सोमवार, २६ फेब्रुवारी, २०१८

डोंबिवली-पुणे-डोंबिवली


सकाळपासून ठणकावून, मी स्वतःला आवरलं
ट्रेन गेली समोरून तेव्हा मन मात्र पाघळलं
पुणे-इंदोर, डेक्कन, उद्यान, आणि नगरकाॅइल्
इंद्रायणी, इंटरसिटी, 7.02 कर्जत daily
मिनीटासह त्यांच्या वेळा मुखात माझ्या रेंगाळती
जागांसह सूर्याचे रंग डोळ्यांत माझ्या लखाखती...
खरंच हल्ली या गाड्या डोळ्यांसमोरून जाणं देखील फार nostalgic असतं. अनेक तास, वेग-वेगळ्या ऋतूंत, वेग-वेगळ्या situations मध्ये यांच्या बरोबर वेळ घालवल्याने असेल. पण या अजूनही आपल्याश्या वाटतात... आता एक-दोन महिन्यात पास संपून एक वर्ष होईल. पण अजूनही तिकीट काढून गेल्यावर त्या सगळ्याच माझ्यासाठी खुल्या असतात. जुना पास दाखवल्यावर टिसीही ओळख दाखवतो.
प्रत्येक ट्रेन बरोबर केलेला प्रत्येक प्रवास वेगळा आणि अनोखा होता. पण त्यातले काही क्षण वाचायला बोर होणार नाहीत असे सांगता येऊ शकतात...
7.08 ची वेळ बदलली आणि 7.02 झाली. त्या दिवशी पुण्याला परीक्षा द्यायला जात होतो. ऑक्टोबरच्या पहिल्या दिवशी वेळापत्रक बदलतं हे माहीत नसल्याने ती सुटली होती. पर्यायाने मागची इंटरसिटीही सुटली. मग काय धावत्या विशाखाट्टनम् मधे कल्याणहून उडी मारली आणि 15मिनीटे उशीराने का होईना परीक्षेला पोहचलो. सर वाटच बघत होते. :)
नगरकोइलची पॅन्ट्री खास! ती मिळाली की लोणावळ्या आधी नाश्ता आणि काॅफी ठरलेली. त्या संध्याकाळी घाट सुरू झाला तरी डोसेवाला काही आला नव्हता म्हणून चौकशी केली. ते समोर बसलेल्या आजोबांनी ऐकलं. जरा वेळाने जागेवरून उठून बाहेर जाऊन आले ते हातात दोन प्लेट डोसे आणि सांबार वाढायला बरोबर पॅन्ट्रीतला माणूस घेऊन. नंतर माझं पुस्तकात डोकं जाणारच नाही असे अनुभव त्यांनी सांगितले. सत्तर-पंचहात्तरीतलं वय. पण शरीर आणि आवाज खंबीर. रेल्वेत मोठ्या हुद्द्यावरून निवृत्त झालेले. आणि पाकिस्तानातील रेल्वे प्रकल्प अभ्यासून आलेले हे आजोबा, माझ्या प्रवासातले पेल्स्टन काकाच!
टिसीने सगळ्यात जास्त त्रास दिला ती गाडी म्हणजे पुणे-इंदोर. दुपारी 12 नंतर मुंबईसाठी 3.20 पर्यंत म्हणजे ही सुटेपर्यंत एकही गाडी नाही. पुण्याहूनच सुटणारी ही गाडी. पुणेरी सहप्रवाश्यांची कमी ती कसली असणार! उन्हाळ्यात शेड नसलेल्या कारशेडमधून येऊन ही फलाटावर लागली की तिच्या डब्ब्यांनी पेटत्या भट्टीचे रूप घेतलेले असायचे. पण बाहेरगावची गाडी असल्याने ती सगळ्यात लवकर पोहचते म्हणून तिच्यातून खूप वेळा प्रवास केला. कधी कधी तिला पकडायला खडकी पर्यंत चालत जाऊन लोकल ने चिञ्चवडपर्यंतचा प्रवास केला. यात विशेष काय? असाही प्रश्न पडेल. साहाजिक आहे. मुंबईत लोकलने प्रवास करणे सोपे असते. कारण, 'सगळ्यांनाच प्रवास करायचाय' याची जाणीव सगळ्यांनाच असते. पुण्यात प्रवास फक्त 'माला एकट्यालाच' करायचा असतो.😜 थोडक्यात, पुणेरी अनुभव या ट्रेनने खासच दिले.
……………………………………………………………………
24 ऑक्टोबर 2015
एक भन्नाट, नियम तोडून गाडी पकडल्यावर केलेला प्रवास. 12चं लेक्चर होतं. आवडत्या विषयावरचं शेवटचं लेक्चर. काहीही करून चुकवायचं नव्हतं. नेमक्या त्याच दिवशी सगळ्या ट्रेन वेळेवर होत्या. ब्रीज वर असतांना कसारा फास्ट गेली आणि माझी डेक्कन चुकण्यात जमा झाली. स्लो टिटवाळा पकडली. तिने ठाकुर्ली सोडलं तेव्हा समोरून कल्याणच्या दिशेने ऐटीतच डेक्कन धडधडत गेली. दोन नंबरवर टिटवाळा लागली. चार नंबरवर डेक्कन वाटच पाहत होती! मधे तीन रूळ. ब्रीज वरून जाऊन ट्रेन मिळणं शक्यच नव्हतं. कुठूनही ट्रेन येत नाहीये असं बघून उडी मारली आणि समोरच्या गच्च भरलेल्या जनरल डब्ब्यात चढलो. दोन डब्बे सोडून माझा (पास धारकांचा) डबा होता. प्लॅटफाॅर्मवर उतरलो आणि ट्रेन सुटली. आमचा डबा सामान्य लोकांसाठी नेहमीच बंद असतो. धावत जाऊन राॅडला पकडून पायरीवर उभा राहिलो. प्लॅटफाॅर्म सुटला असावा. आवाज ऐकून ओळखीच्या लोकांनी ओळख दाखवली. दार उघडलं. जागेवर बसलो.😌
…………………………………………………………………………….
कामशेत जवळ मेगाब्लाॅक चालू होता. 3.20ची गाडी पकडायला पुणे स्थानकात पोहचलो आणि सगळ्याच गाड्या 4.30 नंतर सुटतील अशी announcement झाली. इंदोर 1नंबर वर लागली होती. बसायची जागा वगैरे पकडली. बॅग ठेवली अन् बिस्कीट आणायला प्लॅटफाॅर्मवर उतरलो. तेव्हा दोन नंबरवर उद्यान लागतच होती. तिची नेहमीची वेळ 3.50-4.00 ची असते. ती वेळेत आली होती. तीन नंबरवर डेक्कन आणि चार का पाच वर कोयना होती. सगळ्या मुंबईकडे जाणार्या गाड्या. वेळापत्रकानुसार इंदोर सगळ्यात आधी सुटणे अपेक्षित होते. Announcement झाली. "उद्यान एक्सप्रेस छुटने को तयार है." माझे पाय फिरले. तसे इंदोरच्या आडून डब्बा हललेला दिसला. "ती सुटली तर अजून 1 तास उशीर" डोक्यात विचार येऊन गेला. फोडलेला बिस्कीटाचा पुडा खिशात कोंबत धावत बॅग ठेवलेल्या डब्यात शिरलो. अपरबर्थ वरची बॅग घेतली आणि दारात आलो. एक कपल एकमेकांना 'अलविदा' म्हणत होतं. स्त्री दाक्षिण्य वगैरे सगळं विसरून "Side" जोरात ओरडलो. दचकल्यामुळे मला जागा मिळाली. दोन गाड्यांमधे एक रिकामारूळ होता. ज्यावर गाडी येण्याची शक्यताच नव्हती. सिग्नल बघितला. उडी मारली. S10 चा दरवाजा. त्याचा राॅड पकडला आणि धावत शिडी चढणार तेवढ्यात पाण्याचा खंब मधे असल्याचं लक्षात आलं आणि राॅड सोडून मी गटारात न पडता स्वतःला बॅलन्स केलं. ट्रेनचा वेग वाढत होता. जीवंतपणे त्यात चढण्यासाठी ट्रेनच्या वेगाने धावतच तिला पकडणं हुशारीचं होतं. सोडून देण्या इतकीही ती फास्ट झाली नव्हती. मधल्या ट्रॅकवर आलो आणि धावायला सुरवात केली. "जिथे एकनंबर संपतो तिथे लगेज साठी रस्ता आहे. एकही खांब नाही" मनाने आठवलं, डोळ्याला दिसलं. "प्रवाश्यांनी दुधाच्या बाटल्या ट्रॅकवर टाकल्या आहेत. सांभाळ!" "शिटीचा आवाज? आपल्या मागे पोलिस तर नाही ना?"😨 चढायच्या जागेपर्यंत पोचलो तेव्हा सगळे स्लीपर कोच गेलेले होते. आणि ग्रीप मिळून पायरी वर स्थिर होईपर्यंत शेवटचा एसी कोच उजाडला. HA1. सगळे वातानुकूलित डबे पार करून टिसीला पासधारक असल्याचे सांगून घाम पुसत एका जागेवर बसलो. आणि सगळ्यात पहिला विचार मनात आला. "आईला हे आवडणार नाही." "इतका रिस्की प्रवास या पुढे करायचा नाही." हा प्रसंग मुद्दाम तेव्हाच डायरीत लिहून काढला.
.......................................................................................................
प्रवास सुरू होऊन महिनाही झाला नसेल. माझ्यासाठी सगळंच नवीन होतं. त्यावेळेस घडलेल्या प्रसंगाने जी जाणीव करून दिली ती आयुष्यभर लक्षात ठेवण्या साठीची. उद्यानने परतीचा प्रवास चालू होता. अष्टाध्यायीची सूत्र पाठ करत होतो. लोणावळा गेल्यावर टिसी आला. विद्यार्थी आहे असं नुसतं सांगून काही पटलं नाही. वर असलेले सुट्टे पैसे जमवून वीस रुपये टेकवले आणि पुस्तकात डोकं खुपसलं. पळसधरी मागे गेलं असावं. टिसी पुन्हा आला आणि माझ्या अभ्यासाची चौकशी करून गेला. काय शिकतोस? काय पाठ करतोयस? वगैरे वगैरे... संस्कृत शिकतोय म्हटल्यावर चेहरा त्याचा फार खुलला. स्कोप, पुढचे प्लॅन वगैरे विचारले आणि निघून गेला. नेरळच्या जवळ कुठेतरी तो परत आला. माझ्या हातात मीच दिलेल्या वीस रुपयांची चिल्लर परत टेकवली. मी विचारलं, "काय झालं काका?" -"तुमच्या कडून कुठे पैसे घ्यायचे? संस्कृत शिकता तुम्ही. मी या गाडीत असतांना कधीही कुणालाही पैसे देऊ नका." विषय फार न ताणता तिथून तो निघून गेला. मनात विचार आला. हे कन्सेशन इंजिनिअरच्या विद्यार्थ्याला मिळाले असते का? जे काही शिकतोय त्याचे दायित्व समाजाला का असावे तर केवळ याच कारणासाठी.
.......................................................................................................
काॅलेजमधे भगवद्गीतेवर पेपर सादर करायचा होता. सकाळी चार पर्यंत विषय मिळाला नव्हता आणि ठरतही नव्हता. शेवटी शांकरभाष्य आणि ज्ञानेश्वरी बॅगेत भरली आणि प्रवास सुरू झाला. कर्जत लोकल मधे दोन्ही पुस्तकातले दुसर्या अध्यायातले दृष्टांत लिहिले होते. आता फक्त पेपर लिहीणं बाकी होतं. सगळा प्रवासच अफलातून! त्या दिवशी सोमवार होता. पासधारकांचा डबा लोकल ट्रेन सारखा भरलेला असणार यात शंका नव्हती. कर्जतला एका रिझर्वेशन डब्यात चढलो. ट्रेनच्या दोन डब्ब्यांमध्ये पुढून आणि मागून येणारे प्रेशर adjust करायला रबरी सस्पेन्शन असते. आणि तिथेच एका डब्यातून दुसर्या डब्यात जायला दोन्ही डब्यांना फळ्या असतात. त्या एकमेकांवर ठेवलेल्या असतात व पुढे मागे सहजपणे सरकू शकतात. वरच्या फळीवर आपण बसून balance सांभाळत सहज प्रवास करू शकतो. मुंबई-पुणे इंटरसिटी हा छोटासा प्रवास असल्याने या गाडीतील शौचालये बरीच स्वच्छ असतात. म्हणून या फळीवरून प्रवास करणं फार कठीण नाही. याचा प्रत्यय इथे पेपर लिहितांना आला. पेपर पूर्ण करायला खाली बसावं लागणार याची कल्पना होती. बॅगेत एक बैठक (कापडी चटई) पण ठेवली होती. ती बाहेर काढली. आणि मोबाईलच्या बॅटरीच्या प्रकाशात रफ पेपर लिहून झाला. टिसी येऊन चौकशी करून गेला. म्हटलं "सब्मिशन आहे." All the best देऊन गेला.😂  खरं तर तिथे बसल्यावर घाटात लागलेले मागचे इंजिन किती महत्वाचे होते याची जाणीव झाली. आणि घाटाचा चढ, पुढच्या इंजिनचा ओढ, भौतिकशास्त्रात कधीतरी शिकलेली banking of roads ची theory या सगळ्यांचा एका वेगळ्या पातळीवर अनुभव घेता आला. माझा प्रवास असाच चालू राहणार होता. ही फक्त सुरुवात होती.
पासधारक म्हणून पहिला प्रवास आणि दोन वर्षात सर्वात जास्त प्रवास नियमितपणे केला तो कर्जत-पुणे इंटरसिटीने. त्या कुटुंबाचा भाग बनलो आहे. कितीही विसरायचा प्रयत्न केला तरी विसरता येणार नाही असा भावनेचा बांध फुटलेला शेवटचा प्रवास इंद्रायणीने झाला. त्या दिवशी खर्या अर्थाने मला, "हे भलते अवघड असते..." या कवितेचा अर्थ समजला.
या ट्रेन शी, या प्रवासाशी इतक्या आठवणी आणि प्रसंग जुळले आहेत. की ते सगळे लिहून काढायला पुढचे अजून दोन वर्ष लागतील... त्यामुळे इथेच थांबलेलं बरं!
पुण्यातल्या मित्र-मैत्रिणींनी एका कवितेचं विडंबन प्रवासाच्या आधारावर करायला सांगितलं. खरं तर ते विनोदी होणं/करणं अपेक्षित होतं पण नकळंत पणे पुढचं लिहिलं गेलं...
संवादात कुणाच्या नाव ऐकताच पुण्याचं, बघ माझी आठवण येते का? मागे डोकाव, तासन्तास केलेला ट्रेनचा प्रवास; कधी उभ्याने, आशेत बसण्याच्या बघ माझी आठवण येते का?
उभं राहून, चालून येणारे पायाला गोळे, पायातच ठेव मांडी घालून घे, झोपी जा. नाहीच जाणवणार यातना, झोप लागेल गाढ, कधीतरी बसायला मिळेलच, स्वागतासह नाश्त्याने संपलाय प्रवास आता, बंघ माझी आठवण येते का?
मग चालू लाग, चटके अगणित ऊन्हाचे टोचून घे चालत रहा स्थळी पोहोचे पर्यंत, वेळ थांबणार नाहीचे शेवटी; लिफ्ट मागू नकोस, टोपी घालू नकोस, पुन्हा त्याच रस्त्यावर, आता गाडी एखादी थांबेलही बघ माझी आठवण येते का?
चालता चालता हाॅर्न वाजेल. कोण ते बघ, सहपाठी असेल, पायदान हाताने उघडेल, बसण्याची खूण करेल तुला काहीही विचारणार नाही, कारण ज्ञात असेलच; तू लिफ्ट घे. स्थळी पोहचून उतरशील, पायदान बंद कर, thanx म्हणून कामाला लाग, बघ माझी आठवण येते का?
मग जेवण होईल, पोट बिघडल्याची जाणीव होईल, शौचालयात पाणी नाहीच, रखरखीतच सगळं, पोटातील गुडगुडणं सहन करत रखरखीत उन्हात चालतच बस स्टाॅप गाठशील बस येईल 348, कुठेही न वळता स्टेशन गाठेल, तू धावत तुझी ट्रेन गाठ, काम आटोप, बघ माझी आठवण येते का?
या नंतर सताड डोळ्यांनी तापते पत्रे पहायला विसरू नकोस. त्यांना बाहेरच्या झळा भाजून नुसत्या शरीराची लाही लाही करण्याचा प्रयत्न करतील. यानंतर T.C येईल. त्याला 10-20 रू. लाच दे, झोपी जाण्याचा प्रयत्न कर. कल्याणला पोहोचता पोहोचता, बघ माझी आठवण येते का?
______________________________________________
एम.ए. साठी शेवटचा पास काढला आणि महिन्याभरानंतर आपला प्रवास संपणार या विचारानेच फार भरून आलं. तेव्हा लिहिलेली ही कविता....
आता, पुण्ण्याच़ं काम आणि पुण्याच़ं काम यातला णकार उच्चारताना उच्चारणातील 'प्रयत्ना'त होणारा आणि त्यामुळे कामातील 'प्रयत्ना'त दिसणारा फरक अगदी व्यवस्थित समज़ला आहे.
ते सामंजस्य येण्यासाठी स्वतःज़वळ असलेल्या पुण्ण्याच्या ज़ोरावर पुण्याचा प्रवास थांबवतांना लिहिली गेलेली ही कविता...
थांबवतांना प्रवास पुण्याच़ा
मीस करणारे मी प्रवास
माझ़ा, निसर्गाच़ा, ट्रेनच़ा, काळाच़ा...
एकंच़ प्रवास विवर्तलेला...
घरी पोहच़ायची केवळ आस
म्हणून तर काढला मी एक पास
अन् सुरू झ़ाला माझ़ा प्रवास...
मनन, गाणी, गप्पा, अभ्यास
सरती कसे सहा तास
संपता संपता माझ़ा प्रवास...
ग्रीष्मातील वणव्याच़ा
वर्षेतील धबधब्यांच़ा
धुक्याच़ा अन् थंडीच़ा
वसंतातील कूजनाच़ा
गंधात न्हालेल्या पृथ्वीच़ा
प्रवास माझ्या सोबत, निसर्गाच़ा
प्रवास, एकाच़ ट्रेनच़ा
ट्रेनमधल्या प्रवाश्यांच़ा
प्रवाशांच्या शरीरांच़ा
आणि, शरीरातील मनामनाच़ा
तरीही, प्रवास एकाच़ ट्रेनच़ा...
सूर्य एकंच़, रोज़ दिसणारा
नाविन्यपूर्ण स्वभावांच़ा
सूर्य, मानवी दृष्यांच़ा
अनुभव उत्तर-दक्षिणायनाच़ा
प्रवास एका काळाच़ा...
थांबवतांना प्रवास पुण्याच़ा
मीस करणारे मी प्रवास
माझ़ा, निसर्गाच़ा, ट्रेनच़ा, काळाच़ा...
एकंच़ प्रवास विवर्तलेला.
-गंधार डोम्बिवलीकर.

