शनिवार, ३ डिसेंबर, २०२२

बाल भारती

शिक्षकाने शिक्षकाच्या, कुणी पालकांच्या तर, कुणी विद्यार्थ्यांच्या (माजी विद्यार्थीही चालेल) भूमिकेतून- आपापल्या दृष्टिकोनातून पाहून- जे हवे ते घेऊ शकेल असे देणारा चित्रपट म्हणजे बाल भारती.
माझ्या कडून १० पैकी ९.५ तारांकनं

यातील एक तारा अधिकचा फक्त विषय निवडीसाठी आहे.
स्वतःची भूमिका स्पष्ट करून मग समीक्षेकडे पाहणे मला महत्वपूर्ण वाटते. आर्थिक गणितं न जुळल्याने शाळा सोडून वेगळ्या क्षेत्रात नोकरी करणाऱ्या माझ्यासाठी हा विषयच अत्यंत जिव्हाळ्याचा. फावल्या वेळात ज्यावर नकळत चिंतन होतं असा... शिक्षण आणि माध्यम भाषेचा. 
काल ताई घरी येऊन गेली. मोठ्या भाचीला सीबीएसई बोर्डात टाकल्याने अभ्यास घेता येत नाही म्हणून छोट्या भाचीला सुरवातीला स्टेट बोर्डात घालणारी ताई, अगदी आनंदाने छोटीची शाळा बदलण्याचा निर्णय सांगत होती. मोठ्या शिशुवर्गाची वार्षिक फी ८२ हजार असलेल्या नव्या इंटरनॅशनल शाळेत मुलांकडून काय काय करून घेणारेत वगैरे सांगण्यात ती तल्लीन होऊन गेली होती. सगळं ऐकून झाल्यावर तिच्या आनंदावर विरझण घालत, तुमची फसवणूक होते आहे हे सांगून विषय तिच्यावर सोडून दिला. आज चित्रपटाचं तिकीट काढलं तेव्हा स्वतःला चाचपडायचा प्रयत्न केला. तेव्हा काल तिला विचारलेले प्रश्न आठवले आणि आपली शिक्षणा बाबतची बरीच मते ठाम आहेत, याची जाणीव झाली. शिक्षण देण्यासाठी भरमसाठ पैसा भरता यायला हवा म्हणून नोकरी करणारे पालक आणि पैसा कमावण्यासाठी नोकरीची मिळावी म्हणून डिग्र्यांच्या मागे लागलेले विद्यार्थी- ह्या दुष्टचक्राचा अनुभव भारतभर घेतलेलाच होता. म्हणून ताईची भूमिका मला काही विशेष वाटली नाही. इतर पालकांसारखीच ती एक! पेश्याने शिक्षक म्हणून वरील अनुभव अगदीच ताजा, डोक्यात रेंगाळत होता.
एक शिक्षक म्हणून मी चित्रपट बघत असतांना, नकळत पणे इंग्रजी माध्यमातील शाळेतल्या माजी विद्यार्थ्याच्या भूमिकेतही शिरलो. कधी, ते काही समजलं नाही.


हसतं खेळतं कोल्हापुरातलं, स्वतंत्र बंगल्यात राहणारं मध्यम वर्गीय मराठी कुटुंब पाहून, सुरुवातीला मुंबईकरांना हा चित्रपट कसा आपलासा वाटेल अश्या शंकेने पाल चुकचूकली. कावितांमधे रमलेले नवरा बायको आणि त्यांच्या प्रभावाने  शीघ्रकवी बनलेला त्यांचा मुलगा म्हणजे चित्रपटातला नायकही ह्या सगळ्यांच्या मराठमोळ्या हास्य-विनोदात ती शंका मागे विरूनही गेली. चित्रपटातलं कथानक अतिशय ओघवतं आहे. नेमके प्रसंग अगदी छोटेसे असले तरी, प्रेक्षकांचं मन जिंकणारे आणि थोडक्यातच बरंच काही बोलून जाणारे आहेत. कुठेही पाल्हाळ नाही. 
"प्राॅब्लेम झालाय ह्यांचा आणि परिणाम भोगणार मुलगा." 
मराठी माध्यमात शिकत असतांना अकार्यक्षम, सृजनशीलता नसलेले इंग्रजीचे शिक्षक मिळाल्याने जी आजची पालकांची पिढी भोगते आहे, त्यांची मुलं इंग्रजी शाळेत शिकतांना दिसतात. आणि मग त्या मुलांचा होणारा कोंडमारा बालनायकाने खूप योग्य प्रकारे दाखवला आहे. आदर्श शिक्षकाच्या रूपात मुलांना प्रोत्साहन द्यायला येणारे शाळेचे मुख्याध्यापक आणि शाळेकडे कृतज्ञतेने परतणारे त्यांनी घडवलेले यशस्वी आणि  सृजनशील विद्यार्थी- त्यांच्या अनुभवांतून विद्यार्थ्यांना समृद्ध करतात. तेव्हा, आपल्या डोळ्यांसमोर एक आदर्श शाळा उभी राहते.
तर, दुसरीकडे इंग्रजी माध्यमाच्या शाळेत होणारा कोंडमारा आणि विद्यार्थ्यांशी कुठेही विश्वासाचे संबंध स्थापू न शकणारे तिथले शिक्षक, एक कुरूप वास्तव -आपला आपल्यालाच विचार करायला भाग पाडते.
कमी होणाऱ्या पटसंख्येवर तोड म्हणून शाळाच बंद पाडायच्या सरकारी डट्ट्यावरही सूचक हल्ला चढवला आहे.
तरीही चित्रपट बोजड होत नाही

अत्यंत कुशलतेने काम करू शकणाऱ्या वडिलांना इंग्रजी येत नाही. म्हणून, "You have to upgrade yourself." म्हणणाऱ्या कंपनीच्या अधिकाऱ्याने दिलेली वागणूक पाहून, त्या मराठी न येणाऱ्या अधिकाऱ्यावरच त्याचं वाक्य उलटवण्या इतपत त्याची कीव येते. त्या प्रसंगाने मोठ्या बुचकाळ्यात पडलेल्या पालकांची व्यथा- 
देश आपला 
भाषा आपली
ती वापरायला
आपली आपल्यालाच 
का चोरी
सारख्या छोट्याश्या कवितेने मांडली आहे.
"Is your company multi lingualism inclusive or  exclusive?" हा सवाल विचारण्यात चित्रपट मागे पडला आहे. तरी, अमेरिकेतून, बंगळुरूतून आलेल्या माजी विद्यार्थ्यांच्या समाजसेवीवृत्तीने शिक्षणातील सृजनशीलतेला संपूर्ण न्याय दिला आहे. त्या स्वरूपात एक शैक्षणिक आदर्श (educational model) साकारण्यात चित्रपट पूर्ण यशस्वी झाला आहे. त्यात कुठेही टीकात्मक सूर नसून सृजनशील रचनेने फक्त सकारात्मक आशावाद घेऊन प्रेक्षक चित्रपटगृहाबाहेर पडतो.

एक विशेष नमूद करावंसं वाटतं‌-
चित्रपटातील पालकांची भूमिका खूपच जबाबदार पालकत्वाची दाखवली आहे. अगदी आदर्श म्हणावी तशी. भरमसाठ फी भरून शाळेवर शिक्षणाची जबाबदारी सोपावणारा दुर्बल विचार त्यात नाही. उलट, पाल्ल्यासाठी पालकाला अभ्यास करायला लावणारी जबाबदार भूमिका विचार करायला लावणारी आहे.  सातवीतल्या मुलाने वडिलांच्या श्रीमुखात भडकावणे कुठेही कुरूप वाटू नये इतका छान संवाद ह्या कुटुंबात आहे. आजी आणि नातवाच्या प्रेमळ नात्याच्या सूत्राने हा चित्रपट बांधला आहे.

एक तास एकोणपन्नास मिनीटांचा हा चित्रपट आजच्या मराठी शाळांसाठी आणि इंग्रजीमाध्यमाचा हट्ट धरणाऱ्या, बड्या शैक्षणिक संस्थांच्या ब्रॅण्डबाजीने फसणाऱ्या पालकांसाठी शर्करावगुंठित समजूतीचे औषध आहे.
हा सारा खाटाटोप कश्यासाठी? आपल्या मुलांचे बालपण हरवू नये ह्यासाठी हे चित्रपटाने स्पष्टपणे सांगितले आहे.

तेव्हा चित्रपटगृहात जाऊन आवर्जून बघा हास्य-विनोदाने भरलेला पैसावसूल मराठी चित्रपट- बाल भारती.
-गंधार.

बुधवार, ३० नोव्हेंबर, २०२२

मनातली बात (सर्व सामान्य युवकाच्या)

मोदींची मन की बात ऐकून, आपणही आपल्या मनात साठून राहिलेली एका सामान्याच्या मनातली बात लिहावी असे वाटले.
मत छोटंसंच आहे. पण त्यासाठी बरंच काही घडून गेलेलं आहे.-
हार-तुरे, शाल-श्रीफळं, सत्कार-सन्मान काही नको; सामान्य माणूस म्हणून जगू द्या!

