शनिवार, २२ फेब्रुवारी, २०२०

थेट प्रक्षेपण

दुपारी दीडच्या दरम्यान जाई ताईचा, "डोंबिवलीत आहेस का?" विचारणारा फोन आला. रात्रीच्या कार्यक्रमासाठी माझा संपर्क ती अग्रेषित करणार होती. मी काहीच विचार न करता होकार देत गेलो.
नंतर स्वतःला आरश्यात बघितलं आणि विचार करत बसलो. कांजिण्या येऊन जेमतेम बारा दिवस होऊन गेले होते. संध्याकाळी साडे चारला रात्रीचा कार्यक्रम नक्की झाल्यानंतर कधीतरी नाकावरची खपली पडली.
मी ज्या कार्यक्रमात गप्पा मारणार होतो  तिथे डाॅ. माहुलीकर बाई, डाॅ. वीणा सानेकर बाई, डाॅ. अभिजीत देशपांडे सर यांसारख्या माझ्या आयुष्यात वंदनीय स्थान असणाऱ्या, मनात आदरयुक्त भिती असलेल्या व्यक्ती येऊन गेल्या होत्या.
चेहरा प्रदर्शनीय दिसेल का? आपल्याला हिरवे कपडे घालू नका असं सांगण्यामागचं कारण काय असेल? इथपासून या कार्यक्रमाच्या प्रतिष्ठेपर्यंतचं सगळंच थोडं थोडं का होईना दडपण घेऊन साडे नऊच्या बातम्या सुरू झाल्या.

 वृत्तनिवेदकासमोर बातमी वाचतांना काय असतं? तो/ती समोर बघतो/ते तेव्हा समोर कॅमेरा असेल तर बातम्या कुठून वाचता येतात? एखादी ओळ सुटली तर? शब्द चुकला तर? अक्षर गलपटलं तर? खरंच थेट प्रक्षेपण असतं का की, गंडवतात आपल्याला?  घरी बसून बातम्या बघतांना या प्रश्नांवर बाबा आणि सयुरी  बरोबर अनेकदा चर्चा झाली होती. आज वृत्तनिवेदकाच्या बाजूला बसून ती सगळी प्रक्रिया प्रत्यक्ष बघत होतो. खरं थेट प्रक्षेपण. अजून एक दडपण!
वेळेचं काटेकोर गणित. दहाव्या मिनीटाला स्वागतपर झालेला नमस्कार आणि ठरवलेला पहिला प्रश्न. आता, "the ball is in my court." याची झालेली जाणीव. मला जे सांगायचंय, जे बोलायचंय, ज्या शब्दात बोलायचंय त्याचं परे पासून वैखरीपर्यंतचं स्वातंत्र्य मलाच! दहा मिनीटं- सहाशे सेकंदांची तेवढी चौकट आहे. एकही नकारात्मक विचार बाहेर न पडता दहा मिनीटं केवळ सकारात्मक बोलायचंय. अभिव्यक्ती स्वातंत्र्यात स्वतःला मर्यादा घातलेल्या बऱ्या असतात.  त्यामुळे स्वातंत्र्याचा तोल स्वैराचाराकडे ढळत नाही.
या सगळ्या गोंधळात, एकाच भाषेत अस्खलित बोलायचं असतं. एखादा शब्द सुचला नाही की? दुसऱ्या भाषेतल्या शब्दाची कुबडी घ्यायची नाहीये म्हणून रिकामी जागा.....ब्लँक! घडाळ्याचा काटा पुढे सरकतोय. कॅमेरा सुरू आहे. महाराष्ट्र बघतोय. अमेरिकेतून मित्र थेट युट्यूबवर बघतोय. अडलेल्या स्वल्पविरामापुढे क्रियापद वापरून पूर्णविराम करत पुढचा मुद्दा सुरू झाला. आता जे शब्द सुचतायत, टिपलेल्या कागदावर जे शब्द दिसतायत तेवढेच मुद्दे घेऊन आपला विषय मांडला जात असतांनाच दहाव्या मिनीटाला आपण आल्या बद्दल आभार मानले जातात. आपल्या समोरच्या कॅमऱ्यावरचा लाल दिवा बंद होतो. आता मागच्या दहा मिनीटात काय घडलंय हे आपल्याला चांगलंच माहीत असतं. ते आठवण्यात काही अर्थ नसतो. "क्षण तो क्षणात गेला. सखे हातचा सुटोनि..." म्हणत सोडून देण्यात शहाणपण असतं. परीक्षा संपल्यावर उत्तरपत्रिकेत लिहीलंय ते बरोबर की चूक हे आठवणं जितकं निरर्थक तितकंच हेही. पुढल्या परीक्षेला जातांना मागच्या उत्तरपत्रिकेतल्या चुका होणार नाहीत याची काळजी घेणारा अभ्यास करू. आत्ता आनंद वा दुःख साजरा करायची गरज नाही.
एवढाच विचार करून त्या हिरव्या पडद्यासमोरील खुर्चीचा निरोप घेत एक वेगळ्या अनुभवाच्या धुंदीत बस पकडून मग ट्रेन मध्ये बसत मुंबईचा निरोप घेतला. एक अनुभव दूरदर्शनाच्या थेट प्रक्षेपणात सहभागी होण्याचा...

