मंगळवार, २६ डिसेंबर, २०१७

शंभरी

या सगळ्याची सुरूवात झाली भारतीय सौर 1 चैत्र शके1939 म्हणजेच
ख्रिस्ती 22 मार्च 2017 ला. त्याच्या काही दिवसांपूर्वी, भारतीय सौर कालगणनेच्या वापराचा प्रचोदक शशांक दादाने ग्रूपवर आणि वैयक्तिक रित्या एक संदेश आग्रहपूर्वक  झळकवला होता.
एक स्पर्धा, #21_days_challenge त्याने त्यात जाहीर केली होती. सौर नवीन वर्षाच्या सुरूवातीपासून तो महीना संपेपर्यंत अंतरातील सातत्य राखून एकवीस दिवस सातत्यपूर्ण सायकलिंग करायचे! मी पुण्याला जाऊन येऊन काम करत होतो. नववीची अभ्यासिकाही त्याच्या बरोबरीने चालू होती. त्यात सातत्याने सायकलिंग करणे अव्हानात्मक होते. स्वीकारले. बरोबरीला अभ्यास सांभाळून ते आव्हान स्वीकारणारे अर्णव आणि रोहनही आहेत असं समजलं. रचितनेही काही दिवस येण्याचा प्रयत्न केला खरा. पण नंतर त्याला इतर क्रीडा प्रकारांत अधिक रस वाढला असावा.
कधी सकाळी, कधी रात्री; पण, एकही दिवस चुकू न देता सायकलिंग करायचे. फेसबूकवर, व्हाॅट्स् अॅप् वर स्थिती सामायिक करायची! (स्टेटस पोस्ट करायचा). जमलं तर फोटो काढून टाकायचा.  एकवीस दिवस कधी संपले समजलंही नाही. वैशाखाचा दाह वाढत होता. त्या बरोबर शरीरही अधिक तप्त होत होतं, सायकलिंग साठी!
निरा, कलिंगड हे तर मनोहारी विषय. खास तेवढ्यासाठी सायकलिंगला जायचं. पोटभर कलिंगड खाऊन घरी यायचं.जुनी सवय! म्हणजे  जो आला नाही त्याला चिडवायला आपण मोकळे. रोज वीस किलोमीटरचं ध्येय ठरलेलं. अर्णवने #21_days_challenge पासून  माझ्या बरोबरच सायकलिंग करायला सुरूवात केली.  21days संपल्यावरही आम्ही ठरवून सायकलिंगला जाऊ लागलो. आणि त्या दिवसांसाठी पुढील अंक तो देऊ लागला. रविवारी सकाळी डोंबिवली सायकल क्लब बरोबर केलेले सायकलिंग आम्ही आखलेले नसते म्हणून ते दिवस सोडून इतर सगळे दिवस मोजायचे असं काही तरी ठरवून त्याने पुढील दिवस मोजले.
 वास्तविक, वेळेचे बंधन लक्षात घेता रोज एकच रस्ता, तीच ती इतर वाहनांबरोबर चालू असलेली मारामारी यांमुळे सकाळी उठायला कंटाळा केला जायचा. मी कंटाळा केला की त्याचा फोन आणि त्याने केला की माझा फोन यामुळे आपल्याला उठायला पर्याय नाही याची जाणीव झाली. उशीरा झोपलो तर सकाळी उठता येणार नाही. सायकलिंग मुकेल. या भितीने लवकर झोपायला हवं. हेही समजलं. सवयी अंगवळणी पडल्या, दोघांच्याही!
एकाच कामात तोच तो पणा आला की कामाचा कंटाळा येतो. तसा आला की एखाद्या रविवारी मोठा दौरा ठरवायचा. निवासाची व्यवस्था होणार असेल तर दोन दिवसात 200-300 कि.मी. जाता येईल असं अंतर डोक्यात ठेवायचं!
एके दिवशी नेरळला जायचे ठरवले. जाऊन येऊन एका दिवसात 80 कि.मी. सहज शक्य होतं. रोहन आणि मी नेरळला जाऊन दुपारच्या जेवणासाठी घरी पोहचलो. तिथे, हा वृत्तांत ऐकून अर्णवचा जळफळाट झाला.
कुलकर्णी काकांनी सगळ्यांना नेरळच्या बंगल्यावर कधीही याण्याचे ठरवण्यासाठी खुले निमंत्रण दिले होते. मुक्कामाला जायला घरून परवानगी मिळणे कठीण! अर्णवच्या बंगल्याच्या चाव्या मिळाल्या होत्या. घोडा सायकल सुस्थितीत होती. 10 वाजता नेरळला पोहचलो. बुर्जी पावाचा नाश्ता करून नदीवर डुंबायला जायचा बेत होता. मॅगी आणायला रोहन आणि रचित घोडा सायकलवरून घरा बाहेर  पडले. रस्त्याला लागताच भरधाव वेगाने येणाऱ्या एका अल्पवयीन दुचाकी स्वाराने त्याच्या फटफटी वरचे नियंत्रण सोडून दिले आणि दुचाकी थेट घोडा सायकलवर आदळवली. माझ्या चार वर्षाच्या घोडा सायकलच्या मागच्या चाकाचा चेंदा मेंदा झाला होता. चाक त्याच्या कडून भरून घ्यायचे. पण नेरळमधील दुकान तर त्यासाठी उघडे हवे! नवीन चाक बसवून घ्यायला सूर्यास्त होऊन गेला. आम्ही नेरळ मध्येच मुक्काम करावे असं घरूनच सांगण्यात आले आणि नेरळ मध्ये अनियोजित मुक्काम ठोकला. परततांना नाशिकला जाण्याचा बेत आखला गेला.