२०२२ चा शेवटचा महिना उजाडलाय. नोकरीमुळे आयुष्यात पहिल्यांदाच आर्थिक स्थैर्य अनुभवतोय. मागे वळून पाहतांना कमालीच्या अस्थिरतेचा काळ मागे पडल्याची जाणीव होते आहे. भारत फिरत असतांना पैसे कधीच कमी पडले नाहीत. किंबहुना उधळीवृत्ती नसल्याने वायफळ खर्च कधीच होत नसे आणि जिथे खर्च करावेत तिथे आखुडता हातही घेतला जात नसे. त्यानंतर २०१९ मधे घरी आल्यावर तीन महिने सादरीकरणं तयार करण्यात आणि सत्कार समारंभांमधे निघून गेले. शैक्षणिक क्षेत्रात काम करायचं ठरवलेलं होतं. ग्रामीण भागात की शहरी भागात ते ठरवायचं होतं. डोंबिवलीतल्या माॅडल इंग्लीश स्कूल मध्ये शिकवल्याने शहरी शाळेतला खूप छान अनुभव होता. ग्रामीण भागातील अनुभव घ्यायला पुढील तीन महिने प्रबोधिनीच्या हराळी केंद्रात राहून आजुबाजूच्या शाळांमध्ये जाऊन पाहिले. फेब्रुवारीत परतलो ते शहरी भागातील शाळांमधेच काम करायचे असे ठरवूनच. २०२०-२१ चे शैक्षणिक वर्ष टाळेबंदीतच सुरू झाले. मिळेल त्या शाळेत एक वर्ष शिकवायची तयारी होतीच. ऑनलाईन शिकवतांना किती विद्यार्थ्यांना पकडून ठेवता येईल हा प्रश्नच होता. पण, शेवटी सगळेच विद्यार्थी दुर्लक्ष करणारे असतात असेही नाही आणि सगळेच उत्तम असतात असेही नाही. ज्यांनी स्वतःहून मेहनत घेतली ते पुढे आले. बाकीचे मागे राहिले. दूरस्थ माध्यमाने त्यांच्या मागे लागून, त्यांचं बोट धरून पुढे आणणे शक्य नव्हते. शिक्षकी पेशाला स्वतःत पालकत्व नकळत स्वीकारावे लागते. देवनागरी टंकन कार्यशाळा त्याचंच प्रतीक म्हणून कल्पना सुचली. गणपतीच्या सुट्टीत शाळेतल्या सगळ्या मुलांना देवनागरी टंकनासाठी मार्गदर्शन केले. शाळेकडून एकाही अधिक पैश्याची अपेक्षा न ठेवता. शंभर मार्कांच्या तीन अर्ध्या तुकड्या म्हणजे अर्धवेळ शिक्षकाचे मानधन होते आठ हजार रुपये. इसवी सन २०२०-२१ ची गोष्ट! 
असेच विविध कल्पक उपक्रम आणि कल्पक गृहपाठाच्या आधारावर दूरस्थ माध्यमातूनही मुलांच्या सातत्याने संपर्कात राहून विषयकुतूहल जीवंत ठेवण्याचा प्रयत्न असायचाच. २०२१ दुसऱ्या लाटेच्या भीती बरोबर टाळेबंदीनेच संपले.  
टाळेबंदी उठताच मला काही गोष्टी जाणवू लागल्या. ज्यांची जाणीव टाळेबंदीत होत नसे. पैकी एक- आपला पगार आपल्या खर्चाला जेमतेम पुरणारा आहे. दोन- आपल्या पगारात आपण सायकलची देखभाल करू शकत नाही. 
कारण, वीस हजार किलोमीटर चाललेल्या सायकलचे हळू हळू सगळेच छोटे-मोठे भाग बदलावे लागत होते. दर्जेदार पण महाग वाटणाऱ्या प्रत्येक भागामुळे होणारे उत्तम परिणाम अनुभवल्यामुळे आता पुन्हा एक पायरी खाली उतरून दुय्यम दर्जाचे भाग विकत घेणं मनाला सहन होईना.
शिक्षकी पेशातील पूर्णवेळ नोकरी स्वीकारायला मला आवडलेच असते. पण जी-ती शिक्षण संस्था १२-१५ हजारावर एकाही पैश्या संबंधी ब्र उच्चारी ना!
कहर तर, डोंबिवलीतल्या एका खूप प्रतिष्ठित शाळेने केला. अशी संस्था जिने माझा सत्कारही केला आणि प्रबोधिनीच्या कामामुळे जिथला जवळ जवळ प्रत्येक शिक्षक ओळखीचा. "संस्थेची आर्थिक स्थिती हालाकीची असल्याने सध्या आम्ही पाच हजार रूपये मानधन देऊ शकू. पण,आम्हालाच ते मानधन कमी वाटत असल्याने आम्ही शिक्षक आमच्या पगारातून पैसे काढून वरून दोन हजार. म्हणजे सातहजार रूपये देऊ. शंभर मार्कांचे तीन पूर्ण वर्ग आहेत..." म्हणजे पूर्ण वेळ शाळेत शिकवण्याचा हा मला देऊ केलेला पगार ऐकून मी थक्कच झालो.

ही किंमत होती माझी? एखाद्याच्या वेळेची किंवा कष्टाची? 

सगळे हार, सगळ्या शाली, सगळी श्रीफळं, मान-सन्मान... त्याच क्षणी मी ठरवलं- यापुढे कुणाचीही शब्बासकी, प्रशंसा स्वीकारायची नाही. 
वर्षभराचा शाळेत दूरस्थ माध्यमातून शिकवण्याचा अनुभव आणि त्यापूर्वी अजून एका वर्षाचा शाळेत प्रत्यक्ष शिकवण्याचा अनुभव पाठीशी असतांना, नुस्त पुस्तकी आणि प्रमाणपत्रां पुरतं नाही तर, देशभर फिरून आल्या नंतरचं गाठोडं बरोबर असतांना पूर्णवेळ काम करून घ्यायची ही किंमत करावी? 
माणूस म्हणून तरी कसे जगावे?

आठ हजाराची नोकरी "कधीही सोडून जाईन" या बोलीवर २०२१-२२ च्या शैक्षणिक वर्षात सुरू ठेवली. आपल्या मुलांना ध्रुवा महोत्सवाचा अनुभव द्यायलाच हवा. म्हणून त्याची तयारी करून घेतली. खरं तर, शाळेसाठी मी अर्धवेळ काम करत असलो तरी मी मनाने पूर्णवेळ शाळेत गुंतणाऱ्या प्रकृतीचा होतो. माॅडेल मधे शिकवतांना तीन दिवस शाळेत गेले तरी मधल्या दोन दिवसांमध्ये शाळेत काय करता येऊ शकतं याचे विचार आपोआपच डोकावत. अभ्यासातला विषय आवडला की त्यात गुंतून राहण्याची प्रवृत्ती आधीपासून असल्याने. अर्धवेळ शाळा ही फक्त संस्थेच्या आर्थिक सोयीची असे. २०२१ ची दिवाळी संपली आणि शाळा भरू लागली. 
माझा मोबाईल भारत फिरून आणि दीडवर्ष दूरस्थ माध्यमातून वर्ग घेऊन कुरकूर करत होता. लॅपटाॅपही थकला होता. या दोहोंपैकी काहीही नवीन घेण्यासाठी पैसे नव्हते. मी घरूनही पैसे का मागावेत?
मी कधी गरीब नव्हतो. आई बाबा पाठीशी खंबीरपणे उभे होते. पण ओरबाडणाऱ्या वृत्तीने ही परिस्थिती आणली होती. गीता म्हणते, "तुला देहवंताला जगायचे ते कर्म करत करतच." मी कर्म करत होतो. पण शैक्षणिक संस्थांना, "क्व ते धर्मस्तदा गतः" (तुझा धर्म कुठे गेला होता?) विचारणारं कुणी होतं का?

नोव्हेंबर महिन्यात पगार वाढवला नाही तर मी सोडतो या हट्टाने राजीनामा टाकला. "तुम्ही हे शैक्षणिक वर्ष पूर्ण करा. फेब्रुवारीत बढती देतो." वगैरे आश्वासनांची गळ होतीच. पण माझा 'समाजसेवक' म्हणून बराच आर्थिक अंत पाहण्यात आला होता. 
मी राजीनामा मागे घेतला नाही. नोव्हेंबर मधे शाळा सोडली. पुढे एका शाळेने मला १५ हजार रूपये पूर्णवेळ आणि एका कनिष्ठ महाविद्यालयाने २० हजार रूपये पूर्णवेळ अशी नोकरी देऊ केली. इतरत्र कुठेच काही झालं नाही तर महाविद्यालय स्वीकारू अशी तयारी दर्शवली. कारण शालेय शिक्षणात भाषेचा पाया पक्का करून घेण्यात जी मजा आहे ती नंतरच्या शब्दजंजाळ शास्त्रार्थात नाही. म्हणून शालेय वयोगटाला शिकवण्यालाच प्राधान्य. पण १५ हजारावर शाळेत लागणं काही शक्य नव्हतं.

आज इतर कुठल्याही क्षेत्रात काम करणाऱ्याचे वार्षिक उत्पन्न किती असते? २०२२ इ.स. मध्ये वयाच्या अठ्ठावीसाव्या वर्षी एका पुरुषाचे आर्थिक उत्पन्न किती असावे. हो इथे मी स्त्रियांचा विचार अजिबात करू नका असे निक्षून सांगीन. कारण भारतातील स्त्रियांचा जन्म अर्थार्जनासाठी होत नाही. म्हणूनच शहरातल्या शाळा आणि शैक्षणिक संस्था चालतात. 

रत्नागिरीतलं शैक्षणिक वातावरण शहरीच होतं. कोकणातलं एकूणच शैक्षणिक वातावरण अधिक प्रगत आहे. दोन्ही टाळेबंदीत रत्नागिरीत राहूनच दूरस्थ माध्यमातून शाळेत शिकवले. आर्थिक अस्थैर्यात निसर्ग सौंदर्याने मिळणाऱ्या मानसिक स्थैर्याचा आधार होता. डोंबिवलीत आलो की चिडचीड होई. रत्नागिरीतल्या शाळेत चिटकायचा प्रयत्न केला. तिथे पुरुष शिक्षक शाळा चालवत. पण शाळा हे उत्तपन्नाचे द्वितीय साधन. संस्कृत शिक्षकाला पगार- डोक्यावरून पाणी पंधरा हजार! भिक्षुकी आणि पिढीजात जमीन सांभाळून, पाच-दहा घरगुती शिकवण्या घेऊन शाळेचे काम करण्याचे व्यावसायिक कसब कोकणातल्या शिक्षकांत आहे. एका शाळेचं नाव घ्यायला हरकत नाही. शतक महोत्सवी वर्षं साजरा करणारी रत्नागिरीतली फाटक शाळा. आमच्या घरातून माडांआड तिची कौलं दिसावीत इतकी जवळ. संस्कृतचा शिक्षक तर हवा होता. पण त्याचे मानधन पाच हजार इतकेच देता येणारे होते. कोणीही असो! त्याने बाहेर काहीही करावं. सरकारी नियमांचे काटेकोर पालन करून त्यात शिक्षण बसवले की काहींना ते सहज शक्य होतं. पे-रोल वर येण्याच्या मृगजळामागे धावत दशकानुदशके आर्थिक चणचण सहन करत ही तारेवरची कसरत करत, शैक्षणिक संस्थेची 'सेवा' करणारे तिथले शिक्षक पाहिले. जॅक लावून कुठे चिकटता येतंय का म्हणून प्रयत्न केले आणि सोडलेही.

दरम्यान, आकाशवाणीत संस्कृत वृत्तपत्र निवेदकासाठी दोन जागा निघाल्या. बाराशे रुपये खर्चून अर्जदार रक्कम आणि अर्ज पाठवले, दोन्ही जागांसाठी. ते अर्ज पोहचले का? त्यांचं पुढे काय झालं, काही समजू शकलं नाही. भारत फिरतांना संस्कृतच्या माध्यमातून चांगलं संपर्क जाळं विणलं होतं. आईही केंद्र सरकारी अधिकारी असल्याने तिचे दिल्ली दौरे झाले तेव्हा तिने चौकशी केली. पारदर्शकता नसलेला कारभार चांगलाच दिसून आला. तसाच अनुभव डेक्कन काॅलेजमधे निघालेल्या जागांविषयी आला. 

असो, हे सारे अनुभव घेतांना,
 "ह्या भारतभू पुत्राच्या कष्टाला किंमत यावी" 
हे शेतकऱ्यांची व्यथा सांगणारं प्रबोधन गीत आठवायचं. गरीब गरीब म्हणवणं ही मानसिक व्यथा आहे हेच खरं. ज्या संस्थेत हे गीत शिकलो, ज्या संस्थेने मला स्वतःतलं मीपण गवसायला मदत केली, त्याच संस्थेने दुसरीकडे भौतिक जगाच्या अर्थकारणा पासून दूर राहण्याची भ्रामक बौद्धिकं दिलेली होतीच. एक संस्था म्हणून तिला दोष देण्यात काहीच अर्थ नाही. एक मोठा मागास विचारप्रवाह त्या भ्रामक "त्यागाच्या" संकल्पनेवर जगत असतो. काही जण सोयीस्कर पाठ फिरवतात. काहीजण अडकतात. काहीजण दरी ओळखून काठावरून टाळ्या वाजवतात, झेंडे मिरवतात. बाकी ही, झेंडे मिरवणारी लोकं अत्यंत धोकादायक. माणसाला माणूस म्हणून जगू न देण्यात त्यांचाच मोठा वाटा असतो. फक्त नामनिराळे राहण्याचे कसब झेंड्याचे पांघरूण मिरवल्याने कमावलेले असते.

दोन वर्षांच्या अनुभवातून हिंदू, हिंदुत्व, समाजकारण, कार्यकर्तापण वगैरे सगळ्यांतून मनापासून बाहेर पडलो, खूप दूर आलो. कारण एकच- भारतासारख्या भांडवलशाही स्वीकारलेल्या देशात कोणी कष्टानुरूप पैश्यांची माळ चढवत असेल, गुण ओळखून योग्य पगारावर काम देत असेल तर तो गुणसन्मान स्वीकारावा. खाऊन झाल्यावर संडासात फ्लश होणारे नारळ, ओल्या कचऱ्या स्वरूपी निर्माल्यात जाणारे हार आणि फुकाच्या थापा मग त्या दाखवण्यासाठी कौतुकाच्या का असेनात-थापाच! स्वीकारण्यात काही अर्थ नाही. खरा अर्थ -अर्थातच, अर्थालाच.

शनिवार, २६ नोव्हेंबर, २०२२

चर्चा तर होणारच!

२६ नोव्हेंबर २०२२
सावित्रीबाईफुले नाट्यमंदिर, डोंबिवली
सी-२० आसनावर बसून पाहिलेला 
दु ४.३० चा प्रयोग

३ /५ ☆ तारांकन

आजच्या नाटकाची सुरुवात श्रद्धांजलीने झाली. आयुष्यभर अभिनयाला वाहून घेतलेला नट जेव्हा काळ्याच्या पडद्या आड जातो तेव्हा प्रेक्षक  प्रेक्षागृहातच बसून रंगमंचावरचा खेळ बघत असतो, रंगमंचाची सेवा करवून घेत असतो असं उगाच वाटून गेलं. नाटक होतं चर्चा तर होणारच. नवीनच नाटक. परीक्षणाने चर्चेत न आलेलं. त्यामुळे गर्दी जेमतेमच होती. पण आम्ही सी-20,21 म्हणजे समोरच्या रांगेत अगदी मधोमध बसलेलो. त्यामुळे नाटकातलं सौंदर्य आणि उणंधुणं स्पष्ट दिसत होतं. माझी निरीक्षणं नोंदवायचा हा छोटासा प्रयत्न.

*३ पात्रांचा २ अंकी प्रयोग*
 डाव्या-उजव्या विचारसरणीतील दोन कार्यकर्ते चर्चेसाठी रंगमंचावर उतरले होते. अस्ताद आणि अदिती! या चर्चेचं सूत्र हाताळत होते देशपांडे. बंगल्याचं सुंदर आणि भव्यदिव्य नेपथ्य पडदा उघडल्या पासूनच उत्सुकता वाढवत होतं. पात्र रंगमंचावर खेळू लागली तसे नेपथ्य वेशभूषेला झाकत होतं. तरीही वेशभूषेतील रंग विचारपूर्वक वापरलेले दिसून येत होते. डाव्या-उजव्या विचारसरणीतील कार्यकर्ते नट-नटी आणि अमेरिकन कंपनीने नियुक्त केलेला नाटकातला विदूषक. 

*भूमिका*
अदिती यांचा अभिनय उत्तम, प्रकाश झोत घेण्यातही त्या मागे न पडल्याने तो ठसठसून दिसला आणि नाटकात प्रभावी ठरला. बहुतांश उत्स्फूर्त टाळ्या त्यांच्या अभिनयाने घेतल्या.

त्या मानाने अस्ताद यांचा अभिनय फिका वाटला. किंबहुना अस्ताद यांच्या रंगभूमीवरील वावरातून  पिके चित्रपटातल्या प्रमुख नटाचा भास होत राहिला. प्रकाश योजना त्यांना साजेशी नव्हती. प्रेक्षकाभिमुख न होता नव्वद अंशाने होत केलेला अभिनय प्रक्षकांवर छाप पाडू शकला नाही. पण ह्या नटाच्या जमेची बाजू म्हणजे आवाजातील वैविध्य आणि प्रसंगानुरूप चढ-उतार. काही संवादांना टाळ्या आणि हाशे मिळाले ते शब्दफेकीतील कौशल्याने. 

"non देशपांडे" हे पात्र साकारणारे क्षितीज झारापकर यांचा अभिनय उत्तम होता. मुद्दमून घसा घाकरण्यामागचं कारण समजू शकलं नाही. त्यामुळे व्यत्यय निर्माण झाल्यासारखे वाटले. पण, विदूषकाच्या पात्राला त्यांनी पूर्ण न्याय दिलेला आहे.

*नेपथ्य, संगीत आणि प्रकाश योजना*
बंगल्याचे नेपथ्य मनोरम्य आणि भारदस्त आहे. संगीत अगदी मोजकेच आहे. त्यामुळे मधूनच येणारे ते आवाज अनेक ठिकाणी कृत्रीम वाटतात. नटीवर एका प्रसंगी पडणारा निळा झोत अतिशय परिणामकारक ठरतो. तर, नटावर कुठेही केशरी झोत न पाडल्याची कमतरता जाणवून येते. खिडकीतून येणारा प्रकाश झोत नाटकभर एकाच खिडकीतून येत असल्याने दिवसभराच्या वेळेचा आणि त्या प्रकाश झोताचा काहीच संबंध नसल्याचे समजवावे लागते. परंतु एकंदरीत, नाटकातील वळणावळणांवर वापरलेली प्रकाशयोजना अतिशय परिणामकारक ठरते, नाटकाला उठवते.

*कथानक*
पहिल्या अंकातील चर्चा फारच रटाळ, उथळ वाटत राहते. मध्यंतरापर्यंत लेखकाला नेमकं काय सांगायचंय हे समजू न शकल्याने प्रेक्षकांचा हिरमोड होतो. 
हा विषय भांडवलशाहीतील समाजाभिमुख कार्यकर्त्यांची- (मग ती कुठल्याही विचारसरणीची असोत)- होणारी कुचंबणा याकडे नेता आला असता. पण लेखकाने पहिल्या अंकात कुठल्याच विषयाला न्याय न देता प्रेक्षकांना विनाकारण बौद्धिक त्रास दिला आहे. (काही प्रेक्षक पहिल्या अंकात झोपल्याची चर्चा प्रयोग संपल्यावर प्रेक्षागृहाबाहेर रंगली होती.)

नाटकातील दुसरा अंक -पहिल्या अंकात पडलेलं नाटक उठवतो आणि प्रेक्षकांना खूष करतो. दुसऱ्या अंकात कथानकाने घेतलेली अनपेक्षित वळणं, तोतयेपणा आणि खरेपणांचं प्रकटीकरण प्रेक्षकांची मनं जिंकतं. पैसे अगदीच वाया न गेल्याचं समाधान देतं. 'अंतभला तो सब भला' म्हणणाऱ्यांनी हे नाटक नक्की पाहिलं पाहिजे कारण प्रेक्षागारातून बाहेर पडणारा प्रेक्षक आनंदाने आणि संतोषाने बाहेर पडतो.

-गंधार डोंबिवलीकर. ("खरं आडनाव लिहील्याने लोकांची बघण्याची मानसिकता बदलते."- इति नाटकातील नटी.)

सोमवार, १४ नोव्हेंबर, २०२२

ल श चे लेखन नियम- मराठी भाषेची दिशाभूल


१२.११.२०२२

मराठीचे संवर्धन करण्यासाठी एका विशिष्ट प्रकारे ल आणि श लिहिण्याचा नियम मराठी भाषेचा 'वेगळपणा' दाखवेल असे मत काही मराठी अभ्यासकांचे आहे. पण ते भाषेची दिशाभूल करणारेच!... 

प्रमाण ध्वनींचे चित्ररूप प्रकटीकरण म्हणजे लिपी. हिंदी, संस्कृत, नेपाळी, कोंकणी, मराठी या सर्व भारतीय भाषा स्वतःचं उच्चारण देवनागरी लिपीतून नोंदवतात. भारतीय लिप्यांचे मूळ ब्राह्मी, शारदा आणि ग्रंथ लिप्यांमधे आहे. लिहिण्याची साधनं जसजशी बदलत गेली तसतसे लिपींमधे बदल होत गेले. शिलालेख-बोरु-कापड-टाकदौत-कागद-लेखणी-टंकनसामग्री.
छापखान्यात कमी खिळे लागावेत म्हणून अ वर वेलांटी-मात्रा देऊन सगळे स्वर छापण्याची पद्धत सावरकरांनी त्या काळात सुरू केली होती. तंत्रज्ञानाच्या विकासाबरोबर ती मागे पडली.
 भाषा आणि लिपींचा विकास राजाश्रयावर अवलंबून असतो. शिख धर्मगुरु गुरुगोविंद सिंहांनी शारदा लिपीचा वापर करून गुरुमुखी लिपी लिहविली. आजची पंजाबी भाषा गुरुमुखीत लिहिली जाते. शिव काळखंडानंतर मोडी लिपीला राजाश्रय मिळाला. मराठी भाषा मोडीत लिहिली जात असे. अगदी भारताला स्वातंत्र्य मिळाल्या नंतरही महाराष्ट्रातील शाळांमधे मोडी शिकवली जात होती. मोडी ही काही भाषा नव्हे! देवनागरी लिपीतील नियम मोडून बनवलेली एक लिपी म्हणजे मोडी. उत्तर कर्नाटकात कन्नड देखील मोडीतून लिहिली जात. तसेच उर्दूही मोडीतून लिहिली गेल्याचे दिसून येते. संस्कृत, पाली, अर्धमागधी, विविध प्रांतातील आणि काळखंडातील प्राकृत या सगळ्या भाषांनीच देवनागरी लिपी स्वीकारल्याने भारतातील मोठ्या प्रांतात देवनागरी लिपीच वापरली गेली आहे. मगाशी उल्लेख केल्या प्रमाणे सगळ्याच भारतीय लिप्यांचा उगम आणि विकास ब्राह्मी लिपीतून झाला. अगदी तमीळ, मल्याळम, कन्नड आणि तेलुगूचा देखील!
त्यामुळे त्यांच्यात उच्चारण स्थानात्मक रचनेचा एक समान धागा दिसतो. कुचुटुतुपु! आता हे काय प्रकरण? हे उच्चारण स्थानांनुसार केलेले वर्णविभाजन सगळ्याच भारतीय भाषांमध्ये आहेत आणि त्यांच्या लिप्यांमधेही. काही भाषांनी काही वर्ण गाळले तर काहींनी त्यात भर घातली. तमीळ मधे प आणि ब साठी दोन वेगळे वर्ण नसले तरी "ळ्ह" साठी वेगळा वर्ण, ऴ साठी वेगळा वर्ण आहेच. तरीही त्या वर्णमालेच्या बांधणीचा साचा आपल्या देवनागरी सारखच. आधी स्वर, मग कुचुटुतुपु व्यंजनं आणि मग य पासून ऴ पर्यंतचे वर्ण!
आहे की नाही भारतीय लिप्यांमध्ये भारतीय एकत्व?
भाषेच्या प्रमाणीकरणासाठी लिपीवर बंधनं टाकणं म्हणजे लिपीचे दुर्बलीकरण! मराठी भाषेला समृद्ध करण्यासाठी एका समृद्ध लिपीचे पाश आवळले जाणे भाषेच्या विकासात स्वतःहून खंड घालण्यासारखे आहे. भाषेचा विकास हा भाषा वापरून होतो. वास्तविक लिपी आणि भाषेत परस्परसंबंध अजिबात नसतो. आज संस्कृत भाषा प्रत्येक भारतीय लिपीतून आणि असंख्य अभारतीय लिपीतून लिहिलेली दिसून येईल. अधिकृत रित्या देवनागरी लिपीतूनच संस्कृत लिहिण्याचा प्रघात असला तरी, विविध चिह्नांचा वापर करून रोमन लिपीला समृद्ध करण्याचे काम संस्कृतने केले. संस्कृतमधील उच्चारणांनी केले. उदा. ळ आणि ण रोमन मधे लिहिण्यासाठी ļa, ņa अनुक्रमे वापरतात. किंवा पञ्चमातला ञ लिहिण्यासाठी ña अश्या चिह्नांसहित रोमन अक्षरांचा वापर केला जातो. एकुणातच विविध उच्चारणं स्वीकारून लिपी समृध्द होत जाते. y सरळ रेषेने काढावा की v च्या खाली छोटी दांडी ठेऊनच काढावा असल्या नियमांनी कुठल्याही भाषेचे विशेषत्व साध्य होत नाही.
भाषा हे मनामनांना जोडण्याचे माध्यम. तिचा प्रवास एखाद्या नदीसारखा. अनेक उपनद्यांतून आलेली सत्त्वे स्वीकारायची आणि आपल्या दोहो तीरांवर सोडत जमीन सुफल करायची. पाणी हे माध्यम. भाषेची सत्त्व प्रवास करतात लिपींतून. भारतातील भाषा बदलल्याने दोन संस्कृती विभागलेल्या दिसत नाहीत. तर, लिपीने विभागलेल्या दिसतात. जव्हार-त्र्यंबक प्रांतातील बोलीत किती गुजराती, किती मराठी, किती खांदेशी, किती आगरी शब्द? कोण खिजगणती? पण तो प्रांत राहिला महाराष्ट्रात म्हणून त्यांची लिहीण्याची लिपी देवनागरी. आणि सापुताऱ्याच्या बोलीची लिपी? गुजराती! शब्द तेच. लिपी बदलल्याने शब्द एकमेकांना पोहचवण्याचे माध्यम बदलते. जे मराठी-गुजरातीचे तेच मराठी कानडीचे. एकमेकांवर कुरघोडी सुरू झाली की नदीचे पाणी अडून त्याचं डबकं व्हायला वेळ लागत नाही. वाहणे थांबले की, शेवाळे लागायचेच आणि पाय निसटायचाच. "आमची मराठी" अगर "आमची हिंदी" या दुराभिमानापायी एखादा नियम बनवला जात असेल तर तो चुकीचाच नाही का? त्याने अहंकाराचे पडदे निर्माण होऊन मुक्त देवाणघेवाण थेंबते.
माणूस जन्माला आल्यावर प्रत्येकाला आपापलं अस्तित्व टिकवायचं असतं. वयात आलेल्या मुलाच्या मताला घरात मान द्यावा लागतो. प्रस्थापित भाषेची वेगळी गोष्ट का असणार आहे?
भाषेच्या कुरघोडीचं राजकारण आणि त्या विरोधात केले जाणारे त्रोटक उपाय स्वतःच्याच पायावर कुऱ्हाड मारल्यासारखे आहेत. ते थांबवत स्वतःची मूळे पसरवून बाजूच्या झाडाबरोबरीने उभे राहणे आणि उंची गाठणे गरजेचे आहे.
हिंदी लादली जात असल्याचे वास्तव नाकारता येणारे नाही. त्याला उत्तरादाखल असले नियम बनवणे हा भामटेपणा आहे. त्याने मराठीचा विकास झाला का? याचं उत्तर नाहीच असेल! भाषेत नवशब्द निर्मिती करून भाषेचा विकास होतो. मराठीच्या बाबतीत बोलायचे झाल्यास जीवनाच्या प्रत्येक क्षेत्रात मराठी भाषा वापरता यावी यासाठी किती प्रयत्न झाले? विविध शैक्षणिक क्षेत्रातील मराठी प्रयोग वाढावा म्हणून एखाद्या अभ्यास मंडळाची दीर्घकालीन नियुक्ती झाली का? त्यात भाषातज्ञ होते की फक्त भावोत्कंठ प्रमाणपत्रधारी मराठीवादी? भाषा आपासात जोडण्याचे माध्यम आहे. एकमेकांवर कुरघोडी करून शत्रु वाढवण्याचे साधन नाही. "हिंदी आमची राष्ट्रभाषा नाही. आम्ही तिला स्वीकारणार नाही." हे दक्षिणभारतीयांप्रमाणे महाराष्ट्राला जोवर ठामपणे सांगता येत नाही तोवर हिंदी लादली जाणे थांबणार नाही. मग, दोन भाषेंतील भेद दाखवण्यासाठी एका समृद्ध लिपीचा बळी का घ्यावा? रेल्वेने महाराष्ट्रात मराठीचाच वापर करावा, राष्ट्रिय महामार्ग विकास प्राधिकरणाने महाराष्ट्रातील रस्त्यांवर मराठीच वापरावी, महाराष्ट्रातील प्रत्येक बँक सुविधा मराठीतच उपलब्ध व्हावी ह्या आणि अश्या कित्येक मराठी व्यवहाराच्या आग्रहास्तव कुठलीही पाऊले न उचलता देवनागरी लिपीवर घाला घालणारा इतका तकलादू आणि पोकळ नियम का बनवावा? इतकी लाचार आणि भिकार पातळी गाठणे हे मराठी भाषेचे दुर्दैवच.
एखादी गोष्ट अश्याच प्रकारे करायची असा नियम जेव्हा केला जातो तेव्हा त्याला पाश आवळणे असे म्हणतात. हिंदी असो वा मराठी असो दोन्ही भाषा देवनागरी लिपी वापरतात. दोन्ही भाषिकांनी स्वैर पणे लकार अगर शकार लिहिला तर कुणाचं नुकसान वा फायदा आहे?
या उलट देवनागरी लिपीत सगळ्यांनीच सरसकट एका प्रकारे लकार किंवा शकार वापरायचे ठरवले तर गोष्ट निराळी. पण आता अभ्यासकांचा वेळ आणि श्रम "हे" मराठीचं वेगळं आणि हिंदीचं वेगळं यावर विचार करण्यात अधिक खर्च होईल. नवीन शब्दनिर्मिती ऐवजी असलेले शब्द असेच लिहिले जायला हवेत हट्टावर श्रम आणि वेळ खर्च होईल. गांधी बरोबर की गान्धी या चर्चेचे चर्वितचर्वण लिपीची मुक्तता नाहिशी झाल्याने ज्याप्रमाणे केले जाते त्याच प्रमाणे करण्यासाठी अजून एक विषय वाढेल.
कारण असल्या पोकळ प्रमाणीकरणाने भारताचे एकसंधत्व धोक्यात येते.
ईशान्यभारतातील बोलींसाठी देवनागरी लिपीचे सक्षमीकरण करणे आणि त्यांच्यावर हिंदी न लादता त्यांच्या बोलींना भारतीय लेखनस्वरूप प्राप्त करून देणे ही आजच्या भारताची खरी गरज आहे. त्या उलट हे कूपमंडूक वृत्तीचे तथाकथित प्रमाणीकरण.
या नियमांना कुठलाही शास्त्रीय आधार नाही. किंवा लेखन-टंकन सामग्रीचा विचार करता आजच्या तंत्रज्ञानाची ती गरज आहे असेही नाही. केवळ हताश भावनाह्वेगाने असला नियम बनवणं आणि भाषेची दिशाभूल करणं चुकीचंच.
-गंधार.

शनिवार, ९ जुलै, २०२२

आजी, विठ्ठलभक्ती आणि मी

आषाढ शु. एकादशी ख्रि. 2022, उदयपुर
काल कांदाभजी तळू लागलो तेव्हा आजीची आठवण आली. आणि एकादशी जवळ येऊ लागली तशी ती येतच राहिली. म्हणून हा लेखनप्रपंच!
आषाढी एकादशी जवळ आली की आजीमधे उत्साह संचारायचा. नवमीला कांदेभजी करायचा अट्टहास शरीर थकू लागलं तरी आवरता येत नव्हता. मग आईने जवळची सुट्टी बघून कांदेनवमी करायला सुरवात केली. रविवारच्या सुट्ट्यांचे मुहूर्त चर्चमधे जाणाऱ्यांसाठीच असतात नाही का! आपण आपल्या परंपरा ॲडजष्ट करायला किती सहज शिकलोय. त्यात आपल्या धर्माचं पुरोगामित्व आहे. कळत्या वयात ट्रेनमधल्या हरिपाठात दंग व्हायचो. त्यासाठी नकळत्या वयात आजी बरोबर विठ्ठल मंदिरात जाऊन मस्तकी लावलेला बुक्का आणि हरिभजनाचे कानावर घडलेले संस्कार कारणीभूत असावेत असं आता वाटतं.

कोणे एके काळी अभ्यंगस्नान करून काकड आरतीला मंदिरात जाण्याची सवय आजीला लागली असावी. तिच्या उत्तर काळात ती रात्रंदिवस अभ्यंग स्नानानंतरच्या काकड आरतीत स्वमग्न व्हायचा प्रयत्न करत असे. अवेळी अंघोळीसाठी हट्ट धरत असे. एकादशीला आजीची आठवण येते ती आजीने दिलेल्या या विठ्ठलभक्तीमुळेच. घरात तिच्या हाताने लिहीलेल्या वह्या मी जपून ठेवल्या आहेत. तोच तिने आमच्यासाठी ठेवलेला वस्तुरूपी ठेवा. आज, उदयपुरात हस्तलिखितांवर काम करतांना आजीच्या त्या हस्तलिखितांची आठवण येणेही साहाजिक आहे. 