रविवार, ९ फेब्रुवारी, २०२०

नातं

व. पु. काळे एकटेपणा आणि एकांत यातला भेद खूप छान समजावून सांगतात.
मृत्यूचा प्रवास एकांताचा असतो. पाच पती असलेल्या द्रौपदीचं मरणही एकटेपणात होतं. "नाथवती अनाथवत्" असं द्रौपदीचं विशेषण ईरावती कर्वे सांगतात.
    शेवटी तिथे माणसाला एकटंच जावं लागतं.
त्या एकांताच्या प्रवासाला निघतांना
एकटेपणा न जाणवणं म्हणजे,
आयुष्य जगल्याचं सर्टिफिकेट असतं. असं मला वाटतं.
कारण,
..........................................................
यम.
यमाचा रेडा.
आणि माझं
जन्मजात नातं आहे.

त्याला माझा पुळका कधी येईल
ते काही सांगता यायचं नाही
त्याच्या हाकेला नाही म्हणणं
मला काही जमायचं नाही.

तो दाराशी आला
की,
"साजण दारी उभा, काय आता करू..."
वगैरे आठवायचाही अवधी नसेल
कोणाला सावरावं
कोणाला आवरावं
काही माझ्या हाती नसेल

कश्यातही न गुंतता
कुणातही न अडकता
सहज त्याच्या बरोबर
जाता यायला हवं.
माझ्यासकट तू, तो, ती, ते
यादगारीपुरतेच थांबलेत
एवढंच लक्षात ठेवायला हवं.

शेवटी मरणानंतर उरतं काय?
छोटीशी यादगारीच ना?
ती
मला निर्माण करता यावी
एवढाच वेळ
दिलाय मला त्याने

यादगारी तयार झाल्यावर
मारलीच कधी मी त्याला हाक
तर माझी निराशा नाही करणार तो
आणि
मला कधीही बोलवायला आलाच तो
तर
मी का करावी त्याची निराशा?
जाईनच आनंदाने
हसत...

एकमेकांना समजून घेण्यात
आहे जे रहस्य
तेच खरं जन्मजात
सुरू झालेलं नातं.
यम.
यमाचा रेडा आणि
माझं...
-सम्प्रिः।

माघ पौर्णिमा 2020ख्रि.

सोमवार, ३ फेब्रुवारी, २०२०

प्रसंग- मन वज्र हवे...

सायकलसहल यशस्वीरित्या पार पडली. पंधरवड्यापूर्वी कौशिक बरोबर झालेला फोनवरील संवाद आठवला. मी हादरलो होतो. पण सावरायचं म्हणून कौशिकला फोन करून प्रसंग कथन केला.
अशीच एका शाळेची सातवी ते दहावीच्या विद्यार्थ्यांची सायकल सहल पंढरपूरला जात होती. दिवसभरात शंभर-सव्वाशे किलोमीटरचा पल्ला होता. पुढे एक दादा, मागे एक दादा. शेवटी एक टेम्पो देखील होता. मध्ये एका रांगेत सारे विद्यार्थी शिस्तबद्ध पद्धतीने, रस्त्याच्या डाव्या बाजूनी सायक्लवत होते.   पंढरपूर पासून वीस किलोमीटरचं अंतर राहिलं असावं. तासा दीड तासाने चंद्रभागेच्या किनारी विठूरायाचं दर्शन होणार याचा विचाराने सगळ्यांच्याच मनात आनंद खुलत होता.
समोरून एखादी गाडी आपल्या अंगावर येईल असं कुणाला वाटायचं काहीच कारण नव्हतं. सगळेच डाव्या टोकावरून चालले होते. पण. एक टेम्पो ट्राव्हलर जोरदार वेगाने समोरून आली, लेन कापत परस्पर एका छोट्या सायकलस्वाराला धडक देऊन थांबली.
नववीत शिकणारा तो विद्यार्थी. काही फूट उडून फेकला गेला. स्वतःच्याच शरीरातून वाहणारं रक्त पाहत वेदनांनी कळवळत रस्त्यावर पडला. इतर गाड्या थांबल्या. लोकं जमा होऊन कुजबूज करू लागली. त्याच्या मित्रांनी दादाला आवाज दिला. सगळीच मुलं घाबरली होती. दादाला त्याच्या जवळ पोहचे पर्यंत दीड मिनीटाचा अवधी गेला होता. "आता काही उठू शकत नाही." "किती रक्त वाहतंय." "काही खरं नाही." वगैरे वाक्यांनी बघ्यांची चर्चा  रंगत चालली होती.
दादाने प्रसंगावधान दाखवून त्याला तत्काळ उचलून एका गाडीत ठेवलं. वाहन चालकाला लोकांनी आडवून धरलेलंच होतं. वाहातं रक्त थांबवायला पंढरपूर गाठणं आवश्यक होतं. तोवर त्याला शुद्धीत ठेवणंही गरजेचं होतं. गप्पा मारत, इकडचे तिकडे प्रश्न विचारत पंढरपूरच्या इस्पितळात ते पोहचले. संपूर्ण उपचार इथे मिळू शकणार नाहीत हे डाॅक्टरांनी सुरुवातीलाच सांगितलं. जमतील तितके प्रथमोपचार करून रुग्णवाहिकेने दीनानाथ मंगेशकर इस्पितळाची वाट धरली.
दुसरा दादा इतर मुलांना धीर देत  पंढरीची वाट पूर्ण करत होता. तिथून शाळेच्या मुख्याध्यापकांना बोलवलं गेलं. घरीदेखील प्राथमिक माहिती पोहचवली गेली.  दीनानाथला पोहचे पर्यंत त्याला शुद्धीत ठेवणं कठीण होतं. रक्तस्रावामुळे तो बेशुद्ध पडला होता. इस्पितळात पूर्वसूचना देऊन ठेवली होती. त्यानुसार थोडी तयारी करून ठेवली होती. एम. आर. आय, एक्स. रे वगैरेचे रिपोर्ट आले.  पयाला  रक्तपुरवठा करणारी वाहिनी दुखावली होती. पाय कापायला पर्याय नव्हता.
ही गोष्ट पचवणं कुणालाच शक्य नव्हतं. दादा, मित्र, मुख्याध्यापक, पालक... ही खरी संयम आणि विवेकाची परीक्षा होती.
वास्तव स्वीकारणं.
सगळ्या शस्त्रक्रिया पार पडल्या. तीन दिवस, दोन दादा इस्पितळात येऊन जाऊन चोवीस तास असायचे. त्यानंतर त्या वाहनचालकावर रीतसर गुन्हा दाखल करण्यात आला. ज्या दादाने घटनास्थळावरून विद्यार्थ्याला उचललं त्याच्या तोंडून मी हे सगळं स्तब्ध होऊन ऐकत होतो. पालकांनी सहन केलेला आघात आणि आयोजकांना दिलेलं सहकार्य ऐकून निःशब्द झालो होतो. दादांनी पालकांचा विश्वास कमावला होता म्हणजे नेमकं काय? ते ऐकत होतो.
वाहनचालक सोडून इतर *कोणाची* चूक होती?
दादाने त्याक्षणी सगळे विचार सोडून देऊन घेतलेला निर्णय आणि केलेली कृती आपण अश्या वेळी करू शकू का? पालकांनी दादा आणि शाळेच्या व्यवस्थापनाला जबाबदार धरलं असतं तर? पालकांनी स्वतःच्या जबाबदारीवर पाल्यांना सायकलसहलीला पाठवावं असं आपण नेहमी सांगतो. पण, अश्या वेळी पालकांना भावनाह्वेग आवरता आला नाही तर?
मी स्वतः स्वतःचं मरण कमी वेळा का जवळून बघितलंय?
वेगाच्या हाव्यासाने एका क्षणात एखाद्या चिमुरड्याचं भविष्य हिरावून घेणाऱ्या वाहनचालकाला काय शिक्षा होईल? आपली न्यायव्यवस्था शिक्षा करू शकेल का?
ओलावलेल्या डोळ्यांसह असंख्य प्रश्नांचं रणकंदन डोक्यात माजलं होतं. 
दादा म्हणून आपण मनाने खंबीर असायलाच हवं. अश्या प्रसंगांसाठी हजरजबाबी व्हायलाच हवं. सायकलसहलीची जबाबदारी पालकांचा विश्वास कमावत सुरू होते. हा प्रसंग कोणावरही कधीही कोसळू शकतो.
एवढाच विचार करून कौशिकला फोन लावला होता.

-गंधार.
03/02/2020