सरळ दक्षिणेकडे जातांना रस्ते डावी वळणं घेऊ लागले. वेगवान वारे वेग अवरोधू लागले. तस्तसं जाणवू लागलं,
आता रस्ता संपणार, जमीन संपणार... आणि समोर उरणार अथांग पसरलेला सागर, महासागर. पुढे काय? दाटून आली एक खिन्नता रस्ता संपण्याची. एक शांतता, रोहतांगच्या पलिकडल्या झिंग झिंग बार पासून, गूगल वर न दिसणाऱ्या पत्थरी ज्योत पासून दक्षिणेकडील प्रवास पूर्णतेची, शांतता! डोळे शोधू लागले तीन लाटा, तीन दिशेकडच्या- या भूमीचे पाय धूणाऱ्या; शोधू लागले एक चेहरा स्फूर्तिदायी, या प्रवासाला, विवेकाचा, आनंदी, मानवांमध्ये इंद्र ठरलेल्या नरेंद्राचा, योध्या संन्याश्याचा, स्वामी विवेकानंदांचा!
त्या उन्हात, वाऱ्यांचा आघात सहन करणाऱ्या नारळीच्या झापांचा आवाज ऐकणाऱ्या घामट्ट शरीरावर उभे राहणारे रोमांच बरंच बोलत होते. मी कन्याकुमारीत पोहचलो होतो. स्वप्न जगत होतो. या प्रवासा बरोबर स्वप्न जगायला शिकलो होतो.
"स्वप्न जगणं" किती पुस्तकी वाटतात ना हे शब्द? धनलालसेत न अडकलेली स्वप्न जगता येऊच शकतात. किंबहुना ती जगण्यासाठीच बघायची असतात. याची आता खात्री पटली आहे. पैसा कितीही कमावला तरी तो कमीच पडतो. पैश्याची स्वप्न पूर्ण झाली तरी त्यात संतुष्टी नाही. म्हणून ही धनलालसा नसण्याची अट!
कुवारबाव ते रत्नागिरीचा चढ उतार सायकलने पार करायचाय, भाट्ये समुद्र, आरे वारे मार्ग, पावस, गोवा आणि आताचे कन्याकुमारी! अगदी लहानपणापासून बघितलेली, बोलून दाखवलेली, बरीचशी चर्चिलेली स्वप्न. जगलो.
संकल्पच असे करावेत की स्वप्न जगता यायला हवीत. स्वप्नच अशी बघावित की त्यातून देशहिताचे काम घडू शकेल. हे कुठेतरी प्रबोधिनीने शिकवलं.
काम केलं की सोयी होत जातील. असा विश्वास गीतेने दिला.
जाणतेपण ते झपाटलेपण ही मालिका प्रवासात निवांत वेळ मिळाला की बघत होतो. स्वप्न जगणारा मी एकटाच नाही हे समजलं. सगळेच स्वप्न का जगू शकत नाहीत? असा प्रश्न बरेचदा पडला प्रबोधन गीतातलेच काही शब्द बदलले, ते असे-
संकल्पांनी बळ मिळवावे
संकल्पांनी बळीष्ठ व्हावे
उघड्या डोळ्यांनी हे दुर्लभ
स्वप्न गोजिरे असे जगावे
आजवरीचे स्वप्नद्रष्टे
धनचिंतेने रात्री निजले
नको तयांचे शब्द ऐकूनि
नकारांनी स्वप्न निजविले
स्वप्न जयांचे ध्येय झाले
स्वप्ननिष्ठ संकल्पचि केले
उघड्या डोळ्यांनी ते दुर्लभ
स्वप्न साजिरे जगते झाले
संकल्पांनी बळ मिळवावे
संकल्पांनी बळीष्ठ व्हावे
ख्रिस्ती नववर्षा निमित्त सगळेच नवीन संकल्प करतील. अगदी आदर्श वगैरे. त्यातले किती स्वतःच्या स्वप्नांकडे घेऊन जाणारे असतील? किंबहुना स्वप्नांवर विचार केलाय का कधी? परीक्षा पास होण्याची पराधीन स्वप्न बघण्यापेक्षा एखाद्याला सहज शिकवता येईल इतके विषयग्रहण पक्के करण्याचे स्वप्न किंवा संकल्प करून बघा, मार्कांची आसक्ती दूर होते.
हे प्रवचन देण्यासाठी एक किस्सा घडला. योगायोग, नियती, मक्तूब, सगळंच!
डाॅ. गौरी माहूलीकरांची भेट.
नाताळ्याच्या सुट्टीच्या काळात केरळात पोहचलो होतो.शाळा-महाविद्यालये बंद. कामाशिवाय नुस्ती सायकल चालवून कन्याकुमारीला पोहचण्याची इच्छा सोडल्यास बाकी काहीच प्रेरक नाही. कोची जवळ चिन्मय विश्वविद्यापीठ असल्याचं समजलं. माहूलीकर मॅडम कुलगुरू असल्याचं ऐकलं. म्हटलं जाऊन, बघून तर येऊया. कोचीहून निघत गूगलबाबाच्या मार्गदर्शनाखाली पेप्पथी(उच्चारण-पेबदी) गाव गाठलं. विश्वविद्यापीठापाशी पोहचलो. वेदांत्यांचे विद्यापीठ. समोर इमारत दिसत होती. पण भला मोठा वळसा घालत, जरासं चुकत, मुख्य दारापाशी पोहचलो. माहूलीकर मॅडमचा कुठलाही संपर्क नव्हता. मी मिळवण्याचा प्रयत्नही केला नव्हता. मुंबईहून आलोय. माहूलीकर बाईंना, मा. कुलगुरूंना भेटायचंय. असं सांगत त्यांच्या खोलीत प्रवेश मिळवला.
त्यांना माझी ओळख ठेवण्याचं कारणही नव्हतं. त्यांनी सहा वर्षांपूर्वी, मी स्नातकाच्या शेवटच्या वर्षाला शिकत असतांना एकदाच माझ्याशी संवाद साधला होता. मुंबई विद्यापीठाची रामटेकला अभ्याससहल गेली होती. आषाढाच्या पहिल्या दिवशी राज्यस्तरीय चर्चासत्र तिथे आयोजित केलं होतं. मी पहिल्यांदाच रामटेक बघत होतो. मेघदूताचं रामटेक! स्वप्न बघायची एकही संधी सोडत नाही ही जागा आणि मेघदूत. तीन दिवसांपैकी एका रात्रीच्या जेवणाच्या वेळी त्यांनी माझी चौकशी केली होती. पुढे काय करणार म्हणून!
मी त्यांच्या खोलीत प्रवेश घेतला. आणि हा संपूर्ण प्रसंग सांगितला. मेघदूताच्या मार्गाने प्रवास सुरू केला होता हे सांगितलं. नंतर अभिमानाची गोष्ट एकच होती की, नव्याने ओळख झालेल्या या गंधार बरोबर फिरत कुलगुरूंनी संपूर्ण विद्यापीठ दाखवलं. शंकराचार्यांचं जन्मस्थान आणि घर दाखवलं. जेवणही केलं. अजूनही तो मी नव्हेच असं वाटतंय.
चिन्मय विद्यापीठ भारतातल्या मोजक्या पाच भारतीय प्रयोगशील विद्यापीठांपैकी एक आहे. माझे अनुभव सांगतांना अभ्यासाचा दृष्टीकोन, त्याचा शैक्षणिकस्तरावर होणारा परिणाम आणि वेदांत हा विषय सोडू शकलो नाही. चंगळवादाकडे झुकणारी वाढती वृत्ती बघतांना विवेकानंद आठवत होते. जगापर्यंत वेदांत पोहचवायला सांगणारे. आपण आपल्या शिक्षणात किती विचार करतो वेदांताचा? गुणात्मक विकास सोडून गणनात्मक विकासाकडे सहज प्रवृत्ती असते. सगळ्यांचीच!
आपल्या संकल्पामध्ये गुण आणि गणन यांचा योग साधता यायला हवा. जगायला पैसा आवश्यक असला तरी पैसा म्हणजेच सर्वकाही नाही आणि पैश्या शिवायही जगता येणार नाही. मग पैसा किती असायला हवा? यातला योग साधता आला की, कुठेतरी दिलीप आणि पौर्णिमा कुलकर्णी यांच्या सारखं समाधानी आयुष्य जगता येतं. माझी काहीच ओळख नसतांना आनंदाने पाहूणचार करणारी जागा लहान असलेली पण मनाची दारं खुली असलेली घरं उभी राहतात. नाहीतर मोठी, रिकामी, दारं बंद असलेली घरं भारतात कमी निर्माण झालेली नाहीत.
असो,
सायकलवरून कन्याकुमारी बघायची स्वप्न अनेकांनी बघितली आहेत. त्यांना ती प्रत्यक्षात उतरवण्यासाठी शुभेच्छा देतो आहे.
माझ्या मनातली शांतता आणि खिन्नता उगवत्या सूर्या बरोबर मावळली नसती तर नवलंच. पूर्व बोलावतेय. पूर्वांचल बोलावतोय, उगवत्या सूर्याची भूमी बोलावतेय...
कन्याकुमारी, 1/1/2019