6/5/2019
गोलाघाट, आसाम.
मागच्या दोन दिवसात सायक्लवून जरा कमी अंतर कापतोय पण, भेटी बऱ्याच घडता आहेत.
1.
सायकलचं काम करण्यासाठी दुकानात पोहचलो. मी दुकानदाराला माझ्या सायकल विषयी काम सांगितलं. माझी सायकल आणि माझा वेश पाहून माझी चौकशी झाली. महाराष्ट्रातून आलोय म्हटल्या बरोबर, इतका वेळ एकाच ठिकाणी सावधान स्थितीत उभे असलेल्या एका जवानांनी, "महाराष्ट्रात कुठून?" म्हणून विचारलं. मी आल्या आल्या एका खूर्ची वजा बाकावर आरामात बसून गप्पा करत होतो. ते उभं राहूनच सगळी कामं करत होते, बोलत होते. मी म्हटलं, "अहो, बसा. दुकानात आहात. समोर दुकानदार आणि मीच आहोत." "नाही. राहू दे. सवय झालीये.", ते म्हणाले. "तुम्ही उभे असतांना मला तुमच्याशी बसून गप्पा मारता येणार नाहीत, म्हणून बसा," म्हणत समोरची रिकामी खूर्ची तुमच्यासाठीच आहे असं खुणावलं. मग तेवीस वर्षीय रोहन माने हे फौजी आणि माझ्या खूप गप्पा झाल्या. सैन्यातलं प्रशिक्षण, कामात येणारे अनुभव, परीक्षा याविषयी मी विचारत होतो आणि ते माझे 'सिव्हिलीयन्स' बरोबरचे अनुभव विचारत होते. ते सांगलीचे राहणारे आणि अतिशय खडतर परिस्थितीत शिक्षण घेतलेले. पण, दुकानातील गप्पा फक्त थरारक अनुभवांवर खिळत राहील्या. त्यांच्या सायकलचं काम झालं. निघता निघता, त्यांच्या डोळ्यात पाणी आलं. ती सायकल त्यांच्या बाॅसची होती आणि आज त्यांना या कामा निमित्त आराम मिळाला होता.
2.
जोरहाटचे एस.पी. श्री. वैभव निंबाळकर यांची भेट अगदीच विशेष होती. त्यांच्या अत्यंत व्यस्त वेळापत्रकात, (मला जाणवूही न देता) माझ्यासाठी त्यांनी वेळ दिला. त्याबरोबरच छान आतिथ्यही केले. गप्पांमधे बरेच वेगवेगळे विषय होते. सांगण्याजोगे म्हणजे प्रबोधिनी, सचिन गावकरांशी भेट, आसाम मधील लोकजीवन. [२०२४ मधे लोकजीवनावर विचारलेला प्रश्न आठवतोय- "इथले गुन्हे कुठले? आणि फौजदारी तक्रारी कुठल्या?"]
आसाम मधील "उद्यमशीलते" विषयी ते माझ्याशी बोलले. "उद्यमशीलता" हा मराठी शब्दच आपुलकीचा वाटला. बऱ्याच दिवसांनी छान मराठी ऐकलं.
सर मूळचे बारामतीचे पण उच्च शिक्षण मात्र पुण्यातच झालेलं.
पोलीस आतिथ्यगृहात राहून त्यांचं आतिथ्य स्वीकारलं आणि भुरभूरत्या पावसात पुढच्या प्रवासाला बाहेर पडलो. हवा कमी होती. सकाळी दुकानंही बंद. माझ्याकडील पंपाने हवा भरण्याचा प्रयत्न करतांना पंपाची नळी फुटली! सुदैवाने रस्ता चांगला होता. कमी हवेतच पुढच्या गावात पोहचलो. पंप कोणाकडे मिळेल का म्हणून चौकशी केली. एकाने जुना लोखंडी पंप आणला. तो काही माझ्या टायरला बसे ना. माझी समस्या ऐकून दास बाबू मला घरी घेऊन गेले. त्यांच्या घरात पंप होता. हवा भरली. गप्पा मारल्या पुढे निघालो. रस्ता ओला होता. हवेत गारवा होता. आसामी गावांची सवय झाली असल्याने तसं नवीन काही नव्हतं पण जे होतं ते मनोहर होतं. बांबूची वनं, भरून वाहणारे नाले, गावात एखादे ठिकाणी बाजारात गर्दीचा केंद्रबिंदू असलेला डुक्कर मांस विक्रेता, सायकलवर एका हांड्यात जीवंत मासे घेऊन फिरणारा मत्स्यविक्रेता, पालेभाज्या विकणारा. अगदी दोन विरुद्ध रंग असलेल्या साड्या नेसलेल्या बायका. गोमचा डोक्यावर किंवा गळ्याभोवती गुंडाळलला पुरुषवर्ग. दूरवर पसरलेले पाण्याने भिजवलेले माळरान. दहा एक कि.मी अंतरा नंतर सहज थांबलो. मोबाईल बघत होतो. मागून एक काका आले चौकशी केली आणि चहा साठी घरी बोलवले. असामी विशेष चहा, दोन प्रकारचे पीठा, घरी केलेली नानकटाई असं आतिथ्य घेतलं. आसामी संस्कृतीविषयी गप्पाही झाल्या. [झोरईचे सांस्कृतिक महत्त्व त्यांनी सांगितले]
सायकलमधली हवा पुन्हा कमी झाली होती. आरित झालं असावं. एक दोन कि मी. च्या अंतरावर दुकान लागलं. मीच चाक काढून ट्यूब काढली, तपासली तर आरित निघालं. ज्या दुकानात थांबलो होतो त्यांच्याशी गप्पा सुरू होत्याच. "चहा घेणार का?" "आताच घेतलाय. नको." "आम्हाला बरं वाटेल तुम्ही घेतलात तर." "बरं, ठीक आहे. जास्त देऊ नका."
दूधचहा बनवला होता.
घेता घेता, "कलसे रमदान शुरू हुआ है."
"घरसे बहार निकलने के बाद कहा रमदान, कहा पूनम और अमावस. कुछ पता नही चलता है."
निघतांना त्यांनी हवा भरण्याचे पैसे घेतले नाहीच. पण, माझ्याकडून "रमदान मुबारक" या शुभेच्छा आनंदाने स्वीकारल्या.
एकाने दिल्ली पर्यंत सायकल यात्रा केली आहे. त्याचं रस्त्यात छोटसं दुकान आहे असं ऐकलं होतं. त्याला हुडकत मधे मधे विचारत त्या दुकानापाशी पोहचलो. फक्त 74 वर्षाचे युवक. मागच्यावर्षी 2,200 कि.मी. सायक्लवत दिल्लीला गेले होते. त्यांना मला बघून खूप आनंद झाला. त्यांनी सगळी छायाचित्र आणि प्रमाणपत्र मला दाखवली. त्यांचे आशीर्वाद घेतले आणि पुढे निघालो.
आकाश निरभ्र होऊ लागलं होतं. दूरवर डोंगर रांगा दिसत होत्या आणि त्यांवर निळा रंगांची उधळण होत होती. एका ठिकाणी तासन्तास उभं राहून या ढगांच्या हालचाली बघण्यात काय मजा आहे! असं वाटत होतं...
#bergamontbicycles #jnanaprabodhini #dombivlicycleclub #pitambari #cyclopasana #सायकलोपासना #bergamontindia