 एप्रिल-मे महीन्यातले रणरणते ऊन. यापूर्वी 30 एप्रिलला अलिबाग सायकलिंग मी आणि रचितने केले होते. एकदम "सुशेगात"! आता कसऱ्याचा घाट,  बरोबर खान्देशातले रखरखीत ऊन! अर्णवला घरून परवानगी मिळाली नव्हती. उंबरमाळ-नाशिक-उंबरमाळ हा प्रवास सूर्याच्या तेजाने अतिआह्लाददायी ठरला!
याच दरम्यान अर्णवची सायकल चोरीला गेली. माझ्या सायकलींबाबत मी फार पझ़ेसीव्ह आहे. तो पझ़ेसीव्हपणा सायकलनिष्ठांसमोर वितळतो. तश्या अर्णवसाठी दोनीही सायकली खुल्या होत्या. नाशिकला जाऊन आल्यावर खंडाळ्याचा घाट खुणावत होता. आताही अर्णवला येणं शक्य नव्हतं.
  एकार्थी चोरी झाली ते बरंच झालं असं अर्णवने नवीन सायकल घेतल्यावर उद्गारलं गेलं. भर पावसाळ्यात कसऱ्याचा घाट करून यायचे ठरवले. बुधवारी मोहीम आखून तयार होती. तोच गुरूवारी एका नवीन नंबर वरून फोन आला. "सायकल नवीन घेतली आहे. एका लाँग राईड साठी जायचंय. तुम्ही जाताय असं समजलं. मी पण येऊ का? शशांक वैद्यंकडून नंबर मिळाला." "स्वतःच्या जबाबदारीवर येत असाल तर स्वागत आहे." "येतो आहे. डीटेल्स् कळव." हाच तो योगेश! इगतपुरी राईड अगदी सहच पूर्ण झाली. वरुणराजाची कृपादृष्टी होती.  तो घाटच होता का? असाही शेवटी प्रश्न पडला. उन्हाळ्यात तोच घाट चढतांना आलेला शीण आणि पावसाळ्यात न संपणारी तरतरी यांमुळे आमच्याच क्षमतांवर ऋतूंचा होणारा परिणाम अनुभवता आला.
परीक्षांच्या गतिरोधकांवर आदळत अमचं सायकलिंग अविरत चालू होतं. दिवाळी संपतांना पंच्याहत्तर दिवसांचा पल्ला गाठला असावा. तोच दोघांच्याही परीक्षांच्या कारणाने सायकलिंग पुढे स्वल्पविराम लागला. तरी अधून मधून न करमल्याने सायकलिंगला पर्याय उरत नव्हता. त्या अधून मधून होणाऱ्या सायकलिंग मुळे नव्वदी गाठली आहे हे लक्षात आल्यावर शंभरी गाठायची उत्सुकता स्वस्थ बसू देई ना! तीही ख्रिस्ती वर्ष संपण्या आधीच गाठावी असं ठरवलं.
अर्णवने घरी काहीतरी गोंधळ घातला आणि त्याचं सायकलिंग पूर्णपणे बंद होण्याची वेळ आली. सायकलस्वारांचं पालकांच्या चिंतेमुळे आणि प्रेमामुळे घरच्यांशी न पटणं म्हणजे घरोघरी मातीच्या चुली असल्यासारखं आहे. पहिल्या सायकल मित्र संमेलन डोंबिवलीत 28 जानेवारीला होणार असल्याचं ठरलं. त्याची निमंत्रणे प्रत्यक्ष द्यायला हवीत म्हणून पुण्याला जायला हवं असं ठरलं. तेव्हा अर्णवने येण्याची तयारी दाखवली होती. नंतर जाण्याचा दिवसही ठरला तेव्हा त्याचं सायकलिंगसाठी येणंही कठीण होतं. पाच वाजता निघायचं होतं. अर्णवचा पावणे पाच वाजताच फोन. आणि पाच वाजता तो माझ्या सोसायटीत हजर! म्हटलं आता याला पनवेल पर्यंत तरी घेऊन जाऊ. पण तो घरी काहीच न सांगता आलेला. सायकलिंग कायमचं बंद होण्यापेक्षा आलाय ते काय कमी आहे, असं म्हणंत त्याला शिळफाट्याला निरोप दिला आणि पुणे दौरा फत्ते केला.  नऊ महिन्यातील रविवारच्या  DCC राईड्स वगळता 100 दिवस अर्णव आणि मी एकत्र सायकलिंग केले. कधी अंबरनाथ, कधी बदलापूर, कधी दुर्गाडी, कधी टिटवाळा, कधी गोवेली, कधी नेरळ तर नियमीत पणे ऊंबर्ली, 90फुटी रस्ता, तर चहा वाला ओळखीचा होईस्तोवर नेवाळी फाटा आणि शीळ फाटा.
मी सायकलिंग स्वतःसाठी करत असल्याने रेकाॅर्ड वगैरे ठावायच्या भानगडीत पडत नाही. पण अर्णवने ठेवलेल्या या 100 दिवसाच्या रेकाॅर्डमुळे नऊ महीन्यात कमीत कमी  2200 कि.मी. सायकल चालवल्याचा रेकाॅर्ड मेंटेन्ड राहीला.
स्वतःला स्वतःच प्रोत्साहन द्यावं म्हणून आजच्या निमित्ताने सायकलींसाठी भेटवस्तू आणल्या. हे भारतीय सौर वर्ष संपेपर्यंत हा आकडा असाच वाढत जाओ हीच ब्रह्माचरणी प्रार्थना...
-सम्प्रिः।

