28/1/2020
कोरोना पूर्वीच्या माघी चतुर्थीला या दौऱ्याला निघालो तेव्हा संकल्प वगैरे काही केला नव्हता. पण गणेश चतुर्थीला निघतोय म्हणून काहीतरी वेगळं, खास करावं असं मनापासून वाटलं. डोंबिवलीला पहिली गणपतीबाप्पा मोरया घोषणा देऊन जी टांग मारली सायकलला ती अथर्वशीर्ष म्हणतंच! त्याची आवर्तनां मागून आवर्तनं अगणिकवेळा होत राहिली. सायकलंचं चाक थांबलं की अथर्वशीर्षपठणही थांबायचं. या नियमाने डोंबिवली ते पाली हा प्रवास पूर्ण झाला. मधे अनेक विचार मनात डोकावत होते. नुकतंच झालेलं भारत भ्रमण, त्यानंतर झालेले सत्कार समारंभ वगैरे... घरी परतल्यानंतर हा पहिलाच मोठा दौरा होता. दुपारी माणगाव जवळ एका झाडाखाली निवांत थांबून एक मौन संवाद घडला. तो असा- मी विविध अनुभव आणि ही सायकल...
माघ शुद्ध चतुर्थी शके 1941
आज
अनेक महिन्यांनी
आपल्याला मिळालेला हा एकांत...
तूही किती आनंदली अहेस
तुला देखील स्मरत असतीलच ना
साऱ्या आठवणी
सहवासातल्या
आपल्याच!
स्वच्छ आकाश
त्याचे निळे रंग.
कापसासारखे तरंगणारे
पांढरे ढग.
वाट चुकून भरकटलेला
एखादा मेघ
विसावा देणारा.
दूरवर दिसणारे हिरवेगार
डोंगर.
ताप्तं ऊन.
त्यात विसावा देणारं
जीव मुठीत घेऊन
उभं असलेलं
एखादं झाड
छाटलेलंच.
लांबसडक रस्ता
काही
जीवघेणी वाहनं
अंगचटीला आलेली
एका क्षणात संपवणरी
सारंच
भीतीही
भिववून
नाहिशी झालेली.
अंगावर आदळणारा वारा
घोघावणारा
कधी
मागून वेग देणारा
तर कधी
समोरून येऊन
आडवणारा.
लोकांचे
नेत्रकटाक्ष
आश्चर्यकारी
कौतुकाची थाप देणारे
तर कधी वेडे ठरवणारे
आपल्यालाच!
गोंधळून गेलेली
जनावरं
एकत्र मार्गक्रमण करणाऱ्या आपल्याला
पाहूनच.
वर्षभराचे ऋतू
देशभरातल्या जागा
तिथल्या त्यांच्या छटा
विविधांगी.
सारं सारं काही
अगदी काही
महिन्यांपूर्वीचं
ह्या एकांतात तुला
आठवत असतीलच
सारी स्वप्नं, सारे विचार
आपल्या बद्दलचेच
काही इतिहासातले
काही भविष्यातले
वृक्षहीन रस्त्यावर
तळपत्या सूर्याच्या
प्रकाशात पाहिलेले
मृगजळासारखेच!
आठवतायत ना?
#dombivli_cycle_club #cyclopasana #सायकलोपासना
-सम्प्रिः ।डोंबिवली-पाली यात्रा
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा