शनिवार, ३१ मार्च, २०१८

साहस्री

2018 ख्रिस्ताब्दाच्या सुरूवातीपासून 18 हा आवडता आकडा असलेला 18 वर्षांचा अर्णव वर्षभरात अधिकाधिक सायकलिंग कसं होईल याच्या मागे लागला होता. गतिमापक (स्पीडोमीटर) पुनर्मूल्यांकित (reset) करून 1 जानेवारी नंतर  त्याने त्याच्या सायकलवर मारलेले प्रत्येक पेडल मोजले गेले. एखादा दिवस वगळता बाकी सगळे दिवस त्याच्या बरोबरच सायकलिंगला होतो. 
गुढीपाडव्याला मीही संकल्प केला. वेगो न वापरण्याचा. आमावस्येला पेट्रोल भरलं, ते रात्री फडके रोड फिरून आल्यावर गाडी पार्क करून पुन्हा न काढण्याचे ठरवूनच!
सुदैवाने आजच्या पौर्णिमेपर्यंत मला तिला हात लावायचा मोहही झालेला नाही. संकल्प जाहीर केले की ते पूर्ण करण्यासाठीची जबाबदारी ते माहिती असणाऱ्यां बरोबर वाटली जाते. आज तसेच व्हावे म्हणून तो संकल्प जाहीर करतोय. फिरतांना बाईक किंवा मोपेडची मदतही घ्यायची नाही आणि स्वतः चालवायचीही नाही. हा वर्षभराचा संकल्प आहे. चारचाकीचा वापर हा चांगल्या रस्त्यां अभावी फारच मर्यादित प्रमाणात होत असल्याने, आणि तोही एकट्यासाठी कधीच करत नसल्याने तिला या संकल्पातून सूट मिळाली. पुण्यामधे वारंवार जाणं होतंय. पण तिथे जेव्हा केव्हा जाईन तेव्हा गेल्यावर शिवाजी नगर स्थानकाजवळ सायकलची सोय झाली तर संकल्प काटेकोर पाळण्यास मदत होईलच.
असो, माझ्या संकल्पामुळे अर्णव शिवायही बरंच सायकलिंग होत असलं तरीही, नोंद ठेवलेल्याची भूलोकी गणती होते. बाकीचे वरूणाक्षांनी घेरलेले इंद्राप्रत पोहचते. हे जाणून तीन महिन्यात 1000 कि.मी. पूर्ण केल्याचे अप्रूप वाटल्या वाचून राहीले नाही.
तसा हजार हा आकडाच मला माझ्या कल्पना विश्वात घेऊन जातो.
"पावसाळ्यातल्या आषाढात, खंडाळ्याच्या घाटातला प्रवास करून पुणे विद्यापीठातल्या संस्कृत विभागात वेदाच्या तासाला मी बसलो आहे. त्यात बाई अथर्ववेदातील वरुणदेवाचे मंत्र शिकवता आहेत. कालच्या प्रवासात घाट उतरतांना काळ्या कभीन्न मेघांतून लाखाखत्या हजार डोळ्यांनी माझा वेध घेतला. ते डोळे दाखवणाराच वरुणदेव!
हे समजल्यावर चेहऱ्यावर फुलणारं हास्य बाईंपासून लपत नाही.'ज्ञातव्यं ज्ञातवान्' (समजायचं होतं ते समजला) याची जाणीव बाईंना होऊन त्यांच्याही चेहऱ्यावर स्मित दिसतं. आणि पुढल्या मंत्रात सहस्रपाशांनी बांधलेला अनृत वागणारा कोणी...", वगैरे वगैरे हजाराची गणना ती कोण व कशी करणार.
#21_days_challenge साठी रोज एकाच ठिकाणी जाऊन आलेला कंटाळा मोडून काढायचा होता. म्हणून अर्णवने खारघर ला जाण्याचे ठरवले. त्याने नुकताच हा रस्ता हेरला होता. 1000 कि.मी. 50 एक कि.मी.  सायकलिंग करून ओलांडणार हा विचार सुखावून जात होता. #dombivli_cycle_club ची नवीन जर्सी घालायला हे कारण पुरेसं होतं.
खारघरला अर्णवची सहपाठी कालिंदी भेटली. कामत काका-काकूंनी खारघर ला चहापानाने छान पाहूणचार केला. सहज कोणाच्याही घरी न जाण्याच्या माझ्या आड वृत्तीला ओलांडले गेले. या सगळ्यात भर म्हणून ऊन्हाळ्यातल्या सकाळी भोवनी केलेले कलिंगड साक्षीला होतेच. वरुणही सूर्यासमोर येऊन आपली प्रसन्नता दाखवत होता.
एक टप्पा पार केल्यावर पुढील वाटचालीची स्वप्न सहजच फुलतात. तसंच आता सायकलोपासनेच्या पुढील टप्प्याची कुणकुण लागली आहे.
-सम्प्रिः|

गुरुवार, १५ मार्च, २०१८

प्रयोग

पुण्याहून फोन आला. "तुझ्या नावाशिवाय चालू असलेली एका 'त्या' विद्यार्थ्या विषयीची चर्चा ऐकली. मानसोल्लास शिकवतांना बाईंनी तू करून आणलेल्या मुद्गसूपाविषयी,  तुझं नाव घेऊन, दूरवरून येणाऱ्या एका विद्यार्थ्याचा प्रयोग सांगितला गेला. त्या चर्चेतला 'त्याच्या' बरोबरच मी शिकलो आहे."
मनोमन आनंद झाला. मार्कांमध्ये न तोलता येणारी ही पोचपावती होती.😇

प्रयोग!
मी जोवर प्रयोगशील आहे, तोवर जीवंत आहे. माझ्यातली प्रयोगशीलता जेव्हा संपेल तेव्हा मी मेलेलो असीन. प्रबोधिनीचा एक विचार स्वतःत भिनवायचा प्रयत्न करतोय. "रोज काहीतरी नवीन सुचलेच पाहीजे; कालच्या पेक्षा आज पुढे गेलेच पाहीजे." सायकलोपासना करतांना नाविन्याला अभिव्यक्त होता न आल्याने येणारी उदासीनता दिवस वाया गेल्याची जाणीव करून देते. अस्वस्थ करते.

पुण्यात शिकत असतानाची गोष्ट. सदाशिव पेठेत फिरतांना संस्कृत अभ्यासकांविषयी एक कडवी टीका ऐकली. "वर्षोंवर्ष लोकांसाठी निरुपयोगी असलेले प्रकल्प करणारे बघायचे असतील तर संस्कृत क्षेत्राकडे बघा!" त्या क्षणी प्रचंड रागही आला. पण, नंतर विचार केला. खरंच तर आहे! काही दोनशे वर्ष आणि काही तर असंख्य वर्ष न संपणारे प्रकल्प सध्या पुण्यातल्या विविध संस्थांमध्ये चालू आहेत. एखादा खंड प्रकाशित होतो. शास्त्रज्ञ काळ्यापुठ्ठ्यातली पानं वाढवतात. पदव्यांचे कागद घरी फ्रेम वगैरे करून लावले जातात. पण, त्यांची लोकोपयोगिता काय? असा विषय मानधन मिळणारे अभ्यासक टाळतात तरी किंवा दुर्लक्षित तरी करतात. मीही तसं  करून टीकेचं धनी न होण्याचा निश्चय झाला. आणि चालू असलेल्या अभ्यासात काय प्रयोग करता येतील यावर विचार चक्र सुरू झाले. अकराव्या शतकातील राजाच्या स्वयंपाकघरात बनणारे पदार्थ आमच्या अभ्यासात होते. तोंडी परीक्षेला जाण्यासाठी सकाळी साडेतीन वाजता उठलो. स्वतःची चित्रफित बनवत मुद्गसूप (त्या काळात बनवली जाणारी मुगाची डाळ) बनवले आणि पुणे गाठले. माझ्या तोंडी परीक्षेसाठी वर्गात शिरलो ते डबा बाईंना देण्यासाठीच!
मल्लिनाथी रचता येणं म्हणजे संस्कृतपंडीत होणं या पारंपारिक विचाराने संस्कृतमधील प्रयोगशीलता नष्ट झाली आणि त्या बरोबरच संस्कृत मृत वाटू लागली. मल्लिनाथी मनातल्या भाषेत व्हायलाच हवी आणि प्रकट व्हायला हवी ती, कृती! हे ज्यांनी जाणलं तेच खऱ्या अर्थी भाषेचे अभ्यासक होऊ शकले.

कारण, शब्दांचे रीघ रचत विषयांवर खल करणं अगदीच सोपं असतं. प्रत्यक्षात काम करायची वेळ आल्यावर अनेकांचं शेपूट आत गेलेलं असतं. शेवटी, बोली भाषा हे संवादाचं अधमतम माध्यम आहे; जेव्हा ती उत्तम होते तेव्हा साहित्य निर्माण झालेले असते. संवाद बहिरावयवांपासून परेपर्यंत पोहचलेला असतो. माणसाने बोलण्यातून व्यक्त होण्यापेक्षा कृतीतून व्यक्त व्हायला शिकायला हवं.

हे जितकं अभ्यासाच्या बाबतीत खरं आहे तितकं व्यावहारीक जगातही तसं वर्तन करता यायला हवं. आज स्वतःची भाषा सोडून इतरांना समजावं म्हणून परकीय भाषांना दिले जाणारे महत्त्व यामुळे गौण करता येऊ शकेल. स्वतःची भाषा स्वतःला ओळखता यायला हवी. तीत स्वतः पारंगत व्हायला हवं. भाषा उसनी घेऊन तिच्यात कधी अभिव्यक्त होता येत नाही. परिपूर्ण अभिव्यक्ती ही स्वतःच्याच भाषेत होत असते.

संस्कृत भाषा शिकायला सुरूवात करून तपोपूर्ती होत असल्याची जाणीवही खूप सुखावते आहे. भाषेवर असंख्य प्रयोग करायचे आहेत. भाषेतले असंख्य प्रयोग कृतीरूपात आणायचे आहेत. संस्कृतला बोलतं करायचं आहे, प्रयोगांतून! इंग्रजीचा तिरस्कार करत जिच्याकडे वळलो. तिने मला भाषेवर प्रेम करायला शिकवलं. भाषेला भाषेचं बंधन नसतं हा संस्कार करविला. असंख्य विरोध झेलंत हा भाषेचा प्रवास चालू आहे.
असो, कृतिशीलता बरंच काही बोलून जाते...
निष्क्रीय यू.जी.सी.च्या अधिपत्याखाली राहून पुणे विद्यापीठाच्याही विस्मरणात गेलेले यः क्रियावान् स पण्डितः। असे विद्यापीठाचे बोधवाक्य विद्यार्थ्यांच्याच प्रयोगांतून उलगडता येऊ शकते हेच खरे...
-सम्प्रिः।

गुरुवार, ८ मार्च, २०१८

महिलादिन

आज महिलांसाठी आयोजित केलेली महिला दिन विशेष- दुर्गाडी किल्ला सायकल भ्रमंती प्रोत्साहनदायी ठरली. तीन नेहमी सायकल चालवणाऱ्या महिलांबरोबर दहा नवीन सायकलस्वार महिला यात सहभागी झाल्या होत्या. काहींसाठी हे  अनोखे नाविन्य स्वतःची ओळख नव्याने स्वतःलाच करवून देत होते. अनेक दशकांनंतर सायकलवर बसल्यावर आलेले दडपण. काॅलेज संपल्यावर आजवर कधीच कुठल्याही क्रिडेत भाग न घेतल्याने आलेला न्यूनगंड. "मी करू शकीन का?" या मनातल्या प्रश्नाला मुखावाटे वाट मोकळी करून देत स्वतःच्याच कर्तृत्वाने  10-12 कि.मी.  सायकल चालवून, स्वतःच्या मर्यादा स्वतःच ओलांडल्या गेल्याची जाणीव; कामातून वेळ काढून विचार करायला उसंत मिळाल्यावर  सहभागी झालेल्या नवीन सायकलस्वारांना नक्कीच झाली असेल, यात शंका नाही.

सायकलिंग मधे पैसा नसला तरी एक प्लसपाॅईंट आहे.
फूटबाॅल, क्रिकेट, खोखो, कबड्डी यांच्या स्पर्धा विशिष्ट वयोगटासाठी शाळेपासूनच लढवल्या जातात. प्रोत्साहन आणि पाठिंबा समाजातल्या सर्व स्तरांवरून दिला जातो. लोकव्यवहाराशी या क्रिडांचा फारसा संबंध येत नाही. सुदैवाने सायकलचे तसे नाही. ती जनांची आहे. लोकव्यवहारापासून सायकलिंग सुरू होते. त्यात स्पर्धा स्वतःशीच करावी लागते. अगदी शरीरापासून मनापर्यंत बौद्धिक विषयांपासून सामाजिक जाणीवांपर्यंत, घरातल्या परिस्थिती पासून देश स्थितीपर्यंत स्पर्धा स्वतःशीच असते. दालनं सदैव खुली असतात. अश्या या सायकलशी गट्टी जमावी म्हणून एक खेळतं वातावरण निर्माण करणं हे आपलं प्रत्येकाचं कर्तव्य असल्याची जाणीव होणे आवश्यक आहे. बारावी उत्तीर्ण झालेली पिढी एकदा का अश्वशक्तीधारी वाहनांच्या हाती सापडली की ती वाया गेली, असं मी म्हणतो. जिची गोडी लहानपणापासून लागावी अशी एक मैत्रीण आयुष्यात एकदा तरी भेटून जाते. त्या भेटीतच गोडी लावण्याची गरज आहे हे नाकारता येणे कठीण आहे.
"प्रलोभने जरी असंख्य सोसते सायकल
आपुल्या मनामनात राहते सायकल"
ती मनातून पायापर्यंत आणण्याचं काम जेव्हा घडेल तेव्हा खऱ्या अर्थी महिला दिन सफल होईल. शेवटी सायकलही "ती"च असते. तिच्या उपासनेची गोडी लागणं म्हणजेच सायकलोपासना आचरणात आणणं होय!
महिला दिनाच्या शुभेच्छा!!!
सम्प्रिः।

सोमवार, ५ मार्च, २०१८

क्रेझ

कृतीशीलता कमी होण्याचं कारण विचाराल तर, ते चर्चेच्या उत्तरापर्यंत घेऊन जातं. चर्चा करण्यात इतका वेळ घालवला जातो की, प्रत्यक्षात काम करायचं राहून गेल्याचं लक्षातही येत नाही! कृतीला गती देणारी चर्चा घडणार नसेल तर, ती न झालेली बरी. चर्चेची साधनं मुबलक प्रमाणात वाढली आहेत. सोशल मिडीया तर रोज ऊफाळून वाहत असतं. एखादा काय वागतोय? ते बरोबर की चूक? याच्या चर्चा. अगदी सायकलिंगला कुठे जायचं? तिथेच का? यावर चर्चा, घर बसल्याच! किती वाजता निघायचं? तेव्हाच का? यावर चर्चा, घर बसल्याच! अरे बाहेर तर पडा, भेटा तर खरं, मग ठरवा!

सगळ्यांचे लाईव्ह स्टेटस अपडेट्स, सायकलवरून तोल जातानाही लाईव्हच! बघणाराही काय रंगात येऊन इतरांना दाखवेल, काही नेम नाही!
अश्या या क्रेझला उद्देशून एक प्रश्न आहे...

मी काय करतोय हे तुम्हाला का पहायचंय?
फेसबूक, इन्स्टा, व्हाॅट्स अॅप, माझं का बघायचंय?

कोण आहात माझे तुम्ही?
मित्र, की नातेवाईक?
भेटला आहात का कधी?
काल-परवा की दशकांपूर्वी?

सहज, चुकून की ठरवून?
ते नाते, आहे का अजून?

का मिडीया वरच्या चर्चेत
मन झालंय कलूषित?
ओळख दाखवायला देखील
कारण शोधताय कदाचित!

अहो राहू द्या राहू द्या

जवळ आलोय इतके
की, अपमान होतात भराभर
दुरूनच डोंगर साजरे
कुणी म्हणून गेलंय खरोखर

रोज भेट, मिडीया पेक्षा
प्रत्यक्षात कधी घडावी
दृष्य पूर्वग्रहांपेक्षा
थेट ग्रहदिशा पहावी!

मिडीया काय दाखवत राहील
पूर्वग्रह वाढवत राहील
कामापेक्षा विचारांत
वेळ जास्त घालवत राहील

फिरता फिरता या गावाला
करू जरा चहा-पाणी
टी.टी.एम.एम की ट्रीट कुणाची
ते ठरवू भेटूनच, संवादा अंती

आता फक्त जरा उत्तर शोधू म्हणतोय...

मी काय करतोय हे तुम्हाला का पहायचंय?
फेसबूक, इन्स्टा, व्हाॅट्स अॅप, माझं का बघायचंय?

-सम्प्रिः।

गुरुवार, १ मार्च, २०१८

फाल्गून

सोमय्यात असतांना दृष्टी फिल्म फोरम मुळे चित्रपट बघण्याचं व्यसन लागलं. सत्यजित रेंच़े चित्रपट मनाला बंगाली शिकण्याकडे खेचून घेऊन गेले. आणि नवीन भाषेबरोबरच स्वतःचाही पुनर्जन्म झाल्याची जाणीव झाली. रविंद्रसंगीत आणि नाझरूल गीतिने अलंकारिलेली बंगाली भाषा मराठी भाषिकासाठी बोबडी वाटेलही. पण त्या मऊपणातच तिचे माधुर्य आहे.
वाङ्मयाचे विषय म्हणाल तर,  बा. भ. बोरकरांसारखेच आयुष्याला निसर्गाजवळ घेऊन जाणाऱ्या भारतीय संस्कृतीशी एकरूप झालेले. सहाजिकच, वसंता सारख्या ऋतूंसाठी शब्द-वाक्यांचे अगणित रीघ लागावेत. पण वर्णन मात्र थांबू नये. वृत्त जन्माला यावीत, संपावीत पण त्यां साठी भाषा कुठेही थांबू नये.
वसंत पंचमी हा भारतीय उत्सव. उत्तरेपासून दक्षिणेपर्यंत विविध नावांनी, पद्धतींनी साजरा केला जातो. या प्रसन्नदायी ऋतूत मानवी मन निसर्गाकडे बघून न आनंदले तर नवलंच!
महीना फाल्गून; नुकताच सुरू झालेला नाही तर, मध्यापर्यंत- पौर्णिमेपर्यंत पोहचलेला. वसंत ऋतूचा शिगेला पोहोचलेला काळ...   त्याचं वर्णन येतं...
मित्रहो फाल्गून लागलाय वनो-वनी
पानो-पानी डहाळींवर फळा-फुलांत रे
काना-कोपऱ्यात, अडगळीत
मित्रहो फाल्गून लागलाय वनोवनी ॥धृ॥
रंगा-रंगात रंगलंय आकाश
चिंता विरल्या गाण्या-गाण्यात
पानांची सळसळ ध्वनिरूपी चंचळ
शिरली कशी मनोमनी  ॥1॥
घेर ते तू पृथ्वीचे रंग आकाशाचा करती तपोभंग
हास्य मग कसे तिचे शांत ठेवी आकाशांते
ऊठ-सूठ आकाशा कंपवी ॥2॥
वनी कसा सुटला वारा फुलांचे ज्ञान न त्याला
फिरे कसा दारो दारी, फुलांच्या घरोघरी
परिचय प्रत्येका विचारी  ॥3॥
फाल्गून महीन्याची पौर्णिमा म्हणजे होळी दहन! पाठोपाठ येणारी धुळवड आणि रंगपंचमी म्हणजे याच पृथ्वीवर चढलेल्या रंगांबरोबर मनावर आणि माणसांवर रंग उधळायचे आपणा भारतीयांचे हक्काचे दिवस. समूहाने एकत्र येऊन कृती करावी, मनाची दारं सताड उघडी ठेवण्याचाच उद्देश. त्याचं वर्णन...
ऐका हो गृहस्थांनो
दार उघडा, उघडा दार;
रंग लागलाय
जळी, स्थळी, वनी, तळी
लागलाय रंग
उघडा दार, दार उघडा...॥धृ॥
रंग- मुखी उज़ळलेले- अशोकाच्या पानी
रंगीत- नशा, मेघकडा, प्रभात आभाळी
पल्लवीचा रंग चढे- उत्साही
उघडा दार, दार उघडा ॥1॥
वेणूवन गुणगुणे वाऱ्याने दक्षिणी
फुलपाखरू डोले पुष्पी पाती
मधमाशी फिरून ज़ाई फुलांफुलांतुनी
पंख तिचे भिकार्याच्या वीणेसम गाती
माधवी लतेचा गंध दरवळलाय
उघडा दार, दार उघडा ॥2॥
नवीन भाषा शिकल्याने पुनर्जन्म होतो असे मत एका पाश्चात्य अभ्यासकाने मांडले. ते किती बरोबर, हे प्रत्यक्ष अनुभवल्या शिवाय समजणे कठीण!
ते अनुभायला या एका लोकगीताचा अभ्यास पुरेसा होता.
हे लोकगीत एका वेगळ्याच़ दुनियेत घेऊन ज़ाणारे. काव्यात बंगाल मधील भौगोलिकतेचा फरक 'दक्षिणी वारे' याने समजून येईल. आपण मराठी लोक, 'पश्चिमेच्या गार वाऱ्यात' रमतो. पण वङ्ग प्रांतात वारे वाहतात, दक्षिणेकडून. वन संपदेतील फरक वेणूच्या वना मुळे समजून येईलच. आपल्याकडे सुरूची बन असतात. आणि, समाजातील भिकार्याचे स्थान कवितेतील स्पष्ट उल्लेखानेच समज़ते. आपल्याकडचा भाकारी पावा वाजवताना रंगवला जातो. तिथे भिकारी वीणा वाज़वतोय...
भाषा शिकणे विलक्षण अनुभव देऊन जातात. या दोन गाण्यांचा अनुवादही त्याच अनुभवाचा भाग....
-सम्प्रिः।