१२.११.२०२२
मराठीचे संवर्धन करण्यासाठी एका विशिष्ट प्रकारे ल आणि श लिहिण्याचा नियम मराठी भाषेचा 'वेगळपणा' दाखवेल असे मत काही मराठी अभ्यासकांचे आहे. पण ते भाषेची दिशाभूल करणारेच!...
छापखान्यात कमी खिळे लागावेत म्हणून अ वर वेलांटी-मात्रा देऊन सगळे स्वर छापण्याची पद्धत सावरकरांनी त्या काळात सुरू केली होती. तंत्रज्ञानाच्या विकासाबरोबर ती मागे पडली.
भाषा आणि लिपींचा विकास राजाश्रयावर अवलंबून असतो. शिख धर्मगुरु गुरुगोविंद सिंहांनी शारदा लिपीचा वापर करून गुरुमुखी लिपी लिहविली. आजची पंजाबी भाषा गुरुमुखीत लिहिली जाते. शिव काळखंडानंतर मोडी लिपीला राजाश्रय मिळाला. मराठी भाषा मोडीत लिहिली जात असे. अगदी भारताला स्वातंत्र्य मिळाल्या नंतरही महाराष्ट्रातील शाळांमधे मोडी शिकवली जात होती. मोडी ही काही भाषा नव्हे! देवनागरी लिपीतील नियम मोडून बनवलेली एक लिपी म्हणजे मोडी. उत्तर कर्नाटकात कन्नड देखील मोडीतून लिहिली जात. तसेच उर्दूही मोडीतून लिहिली गेल्याचे दिसून येते. संस्कृत, पाली, अर्धमागधी, विविध प्रांतातील आणि काळखंडातील प्राकृत या सगळ्या भाषांनीच देवनागरी लिपी स्वीकारल्याने भारतातील मोठ्या प्रांतात देवनागरी लिपीच वापरली गेली आहे. मगाशी उल्लेख केल्या प्रमाणे सगळ्याच भारतीय लिप्यांचा उगम आणि विकास ब्राह्मी लिपीतून झाला. अगदी तमीळ, मल्याळम, कन्नड आणि तेलुगूचा देखील!
त्यामुळे त्यांच्यात उच्चारण स्थानात्मक रचनेचा एक समान धागा दिसतो. कुचुटुतुपु! आता हे काय प्रकरण? हे उच्चारण स्थानांनुसार केलेले वर्णविभाजन सगळ्याच भारतीय भाषांमध्ये आहेत आणि त्यांच्या लिप्यांमधेही. काही भाषांनी काही वर्ण गाळले तर काहींनी त्यात भर घातली. तमीळ मधे प आणि ब साठी दोन वेगळे वर्ण नसले तरी "ळ्ह" साठी वेगळा वर्ण, ऴ साठी वेगळा वर्ण आहेच. तरीही त्या वर्णमालेच्या बांधणीचा साचा आपल्या देवनागरी सारखच. आधी स्वर, मग कुचुटुतुपु व्यंजनं आणि मग य पासून ऴ पर्यंतचे वर्ण!
आहे की नाही भारतीय लिप्यांमध्ये भारतीय एकत्व?
भाषेच्या प्रमाणीकरणासाठी लिपीवर बंधनं टाकणं म्हणजे लिपीचे दुर्बलीकरण! मराठी भाषेला समृद्ध करण्यासाठी एका समृद्ध लिपीचे पाश आवळले जाणे भाषेच्या विकासात स्वतःहून खंड घालण्यासारखे आहे. भाषेचा विकास हा भाषा वापरून होतो. वास्तविक लिपी आणि भाषेत परस्परसंबंध अजिबात नसतो. आज संस्कृत भाषा प्रत्येक भारतीय लिपीतून आणि असंख्य अभारतीय लिपीतून लिहिलेली दिसून येईल. अधिकृत रित्या देवनागरी लिपीतूनच संस्कृत लिहिण्याचा प्रघात असला तरी, विविध चिह्नांचा वापर करून रोमन लिपीला समृद्ध करण्याचे काम संस्कृतने केले. संस्कृतमधील उच्चारणांनी केले. उदा. ळ आणि ण रोमन मधे लिहिण्यासाठी ļa, ņa अनुक्रमे वापरतात. किंवा पञ्चमातला ञ लिहिण्यासाठी ña अश्या चिह्नांसहित रोमन अक्षरांचा वापर केला जातो. एकुणातच विविध उच्चारणं स्वीकारून लिपी समृध्द होत जाते. y सरळ रेषेने काढावा की v च्या खाली छोटी दांडी ठेऊनच काढावा असल्या नियमांनी कुठल्याही भाषेचे विशेषत्व साध्य होत नाही.
भाषा हे मनामनांना जोडण्याचे माध्यम. तिचा प्रवास एखाद्या नदीसारखा. अनेक उपनद्यांतून आलेली सत्त्वे स्वीकारायची आणि आपल्या दोहो तीरांवर सोडत जमीन सुफल करायची. पाणी हे माध्यम. भाषेची सत्त्व प्रवास करतात लिपींतून. भारतातील भाषा बदलल्याने दोन संस्कृती विभागलेल्या दिसत नाहीत. तर, लिपीने विभागलेल्या दिसतात. जव्हार-त्र्यंबक प्रांतातील बोलीत किती गुजराती, किती मराठी, किती खांदेशी, किती आगरी शब्द? कोण खिजगणती? पण तो प्रांत राहिला महाराष्ट्रात म्हणून त्यांची लिहीण्याची लिपी देवनागरी. आणि सापुताऱ्याच्या बोलीची लिपी? गुजराती! शब्द तेच. लिपी बदलल्याने शब्द एकमेकांना पोहचवण्याचे माध्यम बदलते. जे मराठी-गुजरातीचे तेच मराठी कानडीचे. एकमेकांवर कुरघोडी सुरू झाली की नदीचे पाणी अडून त्याचं डबकं व्हायला वेळ लागत नाही. वाहणे थांबले की, शेवाळे लागायचेच आणि पाय निसटायचाच. "आमची मराठी" अगर "आमची हिंदी" या दुराभिमानापायी एखादा नियम बनवला जात असेल तर तो चुकीचाच नाही का? त्याने अहंकाराचे पडदे निर्माण होऊन मुक्त देवाणघेवाण थेंबते.