आरित

'सायकल' आणि माझे जीवाभावाचे संबंध! बारावीत लपून सायकलिंग ला जाण्यापासून नंतर उज्जैन-डोंबिवली सायकलस्वारी पर्यंत आणि पुढे आता पर्यंतचा प्रवास, यामुळे 'सायकल' माझे अर्धाङ्गच बनली आहे. भेषेचा एक विद्यार्थी म्हणून तिच्याशी संबंधित अनेक शब्दांचा ऊहापोह डोक्यात चालूच असतो. एलिझाबेथ एकादशी बघून माझ्याही सायकलचे नाव औरंगाझेबी ठेवावे असा विचार मनात आला होता. 
गंमतीचा भाग वगळता... दुचाकी हा सामान्यपणे कुठल्याही दोन चाकी वाहनाला वापरला जाऊ शकणारा शब्द. त्यात फक्त 'सायकल' ला दुचाकी कसे म्हणता येईल? 'bicycle' हा रूढार्थाने भारतीय इंग्रजीत वापरला गेलेला शब्द. पण अमेरिकेत अगर पाश्चात्य देशात 'bike' हाच शब्द रूढार्थाने सायकलसाठी वापरला जातो. किंबहुना professional cyclists बरोबर बोलताना 'सायकल' या शब्दाचे उच्चारण cheap वाटते. त्यामुळे ज्याप्रकारे इंग्रजीत 'bike' मुळे motorbike की bicycle असा संभ्रम निर्माण होतो त्याच प्रकारे 'दुचाकी' मुळे झाला तर त्यात काही विशेष नाही. सायकल हा अकारांती, स्त्रिलिंगी शब्द मराठीने स्वीकारून त्यावर मराठी प्रत्ययादी संस्कार करून स्वतःला समृद्ध करणे सर्वार्थी व्यवहार्य ठरेल.


दुचाकी puncture होणे. याला मराठीत काय म्हणतात? to puncture हे क्रियापद बघितले तर त्याचा अर्थ छिद्र पडणे व त्यामुळे आतील द्रव्य बाहेर ओसंडून पडणे (ooze होणे) ह्या दोन क्रमिक क्रिया येतात. मग अश्या अर्थी शब्द अस्तित्वात आहे का? नसेल तर कसा बनवता येईल? असे विचार डोक्यात होतेच.
पावसाळ्याचे दिवस होते. डोंबिवली-पुण्याचा निसर्ग-रम्य प्रवास करून वर्गात बसलो होतो. वेदाचा तास होता. 'पूषन्' देवतेचे वर्णन सुरु होते. तोच त्या वैदिक संस्कृतात, मी गावाला असतांना ऐकलेला आणि आजी बरेचदा वापरते असा 'गाउण्ढळ' शब्द त्याच अर्थी आल्याचे पाहून जागा झालो. पूषा देवतेची शस्त्रे, "आरा", "अष्ट्रा". त्या देवतेचे काम, चरायला गेलेल्या गुरा ढोरांना घरी आणणे. "बैलाला कसं आर्याने सारखं टोचाव लागतं, तसं तुम्हाला अभ्यासाच्या बाबतीत सारख टोचत राहिलं पाहिजे.", आजीचं नेहमीच वाक्य हे! हा आरा म्हणजे काय, एका लांब काठीला पुढच्या बाजूला खिळ्याच टोक बाहेर असलेले एक शस्त्र. तो खिळा बैलाला टोचला, पाठीत घुसवला, की बैल धावतो, त्याच्या पाठीतून रक्तही येत बरेचदा. बैलगाडीत 
बसल्यावर हा प्रकार अनुभवला होता. म्हणजे कुठलेही टोकधार शस्त्र ज्याचा वापर टोचायला केला जातो त्याला 'आरा' हा वैदिक शब्द आहे. आणि अजूनही तोच शब्द जळगाव जवळच्या ग्रामीण मराठीत, कदाचित अहिरणी बोलीत वापरला जातो. वा वा! छानच interesting! 

सायकल puncture होते म्हणजे नेमकं होता काय? टोकधार वस्तू वायूनलिकावरणात (tyreमध्ये) घुसते आणि वायूनलिकेला (tubeला) छिद्र पाडते, ज्यामुळे हवा बाहेर येते! मिळाला की मग शब्द… 
"आरित", टोकेरी शस्त्र ते 'आरा' त्यामुळे जी क्रिया घडते ते 'आरणे' आणि घडलेल्या क्रियेमुळे जो परिणाम दिसून येतो ते "आरित"
आज राज्य मराठी भाषा दिन. सर्वांना मनःपूर्वक शुभेच्छा. Puncture होणे या इंग्रजी शब्दासाठी बोलायला सोपा आणि अर्थयुक्त शब्द समर्पित करीत आहे. दुचाकी आरित झाली. cycle आरित झाली. येथे आरित काढून मिळेल. आरित काढायला जातोय. आरितामुळे उशीर झाला. 
भाषा क्लिष्ट वाटू लागते जेव्हा त्यात artificial पणा येतो. ज्या प्रमाणे 'महापौर' हा शब्द आग्रहाने वापरात आला आणि माराठीतेने तो स्वीकारला तसाच 'आरित' हा ही स्वीकारला जाईल ही विनम्र अपेक्षा करतो. मराठी भाषा अधिकाधिक 
समृद्ध व्हावी यासाठी शुभेच्छा! मराठी राजभाषा दिनाच्या अनेक अनेक शुभेच्छा!!!


सोमवार, १९ फेब्रुवारी, २०१८

सायकल सहल

अरुंद झालेला रस्त्याचा भाग. चारचाकी धारी घाबरतंच, बेताच्या वेगाने, जरा कमीच पण अनक्षेपार्ह अंतर ठेऊन पुढे चाललेला. तरीही एक सायकल पडल्याचे दिसले. चला कोणाला तरी गाडीवर घ्यावं लागणार का? चारचाकी तर लागली नाही? असंख्य विचारांनी पुढे पोहचलो. गाडी पासून दूर सायकल आणि सायकलस्वार आडवे झालेले. चारचाकीतून चालक पटकन उतरला. दोघांनाही काही झालं नसल्याची खात्री केली. पाण्याची वगैरे विचारणा करून गाडी काढता झाला. एक मिनीटाचाही पूर्ण अवधी संपायच्या आत सगळे स्थिरावले. तेव्हा चौकशी केली. सायकलचाच पुढचा थांबक (ब्रेक) जोरात लागून सायकलचा तोल गेला. एवढं झालं तरी काय होतं थांबक कचकचून मारायला? भिती, अस्थिरता, संवादाचा अभाव. संवादाचा अभाव? लिखाणात भरकटतोय मी, असं वाटेल! पण नाही.
मी सायकलिस्ट कधी होईन? जेव्हा माझा अशब्द रूपी संवाद सुरू होईल. संवाद-सायकलशी, इतर वाहनांशी, शरीरावयवांशी. संवाद- रस्त्याशी. संवाद- वारा, सूर्य, चंद्र-ताऱ्यांशी. संवाद या वातावरणाशी; शेवटी संवाद म्हणजे काय हो?
परा वाणी पासून निर्मिलेला आणि परा वाणी पर्यंत पोहचलेला विचार! समर्थ रामदास स्वामी म्हणतात ना, "पुढे वैखरी, राम आदि वदावा." तीच ही आदि बोलली गेलेली वाणी, परा वाणी!
तर असा हा संवाद कमी पडल्यामुळे सकाळपासून दोन जणं पडली होती. पण सुदैवाने कोणालाही फारसे लागले नव्हते.
ही, शाळेत जाणारी सायकलसाठी नवीन असलेली मुलं, रोजच्या अपघातांच्या भितीने घाबरलेली; पालकांनी जपून सायकल चालव सांगून दटावलेली; इतकी मोठी गाडी बाजूने जाते आहे म्हटल्यावर आत्मविश्वासाभावाने बिचकली का नसती? तेच झाले. एवढी मोठी गाडी बाजूने जाते आहे लक्षात आले. मनात निर्माण केलेल्या अस्थिरतेने थांबक खेचला तो, तोल जाऊन पडण्या करताच! डोक्यावर शीररक्षक असल्याने आणि प्रसंगावधान राखून चारचाकी चालकानेही गाडी थांबवल्याने अनुभव मिळण्याखेरीज काहीच गंभीर घडले नाही. "पडीता पडीता पढलो मी" हा अनुभावाधिष्ठित शिक्षणाचा पायाच आहे जणू!