लहानपणी मी तिचं बोट धरून विठ्ठल मंदिरात जायचो. नंतर आधार लागू लागल्यावर तिला मी मंदिरात घेऊन जाऊ लागलो. अगदी नकळत घडत गेलं होतं ते. भजनमंडळांची एक गंमतच आहे. आजी ज्या मंदिरात जायची तिथेही ते घडायचं आणि ट्रेनमधेही तेच होतं. हरिपाठ ऐकत आषाढीला विठ्ठल झोपी गेला की  गोकुळातल्या गवळणी फेर धरू लागतात. श्रावण अष्टमीला काला होऊन कृष्ण जन्म झाला की पाळणे म्हणत गणपतीच्या आरत्या सुरू होतात. नंतर वारागणिक विविध देवता एकत्र येऊ लागतात. नवरात्र होऊन जाते. दिवाळी येऊन नाविन्याने रोषणाई करून जाते की कार्तिकीला पहाटेच्या काकड्याने विठ्ठल उठतो आणि पुन्हा हरिपाठ सुरू होतो. हा भक्तीरसाचा मेळ अतूट आहे. तो मंदिरातल्या दगडात नाही, भक्तिमय भजनातच आहे. 

आजीने रामरक्षा पाठ करून घेतली. पण रामाची मूर्तिभक्ती तिने माझ्याकडे कधी सोपवली नाही. म्हणून रामभक्तीचा पुरस्कार करणारं आजचं राजकीय हिंदुत्व मला अजिबात आपलंसं वाटत नाही. कासोद्याच्या घराबाजूला राममंदिर होतं. पण तिथला राम घरातल्या देव्हाऱ्यात किंवा घरातल्या भक्तीत कधीच आला नाही. तो फक्त शब्दरूपी रामरक्षेतच राहिला. पण पंढरपुरातला पांडुराया आजीकडून आमच्याकडे अगदी विविध मार्गाने आला. त्याचं मूर्तिरूप दर्शन हवसं वाटावं इतका... आणि म्हणूनच त्याची मूर्ती आम्ही पंढरपुराहून घरी आणली. 
 
आजी अंथरुणाला खिळून होती. तेव्हा आत्याने तिच्यासाठी तिच्या जवळ असावी म्हणून एक विठोबारुक्मिणीची मूर्ती आणली होती. ती घरात आलेली दुसरी मूर्ती.  ती पलंगा जवळ ठेवायला जागा नव्हती म्हणून आजीच्याच खोलीतच पण, आजीला दिसतेय की नाही अशी शंका येण्याइतकी दूर ठेवली गेली. आजीला ती दिसत नाही म्हणून, मला काही ती जागा आवडली नाही.  मी ती मूर्ती आजीच्या नजरेच्या टप्प्यात- पलंगा जवळच्या खिडकीत ठेवायचा खाटाटोप करत होतो. तेव्हा ती माझ्या हातून खाली पडली आणि पांडुरंग विटेवरून हलला. त्यानंतर दोन-तीन दिवसातंच आजी गेली. भक्तीत आंधळा होऊन मूर्खासारखा त्या घटनेच्या संदर्भ लावायचा मी कधीतरी प्रयत्नही केला होता. पण माझा तसल्या योगायोगांवर विश्वास नाही. जीर्ण शरीरात अडकलेला जीव सुटणं  आम्हा सगळ्यांनाच हवं होतं. ते विठ्ठलाने ऐकलं. आणि विठाई शरीरातून निघून गेली.
जाता जाता काया ही पंढरी, आत्मा हा विठ्ठल अभंग शिकवून गेली.
राजकारण्यांनी स्वार्थासाठी समाजावर लादलेलं आणि समाजाने आंधळेपणाने स्वीकारलेलं तथाकथित हिंदुत्व मला मान्य नसल्याने मी निधर्मी जगण्याचा विचार ठाम केला. तरी, त्यामुळे माझ्यावर झालेले हिंदुधर्माचे हे चांगले संस्कार सोडणं मूर्खपणाचेच ठरेल नाही का! चांगलं तेवढं घेऊन पुढे जातांना आजीनेच शिकवलेलं भजन आठवतं-
"पाऊस आला चिखल झाला भिजला हरीचा वीणा
हरिनामाचा गजर होतो विट्ठल विट्ठल म्हणा" आणि पुढे चला.
आठवणींच्या पावसाने विचारांचा चिखल झालाय, हिंदुत्वाची वीणा भिजत बेसूर झालीये. पण हरिनामाचा गजरच तितका- एकसंधपणे टिकून आहे. भोळी-भाबडी-भक्तीच म्हणाची. चांगलं तेवढं स्वीकारा आणि पुढे चला. 
॥रामकृष्णहरी॥

रविवार, १३ मार्च, २०२२

द काश्मीर फाईल्स

समीक्षा लिहीण्या पूर्वी...  मी पैसा खर्च करून "हिंदी" चित्रपट- द काश्मीर फाईल्स बघायला जातो तेव्हा...

मनापासून पैसे खर्चून चित्रपटगृहात जाऊन बाॅलिवूड चित्रपट बघणाऱ्यातला मी प्रेक्षक नाही. रविवारी उदयपुरातली दुकानंही बंद. दुपार किंवा संध्याकाळचं महागडं प्रक्षेपण बघण्यापेक्षा सकाळी नऊचं स्वस्तात बघता येणारं प्रक्षेपण बघूया असं ठरवलं.

हिंदी भाषेतला वयस्कांकित (Adult rated) चित्रपट बघायची ही माझी पहिलीच वेळ. घरातून निघतांना मनात या विषयी असंख्य विचार होते. वयस्कांकन म्हणजे नग्नता, शिव्या, महिला अत्याचारांचे खुले प्रदर्शन, वगैरे हीन गोष्टी दाखवल्या असाव्यात.
पूर्वी तंबूतल्या चित्रपटाच्या जमान्यात देवता आणि संतांचे चित्रपट बघायला तंबूबाहेर चप्पला काढायची पद्धत होती. चित्रपट हिट जायचे. तसे हल्ली देशभक्तीवर आधारित वरील हीन गोष्टी दाखवल्या तरी चित्रपट हिट जातात. इतिहासांचे विडंबन करणे हा गल्ले भरायचा सोप्पा मार्ग.  बाॅलिवूडची एकूण पातळी ही काही दिग्दर्शकांनी खालावलेली आहेच. त्यामुळे वयस्कांकित चित्रपटाची तिकीटं काढल्यावर तसला प्रकार बघायचीही मनाची तयारी ठेवली होती.

काश्मीर विषयीचे मिश्र अनुभव घेऊन चित्रपटगृहात जातांना...
हा विषय गूढ वलयांकित काश्मीरचा. काश्मीर म्हटलं की पटनीटाॅप पलिकडल्या भटोत, भदरवाह भागात झालेल्या गप्पा आणि तिथल्या शाळा आठवतात. संस्कृतमधे लिहीलेल्या राजतरंगिणीतली काश्मिरीयत आठवते. दोन हजार चौदा साली आई बाबांबरोबर फिरायला गेलो असतांना पहलगाम भागातील काही डोंगर भटकतांना तिथल्या स्थानिकांनी विचारलेला, "क्या आप हिन्दुस्थानसे हो?" (तुम्ही हिन्दुस्थानातून आला आहात का?) हा खवचट-टोकेरी प्रश्न आठवतो. तर दुसरीकडे दोन हजार अठरा साली भदरवाहच्या पहाडांत सायक्लवतांना अत्यंत प्रेमाने आणि अदबीने झालेला पाहूणचारही आठवतो. काश्मीरच्या शिक्षणात काश्मिरी सोडून इतर भाषांचाच भर अधिक! हेच इथले भाषिक पारतंत्र्य मी भाषारत सायकलोपासनेत नोंदवले होते. जिथे मातृभाषेतून व्यवहाराचे स्वातंत्र्य नाही तिथे स्वातंत्र्याची जाणीव दुर्मीळच असते. इथे तर उर्दू भाषेसहित जीवनमानच लादलेले... "यहापे सरकारी सिस्टम उल्टी चलती है" (इथे सरकारी यंत्रणा उलटी चालते) सरकारी योजनांच्या अंमलबजावणीवरचं  हे अस्सरच्या स्थानिकांचं वाक्य डोक्यात घुमू लागतं.
या सगळ्या माझ्या डोक्यातल्या पार्श्वभूमीवर मी चित्रपटगृहात जाऊन बसलो.

...आणि राष्ट्रगीताने चित्रपट सुरू झाला...

काश्मिरी भाषेचे सौष्ठव सुरुवातीपासूनच कानावर पडू लागले. समोरील दृष्य 1990 सालच्या 18-19 जानेवरी पासून घडलेल्या काश्मीरातल्या घटना आणि आजच्या भारतातील विद्यापीठं या दोन काळखंडात- आजचा तरुण विद्यार्थी- कृष्ण पंडित, त्याची प्रोफेसर- राधिका मेनन, आणि त्या काळात साऱ्या घटनांचे साक्षीदार असलेले चार मित्र या पात्रांच्या भूमिकेतून -फिरवू लागली.
 
