मत छोटंसंच आहे. पण त्यासाठी बरंच काही घडून गेलेलं आहे.-
हार-तुरे, शाल-श्रीफळं, सत्कार-सन्मान काही नको; सामान्य माणूस म्हणून जगू द्या!
२०२२ चा शेवटचा महिना उजाडलाय. नोकरीमुळे आयुष्यात पहिल्यांदाच आर्थिक स्थैर्य अनुभवतोय. मागे वळून पाहतांना कमालीच्या अस्थिरतेचा काळ मागे पडल्याची जाणीव होते आहे. भारत फिरत असतांना पैसे कधीच कमी पडले नाहीत. किंबहुना उधळीवृत्ती नसल्याने वायफळ खर्च कधीच होत नसे आणि जिथे खर्च करावेत तिथे आखुडता हातही घेतला जात नसे. त्यानंतर २०१९ मधे घरी आल्यावर तीन महिने सादरीकरणं तयार करण्यात आणि सत्कार समारंभांमधे निघून गेले. शैक्षणिक क्षेत्रात काम करायचं ठरवलेलं होतं. ग्रामीण भागात की शहरी भागात ते ठरवायचं होतं. डोंबिवलीतल्या माॅडल इंग्लीश स्कूल मध्ये शिकवल्याने शहरी शाळेतला खूप छान अनुभव होता. ग्रामीण भागातील अनुभव घ्यायला पुढील तीन महिने प्रबोधिनीच्या हराळी केंद्रात राहून आजुबाजूच्या शाळांमध्ये जाऊन पाहिले. फेब्रुवारीत परतलो ते शहरी भागातील शाळांमधेच काम करायचे असे ठरवूनच. २०२०-२१ चे शैक्षणिक वर्ष टाळेबंदीतच सुरू झाले. मिळेल त्या शाळेत एक वर्ष शिकवायची तयारी होतीच. ऑनलाईन शिकवतांना किती विद्यार्थ्यांना पकडून ठेवता येईल हा प्रश्नच होता. पण, शेवटी सगळेच विद्यार्थी दुर्लक्ष करणारे असतात असेही नाही आणि सगळेच उत्तम असतात असेही नाही. ज्यांनी स्वतःहून मेहनत घेतली ते पुढे आले. बाकीचे मागे राहिले. दूरस्थ माध्यमाने त्यांच्या मागे लागून, त्यांचं बोट धरून पुढे आणणे शक्य नव्हते. शिक्षकी पेशाला स्वतःत पालकत्व नकळत स्वीकारावे लागते. देवनागरी टंकन कार्यशाळा त्याचंच प्रतीक म्हणून कल्पना सुचली. गणपतीच्या सुट्टीत शाळेतल्या सगळ्या मुलांना देवनागरी टंकनासाठी मार्गदर्शन केले. शाळेकडून एकाही अधिक पैश्याची अपेक्षा न ठेवता. शंभर मार्कांच्या तीन अर्ध्या तुकड्या म्हणजे अर्धवेळ शिक्षकाचे मानधन होते आठ हजार रुपये. इसवी सन २०२०-२१ ची गोष्ट!
असेच विविध कल्पक उपक्रम आणि कल्पक गृहपाठाच्या आधारावर दूरस्थ माध्यमातूनही मुलांच्या सातत्याने संपर्कात राहून विषयकुतूहल जीवंत ठेवण्याचा प्रयत्न असायचाच. २०२१ दुसऱ्या लाटेच्या भीती बरोबर टाळेबंदीनेच संपले.
टाळेबंदी उठताच मला काही गोष्टी जाणवू लागल्या. ज्यांची जाणीव टाळेबंदीत होत नसे. पैकी एक- आपला पगार आपल्या खर्चाला जेमतेम पुरणारा आहे. दोन- आपल्या पगारात आपण सायकलची देखभाल करू शकत नाही.
कारण, वीस हजार किलोमीटर चाललेल्या सायकलचे हळू हळू सगळेच छोटे-मोठे भाग बदलावे लागत होते. दर्जेदार पण महाग वाटणाऱ्या प्रत्येक भागामुळे होणारे उत्तम परिणाम अनुभवल्यामुळे आता पुन्हा एक पायरी खाली उतरून दुय्यम दर्जाचे भाग विकत घेणं मनाला सहन होईना.
शिक्षकी पेशातील पूर्णवेळ नोकरी स्वीकारायला मला आवडलेच असते. पण जी-ती शिक्षण संस्था १२-१५ हजारावर एकाही पैश्या संबंधी ब्र उच्चारी ना!
कहर तर, डोंबिवलीतल्या एका खूप प्रतिष्ठित शाळेने केला. अशी संस्था जिने माझा सत्कारही केला आणि प्रबोधिनीच्या कामामुळे जिथला जवळ जवळ प्रत्येक शिक्षक ओळखीचा. "संस्थेची आर्थिक स्थिती हालाकीची असल्याने सध्या आम्ही पाच हजार रूपये मानधन देऊ शकू. पण,आम्हालाच ते मानधन कमी वाटत असल्याने आम्ही शिक्षक आमच्या पगारातून पैसे काढून वरून दोन हजार. म्हणजे सातहजार रूपये देऊ. शंभर मार्कांचे तीन पूर्ण वर्ग आहेत..." म्हणजे पूर्ण वेळ शाळेत शिकवण्याचा हा मला देऊ केलेला पगार ऐकून मी थक्कच झालो.
ही किंमत होती माझी? एखाद्याच्या वेळेची किंवा कष्टाची?
सगळे हार, सगळ्या शाली, सगळी श्रीफळं, मान-सन्मान... त्याच क्षणी मी ठरवलं- यापुढे कुणाचीही शब्बासकी, प्रशंसा स्वीकारायची नाही.
वर्षभराचा शाळेत दूरस्थ माध्यमातून शिकवण्याचा अनुभव आणि त्यापूर्वी अजून एका वर्षाचा शाळेत प्रत्यक्ष शिकवण्याचा अनुभव पाठीशी असतांना, नुस्त पुस्तकी आणि प्रमाणपत्रां पुरतं नाही तर, देशभर फिरून आल्या नंतरचं गाठोडं बरोबर असतांना पूर्णवेळ काम करून घ्यायची ही किंमत करावी?
माणूस म्हणून तरी कसे जगावे?
आठ हजाराची नोकरी "कधीही सोडून जाईन" या बोलीवर २०२१-२२ च्या शैक्षणिक वर्षात सुरू ठेवली. आपल्या मुलांना ध्रुवा महोत्सवाचा अनुभव द्यायलाच हवा. म्हणून त्याची तयारी करून घेतली. खरं तर, शाळेसाठी मी अर्धवेळ काम करत असलो तरी मी मनाने पूर्णवेळ शाळेत गुंतणाऱ्या प्रकृतीचा होतो. माॅडेल मधे शिकवतांना तीन दिवस शाळेत गेले तरी मधल्या दोन दिवसांमध्ये शाळेत काय करता येऊ शकतं याचे विचार आपोआपच डोकावत. अभ्यासातला विषय आवडला की त्यात गुंतून राहण्याची प्रवृत्ती आधीपासून असल्याने. अर्धवेळ शाळा ही फक्त संस्थेच्या आर्थिक सोयीची असे. २०२१ ची दिवाळी संपली आणि शाळा भरू लागली.
माझा मोबाईल भारत फिरून आणि दीडवर्ष दूरस्थ माध्यमातून वर्ग घेऊन कुरकूर करत होता. लॅपटाॅपही थकला होता. या दोहोंपैकी काहीही नवीन घेण्यासाठी पैसे नव्हते. मी घरूनही पैसे का मागावेत?
मी कधी गरीब नव्हतो. आई बाबा पाठीशी खंबीरपणे उभे होते. पण ओरबाडणाऱ्या वृत्तीने ही परिस्थिती आणली होती. गीता म्हणते, "तुला देहवंताला जगायचे ते कर्म करत करतच." मी कर्म करत होतो. पण शैक्षणिक संस्थांना, "क्व ते धर्मस्तदा गतः" (तुझा धर्म कुठे गेला होता?) विचारणारं कुणी होतं का?
नोव्हेंबर महिन्यात पगार वाढवला नाही तर मी सोडतो या हट्टाने राजीनामा टाकला. "तुम्ही हे शैक्षणिक वर्ष पूर्ण करा. फेब्रुवारीत बढती देतो." वगैरे आश्वासनांची गळ होतीच. पण माझा 'समाजसेवक' म्हणून बराच आर्थिक अंत पाहण्यात आला होता.
मी राजीनामा मागे घेतला नाही. नोव्हेंबर मधे शाळा सोडली. पुढे एका शाळेने मला १५ हजार रूपये पूर्णवेळ आणि एका कनिष्ठ महाविद्यालयाने २० हजार रूपये पूर्णवेळ अशी नोकरी देऊ केली. इतरत्र कुठेच काही झालं नाही तर महाविद्यालय स्वीकारू अशी तयारी दर्शवली. कारण शालेय शिक्षणात भाषेचा पाया पक्का करून घेण्यात जी मजा आहे ती नंतरच्या शब्दजंजाळ शास्त्रार्थात नाही. म्हणून शालेय वयोगटाला शिकवण्यालाच प्राधान्य. पण १५ हजारावर शाळेत लागणं काही शक्य नव्हतं.
आज इतर कुठल्याही क्षेत्रात काम करणाऱ्याचे वार्षिक उत्पन्न किती असते? २०२२ इ.स. मध्ये वयाच्या अठ्ठावीसाव्या वर्षी एका पुरुषाचे आर्थिक उत्पन्न किती असावे. हो इथे मी स्त्रियांचा विचार अजिबात करू नका असे निक्षून सांगीन. कारण भारतातील स्त्रियांचा जन्म अर्थार्जनासाठी होत नाही. म्हणूनच शहरातल्या शाळा आणि शैक्षणिक संस्था चालतात.
रत्नागिरीतलं शैक्षणिक वातावरण शहरीच होतं. कोकणातलं एकूणच शैक्षणिक वातावरण अधिक प्रगत आहे. दोन्ही टाळेबंदीत रत्नागिरीत राहूनच दूरस्थ माध्यमातून शाळेत शिकवले. आर्थिक अस्थैर्यात निसर्ग सौंदर्याने मिळणाऱ्या मानसिक स्थैर्याचा आधार होता. डोंबिवलीत आलो की चिडचीड होई. रत्नागिरीतल्या शाळेत चिटकायचा प्रयत्न केला. तिथे पुरुष शिक्षक शाळा चालवत. पण शाळा हे उत्तपन्नाचे द्वितीय साधन. संस्कृत शिक्षकाला पगार- डोक्यावरून पाणी पंधरा हजार! भिक्षुकी आणि पिढीजात जमीन सांभाळून, पाच-दहा घरगुती शिकवण्या घेऊन शाळेचे काम करण्याचे व्यावसायिक कसब कोकणातल्या शिक्षकांत आहे. एका शाळेचं नाव घ्यायला हरकत नाही. शतक महोत्सवी वर्षं साजरा करणारी रत्नागिरीतली फाटक शाळा. आमच्या घरातून माडांआड तिची कौलं दिसावीत इतकी जवळ. संस्कृतचा शिक्षक तर हवा होता. पण त्याचे मानधन पाच हजार इतकेच देता येणारे होते. कोणीही असो! त्याने बाहेर काहीही करावं. सरकारी नियमांचे काटेकोर पालन करून त्यात शिक्षण बसवले की काहींना ते सहज शक्य होतं. पे-रोल वर येण्याच्या मृगजळामागे धावत दशकानुदशके आर्थिक चणचण सहन करत ही तारेवरची कसरत करत, शैक्षणिक संस्थेची 'सेवा' करणारे तिथले शिक्षक पाहिले. जॅक लावून कुठे चिकटता येतंय का म्हणून प्रयत्न केले आणि सोडलेही.
दरम्यान, आकाशवाणीत संस्कृत वृत्तपत्र निवेदकासाठी दोन जागा निघाल्या. बाराशे रुपये खर्चून अर्जदार रक्कम आणि अर्ज पाठवले, दोन्ही जागांसाठी. ते अर्ज पोहचले का? त्यांचं पुढे काय झालं, काही समजू शकलं नाही. भारत फिरतांना संस्कृतच्या माध्यमातून चांगलं संपर्क जाळं विणलं होतं. आईही केंद्र सरकारी अधिकारी असल्याने तिचे दिल्ली दौरे झाले तेव्हा तिने चौकशी केली. पारदर्शकता नसलेला कारभार चांगलाच दिसून आला. तसाच अनुभव डेक्कन काॅलेजमधे निघालेल्या जागांविषयी आला.
असो, हे सारे अनुभव घेतांना,
"ह्या भारतभू पुत्राच्या कष्टाला किंमत यावी"
हे शेतकऱ्यांची व्यथा सांगणारं प्रबोधन गीत आठवायचं. गरीब गरीब म्हणवणं ही मानसिक व्यथा आहे हेच खरं. ज्या संस्थेत हे गीत शिकलो, ज्या संस्थेने मला स्वतःतलं मीपण गवसायला मदत केली, त्याच संस्थेने दुसरीकडे भौतिक जगाच्या अर्थकारणा पासून दूर राहण्याची भ्रामक बौद्धिकं दिलेली होतीच. एक संस्था म्हणून तिला दोष देण्यात काहीच अर्थ नाही. एक मोठा मागास विचारप्रवाह त्या भ्रामक "त्यागाच्या" संकल्पनेवर जगत असतो. काही जण सोयीस्कर पाठ फिरवतात. काहीजण अडकतात. काहीजण दरी ओळखून काठावरून टाळ्या वाजवतात, झेंडे मिरवतात. बाकी ही, झेंडे मिरवणारी लोकं अत्यंत धोकादायक. माणसाला माणूस म्हणून जगू न देण्यात त्यांचाच मोठा वाटा असतो. फक्त नामनिराळे राहण्याचे कसब झेंड्याचे पांघरूण मिरवल्याने कमावलेले असते.
दोन वर्षांच्या अनुभवातून हिंदू, हिंदुत्व, समाजकारण, कार्यकर्तापण वगैरे सगळ्यांतून मनापासून बाहेर पडलो, खूप दूर आलो. कारण एकच- भारतासारख्या भांडवलशाही स्वीकारलेल्या देशात कोणी कष्टानुरूप पैश्यांची माळ चढवत असेल, गुण ओळखून योग्य पगारावर काम देत असेल तर तो गुणसन्मान स्वीकारावा. खाऊन झाल्यावर संडासात फ्लश होणारे नारळ, ओल्या कचऱ्या स्वरूपी निर्माल्यात जाणारे हार आणि फुकाच्या थापा मग त्या दाखवण्यासाठी कौतुकाच्या का असेनात-थापाच! स्वीकारण्यात काही अर्थ नाही. खरा अर्थ -अर्थातच, अर्थालाच.