सहा-सात वर्षांपूर्वी सायकल सहल घेऊन जावी असं ठरवतांना कितीसा विचार झाला होता, आठवत  नाही. शारीरिक क्षमता ओळखून त्या अधिक ताणण्यासाठीचा हा एक उपक्रम. विद्याव्रतींचा पाठपुरावा म्हणून सुरू केला गेला. आता या उपक्रमाची व्याप्ती आणि आवाका यावर पुन्हा विचार केला असता, तो बराच विस्तारला गेल्याची जाणीव झाली. सायकलची आवड लावण्याबरोबरच पथिकाची (घरा बाहेर पडलेल्याची) वृत्तीघडण, लहानपणापासून अनुभवाने करविण्यात सायकल सहलीचा खूप मोठा वाटा असायलाच हवा. सायकलस्वार हा संपूर्ण पायी चालणारा नाही आणि वाहनधारीही नाही म्हणून त्याला 'सेमी पेडेस्ट्रियन' असा काहीसा दर्जा दिला आहे. याचा वावर  रस्त्यावरील आणि पदपथावरील  समस्या आणि सोयींशी झूंज देत होत असतो. हो, भारतात तरी झूंज देतंच! कारण सायकलच्या अर्थकरणाच्या प्रगतीत असलेल्या मानवी निराश वृत्तीने कुठल्याही प्रकारच्या दर्जेदार सुविधा सायकलस्वारांपर्यंत पोहचलेल्या नाहीत, भारतातच!त्याचा अनुभव या लहान वयात आल्यावर मोठेपणी खचितच उलट्या बाजूने दुचाकी चालवण्यास अगर, डाव्या बाजूने चाललेल्या सायकल जवळून दुसरे वाहन वेगाने नेण्यास ही मुलं धजावतील; तीच वृत्तिघडण.

तर, ठरल्या प्रमाणे साडे सहा वाजता सायकल सहल निघाली ती, एक बिघडलेली सायकल ठेऊन, दुसऱ्या सायकलची व्यवस्था करूनच, अगदी वेळेत! शहरा शहरातून बाहेर पडणारे तयारीचे प्रोफेश्नल सायकलस्वार रस्त्यावर, शिस्तबद्ध एका रांगेतून सायकल चालवणाऱ्या आमच्या शालेय वयोगटातील नवीन स्वारांना शुभेच्छा देऊन  बदलापूरच्या दिशेने निघून गेले. 
फाल्गून मासातील, वंसंत ऋतूतील मंद गारवा हवेत रेंगाळत होता. सूर्योदयाची कोवळी किरणे काही वेळात आम्हाला भिजवतील याची जाणीव गुलाब-केशरी रंगाचा उगवता थंड सूर्याचा गोळा करवून देत होता. अंबरनाथला पोहचे पर्यंत सायकलचा पुढील चाकाचा थांबक जोरात खेचून मिथिलेशचे पडून झाले होते. अंबरनाथ पुढे मागच्या वर्षीच्या सायकल सहली साठी घेतलेल्या डेटाॅलच्या बाटलीचे उद्घाटन झाले. त्याने आनंदाने ते सहनही केले. सायकल चालवायचा हट्ट सुटत नव्हता. शेवटी, "येताना सायकल चालवायला देतो" यावर मांडवणी झाली आणि भूकेल्या पोटांनी बदलापूर वेळेत गाठले. इडली चटणी आणि जिलेबीचा पोटभर नाश्ता करून पुढचा प्रवास सुरू झाला. गोळ्या-ग्लुकोण्डी ची पाकीटं फोडली गेली. उत्तर गोलार्धात दाखल होऊ पाहणारा सूर्य तीक्ष्ण होऊ पाहत होता. पण गारपीट करून आलेला थंड वारा त्याचे तेज बोथट करत होता. अकरा वाजता नेरळला नदी शोधणारे डोळे पोहचले. ऊसाचा रस पिण्यात जास्त वेळ न घालवता नदी किनारी सायकल लागल्या आणि सगळा शीण उल्हास नदीत विसर्जित केला गेला.अर्णवचा बंगला आमची वाट पाहतच होता. बारा वाजताचं तापलेलं ऊन. त्यात कपडे वाळत टाकले आणि भोजन मंत्र म्हणून जेवणाच्या डब्ब्यांवर आक्रमण चढवले गेले. नदी काठच्या ऊन्हात तापून अर्णवच्या सायकलची ट्यूब फुटली होती. अर्णवने सहल प्रमुख- रोहनला हाताशी घेऊन विश्रांती न घेता सायकल दुरुस्त केली. सरत्या घड्याळ्याच्या काट्यांप्रमाणे निघायची वेळ जवळ आली तशी, बेडरूम मधे पसरलेली शांतता भंग करावी लागली. कुठलाही नकारात्मक आवाज न काढता  सगळे परतीच्या प्रवासाला नव्या दमाने सज्ज झाले. गायत्री मंत्राची उपासना झाल्यावर सेल्फी काढले गेले आणि पुनरागमनाय च म्हणत अर्णवच्या बंगल्याचा निरोप घेतला.
"I am on the road again; i wanna go places haven't ever been or seen. Ooooh, i am on the road again." 
डी.सी.सीने ज्याच्या बरोबर सायकलिंग केले, त्या,जग भ्रमण करतांना डोंबिवलीत मुक्काम केलेल्या ज्योशिआह स्केट्स ने शिकवलेलं गाणं म्हणून नेरळ सोडलं तेव्हा संध्याकाळी 4.30 वाजले होते. अरुंद रस्त्यावर जेव्हा दुसरा मुलगा सायकलवरून पडला तेव्हा खरंच विचार चक्र सुरू झालं. सुरक्षिततेचं. त्यावेळी असं वाटलं-
  • मी माझ्या इंद्रियांनी रस्त्याला गती देणारा एक सहप्रवासी आहे.
  • मी निसर्गाची हानी करून वेगवान होणाऱ्या सहप्रवाश्यांपेक्षा श्रेष्ठतर आहे.
  • हे श्रेष्ठत्व मी, चंगळवादाला माझ्या पासून दूर ठेऊन कमावले आहे.
  • माझी गती शमवण्याचा त्यांना, चंगळी संस्कृतीच्या, निसर्गघती धुराधरांना कुठलाही अधिकार नाही. कारण, आपल्या सगळ्यांच्याच गतीचे लगाम आपल्या हाती नाहीत.
  • माझ्या रस्त्यावर मागून येत असल्यास त्यांची गती कमी करण्याचे स्वातंत्र्य मी माझ्याजवळ त्या श्रष्ठत्वानेच बाळगतो.

पश्चिमेकडील पर्वत रांगांमध्ये अस्ताला जाणारा सूर्य मला माझा पुणे-डोंबिवलीचा रोजचा प्रवास आठवल्या शिवाय मावळत नाही. तो मावळताही कसा? मी त्या लोहमार्गाला समांतर रस्त्यावरच तर होतो, ज्यावरून मी रोजचा सूर्य नव्याने बघायला शिकलो . आज तर मी माझ्या सायकलवर होतो... काळा अंधार पसरू लागला तशी पौर्णिमेला जाणारी तृतीयेची, आमावस्येकडून बाहेर पडलेली चंद्रकोर मनावरचा ताबा घेऊन गेली. बदलापूरला थांबून जरासं खाणं झालं आणि घराकडील अंधारल्या वाटांवर आमच्याकडील दिवे प्रकाश टाकत रस्ता कापू लागले. साडे आठ ते सव्वा नऊ पर्यंत सुखरूप घरी पोहचले.

ही सायकल सहल पूर्ण झाली ती मिथिलेश, शशांक, सौरभ, अर्णव वृंदा मावशी, भाग्यश्री मावशी यांच्या सहकार्याने... रोहन या सगळ्यांचा प्रमुख होता. अर्थप्रमुख मिथिलेश होता. त्याने त्या खेरीज लोकमान्य गुरुकूल मधे पाठपुरावाही केला होता. सायकलिंग हा तोंडाने स्तुती केला गेलेला उपक्रम असला तरीही आजवर वीस विद्यार्थ्यांची सायकल सहल जाऊ शकलेली नाही. नियोजित सायकल सहलीसाठी मुलं गोळा करणं हे वेगळं आव्हान असतं आयोजकांसाठीच!
शशांकने सगळ्यात मोठा त्याग केला होता, सायकलचा. कोणाला सायकल चालवणे अशक्य झाल्या शिवाय त्याला सायकल चालवता येणार नव्हती. त्याची तयारी दाखवणेही मनावर दगड ठेऊन घ्यायचा निर्णय होता. एक गाडी लायसन्सधारी दादा कडूनच चालवली जायला हवी. सौरभ, पहिल्या सायकल सहलीत सहभागी झालेला विद्याव्रती. पुन्हा मजा लूटायला सायकलसहलीत सहभागी झाला, सराव आणि सायकल नसल्याने गाडीवरच.
 पालकांची चिंता आमच्या पर्यंत पोहचायच्या आत ती निरसन करायचं काम झालं नसतं तर सायकलसहल शांतपणे पार पडणं कठीण होतं. बारा जणांच्या पालकांचे किमान तीन वेळा फोन येणार म्हणजे छत्तीस फोन्सना उत्तर देण्याचे जिकरीचे काम दोन्ही मावश्यांनी पार पाडले.
आम्ही पराक्रम घडवू. आमच्या मर्यादा उल्लंघू. नवीन आव्हानं स्वीकारू. आम्ही स्वतःला बि घडवू. आमच्या बरोबर प्रत्येक मित्राला बि घडवू! हा प्रवास कृती रूपी सुरू ठेवला की आज सारखी सायकल सहल पूर्ण रित्या यशस्वी होते. सायकल सहलीत सहभागी झालेल्या प्रत्येक विद्यार्थ्याने आज पराक्रम गाजवला आहे. ही भावना उराशी बाळगूनच पुढील पराक्रमांच्या तयारीला लागायलाच हवं.