मंगळवार, २१ नोव्हेंबर, २०१७

पुणे

आज पुण्याविषयी जरा लिहीण्याची इच्छा झाली आहे. वास्तविक हे वाक्य माझ्या लेखणीत वाचताच अनेकांना स्वतःचे पूर्वग्रह दूषित असल्याचा अनुभव येईल. साहजिकच आहे म्हणा; माझ्या तसल्या वर्तनाचा तो परिणाम!

दीड दोन वर्षापूर्वी संपलेला दोन वर्षांचा शैक्षणिक काळखंड आणि त्याच्याही दोन वर्षां पूर्वी प्रबोधिनीच्या परिचयात आल्यापासून पुण्याशी सातत्याने  येत गेलेला संबंध. असे हे पुणे!  आज अनेकविध कारणांनी आयुष्यात स्वीकारले गेल्याचे मी कबूल करतो आहे. सुरूवात उत्सुकतेपासून झाली. सवाईला गेलो तेव्हा कुतूहल जागृत झाले. प्रबोधिनीमुळे अप्रूप वाटले. हा परिचय, लवकरच अतिपरिचयात बदलायला वेळ लागला नाही. तश्या परिस्थिती निर्माण झाल्या, तयार झाल्या म्हणून असेल कदाचित्. दूरूनच डोंगर साजरे हे पुरते पटले. पुण्यात वास्तव्यासाठी केलेले निष्फळ प्रयत्न बरंच काही शिकवून गेले.
आज या विषयावर लिहावेसे वाटले तेव्हा "का???," हा एकमेव प्रश्न मोठ्याने ओरडून मनालाच विचारला.

