शनिवार, ११ फेब्रुवारी, २०२३

ढोंगीपणा

काल एक वाक्य वाचनात आलं.
"भित्र्या तारुण्यातून ढोंगी समाज निर्माण होतो." (सुनीता देशपांडे यांच्या प्रिय जी. ए. पुस्तकातून)
दिवसभर हे एकच वाक्य डोक्यात घोळत राहिलं.
देवाधर्माची भीती, समाजापासून भीती, पालकांपासून भीती, वगैरे किती विविध धाक आणि भीतींमधून  तरुणपिढी जात असते? त्यातून पळवाटा काढायला काय काय उपाय करते आणि हेच उपाय अंगवळणी पडता, कुठकुठल्या ढोंगीपणाला नकळतपणे आत्मसात करते ही खरंच विचार करण्यासारखी गोष्ट आहे. कुठलीही पळवाट न काढता दडपणाखाली जगणारे पुढे, मनाची समजूत घालून, आहे तेच स्वीकारून भीतीपासूनच भीऊन जगताना दिसतात. हे सारं आपल्या भोवताली घडत असतं. ते आपण स्वीकारलेलं असतं किंवा त्याकडे दुर्लक्ष करायची आपल्याला सवय झालेली असते. 

ज्या ज्या समाजाला आचार-विचारांच्या चौकटी असतात त्या त्या समाजात ढोंगीपणा अगदी स्वाभाविकपणे सहज पसरतो.  स्वैराचाराची मर्यादा हे स्वतंत्रतेचे दुसरे टोक. ते कोणीही ओलांडू नये. पण, मुक्तपणे बौद्धिक, मानसिक आणि शारीरिक संचार करायच्या तरुण वयात स्वातंत्र्य गमावणे हे समाजासाठी घातकच.
एकाद्या गोष्टी बाबत धाक घालणे- ज्याला प्री-कंडिशनिंग म्हणणे इष्ट, हे बहुधा लहानपणापासूनच केलेलं असतं. त्याच दडपणाच्या भीतीखाली मनुष्य घडत गेला की पळवाटा शोधत किंवा स्वतःच्या भ्रामक समजूता घालत ढोंगीपणाचा आपोआप जन्म होतो.
उदाहरणार्थ-  चोरून खाणं आणि चोरून वागणं हे ढोंगीपणाचं लक्षण. इथे चोरी हा शब्द व्यापक अर्थाने वापरला आहे. "कोणीही जन्मजात चोर नसतो. परिस्थिती चोर निर्माण करते," हे विधान देखील आपल्या विषयाला समांतर जाणारंच. 
अशी आणिक कितीतरी  उदाहरणं तपशीलवार देता येतील. ती विस्तारभयाने टाळणे इष्ट समजतो. सुनीताबाईंच्या ह्या विधानावर आपणही मुक्तपणे विचार करावा म्हणून पुन्हा वाक्य लिहीतो-
 
"भित्र्या तारुण्यातून ढोंगी समाज निर्माण होतो."

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा