शिक्षकाने शिक्षकाच्या, कुणी पालकांच्या तर, कुणी विद्यार्थ्यांच्या (माजी विद्यार्थीही चालेल) भूमिकेतून- आपापल्या दृष्टिकोनातून पाहून- जे हवे ते घेऊ शकेल असे देणारा चित्रपट म्हणजे बाल भारती.
माझ्या कडून १० पैकी ९.५ तारांकनं
यातील एक तारा अधिकचा फक्त विषय निवडीसाठी आहे.
स्वतःची भूमिका स्पष्ट करून मग समीक्षेकडे पाहणे मला महत्वपूर्ण वाटते. आर्थिक गणितं न जुळल्याने शाळा सोडून वेगळ्या क्षेत्रात नोकरी करणाऱ्या माझ्यासाठी हा विषयच अत्यंत जिव्हाळ्याचा. फावल्या वेळात ज्यावर नकळत चिंतन होतं असा... शिक्षण आणि माध्यम भाषेचा.
काल ताई घरी येऊन गेली. मोठ्या भाचीला सीबीएसई बोर्डात टाकल्याने अभ्यास घेता येत नाही म्हणून छोट्या भाचीला सुरवातीला स्टेट बोर्डात घालणारी ताई, अगदी आनंदाने छोटीची शाळा बदलण्याचा निर्णय सांगत होती. मोठ्या शिशुवर्गाची वार्षिक फी ८२ हजार असलेल्या नव्या इंटरनॅशनल शाळेत मुलांकडून काय काय करून घेणारेत वगैरे सांगण्यात ती तल्लीन होऊन गेली होती. सगळं ऐकून झाल्यावर तिच्या आनंदावर विरझण घालत, तुमची फसवणूक होते आहे हे सांगून विषय तिच्यावर सोडून दिला. आज चित्रपटाचं तिकीट काढलं तेव्हा स्वतःला चाचपडायचा प्रयत्न केला. तेव्हा काल तिला विचारलेले प्रश्न आठवले आणि आपली शिक्षणा बाबतची बरीच मते ठाम आहेत, याची जाणीव झाली. शिक्षण देण्यासाठी भरमसाठ पैसा भरता यायला हवा म्हणून नोकरी करणारे पालक आणि पैसा कमावण्यासाठी नोकरीची मिळावी म्हणून डिग्र्यांच्या मागे लागलेले विद्यार्थी- ह्या दुष्टचक्राचा अनुभव भारतभर घेतलेलाच होता. म्हणून ताईची भूमिका मला काही विशेष वाटली नाही. इतर पालकांसारखीच ती एक! पेश्याने शिक्षक म्हणून वरील अनुभव अगदीच ताजा, डोक्यात रेंगाळत होता.
एक शिक्षक म्हणून मी चित्रपट बघत असतांना, नकळत पणे इंग्रजी माध्यमातील शाळेतल्या माजी विद्यार्थ्याच्या भूमिकेतही शिरलो. कधी, ते काही समजलं नाही.
हसतं खेळतं कोल्हापुरातलं, स्वतंत्र बंगल्यात राहणारं मध्यम वर्गीय मराठी कुटुंब पाहून, सुरुवातीला मुंबईकरांना हा चित्रपट कसा आपलासा वाटेल अश्या शंकेने पाल चुकचूकली. कावितांमधे रमलेले नवरा बायको आणि त्यांच्या प्रभावाने शीघ्रकवी बनलेला त्यांचा मुलगा म्हणजे चित्रपटातला नायकही ह्या सगळ्यांच्या मराठमोळ्या हास्य-विनोदात ती शंका मागे विरूनही गेली. चित्रपटातलं कथानक अतिशय ओघवतं आहे. नेमके प्रसंग अगदी छोटेसे असले तरी, प्रेक्षकांचं मन जिंकणारे आणि थोडक्यातच बरंच काही बोलून जाणारे आहेत. कुठेही पाल्हाळ नाही.
"प्राॅब्लेम झालाय ह्यांचा आणि परिणाम भोगणार मुलगा."