ज्ञान प्रबोधिनी पुस्तकाच्या बाहेर पडून सार्वांगीण विकासासाठी काम करत आहेच. पण त्याला साथ पालक आणि मुलांची लाभली की, एक असाच शब्दात न अडकलेला संवाद सुरू होतो. एक नवीन पुस्तक रचण्यासाठी...

-सम्प्रिः।

शनिवार, १० फेब्रुवारी, २०१८

सराव

शिस्त 'माझ्या' पासून सुरू होते आणि शब्दार्थासारखीच विस्तारत जाते. पाळलेलीही, आणि मोडलेलीही; चांगल्या आणि वाईट शब्दार्थांसारखीच!

ज्ञान प्रबोधिनी डोंबिवली विस्तार केंद्राच्या 18 तारखेला जाणाऱ्या सायकल सहलीसाठीचा सराव आज एकत्रितपणे झाला. मी म्हणजे प्रबोधिनी, मी म्हणजे डोंबिवली सायकल क्लब म्हटलं की बऱ्याच गोष्टी सोप्या होतात. फडके पथाच्या गणेश मंदीरापाशी एकमेकांना नवीन असणारे बरेच चेहरे  एकत्र भेटले.

डाॅक्टर काकांना यायला जमणार नव्हतं. त्यामुळे नेमलेल्या डी.सी.सीच्या मार्गावर मिलापनगर पर्यंत मार्गक्रमण करायची धुरा कोण सांभाळेल हा प्रश्न होता. रोहन सायकल सहलीचा प्रमुख असल्याने त्याची आज्ञा शिरसा वन्द्य मानून मिलापनगर गणेश मंदीरापाशी परिचय व अल्प विश्रांतीसाठी येऊन पोहचलो. घार्डा सर्कलपाशी  डबलसायकल घेऊन मुळ्ये काका आणि बिराजदार काकां बरोबर  योगेश वाट बघत होते. त्यांची शेपूटही या रांगेत चाललेल्या सायकल सापाला जोडली गेली.
सहावी-नववीतील मुलं. काहीजण पहिल्यांदाच महामार्गावर सायकल घेऊन येणारे. अक्षय आणि मल्हार वगळता बाकी सगळेच आमच्यासाठी सायकल वरील नवीन चेहरे. जरा दटावूनच नियम सांगितले गेले. ते 9.00-9.15 ला घरी पोहचे पर्यंत पाळलेही गेले. एक रांग शिस्तबद्धपणे कोणालाही मागे टाकायची घाई न करता निसर्गरम्य उंबर्ली तलावापाशी पोहचली.
महाजन काकांनी गुलकंदयुक्त राजगिऱ्याच्या वड्या आणल्या होत्या. तिथे सायकल सहलीची संपूर्ण माहिती रोहन दादाने दिली. त्या मोकळ्या परिसरात स्टंट मारायचा आनंदही नवीन सायकल स्वारांनी लूटला. पुढे नेवाळी फाट्या पर्यंत बदलापूर पाईपलाईन रोड वरून जायचं होतं. कोणीही थकलं नव्हतं यात आनंद होता. ममता मॅडम नेहमी प्रमाणेच जरा उशीराने पण उत्साहपूर्ण मनाने आम्हाला जाॅईन झाल्या.
नवीन सूर्य त्याची कोवळी किरणे अंगावर टाकत होता. भुरभूरत पसरलेल्या पांढऱ्या ढगांच्या सुवर्ण कडा अनुभवत चहापानासाठी नेवाळी फाट्याला पोहचलो. चहापान होईस्तोवर साडे आठने सहाचा काटा सोडला होता म्हणून जरा घाई करतच परतीचा प्रवास सुरू झाला.

डावीकडून पूर्व दिशेने किरणांचे झोत फेकणाऱ्या सूर्याला रस्त्याच्या सुरुवातीलाच आम्ही आडवत होतो.  या रस्त्यावर आम्ही विस्तारलेल्या शिस्तीचे एक विलक्षण चित्रच जणू आम्ही रेखाटत होतो. सात वर्षांपूर्वी डी.सी.सी. ला डी.डी काकांनी लावलेली शिस्त अर्णवला पुन्हा एकदा रस्त्यावर दिसत होती. "हा रस्ता संपूच नये," अशी भावना दृढ करत होती.
मा नः पन्थानस्तिष्ठन्तु। "आमचे मार्ग कधीही थांबू नयेत." 
हे वाक्य आपलं लक्ष्य आणि ब्रीद व्हावं असा विचार त्या वेळी मनात न येता तर आजची सायकलोपासना व्यर्थच जाती ना!
शेवटी प्रबोधिनीत म्हटलंच आहे. 'रोज काहीतरी नवीन सुचलंच पाहिजे. कालच्यापेक्षा आज पुढे गेलंच पाहिजे.'
-सम्प्रिः।