एखादा चित्रपट पाहतांना दिग्दर्शक आपल्याला कुठे घेऊन जातो? विहीर, किल्ला, सैराट् यांसारख्या चित्रपटात आपण कथानकातल्या पात्रांशी एकरूप होऊन जातो. त्या गावात, त्या घरात नटां बरोबर आपलाही वावर सुरू असतो. विवेक अग्निहोत्रींच्या द काश्मीर फाईल्समधे मात्र आपण त्या पात्रांसोबत फिरत असूनही स्वतः एक त्रयस्थ हतबल नागरिक म्हणून अकल्पित क्रूर घटनांची माहिती करून घेत असतो. म्हणून हा नुस्ताच चित्रपट नसून माहितीपट आहे.
असंख्य सत्य घटनांची मोळी बांधत, एका अव्याप्त चिकित्सक आवृत्तीतून साकारलेलं हे एक थरारक कथानक आहे.
ज्यांनी हे भोगलं त्यांच्या जाणीवेच्या नखाएवढी जाणीवही आपल्याला नाही. डोळे न पाणवता हा चित्रपट बघता येणं कठीण आहे. हळव्या मनांसाठी चित्रपटगृहात जागा नाही. नैतिकतेचा तोल ढळू न देता वास्तविकतेला न्याय द्यायचा सर्वतोपरीने प्रयत्न केला गेला आहे. यात नग्नता नाही, शिव्या नाहीत. आहे तो फक्त रक्तपात. 1990 साली धनधान्यांनी भरलेल्या काश्मिरी पंडितांच्या घरात धान्य रक्तात न्हाऊन निघाल्याचं करुण वास्तव आपल्या पुढे उभं ठाकतं.
आजच्या शिक्षणातील फोलपणाही या चित्रपटाने प्रदर्शित केला आहे.
या इतिहासाला वाचा फोडण्याचं शिवधनुष्य सगळ्यांनीच उत्तमप्रकारे उचलून धरलं आहे.

अनुपम खेर, मृणाल कुलकर्णी, चिन्मय मांडलेकर, मिथून चक्रवर्ती, पल्लवी जोशी, प्रकाश बालेवाडी, भाषा सुंबली यांसारख्या प्रथित यश कलाकारांसोबत पृथ्वीराज सरनाईक या बालनटाने आणि दर्शन कुमारने स्वतःच्या अभिनय कौशल्यांनी हा माहितीपट थरारक बनवला आहे. पार्श्वसंगीतकारांच्या नावात स्वप्नील बांदोडकरचे नाव मराठी प्रेक्षक म्हणून काॅलर टाईट करणारे नक्की आहे.

ज्याप्रमाणे कृष्ण पंडितची भेट दल सरोवरात चिन्मय मांडलेकरशी घडवली तसंच मृणाल कुलकर्णीच्या मुली सोबत बोलणं घडवता आलं असतं असंही वाटत राहतं. त्यात या पूर्ण असलेल्या कथानकाचं अपूर्णत्व आहे आणि यशही.

आपण काय घेऊन चित्रपटगृहाच्या बाहेर पडतो?

स्मशान शांतता पसरलेले, प्रेक्षकांच्या हुंदक्यांनी भरलेले, पाणवत्या डोळ्यांचे असंख्य वास्तववादी क्षण या तीन तासात आपण अनुभवलेले असतात. कधीतरी ओक्साबोक्षी रडावं असंही वाटू शकेल. इतकं क्रौर्य आपण दृक्-श्राव्य माध्यमातून बघत असतो.
हा इतिहास अश्या प्रकारे सगळ्यांसमोर येण्याची वेळ यावी यातच- सगळ्या तथाकथित मानवतावाद्यांचं, आंतरराष्ट्रीय-राष्ट्रीय राजकारण्यांचं अपयश सामावलेलं आहे. आजच्या घटिकेतील समस्यांना (Real time problems) ऐतिहासिक भावनिक वळण देऊन तरुणांना भडकवणं, दिशाभूल करणं हा विज्ञानाधिष्ठित अध्ययना विरोधातला राजकारणी खेळ आहे. याची जाणीव कुठलीही नारेबाजी न करता चित्रपट बघणाऱ्या संवेदनशील युवक-युवतींना नक्कीच होऊ शकेल. हा चित्रपट माथेभडकाऊ नाही. इतिहासाची पुनरावृत्ती न होवो म्हणून डोळे उघडणारा नक्की आहे.
तेव्हा हा चित्रपट बघायचा असेल तर, मन वज्र करून चित्रपटगृहात जायला नक्की सज्ज व्हा...

ता. क.-
समीक्षकाचं काम चित्रपटाची समीक्षा करणं आहे. चित्रपटाच्या विषयावरील संशोधनावर वाहवत जाणं नाही.
गब्बरचं गुणगान ऐकू यावं म्हणून कोणी खलनायकाची भूमिका रेखाटत नसतो. "त्याने कापलेले हात किती क्रूर!" म्हणत समीक्षक घोळत राहिला तर चालेल का? 

नायकाचं उदात्तत्व सगळ्यांमधे चमकून दिसावं यासाठीही दिग्दर्शकाची उत्तमता पणाला लागते.
चित्रपट जर एका समाजाला नायक आणि दुसऱ्या समाजाला खलनायक बनवत असेल तर, मात्र चित्रपट प्रदर्शनावरच फेरविचार करण्याची गरज आहे. शालजोडे घेऊन फिरणाऱ्या प्रेक्षकांसमोर दिसणाऱ्या चित्रपटाचा विषय कसा असावा?
आपल्या उत्तम चित्रपटाचं, कथानकाचं मूर्ख प्रेक्षकांमुळे राजकारण घडू नये; अस्थिरतेचा ऐतिहासिक विषय मांडल्यावर वर्तमानात स्तोम माजू नये -याची जबाबदारी निर्माते आणि दिग्दर्शकाने स्वीकारायलाच हवी.
भारताच्या चित्रपटसृष्टीचा प्रदीर्घ आलेख बघतांना, सुजाण प्रेक्षक घडवण्यासाठी किती निर्मात्यांनी प्रयत्न केले?
समीक्षकांचा वापर भडक विधानं अधोरेखित करून स्वतःच्या चित्रपटाच्या प्रसिद्धीसाठी केला गेल्यावर या देशात चांगला प्रेक्षक तयार होणं अशक्यच. परिणामी कितीही उत्तम चित्रपट आला तरी वादाच्या भोवऱ्यात अडकवून तो बंद पाडणे, विषयावर राजकारण करत समाजाला भडकवणे हे नित्याचेच. प्रत्येक चित्रपट उत्तमच असतो असे नाही. पण, उत्तम चित्रपटातलं उत्तमत्व न समजण्यासारखं दुर्दैव दिग्दर्शकाच्या माथी येतं ते आंधळ्या समीक्षेमुळेच!

-सम्प्रिः।

रविवार, २० फेब्रुवारी, २०२२

जागतिक मातृभाषा दिवस

*जागतिक मातृभाषा दिवस*

एकोणीसशे अठ्ठेचाळीस साली पाकिस्तानने उर्दू 'राष्ट्रभाषा' म्हणून स्वीकारली. या धोरणाची अंमलबजावणी अराजकीय व लोकतंत्राला न जुमानता पूर्व पाकिस्तानात म्हणजेच आजच्या बांगलादेशात होऊ लागली. एकवीस फेब्रुवारी एकोणीसशे बावन्न रोजी ढाका युनिव्हर्सिटीत उर्दू 'राष्ट्रभाषे'विरोधात मोर्चा निघाला होता. पाकिस्तानी पोलिसांनी मोर्चेकरूंवर खुला गोळीबार केला. अब्दूस सलाम, अब्दूल बरकत, रफिक उद्दीन अहमद, अब्दूल जब्बर आणि शाहफियूर रहमान तिथेच हूतात्मे गेले आणि शेकडो जखमी झाले.

हीच पूर्व पाकिस्तान विरुद्ध पश्चिम पाकिस्तान युद्धाची नांदी होती. नंतर एका दशकाहून अधिक काळ पूर्वपाकिस्तानावर काळरात्र पसरली होती. तिथे बंगाली बोलण्यावरही बंदी आणली गेली. मग घडलेलं युद्ध आणि त्यात भारताची कामगिरी सगळ्यांनाच माहिती आहे.  एकोणीसशे एकाहत्तर साली "आमार बांगला" म्हणत बांगलादेश स्वतंत्र झाला. बंगाली भाषा मुक्त झाली.

परकीय राजवटी खालसा झाल्यावर साऱ्याच देशांमधे "राष्ट्र भाषेच्या" नावाखाली स्थानिक भाषा धोक्यात येत असल्याचे चित्र सर्वत्रच दिसून येत होतं. हाच मातृभाषा संरक्षणाचा मुद्दा लक्षात घेऊन युनेस्कोने बांगलादेशा मधील हूतात्म्यांना श्रद्धांजली म्हणून 21 फेब्रुवारी हा जागतिक मातृभाषा दिवस साजरा करण्याचे ठरवले. 17 नोव्हेंबर 1999 रोजी एकमताने हा ठराव पारीत करण्यात आला.