मराठी माध्यमात शिकत असतांना अकार्यक्षम, सृजनशीलता नसलेले इंग्रजीचे शिक्षक मिळाल्याने जी आजची पालकांची पिढी भोगते आहे, त्यांची मुलं इंग्रजी शाळेत शिकतांना दिसतात. आणि मग त्या मुलांचा होणारा कोंडमारा बालनायकाने खूप योग्य प्रकारे दाखवला आहे. आदर्श शिक्षकाच्या रूपात मुलांना प्रोत्साहन द्यायला येणारे शाळेचे मुख्याध्यापक आणि शाळेकडे कृतज्ञतेने परतणारे त्यांनी घडवलेले यशस्वी आणि सृजनशील विद्यार्थी- त्यांच्या अनुभवांतून विद्यार्थ्यांना समृद्ध करतात. तेव्हा, आपल्या डोळ्यांसमोर एक आदर्श शाळा उभी राहते.
तर, दुसरीकडे इंग्रजी माध्यमाच्या शाळेत होणारा कोंडमारा आणि विद्यार्थ्यांशी कुठेही विश्वासाचे संबंध स्थापू न शकणारे तिथले शिक्षक, एक कुरूप वास्तव -आपला आपल्यालाच विचार करायला भाग पाडते.
कमी होणाऱ्या पटसंख्येवर तोड म्हणून शाळाच बंद पाडायच्या सरकारी डट्ट्यावरही सूचक हल्ला चढवला आहे.
तरीही चित्रपट बोजड होत नाही.
अत्यंत कुशलतेने काम करू शकणाऱ्या वडिलांना इंग्रजी येत नाही. म्हणून, "You have to upgrade yourself." म्हणणाऱ्या कंपनीच्या अधिकाऱ्याने दिलेली वागणूक पाहून, त्या मराठी न येणाऱ्या अधिकाऱ्यावरच त्याचं वाक्य उलटवण्या इतपत त्याची कीव येते. त्या प्रसंगाने मोठ्या बुचकाळ्यात पडलेल्या पालकांची व्यथा-
देश आपला
भाषा आपली
ती वापरायला
आपली आपल्यालाच
का चोरी
सारख्या छोट्याश्या कवितेने मांडली आहे.
"Is your company multi lingualism inclusive or exclusive?" हा सवाल विचारण्यात चित्रपट मागे पडला आहे. तरी, अमेरिकेतून, बंगळुरूतून आलेल्या माजी विद्यार्थ्यांच्या समाजसेवीवृत्तीने शिक्षणातील सृजनशीलतेला संपूर्ण न्याय दिला आहे. त्या स्वरूपात एक शैक्षणिक आदर्श (educational model) साकारण्यात चित्रपट पूर्ण यशस्वी झाला आहे. त्यात कुठेही टीकात्मक सूर नसून सृजनशील रचनेने फक्त सकारात्मक आशावाद घेऊन प्रेक्षक चित्रपटगृहाबाहेर पडतो.
एक विशेष नमूद करावंसं वाटतं-
चित्रपटातील पालकांची भूमिका खूपच जबाबदार पालकत्वाची दाखवली आहे. अगदी आदर्श म्हणावी तशी. भरमसाठ फी भरून शाळेवर शिक्षणाची जबाबदारी सोपावणारा दुर्बल विचार त्यात नाही. उलट, पाल्ल्यासाठी पालकाला अभ्यास करायला लावणारी जबाबदार भूमिका विचार करायला लावणारी आहे. सातवीतल्या मुलाने वडिलांच्या श्रीमुखात भडकावणे कुठेही कुरूप वाटू नये इतका छान संवाद ह्या कुटुंबात आहे. आजी आणि नातवाच्या प्रेमळ नात्याच्या सूत्राने हा चित्रपट बांधला आहे.
एक तास एकोणपन्नास मिनीटांचा हा चित्रपट आजच्या मराठी शाळांसाठी आणि इंग्रजीमाध्यमाचा हट्ट धरणाऱ्या, बड्या शैक्षणिक संस्थांच्या ब्रॅण्डबाजीने फसणाऱ्या पालकांसाठी शर्करावगुंठित समजूतीचे औषध आहे.
हा सारा खाटाटोप कश्यासाठी? आपल्या मुलांचे बालपण हरवू नये ह्यासाठी हे चित्रपटाने स्पष्टपणे सांगितले आहे.
तेव्हा चित्रपटगृहात जाऊन आवर्जून बघा हास्य-विनोदाने भरलेला पैसावसूल मराठी चित्रपट- बाल भारती.
-गंधार.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा