पेंगुळलेल्या रातकि़ड्याचा आवाज. वाऱ्याच्या झुळूकीबरोबर डुलणाऱ्या हुरड्यासाठी तयार झालेल्या ज्वारीच्या पीकांचा मागच्या शेतातून येणारा आवाज. बाकी सगळीच शांतता. आपण हालचाल केल्यावर खोलीत घुमेल इतकाच मनुष्यनिर्मित आवाज.
डोळ्यावरची झोप अर्धवट उघलेली असतांना अश्या नहाणी घर कम पाश्चात्य पद्धतीच्या शौचालयात बसलेल्या आपल्यावर, मागल्या बाजूला असलेल्या खिडकीवरच्या पाईप वरून एक बेडूक उडी मारतो. ही उडी अंगावर असेल तर?

अंघोळ करत असतांना समोरून मारलेली ही उडी बघितली आणि दुसऱ्या दिवशी घडू शकणाऱ्या प्रसंगाच्या कल्पनेने, त्या बेडकाचा बंदोबस्त करायला हवा असा, मानवी विचार मनात आला. टणाटण उड्या मारणारा तो बेडूक, सौर बंबाने गरम पाण्याची ऊब घेऊन अधिकच तरतरीत झाला. वर पोहचायची वाट शोधू लागला.

मातीत झोपायचं सोडून, विहिरीत रहायचं सोडून, बेडूक इथं कुडकुडायला का आला असावा?

दिवसभरात त्या बेडकाची जागा न्याहाळून हेरून ठेवली होती. दुसऱ्या दिवशी पहाटे आधी त्याचा शोध घेतला. त्याला बाहेर काढणं कठीण होतं. तो जमिनीवर आल्यावर त्याला छोट्या बादली खाली झाकून ठेवलं. मानवी स्वभाव! दुसरं करू तरी काय शकणार?

प्रत्येक जण आपापल्या कूपात (विहिरीत) राहणारा. प्रत्येकाला आपलाच कूप स्वच्छ, सुंदर आणि उत्तम वाटणारा. त्या कूपाच्या बाहेरचं जग विद्रूप, कुरूप मानणारा. आपलाच कूप वाढावा यासाठी आटापीटा चाललेला. या सगळ्या स्पर्धेपासून अलिप्त राहून जगू इच्छिणारा तो, भिंतीवरला बेडूक. भीती वाटावी त्याची, त्याच्या वेगळ्या विचारांची म्हणूनचकी काय, मानवी स्वभावाने त्याला बांधून टाकलं बंद बादलीत. काही वेळ बांधलेलं राहून तरी शिकेल एखाद्या कूपानुसार ढाळून घेऊन रहायला. लाल, हिरव्या, निळ्या, भगव्या किंवा पांढऱ्या झेंड्याखाली.

प्रभाकर पेंढारकरांच्या रारंग ढांगच्या एकशे चौऱ्याहत्तराव्या पानावर कर्नल राईट विश्वनाथला विचारतात-

"...ज्याचा जीवनाशी संबंध नाही आणि जे मनापासून पटलेलं नाही ते विद्यार्थ्यांना शिकवण्याची पाळी शिक्षकावर येते. राज्यकर्त्यांच्या लहरीनुसार संशोधनाचे विषय शास्त्रज्ञांना निवडावेच लागतात...
...सैन्यात नसेल पण बाहेर तरी तुली अपेक्षित असलेलं स्वातंत्र्य आहे का?”

लेखकाला ‘ह्या जगात सर्वसुखी माणसाइतकाच दुर्मिळ स्वतंत्र माणूसही आहे काय?’ हा प्रश्न सतावतोय.

-सम्प्रिः।