पुण्या विषयी अप्रूपही नाही, कुतूहलही नाही, आसक्तीही नाही आणि द्वेषही नाही. पण पुण्यातल्या लोकांनी राग-द्वेषापलीकडलं मैत्रीचं छान नातं जमवलंय. सगळ्या पुणेकरांशी मैत्री होऊ शकेलच, असा समज नसावा. मी ओकलेला त्यांच्या विषयीचा सर्व द्वेष त्यांनी स्वीकारला. म्हणून ती मैत्री. मैत्रीचा संबंध शब्दात मांडणे फार सोपे आहे. "निरपेक्ष विश्वास". द्वेष स्वीकारण्याची अपेक्षा मुळीच नव्हती. पण नकळत घडते तीच तर मैत्री असते! पु. ल. म्हणतात तसं, "वेवलेन्थ जुळली की क्षणभरात जन्मजन्मातरीचं नातं असल्याचा दुवा साधला जातो. वागण्यातला बेत शुद्धपणा क्षणार्धात नष्ट होतो." वगैरे, वगैरे...
पुण्याने मला खूप वाईट अनुभव दिले. पण त्यातही काही लोकांची त्यांच्यापरीने इतकी चांगली साथ मिळाली की पुण्यात गेल्यावर यांची भेट झाली नाही तर चुकल्यासारखं वाटल्या खेरीज पुणे दौरा पूर्ण होत नाही. मुंबईत झालेले शिक्षण म्हणजे महाविद्यालय-घर-अभ्यास-प्रबोधिनी-सायकल या शिवाय वर्गात दोनच विद्यार्थी असल्याने काॅलेज लाईफ एन्जाॅय करण्यासाठी कधी कारण मिळण्याचा अवसरच नव्हता. ते काॅलेज लाईफ पुण्यात एन्जाॅय करता आलं. अभ्यासाकडे दुर्लक्ष झालंही असेल पण अभ्यास एके अभ्यास करून कोणाचं भलं झालंय? पद्धतशीर बंक मारून चित्रपट बघितले. नाटकं केली. मित्र-मैत्रिणींच्या गाड्यांवरून टेकड्या हिंडलो. पुण्यात राहण्याच्या प्रयत्नात हाॅस्टेल लाईफ बघायचा आणि बॅचलर लाईफ जगायचा काही महीन्यांसाठी अनुभवही घेतला. पेठेंमधले पुणेरीपण अगदी कोळून प्यायलो ते योग्य वेळी वापरता येण्याच्या उद्देशानेच!

"एकच भाषा शिकावी पण व्यवस्थित, परिपूर्ण शिकावी." हे भाषेचं तत्त्व इथेच उलगडलं गेलं.
विभागाचे दरवाजे संध्याकाळी बंद झाले की विद्वान् विदुषींबरोबर अभ्यासासाठी दरवाजाबाहेर बैठक मारली जात असे.  नाकं मुरडत यज्ञकर्म समजत हाॅस्टेलचे बेचव अन्न पोटात ढकललं जाई. पुण्याच्या आलिशान रस्त्यांवर सायकल पळवणं आनंददायी असे.  बाकी राहण्या खाण्याची  मारामारी रोजच चालू होती. सकाळी लवकर उठून दूध आणायला जावं, तर गवळ्याची झोप मोड व्हायची. अश्या सगळ्या विचित्र अनुभवांनंतर अभ्यासावर परिणाम होतोय हे समजलं. मग रोज प्रवास करायचे ठरवले आणि ट्रेन मधलं वेगळंच आयुष्य सुरू झालं. सर्वांना नवल वाटायचं. बोलण्यासाठी तो मूर्खपणाही वाटायचा. विभाग प्रमुखांना हाॅस्टेलच्या खोलीवरचा ताबा सोडण्या बाबत लेखी पत्र दिले. तेव्हा त्या ते घ्यायला तयार नव्हत्या. आम्हा सगळ्यांवर त्यांची आजी सारखी माया आणि लक्ष असायचं.  प्रवासामुळे अभ्यासाकडे दुर्लक्ष होतंय म्हणून मार्क जास्त द्यावेत अशी अपेक्षा कधी बाळगली नाही. वेळेमधे सूट मिळायची. अभ्यासासाठी नाना तऱ्हेची मदतही मिळायची. टोमणेही मिळायचे. पण पुण्यात रहायचे नाही हेही ठरलेच होते. कधी ग्रुपचे कुठे फिरायला जायचे ठरले की ते माझ्या वेळेत इंद्रायणी जायच्या आत बसवावे लागे. नाकं मुरडत, माझ्या प्रवासाच्या निर्णयाला शिव्या घालत ते बसवले जाई. तो प्रवास संपत आला तेव्हा ते सगळं मीस करणार असल्याचा विचार डोळे पाणावून गेला. नाही म्हणता म्हणता शिक्षण संपलं.

माणसापेक्षा अधिक जागेशी भावना जोडल्या जातात असं म्हणतात. कितीही वाईट अनुभव आले तरीही आता ते भूतकाळातले आहेत. त्यांच्यामुळे मी शहाणा झालोय. वाईट अनुभव देणाऱ्या जागेला मी चांगलाच ओळखून आहे. गुण-दोषांसहित तिला स्वीकारलंय. त्या जागेशी माझा जुना संबंध जडलाय कारण तिच्याकडून मला कोणत्याच अपेक्षा नाहीयेत. बारामहीन्यातले ऋतू माहिती आहेत. तिचे स्वभाव-धर्म, गुण-दोष, वगैरे सर्व पैलूंपासून मी अनभिज्ञ नाही. मी पुण्याला ओळखू लागलोय!
भूतकाळ गेला. आता वर्तमान आणि भविष्यकाळांसाठी मीच पुण्याचे दरवाजे उघडे ठेवले आहेत. पुण्यात न राहता एक कंफर्ट झोन निर्माण करून असतील कदाचित्. पुणे परकं राहीलं नाहीये.

एखादी गोष्ट स्वीकारायला आणि मग, ती स्वीकारल्याची जाणीव व्हायला किती वेळ लागू शकतो ते आता समजतंय खरं!

ज्या विषयी भरभरून लिहावे असे काही कारण नव्हते, त्या विषयी लिहूच नये असेही कारण मिळाले नाही. व्यक्त व्हायचे ठरवले. वाणीने रूप प्रकटीले. शब्द जुळले. झाले.
-सम्प्रिः।

शुक्रवार, १७ नोव्हेंबर, २०१७

नाविन्य

रोजच्या उगवत्या सूर्याला जितके नाविन्य आहे, तितकेच रोज भेटणाऱ्या व्यक्तीला. क्षणोक्षणी मिळणारे अनुभव किंवा घडणारे प्रसंग व्यक्तीला घडवत असतात. ही व्यक्तीची जडण घडण दुसऱ्या माणसाला व्यक्तीतील बदल म्हणून दिसत असते. बदल बाह्य असतो आणि घडण आंतरिक असते हाच काय तो दोन शब्दांतील अर्थांचा फरक.
असो, तर मनात असलेली एखाद्या व्यक्ती विषयीची अढी ज्या कारणाने निर्माण झालेली आहे त्या कारणा विषयीचे परीक्षण, ती व्यक्ती भेटली असता प्रतिक्षणी झाले तर जगातला द्वेष वाढेल का?
मनाच्या चौकटीच्या बाहेरची गोष्ट घडली की मगच तर द्वेष निर्माण होतो!
ती चौकटच नाहिशी केली तर?
तसे व्हावे म्हणूनच कदाचित् स्वामी विवेकानंद भारत फिरले आणि जागतिक पातळीवर "brothers & sisters", असा सूर लावून प्रशंसा मिळवली. ती चौकट नाहिशी झाल्यामुळेच भारत दौरा चालू असतांना सचिन गावकरच्या डोळ्यात नकळत पणे कृतज्ञतापूर्वक ढळा ढळा पाणी आलं असेल. रामदास स्वामींना मनाचे श्लोक स्फुरले असतील आणि तुकारामांना अभंग!

प्रवास रोजचा तोच असू देत
भेटणारी माणसंही तीच असू देत
तीच जागा,  घड्याळातली तीच वेळ
तरीही नाविन्य तेच कसे असेल?
तेही नवीनच दिसेल, प्रत्येकातले
अगदी रोजच्या सूर्यासारखेच!

"सूर्य एकंच़ रोज़ दिसणारा
नाविन्यपूर्ण स्वभावांच़ा
सूर्य मानवी दृष्यांच़ा
अनुभव- उत्तर-दक्षिणायनाचा
प्रवास- एका काळाचा..."
-सम्प्रिः।

सोमवार, १३ नोव्हेंबर, २०१७

माथेरान

जावं  कधीतरी एकट्यानेच सायकलिंगला,
दूर कुठेश्या एखाद्या अनोख्यात
मनातले ताल उतरवावेत पायात।।
सूरही गुणगुणतील चाकातल्या स्वरात
शब्दही मिळतील वार्याच्या घोंघावात ।।
आवाजातच असतील प्रकृती आणि प्रत्यय
क्रियापद सापडताच, काराकाचा होईल जय ।।
वाक्य-शब्द-अर्थ, यांचे जेव्हा होतील स्फोट
स्वीय सूर गवसून, ब्रह्मावरही चढेल कोट ।।
तेव्हा काय विचारशील तू,"खरच किती एकटा आहेस?"
"सायकल-संगीत-भाषेसह तू,चौथा कुठे फिरतो आहेस?"
ऐकून प्रश्न  उत्तरातला एकटेपणा जाईल दूर
हेच गाणं ऐकत पुन्हा पेडल मारत कापीन नूर ।।
म्हणून म्हणतो,
जावं  कधीतरी एकट्यानेच सायकलिंगला…
मी एकटा  तर नव्हतो पण अनुभवातून परामर्श गोळा करत होतो. महिन्याभराने सायकल बाहेर काढल्यामुळे येणारे अनुभव. महिना-दीड महिन्यानंतरचे सायकलिंग तेही माथेरानचे… नेहमीप्रमाणेच अचानक ठरलेले.
 घरच्या गणपतीचे विसर्जन होऊन, मागील आठवडा-पंधरवडाभर रंगत शिगेला पोहचलेला घरचा गणेशोत्सव संपवून घर एकदम शांत झालं होतं. लेक्चर रद्द झाल्याने किंवा केल्याने अचानक मिळालेली शनिवारची सुट्टी आणि नंतरच्या रविवारच्या सुट्टीने दोन दिवस आरामात जाणार होते. पण, तेव्हा विशेष करायचं ते काय? आराम, झोप!!! आनंदी आनंदच!
दिवे बंद करायचा अवकाश, रोहन चा फोन आला. "दादा उद्या माथेरानला येतोस का? नेरळ पर्यंत ट्रेन" दोन दिवस सुट्टी आणि त्यातल्या एका दिवशी सायकलिंग! कल्पना भारी होती. विचार न करता "हो" म्हटलं गेलं. आई-बाबांना न विचारता निर्णय सांगितला. आणि मनातल्या अनिश्चीततेसह, माझी वाट पाहणारी, नुकतेच नवीन ट्यूब बसवलेली act११० खाली उतरवली गेली.
याच अनिश्चिततेमुळे जरा उशिरा का होईना ठाकुर्ली स्टेशन गाठलं. तोच धुवांधार पाऊस सुरु झाला. इंद्रायणी ११ वाजता सुटणार आहे, अशी अनौन्स्मेंट. तिथे दहावीत असलेल्या रोहनच्या आईचं रोहनला फोन वरून टिप्स् देणं चालू होतं. तसे आम्ही दोघेही समदुःखी होतो. कारण घरी, आई-बाबांच्या valid reasons मुळे, या वेळेस त्यांच्याकडून पायखेची  झाली होती. मनातल्या अनिश्चिततेचं कारणही तेच असावं.
तेराव्या महिन्यात सुरु झालेला दुष्काळ भाद्रपदात संपल्याचा दिलासा देणारा पाऊस पडत होता. ट्रेनच्या खिडकीतून रोज दिसणारे येणारे सौंदर्य आज मुक्ततेने अनुभवत होतो. नेरळची वेस ओलांडून प्रत्यक्ष घाट सुरु झाला. पाऊस-धबधबे-दरी आणि वरून दिसणारी हिरवीगार भातशेतं! चढावर आमच्या बरोबर मंद गतीने वाहणारा वारा आणि अविरत पडणारा पाऊस साथीला होताच.
विद्याव्रताचा अभ्यास करतांना शारीरिक विकसनात दम-रग-वेग वगैरे शब्द आणि त्यांचे शाब्दिक अर्थ वाचले, ऐकले होते. पण प्रत्यक्ष ज्ञानातून अर्थस्फोट झाला तो या घाटातल्या चढावर! रोहन माझा दादा झाला होता! जुम्मापट्टी मागे टाकलं आणि "१st गीअर" लिहिलेले चढ दिसू लागले. रोहन चिकाटीने ते चढत होता. माझे पाय तर दुखत नव्हते. पण घेतलेल्या श्वासातील प्राणवायुचा योग्य रीतीने उपयोग करता न आल्याने "दम" लागत होता. मी, बरेच चढ अर्ध्यावर उतरून, चालत चढलो तर काही पूर्ण केले. रोहनला माझ्यामुळे थांबावं लागत होतं.
कड्यावरच्या गणपतीकडे जाणाऱ्या रूळांपर्यंत पोहचेस्तोवर पाऊस थांबला होता आणि घनदाट धुकं दाटू लागला. ७-८ मीटर च्या पुढचं दिसणही कठीण! एक-दोन चढ न उतरता चिकाटीने चढता आले.  तेव्हा लक्षात आलं. समोर दिसणारा खडा चढ, सुरु होण्या आधीच मनाला मागे खेचत होता. दम लागतो आहे, हे खरं आहे. पण, दम खाऊन चढ पूर्ण करणही कठीण असलं तरी अशक्य नाहीये.
एका नवीन र्हिदमने माथेरान पर्यंत पोहचलो. काही वर्षांपासून तो घाट सायकलवरून पूर्ण करायचं मनात असलेलं स्वप्न पूर्ण झालं होतं! सायकलिंग करतांना पावसाळी निसर्ग बघून मनात गुणगुणत असतो कालिदास. "परा" मध्ये तर्कसंग्रहातून कुठेतरी उभे राहत असतात परामर्श आणि वैखरीतून लिहिले जात असतात असेच छोटे छोटे अनुभव!
खरंच मी जितकं जास्त फिरतो तितकंच जास्त मला संस्कृत समजत असतं. पुस्तकातल्या किड्यांपेक्षा ते खूपच माणसाळलेलं असतं.
20/09/2015