मातृभाषेसाठी घडलेलं युद्ध आणि वेगळे झालेले दोन देश हे भाषिक स्वातंत्र्याचे जगातील प्रेरणादायी उदाहरण आहे.
"स्वतंत्रते भगवति त्वामहं यशोयुतां वन्दे" म्हणणाऱ्या सावरकरांच्या "स्वातंत्र्य" मुद्द्यावरीलच हा एक आयाम...
मातृभाषेच्या स्वातंत्र्याचा.

सगळ्यांना जागतिक मातृभाषादिनाच्या शुभेच्छा!!!

-सम्प्रिः।
21.02.2022

मंगळवार, ४ जानेवारी, २०२२

कर्तव्यग्रहण

मूळ बंगाली
কে লইবে মোর কার্য, কহে সন্ধ্যারবি।
শুনিয়া জগৎ রহে নিরুত্তর ছবি।
মাটির প্রদীপ ছিল, সে কহিল, স্বামী,
আমার যেটুকু সাধ্য করিব তা আমি।

लिप्यंतरण
के लइबे मोर कार्य, कहे सन्ध्यारवि।
शुनिया जगत् रहे निरुत्तर छबि।
माटिर प्रदीप छिल, से कहिल स्वामी,
आमार जेटुकु साध्य करिब ता आमि।

भाषान्तर
"कोण घेईल माझं कार्य?..."
विचारे अस्ताला जाणारा सूर्य.
ऐकत राहतं ज्याला जगत
पसरे छाया गडद, निरुत्तर.
एक असते मातीची पणती
आश्वासत म्हणते जी,
"मालक, करता येईल तेवढं
करीन, मी."

सोमवार, ३ जानेवारी, २०२२

पाप-पुण्ण्याची गणती-हिशोब!

एका जवळच्या मित्राचे वडील कर्करोगासहित आपले शेवटचे  दिवस काढत आहेत. दोन वर्षांपूर्वी शरीरातली गाठ त्यांच्या लक्षात आली होती. त्यांनी घरात कोणालाही न सांगता आजार अंगावर काढला. यावर्षी घरातल्यांना शरीरातील अत्यंत बदल लक्षात आले. पण, त्यांनी उपचार घेण्याचे नाकारले. ते स्वतःहून जगाला निरोप द्यायला तयार झाले.

निर्व्यसनी असूनही कर्करोगाचे दुःख वाट्याला येणे- हे त्यांना वेदनेपेक्षा अधिक सलतं आहे. कधीही अपशब्द न उच्चारणारा माणूस असल्या वेदना पचवायला शिवीगाळ करू लागतो. मृत्यू कधीही येईल या विचाराने धीर सुटलेला असतो. हक्काचे प्रेम आणि हक्काचा राग एकाच वेळी प्रकट व्हावा असा चिडचिडेपणा घरातले अनुभवत असतात.

हे समजल्यावर, पाप काय आणि पुण्ण्य काय यावर विचार करत होतो. ज्याचं अंतीम फळ आनंद देतं ते पुण्ण्य आणि ज्याचं अंतीम फळ दुःख देतं ते पाप! 

ही खरं तर पुण्ण्यवान माणसं! आपलं आयुष्य कसं संपवायचं ते स्वतः ठरवतात. आपण मुलं म्हणून, सेवा करत, फक्त पितृ-ऋण फेडायचे काम करू शकतो. आणि तेच आपलं कर्तव्य असतं. तोच आपला पुण्ण्य संचय.

आजी गेली. आईचे काका, म्हणजे आमचे अंबरनाथचे आजोबा गेले. जाण्याच्या वेळा प्रत्येकाच्या ठरलेल्या होत्या. आजीला जगण्याची तीव्र इच्छा होती. तिच्या शरीराला होणाऱ्या वेदना बघणे आम्हालाच असह्य झाले. तेव्हा तिला शरीर सोडण्याविषयी समजवावं लागलं.  तिच्या सेवेला मुलं, सुना, नातवंडं शेवटपर्यंत होती. आजोबांनी पुतण्या आणि पुतणीला त्रास होऊ नये म्हणून अन्न पाणी सोडून दिले. त्यांचा एकटेपणा- आम्ही जवळ असूनही त्यांना दुःख देत होता. कुणासाठी, काय, कसं, कुठे सोडावं याची तयारी कमावणं सुरू झाल्या पासून करावी लागते. नाॅमिनीच्या रूपात फक्त पहिल्याची- 'कुणासाठी'ची तयारी करून घेतली जाते. बाकी सगळा मनो-बुद्धिचा खेळ!

आजीचं वेदनांवरचं लक्ष विचलित करण्यासाठी म्हटलेली रामरक्षा असो, तिचा हात गार पडेपर्यंत माझा हात तिच्या हातात असणे असो, तिला शेवटचे पाणी पाजणे असो किंवा शरीर सोडतांना गीता ऐकवणे असो. आजोबांना अंबरनाथला रात्री जाऊन केलेली मदत असो -या सगळ्याच अंतघटिका,  त्या आठवल्या की मला उगाच दुःखदायी आनंद होतो. 

तेच पुण्ण्य असतं का? माहीत नाही.

आजोबा गेले तेव्हा मी रत्नागिरीत होतो. म्हणजे आजोबांची काळजी घ्यायला आई-मामा होते. मी फक्त त्यांचा मानसिक आधार होऊ शकलो असतो. आई म्हणते मी दहाव्या-बाराव्याला रत्नागिरीहून परत यायला हवं होतं. पण, माझा काही श्राद्ध संस्कारांवर फारसा विश्वास नाही. ते फक्त नातेवाईकांच्या मानसिक समाधानासाठी असतात, असं मला वाटतं. मन हलकं करायचे वेगळे मार्गही असू शकतात. पिंडात ब्रह्म बघण्या पेक्षा निसर्गात ब्रह्म बघणं मला अधिक तर्कसंगत वाटतं. भाट्याच्या समुद्रावर मावळती बघतांना गुरुदेवांची- "के लइबे मोर कार्य कहे सन्ध्यारवि" ही कर्तव्यग्रहणावरील कविता म्हणणं आणि अंबरनाथच्या आजी आजोबांचं स्मरण करणं मला अधिक मानसिक समाधान देतं. 

आई-बाबा, मामा-मामींची धावपळ सुरू असतांना त्यांना मानसिक आधार द्यायला मी डोंबिवलीत थांबलो नाही म्हणून कधी कधी वाईट वाटतं. घश्यात पाणी अडकेल म्हणून मी एकच चमचा आजीला पाणी पाजलं. अजून पाणी पाजायला हवं होतं का? या विचारानेही वाईट वाटतं.

तेच पाप असतं का?  माहीत नाही. 

तत्त्वज्ञानात आस्तिकांचा जन्ममृत्यूच्या फेऱ्यात अडकलेला आणि नास्तिकांचा याच जगण्यात सुटणारा -पाप-पुण्ण्याचा हिशोब वाचतांना आणि त्यावर विचार करतांना मला दोन्ही पक्ष पटतात.  आज जगत असतांना चार्वाकांसारखं जगावं. पण, उद्याच्या कृतीवर विचार करतांना आस्तिकांप्रमाणे करावा असं मला वाटतं. कारण दोन्ही पक्ष चुकीचे नाहीत.

आणि मृत्यूसमयी- शरीर सोडतांना हीच पूर्वी केलेली पाप-पुण्ण्य आठवतील ना! 

गीता-गीतईतले शब्द आजीच्या कानावर पडले तेव्हा तिचे हात-पाय गार पडले होते. पण, त्यानंतर शिरेतून वाहणारा रक्तप्रवाहाचा शेवटचा ठोका मी बघितला. तिच्या मनात, बुद्धीत काय काय सुरू असेल त्या तासाभरात? आयुष्यभरात मनाविरुद्ध घडलेल्या गोष्टी पाप म्हणून तिला आठवल्या असतील का?

वैयाकरणी म्हणून शब्दनित्यत्व मान्य केले तर, आपण उभा केलेला संसार शेवटी तिच्या भोवती होता हे शब्दातून तिला समजलं असेल. हीच पुण्ण्याईची तृप्तता असेल का?

 

सात-आठ वर्ष एकटं जगत असतांना आजोबांनी एकटं मरण्याची मनो-बुद्धीची पूर्वतयारी केली नसेल का? अधिक जगण्याने पुतण्यांना त्रास होईल या विचाराने इस्पिताळात जायला नाकारणे. हे नकारात्मक एकटेपण येणे- मनाविरुद्ध नसेल किंवा असेलही. अन्नपाणी सोडल्यानंतर त्याच पाप-पुण्ण्याचा हिशोब ते करत असतील का?

म्हणजे, मनाविरुद्ध फळ देणारी, घडणारी कृत्य करणे म्हणजे पाप आणि शांतता देणारं वर्तन म्हणजेच पुण्ण्य असावं. असं तरी आता वाटतंय.
-सम्प्रिः।