दिवस 175, 22 डिसेंबर 2018
बंडीपूर, 76 कि.मी.
पुनश्चारम्भ
काहीच लिहू नये असं वाटतंय... कारण सविस्तर लाहीणं म्हटलं की घटनांचा बारकाईने विचार करावा लागतो. आज तसा करणं व्यर्थ वाटतंय.
मैसूरु मध्ये लांबवलेला निवास गीतेच्या विचारांनी सुरू झाला होता आणि गीतेच्या विचारांनी संपला. "नसे दुःखात उद्वेग सुखाची लालसा नसे..."
कधी कुठे कशी राहण्याची व्यवस्था होईल याची कसलीही निश्चिती नसते. कुणाच्यातरी घरी राहणं म्हटलं आणि यजमानच खुलत नसेल तर आपणही किती बिंधास्त व्हावं यावर मर्यादा येतात. तर कधी कधी भाषा प्रांत कसलंच बंधन आड येत नाही. अगदी खुलेपणाने आनंदाने आपुलकीची भाषा अनुभवता येते.
केंद्र सरकारच्या भारतीय भाषा संस्थानाला भेट दिली. त्या दिवशी संचालक रजेवर होते. सहनिर्देशकांना (उपसंचालक) भेटलो तेव्हा त्यांनी संचालकांना भेटण्याचा आग्रह धरला. झोकून देऊन भाषांसाठी काम करणारी सगळीच मंडळी.
गीताजयंतीची तिथी होती. संस्थेच्या आंतरराष्ट्रीय अतिथिगृहात आलिशान निवास व्यवस्था उपसंचालकांनी केली होती... सुरक्षा रक्षकाने अतिथिगृहाच्या मुख्य दारापासून शंभर-दीडशे मीटर दूरच सायकल उभी करायची खूण केली. सवयी प्रमाणे चष्म्याच्या डब्यात वेगमापक ठेऊन चेनने बंद होणाऱ्या सायकल समोरील खोक्यात ठेवला. इमारतीच्या वर कॅमेरे वगैरे लावलेले दिसत होते आणि सुरक्षा रक्षक येण्या जाणाऱ्याला त्रास देतोय हे बघून मनात कुठलाही नकारात्मक विचार न घेता तिथूनच चार नग सामान उचलून आधी आत आणि नोंद वगैरे झाल्यावर वर पहिल्या मजल्यावर घेऊन गेलो.
एखादे ठिकणी पाकीट ठेवले असेल आणि सातत्याने ती जागा न्याहाळत बसलो तर आणखीन चार लोकांचे त्या जागेकडे लक्ष जाणारंच. या न्यायाने उगाच सायकल कडे फिरकून काही व्यवस्थित आहे का हे तपासायचे वगैरे टाळले. याच न्यायाने आजवर गोप्रो कॅमेरा वगैरे अगदी सुरक्षित राहिलेत. गावात अगर मंदीरात रात्रभरात सायकलवरचं सामान कधी कोणीही उघडून बघितलेलं नाही. आज काहीतरी वेगळं अनुभवणार होतो. सायकलवरचे दोन ताणदार दोर (बंजी काॅर्ड्स); राजस्थान मध्ये अश्वशक्तिधारी दुचाकीच्या धडकेत बॅग तुटल्यामुळे या दोरांचा वापर अनिवार्य झाला होता. ते ताणदार दोर जागेवर नव्हते. कुणी गरजू माझी गरज न समजल्याने घेऊन गेला असेल. डोक्याला फार त्रास न करता बॅगेतून दुसरा ताणदार दोर काढला. एकदम लक्षात आलं. सायकलस्वाराच्या गरजा न समजणाऱ्याला वेगमापका विषयी काही जाण असण्याची काय खात्री? ते एक घड्याळ आहे असं समजून ते गायब झालं होतं. 9250 कि.मी. पेक्षा जास्त अंतर पार केलंय म्हणणाऱ्या मला शेवटचा बघितलेला 9268 कि.मी.चा आकडा आठवला. बॅग उपसून बघतांना आणि पुन्हा खोली तपासतांना तो आकडा सोडून द्यावा लागेल यासाठी मन तयारी करत होतं.
अनेक स्वप्न जगतांना आत्ता आत्ता बघितलेलं मुल्यवान चार शून्य बघायचं स्वप्न आता राहून जाणार होतं. जगाला दाखवणारा रेकाॅर्ड वगैरे करायला हा प्रवास सुरू झाला नव्हता. त्यामुळे कुठलाही संकल्प वगैरे मोडला नव्हता. अहंकाराला पोषण देणारे अंक मात्र सुटले होते.
त्यामुळे फार विचार न करता निघूया असं ठरवलं. पण, हे सगळं बघणारे आणि त्यांच्या जीवाला लागलेले मित्र बरोबर होते.
भाषांतर शास्त्राचा अभ्यास करायला आलेला सोमय्या महाविद्यालयातला मित्र नयन आणि कालच नवीन ओळख झालेले त्रिपुराहून आलेले जयकुशल आणि वाराणसीहून आलेला शिवम्... लेखी नोंद झाल्या शिवाय मी जाऊ नये यावर ते ठाम होते. गेलेलं परत मिळणार नाहीये मग वेळ घालवून मी ठरवलेल्या आजच्या स्थळाला, बंडीपूरला पहचू शकणार नाही म्हणून घालमेल होत होती. 10,000 चा आकडा बघू शकणार नव्हतो तर निदान ख्रिस्ती वर्ष संपतांना दक्षिणतम तटाला, पोहचण्याचे तरी साधूया म्हणून निघण्याच्या मनःस्थितीत होतो. तर दुसरीकडे नोंद नीट ठेवायला हवी म्हणून दुसरं मन सांगत होतं. शनिवार-रविवारची सुट्टी बघता अधिकारी वर्ग तर भेटू शकणार नव्हता. पत्र लिहीलं. नयनने सगळी जबाबदारी स्वीकारली होती. पत्र अधिकाऱ्यांपर्यंत पोहचवायचं. वेगमापक जरी नाही मिळालं तरी एक हमी पत्र मिळवायचं वगैरे. आपल्यासाठी या मित्रांचा उत्साह बघितला की, "केन रत्नमिदं सृष्टं मित्रमित्यक्षरद्वयम्" हे वाक्य सहज आठवून जातं.
माझा प्रवास सुरू झाला.
"नसे दुःखात उद्वेग सुखाची लालसा नसे" वगैरे शब्द आठवत होते. त्या आलीशान खोलीत गेल्यावर माझ्यासाठी आवश्यक असणारे स्वच्छ संडास-स्नानगृह, कपडे वाळवायला पंखा, दाढी करायला आरसा सोडल्यास बाकी सगळ चैनीसाठी किंवा अनावश्यक होतं. चैनीसाठी गरम पाण्याची सोय, टि.व्ही-सोफासेट वगैरे बैठकीची खोली, गॅलरी अश्या काही अनावश्यक सुविधा होत्या. मन हळवं होत होतं ते खरं तर पुढच्या शब्दांनी, "गीताई आई माझी, मी तिचा बाळ नेणता, पडता रडता घेई उचलूनि कडेवरी..." डीकॅथलाॅन मधून नवीन वेगमापक आणि ताणदारदोरीचा जोड घेतला.
मैसूरु सोडले. आराम महागात पडला होता असं वाटत होतं. दत्त पौर्णिमेची तिथी होती. दक्षिणधृवाकडून मकर संक्रमण सुरू होण्याचा दिवस होता. तसा मूहुर्तंच! दत्त म्हणजे दिलेला. दा धातूचे क.भू.धा.वि. रूप. मागच्या वर्षी गिरनार चढतांना. "दत्तं दत्तं किं दत्तम्?" असा प्रश्न स्वतःला विचारत होतो. आज त्या प्रश्नाचं एक भौतिक उत्तर मिळालं होतं. उत्तर मिळालं की समाधान झालंच पाहिजे, नाही का?
बंडीपूरच्या वेशी पाशी मुरारजी देसाई निवासी शाळा आहे. इथे विद्यार्थ्यांबरोबर संवाद साधला आणि निवासाची व्यवस्था करविली.
Masta Mitra.. lihit Raha.. ani bhasharat aahesach... Tasach Raha... Char shunya pahna rahila he khara .. tyacha vait vatla.. pn kahi Karu Shakt nai.. aso.. shubheccha..
उत्तर द्याहटवा