अभ्यंग

थंडीच्या परिणामापासून सूर्य काही सुटू शकला नाहीये. मणसांसारखा तोही सुस्तावलाय. वातावरणातल्या आह्लाददायी गारव्याने तोही लोळत असतो क्षितीजावर बराच वेळ. झोपायला मात्र आईच्या कुशीत इतक्या लगेच शिरतो की समजणेही कठीण! आळशीपणा रोमारमात संचरलाय त्याच्या.
परीक्षेचा सोपस्कार पूर्ण झाल्यावर आता पुन्हा सकाळचे सायकलिंग सुरू झाले आहे. नाहीतर मागच्या पंधरा रात्रीत 90 फुटी रस्त्याला माझी आणि लोहराणीची सवय झाली होती.
सकाळी बाहेर पडलो तेव्हा दक्षिणायनातला तो असाच रेंगाळत, केशरी वर्णाने गारवा शमवण्याचे निष्फळ प्रयत्न पृथ्वीवर लोळतंच करत होता!मुंबईच्या दक्षिणेकडील पुणे दक्षिणत्वामुळेच सुस्त असावे. सूर्यानेच सुचवले!
योगेश वेळेत येऊन वाट बघत बसला होता. अर्णव आणि मी वेळेच्या मागे धावत सायकलींना धूर ओकणाऱ्या वाहनांमधून धाववित होतो. नेवाळीला जाण्याचा बेत होता. पण योगेशने ऊंबर्ली बघितले नव्हते. जातानाच तलावावर गेलो तर सूर्योदय बघता येईल म्हणून तसेच ठरले. रोहनने टांग दिल्याने रचितचे आशिर्वाद त्याला मिळाल्याची व त्याने स्वीकारल्याची खात्री पटत होती.
निघायला उशीर झाल्याने रहदारी खूप वाढली होती. अश्वशक्तीधारी वाहनांमधून आमच्या अश्वासम धावणाऱ्या राण्यांना वाट काढावी लागत होती. सामंत पेट्रोल पंपाच्या चढावर उजवीकडे बस आणि तीन चाकी वाहनांची शर्यत चालू होती. कोणाला उजवी कडे वळत मानपाडा रस्त्याला वळायचं होतं. कोणाला डावीकडे भाडं दिसत होतं. त्या चढा ओढीत सामील होऊ इच्छिणारी MH 03 WA 1389 एर्टिगा सायकलच्या मागे येऊन किंचाळू लागली. पण सायकलच आमची, जागा ती केवढी व्यापणार?
एर्टिगास जागा देणे शक्य नव्हते. पण काणठळ्या अनावर झाल्या म्हणून मागे बघितले. काचे मागील पांढऱ्या कपड्यातील काळ्या चेहऱ्यावर राण्यांविषयी हेकस भाव सूर्यप्रकाशामुळे लपू शकले नाहीत. मनपाडा फाट्यावर तिला पुढे जायला जरा जागा मिळाली. चेहऱ्यांनी हातवारे वरून तोंडावरील भाव हातात अवतरविले. तो अपमान आमच्यातले कोणीच सहन करत नाही!
त्याची मिजास उतरवण्याचा निश्चय मनाने केला. इतर अश्वशक्तीधारी वाहनांनीच एर्टिगाचे रस्ते अडवत, आमचे रस्ते मोकळे करत आमची मदतच केली. सामंत पेट्रोल पंपासमोरच्या गतिरोधकावर एर्टिगाने ब्रेक दाबले. आमच्या अश्वांनी जणू अश्वशक्तीधारींचे पाश खेचून धरले होते. प्रिमीयर काॅलनीच्या पुढे उतार होता... पण एर्टिगाला तीन गतिरोधकांचा सामना करायचा होता... काचांमधल्या मंडळींचा असंतोष वाढवायचा म्हणजे एक सायकल पुढे, एक मागे. अशी स्थिती होती. अर्णवने स्प्रिंटचा पवित्रा घेतला होता. तो तिचे रस्ते सफाईदार पणे अडवत होता. वास्तविक लेनची शिस्त न पाळण्याचा पवित्रा एर्टिगाने घेतलेलाच होता. मीही लोहराणीचा झालेला अपमान विसरणार नव्हतो.चालकाच्या काचेपर्यंत पोहचून त्याच्या हातवाऱ्यांना हातानेच उत्तर दिले होते. उंबर्लीचा रस्ता केव्हाच मागे पडला होता. प्रीमियरच्या पेट्रोल पंपापुढे आल्यावर चालक नरमला असल्याचे एर्टिगाच्या चालनातील फरकाने दिसून आले.
योगेशसाठी हा प्रकार नवीन होता. नेवाळी फाट्याला जायचे म्हणून काटई फाट्यावर डावीकडे वळलो... शेवटपर्यंत एर्टिगा अर्णवच्या मागे आणि चालकाच्या काचेतून मी दिसीन अश्या अनवसानाने माझ्या पुढे होती. डावीकडे वळण घेऊन थांबलो. तेव्हा "भेंडी मजा आली! चांगली उतरवली त्याची...रोहन असला पहिजे होता. अजून मारली असती..." वगैरे चर्चा झाली... सूर्य क्षितीजावरच रेंगाळत होता. "येतांना उंबर्लीला जाऊया आता," ऐकून योगेशही हसला.
एकूणच गर्दीत इतरांना रस्ता दिसत नसला तरी आम्हाला फक्त पोहचण्याचे ठिकाणच दिसत असल्याने रस्ता काढायचे काम राण्यांचे असते!
अश्वशक्तीधारींचा मिजास उतरवणे अश्वां (काळा घोड्या)खेरीज इतर कोणाला जमणार?
रोजचीच जीवघेणी पण अस्तित्वासाठीची स्पर्धा संपवून पाईपलाईन मार्गाला एका संथ गतीने लागलो. कोरड्या वातावरणामुळे चिकचीकाट नसला तरी वेगामुळे घामाने कपडे ओले केले होते. वाऱ्याच्या झुळूकांनी ते पाण्याचे शीतत्व अधिक स्पर्शविले जात होते. अंबरनाथ-तळोजा-डोंबिवली हा महाराष्ट्रातला मोठा औद्योगिक पट्टा आहे. त्यातून जाणारा हा रस्ता. शुद्ध हवेची फक्त हवा! धूर, धुके आणि रसायनांचा वास रोजचाच... "रोज माझी भेट होते प्राणघाती वायूशी..." कधीतरी लिहीलं होतं ते आठवलं. वास्तविक सह्याद्रीच्या टेकड्या इथे मान उंच करू पाहत आहेत. असा हा निसर्गाने वरदहस्त ठेवलेला परिसर. पंतप्रधान आवास योजनेसाठी त्यांना कापायचे काम शिताफीने चालू आहे. महाराष्ट्राबाहेरील लोंढ्यांच्या निवासासाठी इतके गृहप्रकल्प राबवले गेलेत. पण एकही प्रकल्प इथले वातावरण संतुलीत करण्यासाठी आलेला नाही. वातावरण मतं देत नाहीत. माणसं देतात!😂
असो. तर सायकलिंग करतांना असली विद्रूपता दिसली की मन खिन्न होतं. पण परततांना उंबर्लीला जायचय हा विचार सुखावतो. दापोली अभ्यास दौऱ्यानंतर "कोकणातल्या माणसाचा अल्पसंतुष्टी पणा स्वीकारायला हवा." असा निश्चय केला आहे. त्रास कमी होतो. नेवाळीला चहापान झाल्यावर उंबर्लीच्या रस्त्याला लागताच योगेशने प्रशंसात्मक थाप दिली. "शहरापासून खूप दूर आल्या सारखं वाटतंय." नुकतीच कापणी होऊन सोन्याच्या पेंढ्यांचे रीघ ऊन खात होते. शांत आणि स्तब्ध तलावाने आमचे स्वागत केले. तोही सुस्तावला असावा! येतांना मानपाडा रस्त्याने आलो. तिथेही स्पर्धा चालूच होती. शंभरेक अश्वशक्तीधारींना मागे टाकत चार रस्त्यापर्यंत पोहचलो. योगेश हरवला होता! त्याचा फोन अर्णवकडे होता. या चुकामुकीचे फळ जरा अधिकच गंभीर असल्याची जाणीव झाली.
मोबाईल- संभ्रमित करणारा भ्रमणध्वनी! योगेश ने चार रस्त्यापर्यंत एकाच बाजूने चार फेऱ्या मारल्या. पण आम्ही गर्दी पासून जरा दूर रस्ता ओलांडून उभे होतो. गर्दीत काही तो दिसला नाही. त्याच्या घरी पोहचवायला जावे लागणार या तयारीत आम्ही आमच्या घरी परतलो ते नंतर हाताश होऊन रागाने लाल झालेला योगेशचा चेहरा बघण्यासाठीच! तो मितभाषी पण कृतीशील आहे. त्यामुळे यापुढे एकत्र सायकलिंगला आला तर माफ केले नाहीतर नाही. हे नक्की!
सम्प्रिः।
-सौर 17 कार्तिक 1939.