माणूस जन्माला आल्यावर प्रत्येकाला आपापलं अस्तित्व टिकवायचं असतं. वयात आलेल्या मुलाच्या मताला घरात मान द्यावा लागतो. प्रस्थापित भाषेची वेगळी गोष्ट का असणार आहे?
भाषेच्या कुरघोडीचं राजकारण आणि त्या विरोधात केले जाणारे त्रोटक उपाय स्वतःच्याच पायावर कुऱ्हाड मारल्यासारखे आहेत. ते थांबवत स्वतःची मूळे पसरवून बाजूच्या झाडाबरोबरीने उभे राहणे आणि उंची गाठणे गरजेचे आहे.
हिंदी लादली जात असल्याचे वास्तव नाकारता येणारे नाही. त्याला उत्तरादाखल असले नियम बनवणे हा भामटेपणा आहे. त्याने मराठीचा विकास झाला का? याचं उत्तर नाहीच असेल! भाषेत नवशब्द निर्मिती करून भाषेचा विकास होतो. मराठीच्या बाबतीत बोलायचे झाल्यास जीवनाच्या प्रत्येक क्षेत्रात मराठी भाषा वापरता यावी यासाठी किती प्रयत्न झाले? विविध शैक्षणिक क्षेत्रातील मराठी प्रयोग वाढावा म्हणून एखाद्या अभ्यास मंडळाची दीर्घकालीन नियुक्ती झाली का? त्यात भाषातज्ञ होते की फक्त भावोत्कंठ प्रमाणपत्रधारी मराठीवादी? भाषा आपासात जोडण्याचे माध्यम आहे. एकमेकांवर कुरघोडी करून शत्रु वाढवण्याचे साधन नाही. "हिंदी आमची राष्ट्रभाषा नाही. आम्ही तिला स्वीकारणार नाही." हे दक्षिणभारतीयांप्रमाणे महाराष्ट्राला जोवर ठामपणे सांगता येत नाही तोवर हिंदी लादली जाणे थांबणार नाही. मग, दोन भाषेंतील भेद दाखवण्यासाठी एका समृद्ध लिपीचा बळी का घ्यावा? रेल्वेने महाराष्ट्रात मराठीचाच वापर करावा, राष्ट्रिय महामार्ग विकास प्राधिकरणाने महाराष्ट्रातील रस्त्यांवर मराठीच वापरावी, महाराष्ट्रातील प्रत्येक बँक सुविधा मराठीतच उपलब्ध व्हावी ह्या आणि अश्या कित्येक मराठी व्यवहाराच्या आग्रहास्तव कुठलीही पाऊले न उचलता देवनागरी लिपीवर घाला घालणारा इतका तकलादू आणि पोकळ नियम का बनवावा? इतकी लाचार आणि भिकार पातळी गाठणे हे मराठी भाषेचे दुर्दैवच.
एखादी गोष्ट अश्याच प्रकारे करायची असा नियम जेव्हा केला जातो तेव्हा त्याला पाश आवळणे असे म्हणतात. हिंदी असो वा मराठी असो दोन्ही भाषा देवनागरी लिपी वापरतात. दोन्ही भाषिकांनी स्वैर पणे लकार अगर शकार लिहिला तर कुणाचं नुकसान वा फायदा आहे?
या उलट देवनागरी लिपीत सगळ्यांनीच सरसकट एका प्रकारे लकार किंवा शकार वापरायचे ठरवले तर गोष्ट निराळी. पण आता अभ्यासकांचा वेळ आणि श्रम "हे" मराठीचं वेगळं आणि हिंदीचं वेगळं यावर विचार करण्यात अधिक खर्च होईल. नवीन शब्दनिर्मिती ऐवजी असलेले शब्द असेच लिहिले जायला हवेत हट्टावर श्रम आणि वेळ खर्च होईल. गांधी बरोबर की गान्धी या चर्चेचे चर्वितचर्वण लिपीची मुक्तता नाहिशी झाल्याने ज्याप्रमाणे केले जाते त्याच प्रमाणे करण्यासाठी अजून एक विषय वाढेल.
कारण असल्या पोकळ प्रमाणीकरणाने भारताचे एकसंधत्व धोक्यात येते.
ईशान्यभारतातील बोलींसाठी देवनागरी लिपीचे सक्षमीकरण करणे आणि त्यांच्यावर हिंदी न लादता त्यांच्या बोलींना भारतीय लेखनस्वरूप प्राप्त करून देणे ही आजच्या भारताची खरी गरज आहे. त्या उलट हे कूपमंडूक वृत्तीचे तथाकथित प्रमाणीकरण.
या नियमांना कुठलाही शास्त्रीय आधार नाही. किंवा लेखन-टंकन सामग्रीचा विचार करता आजच्या तंत्रज्ञानाची ती गरज आहे असेही नाही. केवळ हताश भावनाह्वेगाने असला नियम बनवणं आणि भाषेची दिशाभूल करणं चुकीचंच.
-गंधार.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा